इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ३० मे, २०२२

शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण 1 जूनपासून सुरु

 


 

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): राज्यातील शिक्षक/मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत दिनांक 1 जून 2022 पासून ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी दिली.

 

प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण 94 हजार 541 नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.

 

ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. हे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.

 

प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता  https://youtu.be/bOXSWx5NHIw या यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनी या उद्बोधन सत्रास उपस्थित रहावे. सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यासाठी दिनांक १ जून  पासून ३० जून पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि. १ जून रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाईल, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी दिली.

000000

शुक्रवार, २७ मे, २०२२

समाज स्वास्थ्य टिकवण्यासाठी तंबाखूमुक्ती गरजेची अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे

 


कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाने होतो. तंबाखूच्या व्यसनाला बळी पडून युवापिढी उध्वस्त होत आहे. त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब रस्त्यावर येतात हे थांबण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी करून समाज स्वास्थ टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी तंबाखूमुक्ती हाच पर्याय असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक  तिरुपती काकडे यांनी केले.

तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यामार्फत तंबाखू नियंत्रण कायदा कोट्पा 2003 यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.  कार्यशाळेत राज्य अधिकारी जिया शेख, जिल्हा सल्लागार चारुलता कणसे, साधन व्यक्ती  अभिजीत संघवी आदी उपस्थित होते.

 यावेळी पुढे बोलताना श्री. काकडे म्हणाले, प्रभावी जनजागृती करून तंबाखू विरोधी चळवळीत लोकसहभाग वाढवला तर तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होईल. पोलिस अधिकाऱ्यांनी कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर जास्तीत जास्त कारवाया करणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी अभिजित संघही, राज्य अधिकारी जिया शेख, जिल्हा सल्लागार चारुशीला कणसे, डॉ. पाटील यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून कोटपा कायद्याच्या विविध कलमांची माहिती दिली.

कार्यशाळेची सूत्र सूत्रसंचालन विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रांती शिंदे यांनी केले. कार्यशाळेचा समारोप तंबाखू विरोधी शपथेचे शपथ वाचन करून करण्यात आला याप्रसंगी जिल्ह्यातील मोठ्याप्रमाणावर अधिकारी कार्यशाळेस उपस्थित होते.

 0 0 0 0 00 0

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना

 


            कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर मार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहे. सन 2022-23 अर्थिक वर्षाचे उदिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जाती मधील महार, नवबौध्द, हिंदू खाटीक, वाल्मीकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम, बेडाजंगम, भंगी या प्रवर्गामधील लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापन एस. एम. पवार यांनी केले आहे.

        अनुदान योजना- उद्दिष्ट - भौतिक 80, आर्थिक 8 लाख रुपये ही योजना 50 हजार पर्यंत असून त्यामध्ये 10 हजार रुपये अनुदान म्हणून व 40 हजार रुपये पर्यंत बँक कर्ज लाभार्थीला दिले जाईल.

            बीजभांडवल योजना – उद्दिष्ट – भौतिक 80, आर्थिक अनुदान 8 लाख व बीजभांडवल 40 लाख ही योजना 50 हजार ते 5 लाखापर्यंत असून बँकेची रक्कम 75 टक्के, लाभार्थीचा सहभाग 5 टक्के, महामंडळाचे बीजभांडवल 20 टक्के व अनुदान 10 हजार रुपये दिले जाईल.

            प्रशिक्षण योजना- उद्दिष्ट- भौतिक 80, आर्थिक 24 लाख ही योजना अनुसूचित जातीच्या लाभधारकांना व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधित व्यवसाय सुरु करण्याकरीता विविध व्यावसायिक ट्रेडचे शासनमान्य संस्थेमार्फत 3 ते 6 महिन्यापर्यंत प्रशिक्षण देण्यात येते. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दूरध्वनी क्रमांक 0231-2663853 या कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन

 


          कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): खरीप हंगामासाठी शेतकऱ्याकडून बी- बियाणे, किटकनाशके यांची खरेदी सुरु आहे. वितरकांकडून खते, बियाणे किटकनाशके यांची विक्री जादा दराने केली जावू शकते. शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी कृ‍षि विभागाकडून ठोस कारवाई करण्याच्या उद्देशाने तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी व महिला शेतकऱ्यांना निविष्ठा, बी-बियाणे, खते, किटकनाशके यांच्या खरेदी व विक्रीबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्षात तक्रार करावी. याबाबतच्या येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याकरिता जिल्हास्तरावर निवारण कक्ष स्थापन केला आहे. तक्रार करण्यासाठी कृषि अधिकारी एस. एम. शेटे 0231-2652034/ 9049454649, जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी जी. पी. मठपती 0231-2655403/ 7385990593 यांच्याशी संपर्क साधावा.

000000

 

शाहूवाडी तालुक्यात “शासन आपले दारी” कार्यक्रम

 


          कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान 2022 शासन आपले दारी या मोहिमेअंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर महसूल मंडळातील महसूल सजामधील 24 गावांसाठी गुरुवारी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या उपस्थितीत गाव भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गाव भेट कार्यक्रमामध्ये 7 महसूल सजामधील 24 गावांमधील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यामध्ये शासनाच्या महसूल, कृषि, आरोग्य, ग्रामविकास पोस्ट, बँक, महिला व बालविकास विभाग, रोजगार हमी योजना, वन,  सहकार. एस. टी. महामंडळ, वीज वितरण, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना व देण्यात येणा-या सेवा याबाबतची माहिती देण्यात आली.

शाहुवाडी तालुक्यातील 29 शेतक-यांकडून शेतात पिकविलेला सेंद्रीय भाजीपाला व फळभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये पपई, हापूस, आंबा, पेरू, आदी फळे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. कार्यक्रमामध्ये 4 बचत गट सहभागी झाले होते त्यांनी पापड, लोणचे, शेवया, करवंदाची चटणी, रानमेवा विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.

00000

गुरुवार, २६ मे, २०२२

खासबाग मैदानात १ ते ३ जून दरम्यान जिल्हा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन कुस्ती स्पर्धेसाठी एक जून पर्यंत नावनोंदणी करा -जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर साखरे

 

          कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): 'लोकराजा कृतज्ञता पर्व' अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. 1 ते 3 जून 2022 रोजी खासबाग येथील कुस्ती आखाड्यामध्ये फ्री स्टाईल कुस्ती गटामधील वजन गट जिल्हास्तरीय मुले 57,61,65,70,74,79,86,92,97 अशा 9 वजनी गटामध्ये कुस्ती स्पर्धा नॉकऑऊट पध्दतीने घेतल्या जाणार आहेत. या स्पर्धेतील वजनीगट स्पर्धा ही कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित आहेत. तसेच प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक रु. 10 हजार, व्दितीय रु.7 हजार व  तृतीय रु.5 हजार असे बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

         याचप्रमाणे खुल्या गटातील कुस्ती राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन घेणे आहे. या स्पर्धा मुलांसाठी 86 ते 125 एकच वजनी गटामधे व मुलींसाठी 65 ते 76 एकच वजनी गटामधे बाद पध्दतीने कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले असून या स्पर्धांसाठी प्रथम क्रमांक रु.75 हजार,  व्दितीय रु.50 हजार व  तृतीय रु.25 हजार प्रमाणपत्र व शिल्ड प्रदान केले जाईल. या दोन्ही गटाच्या स्पर्धा दिनांक 1 ते 3 जून 2022 रोजी खासबाग मैदान येथे होतील. दि.1 मे 2022 रोजी सकाळी 8 ते 11 पर्यंत वजने घेणे व दुपारी 3  पासून स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी यापूर्वी ज्या मल्लांनी नावनोंदणी केली आहे व ज्या कुस्ती मल्लांनी आज अखेर नाव नोंद केली नाही असे खेळाडू स्पर्धेच्या ठिकाणी दिनांक 1 जून  रोजी सकाळी 8 ते 9 पर्यंत नावनोंदणी करु शकतात. प्रत्येक गटात कमीत कमी 8 खेळाडू आल्याशिवाय तो गट खेळविला जाणार नाही.

            कुस्ती स्पर्धेचे जिल्हास्तर व राज्यस्तर आयोजन असल्याने खेळाडूंना एकाच वजनीगटाच्या स्पर्धेत सहभागी होता येईल. कुस्ती स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातील कुस्ती क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोढावळे- 9823792879 व क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे- 9673451115 यांच्याशी संपर्क साधावा.

000000

 

 

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय

 


 

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहारातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत झाला आहे. याअनुषंगाने भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरीता कोल्हापूर जिल्ह्यामधून दूधगंगा एज्युकेशन ऍ़कॅडमी संचलीत दूधगंगा व्हॅली इंग्लिश मेडीयम स्कुल, इस्पुर्ली, ता. करवीर या शाळेची निवड करण्यास शासन मान्यता देण्यात आली असून या शाळेमध्ये इच्छुकांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

योजनेच्या मूळ तरतुदीनुसार, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये 1 लाख एवढ्या कमाल मर्यादेत असणा-या पाल्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल. योजनेअंतर्गत या शाळेस मंजूर विद्यार्थी संख्या 150 असून यापेक्षा प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्यास विद्यार्थ्यांची निवड ड्रॉ पध्दतीने करून निवड यादी जाहीर करण्यात येईल. नवीन विद्यार्थ्यांना इयत्ता पहीली ते इयत्ता पाचवी या इयत्तेमध्येच प्रवेश देण्यात येईल.

अधिक माहीतीसाठी इच्छुकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर मुख्याध्यापिका, दूधगंगा व्हॅली इंग्लिश मेडीयम स्कुल, इस्पुर्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर ( भ्रमणध्वनी क्रमांक 9372476529 ) यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

 

 


 

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): सहायक आयुक्त, समाजकल्याण कोल्हापूर यांच्यावतीने तृतीयपंथीय व्यक्तींसाठी उद्या शुक्रवार दि. 27 मे 2022रोजी एक दिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये तृतीयपंथीय व्यक्तींना तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रमाणपत्र, ओळखपत्र सहजरित्या प्राप्त होण्यासाठी राष्ट्रीय पोर्टलवर विनामूल्य अर्ज भरण्यात येणार आहेत. तरी या शिबीरामध्ये जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तृतीयपंथीय व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रासह आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत National Portal For Transgender Persons राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पोर्टलवर संपूर्ण राज्यामध्ये अर्ज सादर करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

 

00000

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन इच्छुक स्टार्टअप्सनी सहभागी होण्यासाठी दि. 30 मे पर्यंत अर्ज करावेत

 

 


 

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरूण आणि नव उद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.  यामध्ये सहभागी होण्यासाठी दि. 30 मे पर्यंत अर्ज करावेत. इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. 

            स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत प्राप्त अर्जापैकी अव्वल १०० स्टार्टअप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवूणकरदार तज्ञ यांच्या समितीसमोर सादर करण्याची संधी भेटते व त्यातील विजेत्या २४ स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने सेवा प्रायोगिक तत्वावर संबंधित शासकीय विभागाबरोबर राबविण्यासाठी नाविन्यता सोसायटीमार्फत १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश दिले जातात. यामध्ये कृषी, पायाभूत सुविधा, गतिशीलता आणि संकीर्ण या क्षेत्रांचा समावेश आहे.

महाराष्ट्र स्टार्टअप वीक आजवर चार वेळा यशस्वीपणे संपन्न झाला असून विजेत्या स्टार्टअप्सने राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महावितरण, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था / विभागांसोबत काम पूर्ण केले आहे. यावर्षी देखील प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप वीक २०२२ वे आयोजन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी ईमेल team@msins.in अथवा ०२२-३५५४३०९९ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

रविवार, २२ मे, २०२२

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी 'कृतज्ञता पर्व' समारोप कार्यक्रम

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी 'कृतज्ञता पर्व' समारोप कार्यक्रम









 

शाहू महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज

                           -श्री शाहू छत्रपती महाराज

 

शाहू समाधी स्थळासाठी 8 कोटींचा निधी देवू ; तर हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतीला प्रत्येकी 15 लाखांचा निधी - सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम

 

हजारो हात एकत्र आल्यामुळेच 'कृतज्ञता पर्व' उपक्रम यशस्वी; पालकमंत्री सतेज पाटील यांनी मानले शाहू प्रेमींचे आभार..

शाहू मिल विकास आराखड्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

- पालकमंत्री सतेज पाटील

शाहू राजाचं अधुरं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची

    - ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ

  राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा जगभर जागर करणारा मी शाहूंचा राजदूत

         - डॉ. ज्ञानेश्वर मुळे

 

कोल्हापूर, दि.22(जिमाका): समाजाचे ध्रुवीकरण थांबवून प्रगती साधण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करुन याची सुरुवात कोल्हापूरातच होवू शकते, असा विश्वास श्री शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व दि.18 एप्रिल ते 22 मे 2022 दरम्यान आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा समारोप केशवराव भोसले नाट्यगृहात झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शाहूप्रेमी उपस्थित होते.

 

कृतज्ञता पर्व अंतर्गत '100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला मानवंदना' या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मान्यवरांच्या हस्ते 'राष्ट्रीय रेकॉर्ड प्रमाणपत्र' प्रदान करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यरत 'कृतज्ञता पर्व संयोजन समिती' सदस्य, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत तसेच सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात योगदान देणारे सर्व मान्यवर, संस्था, संघटना, उद्योजक, विविध विभागांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  'विधवा प्रथा बंदी' चा निर्णय घेतल्याबद्दल हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्राम विकास अधिकारी तसेच याविषयी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या शुभांगी थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच तृतीयपंथीयांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. प्रारंभी कृतज्ञता पर्व उपक्रमात  घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांवर आधारित व्हिडिओ चित्रफीत दाखविण्यात आली.     

 

शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी 8 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देवू

                     राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम

हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतीला प्रत्येकी 15 लाखांचा निधी घोषित

तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र बजेटची तरतूद

 

डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर उपलब्ध करुन देवू, हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत विविध उपक्रमांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. विश्वजित कदम म्हणाले, विधवा प्रथा बंदीचा क्रांतिकारी निर्णय घेऊन हेरवाड आणि माणगावने राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतीला सामाजिक विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रत्येकी 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर महाराष्ट्र उभा असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी राज्य शासनाचे काम सुरु आहे, असे सांगून तृतीयपंथी व्यक्तींच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असून त्यांच्यासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करण्यात येत असल्याचेही राज्यमंत्री डॉ.कदम यांनी सांगितले.

राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करुन विविध जाती धर्मियांसाठी बोर्डिंग बांधले. त्यांचे विविध क्षेत्रातील कार्य महत्त्वपूर्ण आहे. शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन सर्वांना अभिमान वाटेल, असे विविध कार्यक्रम कृतज्ञता पर्व मध्ये आयोजित करुन हा सोहळा लोकोत्सव केल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे कौतुक केले. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आपल्या कार्यातून जतन करुया, असे आवाहन करुन त्यांनी शाहू महाराजांना अभिवादन केले.

 

हजारो हात एकत्र आल्यामुळेच 'कृतज्ञता पर्व' उपक्रम यशस्वी; पालकमंत्री सतेज पाटील यांनी मानले शाहू प्रेमींचे आभार..

शाहू मिल विकास आराखड्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

- पालकमंत्री सतेज पाटील

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, शाहू महाराजांचे कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने 'कृतज्ञता पर्व' उपक्रम घेण्यात आला. हजारो हात एकत्र आल्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. कोल्हापूरकरांनी याला चांगली साथ दिली, म्हणूनच हा उपक्रम जगभर पोहोचला. लोकांसाठी.. लोकाभिमुख कारभार असावा, हेच शाहू महाराजांचे विचार  होते. याच विचारांनी कार्यरत असून शाहू महाराज समाधी स्थळाच्या पुढच्या विकासासाठी आठ कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून दिला जाणार आहे, त्यामुळे आता स्मारकाचे काम गतीने होईल. केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा १०० सेकंद स्तब्ध उभे राहण्याचा उपक्रम सर्वांमुळे जगभर पोहोचला. शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्याने एकाच वेळी ३५० ठिकाणी घेण्यात आली. याद्वारे राजर्षी शाहू महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले. शाहू महाराजांचे विचार जोपासणं.. वाढवणं हे या सर्व उपक्रमाचे उद्दिष्ट होते. शाहू मिलच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहून शाहू मिल विकास आराखडा मंजुरीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.  हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब वाखाणण्याजोगी असल्याचे त्यांनी सांगितले. शाहू राजांचे कार्य आणि कर्तृत्व मोठे असून त्यांचा ठेवा जोपासण्याचे काम यापुढेही केले जाईल. शाहूराजांचा विचार समाजात घट्ट रुजले आहेत. कृतज्ञता पर्व अंतर्गत वर्षभर यापद्धतीने कार्यक्रम होणार असून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच शाहूंच्या विचारांचा वारसा  जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. राज्यभरात असे उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

 


शाहू राजाचं अधुरं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची

              -ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ

शाहू राजाचं कार्य सर्वदूर पोहोचवण्याचं काम शाहू प्रेमी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं

 

समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार, विधवांना समाजामध्ये सन्मानाने वावरण्याचा अधिकार राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्याकाळी दिला. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचं शाहू राजाचं अधुरं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असून ही कामे पूर्ण करण्यासाठी शक्ती मिळो, असे उद्गार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

ग्राम विकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा समाजामध्ये घट्ट रुजला आहे. शाहूप्रेमी व शाहू विचारांचा पाईक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबवून देशाला व जगाला प्रेरणा देण्याचं काम केले आहे. कला, क्रीडा क्षेत्राबरोबरच गोरगरीब वंचितांसाठी आपला खजिना रिकामा करणारे मोठ्या मनाचे शाहू राजा होते. शेकडो एकर जमीन त्यांनी गोरगरिबांना देऊन गुरं - ढोरं फिरणाऱ्यांना, शेळ्या - मेंढ्या पाळणाऱ्यांनाही प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि  शाहू महाराजांनी स्वतः चा खजिना रयतेसाठी खुला केला.  28 वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी लोकोपयोगी कामे केली. त्यांच्यासारखा लोकराजा कोल्हापूर जिल्ह्यात जन्माला आला ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

 

शाहू राजांचे विचार व कार्य सर्वदूर पोहोचवणे गरजेचे - डॉ. ज्ञानेश्वर मुळे 

डॉ. ज्ञानेश्वर मुळे  म्हणाले, शाहू महाराजांच्या विचार व कार्य सर्वदूर पोहोचवणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य, समता आणि न्याय जेव्हा सर्वांना मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे विचार रुजल्याचे म्हणता येईल, असे सांगून राजर्षी शाहू महाराज हे सर्वव्यापी होते. राधानगरी धरणाची निर्मिती, खासबाग मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू मिलची निर्मिती अशी अनेक कामे दूरदृष्टीतून साकारुन सामाजिक क्षेत्रात अनेक बदल  घडवले. माणसांची पारख असणारे ते रत्नपारखी होते, असे सांगुन डॉ. मुळे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा जगभर जागर करणारा मी शाहू राजांचा एक राजदूत आहे. राजर्षी शाहू महाराजांमुळेच माझं जीवन घडल्याचे भावुक उद्गार डॉ.मुळे यांनी काढले.

राजा असूनही ऋषितुल्य जीवन जगणारा, जीवनाकडे पाहण्याचा उदार दृष्टिकोन असणारा देशातील एकमेव राजा म्हणजे शाहू महाराज होते. यासाठी त्यांना उत्तर प्रदेशातील कानपूर मधील कुर्मी समाजाने 'राजर्षी' ही उपाधी दिली. त्यांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित कृतज्ञता पर्व हा 'जनउत्सव' बनवल्याबद्दल पालकमंत्री श्री. पाटील व जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांचे त्यांनी कौतुक केले.


शाहू महाराजांच्या विचारांचा जागर यापुढेही सुरु ठेवूया

- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भावनिक साद

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले. या  त्यांच्या कार्यामुळे हा जिल्हा संपन्न असण्याबरोबरच कोल्हापूरला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भौगोलिक दृष्ट्या संपन्न असण्याबरोबरच येथील नागरिकांचे विचारही संपन्न आहेत. कृतज्ञता पर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी कोल्हापूरकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत ६० हुन अधिक कार्यक्रम घेण्यात आले. शाहू महाराजांनी आपल्या अल्प काळातदेखील क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली.  शाहू राजांच्या विचारांनी प्रेरित होऊन हेरवाड गावाने 'विधवा प्रथा बंदी'चा निर्णय घेऊन क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. शाहू महाराजांच्या विचारांचा अनुयायी म्हणून शाहू महाराजांच्या विचारांचा जागर यापुढेही सुरु ठेवूया, अशी भावनिक साद जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात घातली.

 

कृतज्ञता पर्व संयोजन समितीसह विविध मान्यवरांचा सत्कार

कृतज्ञता पर्व संयोजन समितीचे आदित्य बेडेकर, प्राचार्य डॉ.महादेव नरके, प्रमोद पाटील, उदय गायकवाड, ऋषिकेश केसकर, प्रा.अजेय दळवी, सुखदेव गिरी, प्रसन्न मालेकर, अमरजा निंबाळकर, जयदीप मोरे यांनी सर्व उपक्रमांचे यशस्वीपणे संयोजन केल्याबद्दल सर्वांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हातभार लावणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक तसेच जिल्हा माहिती कार्यालय व माध्यमांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रमातून शाहू महाराजांना मानवंदना वाहण्यात आली. सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000