इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २९ मार्च, २०२२

तृतीयपंथीय मतदार नोंदणीसाठी शुक्रवारी विशेष शिबीराचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी दिनानिमित्त तृतीय पंथीयांसाठी शुक्रवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदार नोंदणीच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.

तृतीय पंथीयांचे मतदार नोंदणीबाबतचे शिबीर उपविभागीय अधिकारी कार्यालय करवीर, निवडणूक शाखा, कोल्हापूर येथे होणार असून याचा लाभ मतदार म्हणून नोंद नसलेल्या सर्व तृतीय पंथीयांनी घ्यावा. या दिवशी मतदार म्हणून नाव नोंदविण्याकरिता पत्याचा पुरावा तसेच वयाचा पुरावा उपलब्ध नसल्यास नमुना अर्ज 6 मधील जोडपत्र 2 व 3 भरून एका रंगीत छायाचित्रासह अर्ज स्विकारले जाणार आहेत.

राज्याचे मुख्‍य निवडणूक अधिकारी यांच्या दिनांक 17 मार्च 2022 च्या पत्रान्वये दिनांक 31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. या आदेशाप्रमाणे दिनांक 27 मार्च ते 2 एप्रिल हा तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह म्हणून साजरा करुन त्या अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

0000000

 

 

 

 

जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

 


          कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. त्याची आचारसंहिता लागू झाली असल्याने दि. 4 एप्रिल रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली आहे.

00000

रविवार, २७ मार्च, २०२२

जिल्ह्यातील कृषी उत्पादनांच्या ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत - पालकमंत्री सतेज पाटील

 









कोल्हापूर दि. 27 (जिमाका) : कोल्हापूर, दि.27: कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या कृषी उत्पादनांच्या ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. यासाठी कृषी विभागातील तरुण अधिकाऱ्यांनी चाकोरीबाहेरील नवकल्पनांचा व व्यावसायिकरित्या समाजमाध्यमांचा वापर करावा, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

राजाराम कॉलेज परिसरात आयोजित राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळा व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत धान्य, तांदूळ व गुळ महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्री.  पाटील यांनी धान्य, तांदूळ, गुळ विक्री स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व खाद्य पदार्थ खरेदी केले. तसेच, विविध कृषी उत्पादनांची माहिती घेऊन शेतमालाच्या ब्रँडिंग, मार्केटिंगसाठी प्रयत्न करु, असे सांगितले.

यावेळी कृषी विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु.बी. होले, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी 'पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व आहारातील महत्व' या घडीपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच ऑनलाइन बीजप्रक्रिया स्पर्धेतील विजेते प्रदीप शिरामे, सुरेखा पाटील, अजित सौदे या शेतकऱ्यांचा व कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा पालकमंत्री श्रीपाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात गुळ, तांदूळ, काजू, भाजीपाला, नाचणी, नाचणीचे बिस्कीट आदी शेतमाल व विविध खाद्यपदार्थ दर्जेदार आहेत. जिल्ह्याला लाभलेल्या विशेष भौगोलिक स्थानाचा उपयोग करून घेऊन येथील शेती उत्पादन कोकण,गोव्यासह अन्य राज्यांच्या बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावा. अनेक महामार्गांना जिल्हा जोडला जात असल्याने याचा फायदाही शेतमालाच्या वितरण व विक्री व्यवस्थेसाठी करता येईल, असे सांगून भविष्यातील विमानतळाच्या कार्गो सुविधेचा लाभ देखील शेतकरी व कृषी उद्योजकांना थेट निर्यातीसाठी होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याच्या प्रगतशील वाटचालीत विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण वाटा असून यापुढेही कृषी, सहकार, उद्योग क्षेत्रासह सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे म्हणाले, शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन देणे, ऊस उत्पादकता वाढवणे, पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या ऊसाची नुकसान भरपाई म्हणून अर्थसहाय्य करणे, नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र करुन गट शेतीसाठी प्रोत्साहन देणे, नाचणी प्रक्रिया उद्योग सुरु होण्यासाठी अर्थसहाय्य देणे अशा माध्यमातून शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग प्रयत्न करत आहे.

यावेळी, प्रा. डॉ. योगेश बन, डॉ.संदीप पाटील, डॉ. सुजित हलर्नकर, डॉ.पुनम पाटील, डॉ. प्रवीण मत्तीवाडे, डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. याठिकाणी लावण्यात आलेल्या धान्य, तांदूळ, गुळ, व खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स ला ग्राहकांनी भेट देवून खरेदी केली.

00000000

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुक : 17 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध


 

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक 2022 साठी 17 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे आज झालेल्या छाननीत वैध ठरली तर 2 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.

       276-कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी वैध ठरलेली नामनिर्देशनपत्रे पुढील प्रमाणे-जाधव जयश्री चंद्रकांत(आण्णा) (इंडियन नॅशनल काँग्रेस),  सत्यजीत (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी), यशवंत कृष्णा शेळके [नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)], विजय शामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी), शाहीद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी), आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष), देसाई सुभाष वैजू (अपक्ष), बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष), भोसले भारत संभाजी (अपक्ष), मनिषा मनोहर कारंडे (अपक्ष), माने अरविंद भिवा (अपक्ष), मुस्ताक अजीज मुल्ला (अपक्ष), मुंडे करुणा धनंजय (अपक्ष), राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष), राजेश सदाशिव कांबळे (अपक्ष), संजय भिकाजी मागाडे (अपक्ष) व संतोष गणपती बिसुरे (अपक्ष),

0000

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिकांना आर्थिक मदत

 


 

कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या कल्याणकारी निधीतून माजी सैनिकांना सदनिका खरेदी व मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिली.

पन्हाळा तालुक्यातील माजी सैनिक दिपक गौड, मौजे बहिरेवाडी यांना सदनिका खरेदिकरिता व माजी सैनिक दत्तात्रय सनगर, मौजे माले यांना त्यांच्या मुलाच्या शिक्षणाकरिता प्रत्येकी 50 हजार रुपयांचा धनादेश प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री. खेडेकर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.

00000

शेतकऱ्यांनी जुने पॉवर टिलर खरेदी न करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

 


 

कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : काही अधिकृत विक्रेते कर्नाटक राज्यात विक्री झालेले पॉवर टिलर कमी किंमतीत खरेदी करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्री करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वितरकांच्या भूलथापांना बळी न पडता असे जुने पॉवर टिलर खरेदी करु नयेत अन्यथा त्यांना अनुदान मिळणार नाही अथवा मिळाले असल्यास वसुल केले जाईल. त्यामुळे पॉवर टिलर खरेदी करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

केंद्र व राज्य शासनामार्फत कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध कृषि अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येतात. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर अशा अवजारांचा/यंत्रांचा समावेश आहे. यासाठी भरघोस अनुदान देखील उपलब्ध आहे. तसेच या प्रकरणी दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे श्री. वाकुरे यांनी सांगितले.

000000

काजलच्या पालकत्वासाठी संपर्काचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : कु. काजल सोनार ही दि. 7 मे 2019 रोजी चाईल्ड लाईन मार्फत व बालकल्याण समितीच्या आदेशानुसार जरग नगर येथील शिशु आधार केंद्रात दाखल झाली आहे. काजल संस्थेत दाखल झाल्यापासून आजपर्यंत तिला भेटण्यासाठी कोणीही आले नाही. तिच्याविषयी कोणाला पालकत्व सांगावयाचे असल्यास बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत महिला जीवन संवर्धक मंडळ, माझे माहेर, संचलित शिशु आधार केंद्र, जरगनगर, कोल्हापूर येथे योग्य त्या कागदपत्राच्या पुराव्यासह पालकत्वाचा दावा करावा, असे आवाहन शिशु आधार केंद्राच्या अधीक्षिका सुनीता भोसले यांनी केले आहे.

मुदतीनंतर कु. काजल सोनार हिच्या पुर्नसवन संदर्भात सुरु केलेली प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत थांबविली जाणार नाही. अधिक माहितीसाठी श्रीमती जरग 9930359499 यांच्याशी संपर्क साधावा.

00000

 

मटण विक्रेत्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या मटणाचीच विक्री करावी

 


 

कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : शहरातील मटण विक्रेते महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित न केलेले मटण विक्री करीत असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले आहे. या प्रकरणी बऱ्याच वेळा मटण विक्रेत्यांना दंड देखील करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व मटण विक्रेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कत्तलखान्यामध्येच बकरे कत्तल करावेत आणि महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले मटणच विक्री करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. ना. शिंगाडे यांनी केले आहे.

 

स्वतःच्या व्यवसायाच्या ठिकाणीच बकरे कत्तल केल्याने तेथून निघणारे सांडपाणी नाल्याद्वारे नदीमध्ये मिसळून नदी प्रदुषण होऊ शकते तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित न केलेले मटण विक्री केल्याने शहरातील लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका संभवतो. तरी देखील बहुतांश मटण विक्रेते महानगरपालिकेच्या कत्तलखान्यामधून बकरे कत्तल न करता स्वतःच्या व्यवसायाच्या ठिकाणीच बकरे कत्तल करीत असल्याचे आणि वारंवार महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित न केलेले मटण विक्री करित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील मटण विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत.

 

या नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या मटण विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई समवेत परवाना निलंबन तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे, याची सर्व मटण व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त श्री. शिंगाडे यांनी कळविले आहे.

0000000

मतदारांनी शंकांच्या निराकरणासाठी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा

 


 

कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. 276 मतदार संघातील मतदारांना काही शंका किंवा अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी 0231-2652954 (Voters helpline) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांनी केले आहे.

शंकांचे निराकरणाची सेवा (24x7) 24 तास उपलब्ध राहील, असेही श्री. क्षीरसागर यांनी कळविले आहे.

00000

गुरुवार, २४ मार्च, २०२२

पेड न्यूज व उमेदवाराच्या जाहिरात खर्चावर माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीची करडी नजर -जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार


 


* जिल्हा माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीची(MCMC) बैठक संपन्न

* राजकीय पक्ष व उमेदवारांनी जाहिरातीचे प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य

* नागरिकांनी पेड न्यूज बाबत तक्रार असल्यास diokop@gamil.com ई-मेल वर द्याव्यात

 

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी मोहीम करावयाची असेल तर संबंधित ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स व मजकूर जिल्हा माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणित करून घ्यावा. तसेच कोणत्याही प्रकारची पेड न्युज करू नये अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच राजकीय पक्ष उमेदवाराच्या निवडणूक जाहिरात खर्चावर समितीची करडी नजर राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी सांगितले.

           जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हा माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीच्या पहिल्या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. रेखावर मार्गदर्शन करत होते. यावेळी समितीचे सदस्य निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी प्रवीण चिपळुणकर, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, सायबर तज्ञ विक्रांत पाटील, प्रा. शिवाजी जाधव, जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव सुनील सोनटक्के, माहिती अधिकारी तथा सहाय्यक नोडल अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहाय्यक एकनाथ पोवार आदी उपस्थित होते.

          जिल्हा निवडणूक अधिकारी रेखावार पुढे म्हणाले की, समितीच्या सर्व सदस्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष व उमेदवाराच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर अधिक बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच दैनंदिन वृत्तपत्रातून प्रसारित होणाऱ्या राजकीय व प्रचाराच्या बातम्यांची निवडणूक आयोगाच्या पेड न्युज संदर्भातील मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योग्य ती तपासणी करून संबंधित वृत्त पेड न्यूज सदृश्य असल्यास तात्काळ समिती समोर ठेवावे व संबंधित उमेदवाराला त्या पेड न्यूजचा खर्च त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याबाबत नोटीस देण्याबाबत प्रस्तावित करावे, अशी सूचना त्यांनी केली.

         जिल्ह्यातील सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया प्रतिनिधिनी कोणत्याही राजकीय पक्षाची व उमेदवाराची जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी त्या जाहिरातीचे प्रमाणीकरण माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीकडून करण्यात आलेले आहे का याची खात्री करावी व त्यानंतर त्याचे प्रसारण करावे. कोणीही अनाधिकृत जाहिरात प्रसारित करू नये अन्यथा निवडणूक नियमावलीप्रमाणे संबंधितांवर कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश श्री. रेखावार यांनी दिले. तसेच जिल्ह्यात जे अनाधिकृत यूट्यूब चैनल आहेत त्या सर्वांनी राजकीय पक्ष व उमेदवाराची विना परवानगी जाहिरात प्रसारित करू नये, अन्यथा संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी निर्देशित केले.

     यावेळी समिती सदस्यांनी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवावे, पेड न्युज नियंत्रण याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच समितीकडे आलेल्या राजकीय पक्ष उमेदवाराचे व्हिडीओ क्लिप, ऑडिओ क्लिप व आणि जाहिरात मजकुराचे निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे विहित वेळेत प्रमाणीकरण करून देण्यात येईल असे सांगितले.

       प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव सोनटक्के यांनी जिल्हा माध्यम व प्रमाणीकरण सनियंत्रण समितीची रचना व कार्य याविषयी बैठकीत सविस्तर माहिती दिली.

पेड न्यूजच्या अनुषंगाने नागरिकांनी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तक्रारी द्याव्यात

             276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने कोणत्याही राजकीय पक्ष व उमेदवारा बाबत पेड न्यूजच्या अनुषंगाने तक्रारी असतील तर नागरिकांनी जिल्हा माहिती कार्यालय यांच्या ई-मेल diokop@gmail.com वर द्याव्यात, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

276 - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक राजू नारायण स्वामी यांची नियुक्ती

 

 

कोल्हापूर दि. 24 (जिमाका) : 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक 2022 साठी निवडणूक निरीक्षक म्हणून राजू नारायण स्वामी (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8767751508 हा आहे. निवडणूक निरीक्षक श्री. स्वामी यांनी आज निवडणूक कार्यालयाला भेट देऊन निवडणूक कामकाजाबाबत माहिती घेतली व या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. 

 

निवडणूक निरीक्षक शासकीय विश्रामभवन, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील भुदरगड या कक्षात वास्तव्यास असून निवडणुकीसंदर्भात ज्यांना भेटावयाचे आहे, त्यांना दररोज सायकांळी 4 ते 6 या वेळेत शासकीय विश्रामभवन, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे भेटता येईल.

0000000

26 व 27 मार्चला दस्त नोंदणीचे कार्यालय सुरू -मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जून माने

 


कोल्हापूर दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये दि. 26 व 27 मार्च रोजी शासकीय सुट्टीतही सुरू ठेवण्यात येणार आहेत. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जून माने यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.1, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.2, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.3, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.4, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, इचलकरंजी  क्र.1, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, इचलकरंजी क्र.2, दुय्यम निबंधक श्रेणी-1,  शिरोळ, दुय्यम निबंधक श्रेणी-1, हातकणंगले या कार्यालयांचा समावेश आहे.

0 0 0 0 0 0 0

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजेनेकरिता अर्ज करण्यास मुदतवाढ

 

कोल्हापूर दि. 24 (जिमाका) : कोरोना -19 च्या प्रादुर्भावामुळे  सन 2020-2021 व 2021-22 या दोन वर्षाच्या शैक्षणिक कालावधीमध्ये संस्था / महाविद्यालये प्रत्यक्ष बंद होती. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी भोजन, निवास, निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः उपलब्ध करुन घेतल्या आहेत व स्वत:च्या घरी अथवा खोली भाड्याने घेवून ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण घेतले असेल अशा पात्र विद्यार्थ्यांसाठी अर्ज सादर करण्यास 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ, बाबर हॉस्पिटल शेजारी कोल्हापूर संपर्क क्रमांक -०२३१-२६५१३१८ येथे संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

बुधवार, २३ मार्च, २०२२

शासकीय भरणा केल्यापासून चार महिन्यात कधीही दस्त नोंदणी

 


 

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): गेल्या काही दिवसांपासुन दस्त नोंदणीसाठी मालमत्ता खरेदीदारांची नोदंणी कार्यालयात गर्दी वाढत आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सर्व्हरची गती कमी होऊन दस्त नोंद करण्यास वेळ लागत आहे. यामुळे 31 मार्च  पूर्वी शासकीय चलनाचा भरणा झालेल्या दस्ताची नोंदणी पुढील चार महिन्यात कधीही सध्याच्या रेडिरेकनरच्या दरावर करता येते. जास्तीत-जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च अखेरीला गर्दी करु नये, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले आहे.

1 एप्रिल  नंतर रेडीरेकनरच्या दरात वाढ होईल व मुद्रांक शुल्कामध्ये (स्टॅम्प ड्युटी) जास्तीची रक्कम भरावी लागेल या शक्यतेने मालमत्ता खरेदीदार 31 मार्चपूर्वी दस्त नोंदणी करण्याची घाई करीत आहेत. जे मालमत्ताधारक 31 मार्च 2022 पूर्वी दस्तांवर खरेदीदार व विक्रेत्याच्या स्वाक्षरी करणे (दस्त निष्पादन करून घेणे ), शासकीय चलनाचा भरणा( मुद्रांक शुल्क व नोदणी शुल्क) चलनाव्दारे 31 मार्च  पूर्वी झाला असेल अशा दस्ताची नोंदणी दस्त नोंदविल्यापासून (निष्पादित केल्यापासून) पुढील चार महिन्याच्या आत सध्याच्या रेडीरेकनरच्या दरावर करता येते.

नवीन रेडीरेकनर लागू झाले तरी अतिरिक्त भुर्दंड लागणार नाही. तसेच पक्षकारांच्या सोईसाठी दररोज 1 ते 2 तासांनी वेळ वाढून देण्यात आली आहे, असेही श्री. माने यांनी म्हटले आहे.

000000

उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरातील प्रतिबंधात्मक आदेशास मुदतवाढ


 

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): उचंगी लाभक्षेत्रातील लोकांनी त्यांच्या पुनर्वसन मागणी संदर्भात वेळोवेळी मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे, ठिय्या आंदोलने करुन धरणाचे कामकाज वेळोवेळी बंद पाडलेले आहे. उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात धरणाचे कामकाज बंद करुन येथील यंत्रसामुग्रीचे नुकसान व जाळपोळ होण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी ठिकाणापासून 2 किमी परीघ व्यासामध्ये दि. 24 मार्च रोजी रात्री 12.00 ते दि. 7 एप्रिल  रोजी रात्री 12.00 या कालावधीत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये कोणत्याही व्यक्ती व वाहनांना परवानगी शिवाय संचार करण्यास जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी बंदी घातली आहे. यापूर्वीच्या 23 मार्च पर्यंतच्या प्रतिबंधात्मक आदेशास मुदतवाढ दिली आहे.

उचंगी लघुपाटबंधारे काम सन-2000 पासून सुरु असून उचंगी लाभक्षेत्रातील लोकांनी त्यांच्या पुनर्वसन मागणी संदर्भात वेळोवेळी केलेले मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे, ठिय्या आंदोलने करुन धरणाचे कामकाज वेळोवेळी बंद पाडले आहे. धरणाच्या अंतिम टप्यातील घळभरणीचे काम सुरु असून वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्या नसल्याचा व घळभरणीचे काम पूर्ण झाले की उर्वरित मागण्या मान्य होणार नाहीत असा धरणग्रस्तांचा झालेला समज व काही प्रकल्पग्रस्त हे घळभरणीचे काम बंद पाडण्यासाठी एक जमाव करुन धरणाचे कामकाज बंद करुन तेथील यंत्रसामुग्रीचे नुकसान व जाळपोळ करण्याची दाट शक्यता आहे. यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

आदेशापूर्वी संबंधितांना नोटीस बजावणी करणे शक्य नसल्याने, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे.  आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील.

उचंगी प्रकल्पासाठी कार्यरत अधिकारी/कर्मचारी/पोलीसवर्ग व कामासाठी उपयोगात येणारी वाहने, मशीनरी, संसाधने, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची वाहने यांच्यासाठी हा आदेश लागू राहणार नाही, असेही आदेशात नमुद आहे.

0000

शासकीय जमिनींमध्ये गौण खनिज उत्खनन परवानगीसाठी खनिकर्म अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करा

 


 

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): गौण खनिज खाणपट्याकरिता शासकीय जमीनीच्या लिलावाकरिता कार्यपध्दती अनुसरुन जमीनींचे जाहिर लिलाव करण्याचे नियोजन  करण्यात आले आहे. इच्छुक सर्व व्यावसायिकांनी कोणत्याही शासकीय जमिनींमध्ये गौण खनिज (दगड, माती, मुरुम) उत्खननाची परवानगी हवी असल्यास त्या जमिनीचा 7/12, 8अ उताऱ्यासह लेखी अर्ज जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार वजिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी केले आहे.

लिलावाची विहित प्रक्रिया पूर्ण करून शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनीसुध्दा अशा लिलाव योग्य जमिनींची माहिती खनिकर्म कार्यालयास सादर करावी.

शासकीय जमिनीसाठी लिलाव प्रक्रियेसाठी अर्ज सादर करताना जमिनीचे किमान क्षेत्र एक हेक्टर असावे व शासकीय जमीन ही गायरान, राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव अभयारण्ये, इनामी, देवस्थान जमीन, राखीव वनक्षेत्र किंवा वनसंज्ञेत सामाविष्ट नसावी या निकषांचे पालन करावे.

खासगी जमिनीवरील खाणपट्टे खासगी जमीनधारक किंवा भोगवटादार यांच्या नावे मंजूर करण्यासाठी लिलाव प्रक्रियेमधून वगळण्यात येतील आणि खासगी जमिनधारकास किंवा भोगवटादारास त्यांच्या अर्जानुसार खाणपट्टा मंजूर करण्यात येईल. खासगी जमीनधारक किंवा भोगवटादार त्यांची जमीन अन्य व्यक्तीस खाणकामासाठी देण्यास इच्छुक असेल तर, असा जमीनधारक किंवा भोगवटादार, जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधात लेखी संमतीपत्रक देईल. नंतर जिल्हाधिकारी विनिर्दिष्ट कालावधीकरिता लिलावाने अशा जमिनीत खाणकाम करण्याचा हक्क मंजूर करतील. अशा प्रकरणी लिलावापासून प्राप्त झालेली रक्कम शासनाकडे जमा करण्यात येईल व शासनाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात येणारी भूपृष्ठ भाड्याची रक्कम जमीनधारक किंवा भोगवटादार यांना देण्यात येईल.

00000

 

 

 

 

 

 

मंगळवार, २२ मार्च, २०२२

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक - श्रीकांत देशपांडे

 





कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) :  चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक जाहीर  झाली आहे. या पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नाला, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साथ देवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजर्षि शाहूजी सभागृहात श्री. देशपांडे  यांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, प्रांताधिकारी अमित माळी आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे पुढे म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी जास्तीत-जास्त असिस्टंटची (B.L.A.) नियुक्ती करावी. तसेच आदर्श आचारसंहितेच्या पालनाकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. प्रशासनाने B L O ची संख्या वाढवावी, असे निर्देश देवून ते म्हणाले, निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग होवू नये म्हणून ‘सी व्हीजल ॲप’ बनविले आहे. याचा वापर पदाधिकाऱ्यांनी करावा. त्याचबरोबर मतदात्यांनी ‘वोटर्स हेल्पलाईन ॲप’ चा वापर करुन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 311 मूळ व 47 सहाय्यकारी मतदान केंद्रे अशी एकूण 358 मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात 11 हजार वरिष्ठ मतदार (सिनिअर सिटीझन) आहेत तर 249 दिव्यांग मतदार असल्याची माहिती देवून या निवडणुकीत मतदात्यांनी कोविडच्या नियमांचे पालन करून मतदान टक्केवारी वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

तर मतदात्यांनी या निवडणुकीसाठी पॅन/आधार कार्ड, मनरेगा सेवा पत्र, बँक/पोस्ट ऑफीसचे छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा योजनापत्र (हेल्थ स्मार्ट कार्ड), लायसन्स, पासपोर्ट, छायाचित्रासह निवृत्तपत्र, केंद्र, राज्य, निम्न शासकीय कर्मचारी ओळखपत्र, केंद्र सरकारचे दिव्यांग ओळखपत्र, संसद, विधानसभा/परिषद सदस्यांचे कार्यालयीन ओळखपत्र अशा एकूण 12 विविध बाबींचा मतदान छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक्त ओळखीचा पुरावा म्हणून मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.

या बैठकीसाठी इंडियन नॅशनल कॉग्रेसचे संजय पोवार (वाईकर), बंडोपंत मालप,  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सुनिल देसाई, भाजपाचे चंद्रकांत घाटगे, बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे, माकपचे शंकर काटाळे, लोकराज्य जनता पार्टीचे शशिकांत जाधव व आम आदमी पक्षाचे अभिजीत कांबळे आदी उपस्थित होते.

00000

सोमवार, २१ मार्च, २०२२

276- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : आज एक नामनिर्देशनपत्र दाखल

 


 

कोल्हापूर दि. 21 (जिमाका) : 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज यशवंत कृष्णा शेळके [पक्ष- नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)] यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्याकडे एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

0 0 0 0 0 0 0

शनिवार, १९ मार्च, २०२२

शासन पुरस्कृत योजना कर्ज प्रकरणात व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकी जपत कर्ज प्रकरणे मंजूर करावीत -मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण

 



कोल्हापूर (जिमाका) दि. 19 :  शासन पुरस्कृत योजनांची कर्ज प्रकरणे मंजूर करताना बँकांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेऊन सामाजिक बांधिलकी जपत कर्ज प्रकरणे प्राधान्याने मंजूर करावीत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांनी जिल्हास्तरीय सल्लागार आणि आढावा समितीच्या बैठकीत दिल्या.

जिल्हा अग्रणी बँक जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. बैठकीस प्रकल्प संचालक रवी शिवदास, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, बँक ऑफ इंडिया कोल्हापूरचे उपआंचलीक प्रबंधक सिवा कुमार, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक डॉ. आशुतोष जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक गणेश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यास 2021-22 मध्ये पीक कर्जाचे वार्षिक उद्दिष्ट रू.2720 कोटीचे देण्यात आले असून फेब्रुवारी 2022 अखेर रू.2330 कोटी इतके वाटप झाले  आहे. हे प्रमाण वार्षिक उद्दिष्टाच्या 86% टक्के इतके आहे. उर्वरित पीक कर्ज प्रकरणे  बँकानी तत्काळ मार्गी लावून  उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावे. शासकीय महामंडळामार्फत बँकाकडे पाठविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये बँकांचे काम असमाधानकारक याबाबत सुधारणा करणा करण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत 2021-22 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला 7410 बचत गट मध्ये 160 कोटीचे उद्दिष्ट असून 112 टक्के भौतिक व 97 टक्के आर्थिक उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे  प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास  यांनी बैठकीत सांगितले.  जिल्ह्यात एमएसआरएलएम कर्ज वाटपामध्ये बँक ऑफ इंडिया व एचडीएफसी बँक आघाडीवर असल्याचे ते म्हणाले.

पीएमईजीपी अंतर्गत कर्ज मंजूरीमध्ये जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेचे सांगून कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र मध्ये आघाडीवर असून देशात दुसरा असलेचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी सांगितले.

अग्रणी जिल्हा व्यवस्थापक गणेश शिंदे यांनी  वार्षिक ऋृण योजना व सर्व महामंडळाचे उद्दिष्ट व मंजूरी तसेच प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेतला. वार्षिक पतपुरवठा आराखडा 2021-22 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यास प्राथमिक क्षेत्राकरीता 10हजार 210 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2021 अखेर एकूण उद्दिष्टापैकी 6 हजार 795कोटी (67% वार्षिक) इतकी उद्दिष्टपूर्तता झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

 जिल्ह्यात 31 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत 12 लाख 21 हजार 947 खाती उघडण्यात आली असून 8 लाख 70 हजार 282 खात्यामध्ये रूपे कार्ड प्रदान करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 6 लाख 49 हजार 213 खाती उघडण्यात आली असून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची  2 लाख 58 हजार 412 खाती उघडण्यात आली आहेत.  प्रधानमंत्री जीवनज्योती व सुरक्षा विमा योजने अंतर्गत सन 2021-22 मध्ये 214 खातेमध्ये मयत व्यक्तींच्या वारसांना रुनये 4.28 कोटी इतक्या विमाची रक्कम मिळाली आहे. अटल विमा योजने अंतर्गत 2021-22 मध्ये 13 हजार 715 खाती उघडण्यात आली आहेत.  प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना अंतर्गत शिशू, किशोर, तरूण या सर्व योजनामध्ये डिसेंबर 2021 अखेर 86 हजार 896 लोकांना वित्त पुरवठा केला असून त्यांना रुपये 847 कोटीचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

पीएम स्वनिधी योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये पथविक्रेत्यांना कर्ज वाटपाचे काम प्रगतीपथावर असून                 10 हजार 614 अर्ज मंजूर करून आतापर्यंत 10 हजार 154 खात्यामध्ये 10.15 कोटी इतकी रक्कम वाटप केली असल्याने  जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

000000