इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाकडून साडेदहा लाखाचा गोवा बनावटीचे मद्य जप्त



कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी येथे काल रात्री उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने लावलेल्या सापळ्यात 10 लाख 52 हजार 840 रुपयांचे गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. गोपाळ नामदेव सावंत, (रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) फिरोज अहमद शेख (रा. निमसालेवाडा, सावंतवाडी) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय मार्गावरुन बेकायदा गोवा बनावट मद्याची वाहतूक करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या फरारी पथकास मिळाली. विभागीय उप आयुक्त वाय.एम.पवार यांच्या आदेशाने आणि जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, उप अधीक्षक बापुसो चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने सापळा लावला. उजळाईवाडी येथे महिंद्र पिकअप वाहन कागलच्या दिशेने येत असल्याचे दिसले. हे वाहन पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला परंतु वाहन न थांबता शिरोलीच्या दिशेने भरधाव वेगाने निघाले. भरारी पथकाने पाठलाग करुन सांगली फाटा येथे वाहन थांबविले.
आतमध्ये वाहनाची तपासणी केली असता रिकाम्या बाटल्यांच्या गोण्याखाली मॅकडॉल नं.1, रॉयल स्टॅग, रॉलय चॅलेंजर्स, विस्कीच्या 750 मि.ली क्षमतेचे 60 बॉक्स मिळून आले. बाजार भावानुसार त्याची 5 लाख 1 हजार 840 रुपये इतकी किमत असून गुन्ह्यात मिळून आलेले वाहन व इतर मुद्देमाल यांची किमत 5 लाख 51 हजार इतकी आहे. या कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, जय शिणगारे यांनी सहभाग घेतला.

पीसीपीएनडीटीच्या अंमलबजावणीसाठी आणि जनजागृतीसाठी जिल्हास्तरावर कार्यशाळा


   


कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आढावा महत्वाचा
- न्यायाधीश पंकज देशपांडे  
कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : बोगस डॉक्टर हा गंभीर विषय आहे. 1994 ला त्या संदर्भात कायदा झाला. प्रभावी  अंमलबजावणी होते की नाही यासाठी आढावा घेणे महत्वाचे आहे. पीसीपीएनडीटीच्या अंमलबजावणीसाठी आणि जनजागृतीसाठी   जिल्हा विधी व प्राधिकरण, पोलीस, वैद्यकीय विभाग आणि सामाजिक संस्था यांची कार्यशाळा वारंवार व्हाव्यात, अशी अपेक्षा जिल्हा व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  पंकज देशपांडे यांनी आज व्यक्त केली.
पीसीपीएनडीटी कायद्या अंतर्गत समुचित प्राधिकाऱ्यांची आज कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये पीसीपीएनडीटी कायदा व त्यातील सुधारणा या विषयावर न्यायाधीश श्री. देशपांडे बोलत होते. सामाजिक आणि कायदेशीर पार्श्वभुमी समजून कार्यवाही करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बाजारात येणाऱ्या प्रत्येक मशिनचे फायदे समजावून देणं, समाज मनावर ते बिंबवनं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचे सकारात्मक फायदे सांगितले पाहिजेत. वारंवार संवाद होण्यासाठी शंकांचे निरसन होण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा झाल्या पाहिजेत, असेही न्यायाधीश श्री. देशपांडे म्हणाले.
 आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे यांनीही यावेळी संवेदशील राहून आपण जबाबदारीने कायद्याची अंमलबजावणी करायला हवी, असे सांगितले. जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनीही स्त्रीभ्रूण हत्याबाबत जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा सांगितला.  पीसीपीएनडीटीच्या कायदे सल्लागार वकील गौरी पाटील यांनी सर्वांचे स्वागत प्रस्ताविक केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी केम्पीपाटील, डॉ. विलास देशमुख, डॉ. हर्षला वेदक यांच्यासह जिल्ह्यातील रुग्णालयांचे अधिकारी उपस्थित होते. 
00000


रब्बी हंगामात पिकांची वाढ समाधानकारक जिल्ह्यात ज्वारीची 9221 हेक्टरवर पेरणी



कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) :  चालू रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झालेल्या रब्बी ज्वारी तसेच अन्य पिकांची वाढ समाधानकारक आहे. जिल्ह्यामध्ये रब्बी ज्वारी 9221 हेक्टर, गहू 871 हेक्टर, मका 1413 हेक्टर, हरभरा 4143 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याचप्रमाणे तंबाखू 456 हेक्टर, भाजीपाला 1903 हेक्टर व चारापिके 2905 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.        
 जिल्ह्यात सन 2019-20 मध्ये ऊस पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 142336 हेक्टर आहे. सन 2018-19 मधील  155584 हेक्टर क्षेत्रावर ऊस पिक आहे. महापुरामुळे नदिकाठच्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून फक्त 59500 हेक्टर क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. सन 2019-20 मधील नवीन आडसाली हंगामातील आतापर्यंत 17880 हेक्टर क्षेत्रावर लागण झाली आहे. पुर्व हंगामी लागणीची कामे सुरू आहेत. आतापर्यंत 27323 हेक्टर लागणीची नोंद झालेली आहे. तसेच सुरू उसाची एकूण 2403 हेक्टर लागण झाली आहे. मध्यंतरी लागणीची कामे खोळांबली होती ती आता सुरू झाली आहेत. सन 2018-19 मधील लागण झालेला ऊस काढणीसाठी तयार झाला असून गळीत हंगामास सुरूवात झालेली आहे. आजतागायत उसाचा खोडवा 13965 हेक्टर इतका असल्याचेही श्री. वाकुरे यांनी सांगितले.
00000




रोजगार मेळाव्यात 406 उमेदवारांची निवड



कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : शिवाजी विद्यापीठ आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्यावतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात 406 बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने काल येथील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर  व विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज.बा.करीम यांच्या हस्ते  करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.टी.साळुंखे हे होते.
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 16 उद्योजकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये एकूण 755 रिक्तपदे (तांत्रिक/अतांत्रिक) अधिसूचित करण्यात आली होती. या रोजगार मेळाव्यात 465 उमेदवार सहभागी झाले होते, त्यामध्ये 406 बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी नोकरीबाबत बेरोजगार तरूणांना व उद्योजकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. सहाय्यक आयुक्त ज.बा.करीम यांनी बेरोजगारांना रोजगार मेळावा व नोकरी विषयक संधी याबाबत मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठाचे प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. जी.एस. राशिनकर यांनी बेरोजगार तरूणांना संभाषण कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.टी.बाठे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व कामकाज कार्यालयातील वरिष्ठ लिपीक अ.रा.खेडेकर व लिपीक वि.वि.धुमाळ  यांनी केले.
00000

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या स्थापनेपासून आजअखेर 16 हजार 770 तक्रारीपैकी 15 हजार 467 वर निकाल - अध्यक्ष सविता भोसले





कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) :  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे स्थापनेपासून 16 हजार 770 मूळ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यामधील आज अखेर 15 हजार 467 प्रकरणात निकाल देण्यात आला आहे. केवळ 1 हजार 303 न्याय प्रविष्ट आहेत, अशी माहिती मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी आज दिली.
ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या  स्थापनेपासून आजअखेर 16 हजार 770 तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 15 हजार 467 प्रकरणात निकाल देण्यात आला आहे, असे सांगून श्रीमती भोसले म्हणाल्या, फौजदारी वसुलीच्या 6 हजार 597 दाखल प्रकरणात 5 हजार 904 निकाल देण्यात आले आहेत. दिवाणी वसुलीच्या 388 दाखल प्रकरणात 285 तर किरकोळ स्वरुपाच्या 186 दाखल प्रकरणात 181 निकाल देण्यात आले आहेत.
प्रत्येक नागरिक हा ग्राहक असतो त्याने जागरुक असले पाहिजे, असे सांगून श्रीमती भोसले म्हणाल्या एखादी सेवा घेताना अथवा वस्तू विकत घेताना आपली फसवणूक होते का याविषयी ग्राहकांनी सतर्क असले पाहिजे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे ग्राहक 20 लाखापर्यंतची प्रकरणे दाखल करु शकतात. ग्राहक हक्क संरक्षण कायद्याप्रमाणे ग्राहकांना वकील देण्याची आवश्यकता नाही. ते स्वत: आपली बाजू मांडू शकतात. संपूर्ण कामकाज हे मराठीमधून चालते. किरकोळ 10 रुपयाच्या बिस्कीट पुड्याच्या प्रकरणात 50 हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई देण्याचे निकालही झाले आहेत. ग्राहकांच्या संरक्षणासाठी आणि हितासाठी मंच आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास अशा ग्राहकांनी मंचाकडे धाव घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
0000000


जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली




कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दोन मिनीटे मौन (स्तब्धता) पाळून हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई,  निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000



बुधवार, २९ जानेवारी, २०२०

कडवेमधील जहागीर इनाम जमिनी 65 वर्षानंतर ‘सरकार’च्या बंधनातून मुक्त



मध्यस्थाशिवाय तलाठ्याकडे 6 पट नजराणा भरुन
पुन:प्रदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  एकूण गट 130, क्षेत्र 340 एकर, 600 खातेदार

       कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : गगनबावडा तालुक्यातील मौजे कडवे गावातील जहागीर इनाम जमिनीवरील ‘सरकार हक्काची’ नोंद कमी करुन कायदेशीर वहिवाटदार/कब्जेदारांना वर्ग 2 या भूधारणा पध्दती प्रमाणे पुन:प्रदान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. या आदेशाने कडवे ग्रामस्थांची 65 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. कोणत्याही मध्यस्थाशिवाय सर्व जमिनी (शर्तभंग झालेल्या जमिनी वगळून) साऱ्याच्या 6 पट नजराणा रक्कम 15 दिवसात तलाठ्याकडे भरावी, असे आवाहन करुन या आदेशाची प्रत गावातील प्रत्येक घरात पोहचविण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
       मौजे कडवेगावातील एकूण 178 सर्व्हे/गट क्रमांकाच्या जमिनीवर राजगोळीकर सरकार यांचा जहागीर हक्क होता. मुंबई विलीन प्रदेश व क्षेत्र (जहागीऱ्या नाहिशा करण्याबाबत) अधिनियम 1953 मधील तरतुदीनुसार जहागीर इनाम 1 ऑगस्ट 1954 पासून खालसा झालेल्या आहेत. इनाम खालसा झाल्यामुळे या जमिनीचे कब्जेदार जमीन महसूल शासनास देण्यासाठी जबाबदार आहेत. जमिनीच्या शेत साऱ्याच्या 6 पट रक्कम शासनास भरल्यानंतर त्यांना कब्जेदार म्हणून हक्क प्राप्त होतात.
            ही 6 पट रक्कम भरण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट 1960 होती. ही रक्कम आजअखेर भरलेली नसल्याने जमिनीचे अधिकार अभिलेखात धारणा प्रकार ‘सरकार’ असे नमूद असून 7/12 च्या कब्जेदार सदरी रेघेवर ‘सरकार हक्काची’ नोंद असून रेघेखाली मुळ  कब्जेदार, वहिवाटदार यांची नावे आहेत.        या जमिनी मुळच्या ‘दुमाला सरकारी’ असल्याने वतन खालसा झाल्याने फक्त जमीन महसूल व खंड जहागीरदारास देण्याऐवजी तो शासना द्यावा लागेल व जमिनीचा धारणा प्रकार वर्ग 2 राहणार आहे.
            जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज दिलेल्या आदेशानुसार सरकार हक्क या नोंद कमी करुन वहिवाटदारांना वर्ग 2 या भूधारणा पध्दतीने प्रमाणे पुन:प्रदान करण्यात येत आहे.
* सर्व जमिनींचा ‘सरकार’ धारणा प्रकार व 7/12 उताऱ्यावरील ‘सरकार हक्क’ कमी होणार.
* जमिनी मूळ कब्जेदार व वहिवाटदारांच्या पूर्ण मालकीच्या होणार.
* शेती प्रयोजनार्थ जमीन हस्तांतरण कर्ज काढणे, तारण गहाण, वाटप, वारस नोंदी आदीसाठी   
   कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही.
* बिगर शेती वापरासाठी चालू बाजार भावाच्या 50 टक्के नजराणा शासनाकडे भरणे बंधनकारक.
* शेत साऱ्याची 6 पट रक्कम भरण्यासाठी कब्जेदार/वहिवाटदारांना 15 दिवसाची मुदत.  
            जे खातेदार 6 पट रक्कम भरणार नाहीत त्यांच्या वसुलीची नोंद 7/12 च्या इतर हक्कात ठेवावी परंतु त्यासाठी जमिनी पुन:प्रदान फेरफारातून वगळू नयेत. याबाबत मुदतीत कार्यवाही पूर्ण करुन सविस्तर अहवाल महिन्याच्या आत सादर करावा, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.        
00000

विद्याथ्यांनी वाहतुक नियमांचे पालन करावे न्यायाधीश पंकज देशपांडे यांचे आवाहन





कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : विद्यार्थ्यांनी वाहतुक नियमांचे काटोकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश पंकज देशपांडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रमुख जिल्हा न्यायाधीश वृषाली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स. म. लोहिया, ज्युनिअर कॉलेज येथे  वाहतुक नियम साक्षरता शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होत. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव
श्री. देशपांडे म्हणाले, सध्या अपघाताचे प्रमाण वाढले असून तरुणांनी वाहतुक नियमांचे पालन करणे खुप आवश्यक आहे. त्याकरीता वाहनाचा वेग नियंत्रित असणे आवश्यक आहे. एखाद्या अपघातामुळे कुटुंबाची वाताहात होते. विद्यार्थ्यांनी सिग्नलचे पालन करणे आवश्यक आहे.  
पोलीस निरीक्षक श्री. बाबर यांनी विद्यार्थ्यांना इंटर सेफ्टर व्हेईकलची माहिती दिली. या वाहनामध्ये लेझर स्पीडगन उपलब्ध असून 300 मीटरपर्यंत गाडीचा वेग तपासला जातो. टिंट मीटर मशीनद्वारे चारचाकी वाहनास काळी काच असल्यास तपासणी केली जाते तसेच या वाहनामध्ये ब्रेथ ॲनालाईझर मशीन उपलब्ध असून त्याद्वारे वाहनचालकांनी मद्य सेवन केले आहे का याबाबत तपासणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक  असल्याचे सांगून  वाहन चालविताना सुरक्षितपणे वाहन चालवणे व हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य  श्रीमती एस. एस. चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन सागर बगाडे तर आभार प्रदर्शन व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी केले.  कार्यक्रमास स्कूल कमिटी सदस्य प्रशांत लोहिया, उपप्राचार्य अनिल सुर्यवंशी, शिक्षक व इतर कर्मचारी,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी ज्ञानेश्वर मिरजकर, अनिकेत मोहिते, सागर गोते उपस्थित होते.
00000


मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीत सोमवारी लोकशाही दिन


कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या 3 फेब्रुवारी रोजी राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिली.
सोमवार, 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता होणाऱ्या लोकशाही दिनाचा लाभ जिल्हयातील सर्व नागरिकांनी घ्यावा, तसेच शासनाकडील दिनांक 26 सप्टेंबर 2012 रोजीच्या शासनपरिपत्रकान्वये तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. परंतु न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व , अपिल्स, सेवाविषयक ,आस्थापना विषयक बाबी, अंतिम उत्तर दिलेले आहे , देण्यात येणार आहे. अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयात केलेले अर्ज लोकशाही दिनात स्विकृत करण्यात येणार नाहीत, याची सर्व नोंद घ्यावी, असेही श्री. गलांडे यांनी स्पष्ट केले.
000000

मुलांच्या शासकीय वसतीगृहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न




कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : प्रजासत्ताकदिनी कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतीगृहात संविधानामधील उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमास गृहपाल संजय जाधव, सागर माळी, नितीन सुतार तसेच शरद शेळके, दिनकर कांबळे, किरण साठे, विजय कांबळे, विजय हेगडे कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अनिकेत कांबळे, किशोर तोरणे, सुदर्शन कानडे, कृष्णा तोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जीवन वाकडे यांनी केले.
                                                     




तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्र देण्यास प्राधान्य - जिल्हाधिकारी दौलत देसाई




कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्र देण्याच्या कामास प्रशासन  प्राधान्य देईल, मात्र संबंधितांनी  तृतीयपंथीयांची एकत्रित यादी व आवश्यक फॉर्म भरुन माहिती सादर करावी, जेणे करुन तृतीयपंथीयांना नव्या नावावर आणि नव्या छायाचित्रासह नवीन मतदान ओळखपत्र उपलब्ध होईल, अशी माहिती  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज येथे बोलतांना दिली.
        जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. एफ.ए. देसाई, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच स्वयंसेवी-सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
          तृतीयपंथी यांच्याबाबतीत समाजाचा दृष्टीकोन बदलावा,  यादृष्टीने तृतीयपंथी यांच्याबाबतीत योग्य ती माहिती समाजासमोर यावी, यासाठी लवकरच सर्व संबंधितांच्या व्यापक कार्यशाळेचे आयोजन करण्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांनी केली. समाजात समलिंगी, स्त्री - पुरुष, तृतीयपंथी यांच्याबाबतीत योग्य ती माहिती नसल्याने त्यांच्याबरोबर हिंसा व भेदभाव घडतो. त्यांना समाजाने स्विकारले नसल्याने हा गट एचआयव्हीला बळी पडन्याची शक्यता असल्याने जिल्हा एड्स नियंत्रण पथकाकडून समाजातील विविध स्तरावर जागृती आणि प्रबोधनावर भर दिला जाईल, असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर यांनी सांगितले.
          जिल्हयात एचआयव्ही संसर्गीतांचे प्रमाण कमी होत चालले असून त्यांना एआरटी सेंटरच्या माध्यमातून नियमित औषधोपचार सुरु आहे. एचआयव्ही संसर्गाबाबत पूर्णपणे गोपनीयता ठेवली जाते. त्याबाबत संबंधितांच्या नातेवाईकांनाही माहिती दिली जात नाही, एचआयव्ही संसर्गीतांना एसटी प्रमाणेच केएमटी बसचा लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालीकेशी पाठपुरावा, करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली. एचआयव्ही संसर्गितांना संजय गांधी निराधर योजनेचे लाभ मिळण्याबाबतच्या अडचणी तात्काळ दूर करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
बैठकीत सुरुवातीला जिल्हा एड्स नियंत्रण पथकाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर यांनी जिल्ह्यात एचआयव्ही / एड्स बाबत होणाऱ्या कार्यक्रमाचा आढवा घेतला. जिल्हा एड्स नियंत्रण पथकास इंडोकाऊंट फाऊंडेशन सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत 15 संगणक तसेच 12 रेफ्रिजरेटर देण्यात आल्याबद्दल इंडोकाऊंट संस्थेचे यावेळी समितीच्यावतीने  अभिनंदन करण्यात आले.
प्रारंभी  प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख यांनी स्वागत केले तर आभार जिल्हा पर्यवेक्षक श्री. निरंजन देशपांडे यांनी मानले. यावेळी अभिमान संस्थेच्या सायरा खानविलकर व विशाल पिंजानी यांनी तृतीयपंथी यांना सामाजिक समावेशनात येणाऱ्या अडचणी, हक्क याबद्दल माहिती दिली.
या बैठकीस वैद्यकीय अधिक्षक डॉ. तेजस्विनी सांगरुळकर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अमोलकुमार माने, पी. एन. देशपांडे, विद्येश  नाईक तसेच, वैद्यकीय अधिकारी, एआरटी केंद्राचे समुपदेशक, स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
00000

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

..केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी... आशीर्वाद घेण्याचे काम.. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला शिवभोजन थाळी लाभार्थ्यांशी संवाद















कोल्हापूर, दि. 28 (जि.मा.का.) : सर्वांना जय महाराष्ट्र ! दादा... समाधानी आहात का... शिवभोजन थाळी कशी आहे... योजना आवडली का... सरकार स्थापन होवून आज दोन महिने पूर्ण होत आहेत... केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे... हे सर्व आशीर्वाद घेण्याचे काम आहे... मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथील रूद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंटमधील शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी आणि बचत गटाच्या अध्यक्षांशी वेब लिंकवरून संवाद साधला.
आण्णा रेस्टॉरंट येथे 26 जानेवारी रोजी पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. याच ठिकाणी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज वेब लिंकच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला. भोजनाची गुणवत्ता, टापटिपपणा आणि स्वच्छता यांच्याशी अजिबात तडजोड नको, असे सांगत मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आज सरकारला दोन महिने पूर्ण होत आहेत. केवळ घोषणा करून न थांबता ही योजना प्रत्यक्ष अंमलात आणली आहे. या योजनेचे शासनामध्ये मित्र पक्षानेही स्वागत केले आहे.
 रुद्राक्ष स्वयं महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली. मुख्यमंत्री म्हणाले, जमणार आहे ना हे काम तुम्हाला...आशीर्वाद घेण्याचे काम आहे...आपली संस्कृती आहे.. अन्नदाता सुखी भव म्हणण्याची. यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी माहिती दिली. प्रारंभ केल्यापासून या ठिकाणी 100 टक्के थाळ्या संपत आहेत. समोरच महापालिकेचे सावित्रीबाई फुले रूग्णालय असल्याने शिवभोजन योजनेचा खूप चांगला फायदा होत आहे. यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, योग्य त्या सुविधा दिल्या जातात का  ते पहा आणि त्यांना सहकार्य करा.
शेवटी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला होतोय यातच मला आनंद आहे. असे सांगून त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.

सरकारचे वजन वाढले पाहिजे असं काम करा- मुख्यमंत्री
       आण्णा रेस्टॉरंट येथे देण्यात येणाऱ्या पदार्थांचे, चपातीचे वजन हे जास्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी दिली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पदार्थांचे वजन किती आहे हे माहीत नाही, पण सरकारचं वजन वाढलं पाहिजे, अशा पध्दतीने काम करा. यावेळी उपस्थितांनी त्याला दाद दिली.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे, सहाय्यक पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील, महिला बचत  गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे, स्म‍िता मुधाळे, प्रमिला केंगारे, लता कुंभार, मधुरा प्रभावळकर,गीता सोलापुरे, प्राची मंडलिक यांच्यासह लाभार्थी प्रकाश पाटील-सरूडकर, मंगल सतीश कासे, अभिजीत सरदेवलकर, कामिनी भाटे, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

00000

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 30 जानेवारीला


कोल्हापूर, दि. 28 (जि.मा.का.) : विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर, राजर्षी शाहू कॉलेज, सदर बजार आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. राजर्षि शाहू कॉलेज, सदर बजार येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र. सहाय्यक आयुक्त ज.बा. करीम यांनी दिली.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील नामवंत खासगी आस्थापनांनी त्यांच्याकडील विविध स्वरूपाची एकूण 700 तांत्रिक / अतांत्रिक पदे अधिसूचित केली आहेत. इच्छूक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.
उमेदवारांनी मेळाव्याला येताना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, एम्लॉयमेंटचे ऑनलाईन कार्ड तसेच पात्र पदांसाठी वेबपोर्टलवर ऑनलाईन 3 ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक आहे.
00000

सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण



कोल्हापूर, दि. 28 (जि.मा.का.) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी पात्र युवक-युवतींसाठी दिनांक 12 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे मोफत प्रशिक्षणाचे  आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी दिली.
जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Googal Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेब साईट  www.mahasainik.com  वरील Recruitment Tab  ला क्लीक करून त्यामधील उपलब्ध Check List  आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करून त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊल लोड करून त्यांचीही दोन प्रतिमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरून आणावे.
केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला/ मुलाखतीस येताना घेऊन येणे आवश्यक आहे.
कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेड मध्ये पास झालेले व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिर्व्हसिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे. 0253-2451031 आणि 2451032 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहनही श्री. सासने यांनी केले आहे.
00000

सोमवार, २७ जानेवारी, २०२०

मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या लोकशाही दिनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा - ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ





कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का.) : 3 फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनाला मी स्वत: तसेच पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उपस्थित राहणार आहेत. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सकाळी 11 ते 2 या वेळेत होणाऱ्या लोकशाही दिनाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले.
 ग्राम विकासमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित असणार आहेत. जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि महामंडळे यांच्या कडील प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांबाबत नागरिकांनी निवेदने घेवून यावीत.  नागरिकांचे प्रश्न अधिकाऱ्यांनी सोडविले पाहिजेत. योग्य काम होणार असेल तर ते तात्काळ झाले पाहिजे. होणार नसेल  तर का होणार नाही त्याचे उत्तर हे संबंधिताला दिले पाहिजे. नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये विनाकारण हेलपाटे मारायला लागू नयेत, यासाठी  हा आमचा प्रमाणिक प्रयत्न आहे. 
कावळा नाका येथील जुन्या विश्रामगृहात आमच्या तिघांचेही लवकरच संपर्क कार्यालय सुरु होणार आहे. महिन्यातून एकदा होणाऱ्या लोकशाही दिना व्यतिरिक्त नागरिकांनी इतर वेळीही आपल्या समस्या, अडचणी याबाबत संपर्क कार्यालयात पत्रव्यवहार करुन संपर्क साधावा. येथे नियुक्त असणारे अधिकारी त्याबाबत संबंधित नागरिकांना उत्तर देतील. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
000000


पंचगंगा पाटबंधारे उपविभागांतर्गत
पाणी उपसा व उपसा बंदी कालावधी जाहीर
       कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का.)  : पंचगंगा पाटबंधारे उपविभागांर्तगत कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगाव, दऱ्याचे वडगाव ल.पा. तलाव जलाशय पाण्यावर तसेच धरण पायथ्यापासून बोलोली केटी बंधाऱ्यापर्यंत हरवळ नाल्यावर तसेच उपवडे जलाशयातून शेतीसाठी पाणी उपसा व उपसा बंदी कालावधी सहाय्यक अभियंता शशांक शिंदे यांनी जाहीर केला आहे.
पंचगंगा पाटबंधारे उपविभागांतर्गत जाहीर केलेल्या उपसा व उपसा बंदी कालावधी पुढीलप्रमाणे आहे. 1) उपवडे ल.पा. तलाव जलाशयातील उपसा कालावधी 3 ते 5 फेब्रुवारी, 17 ते 19 फेब्रुवारी, 2 ते 4 मार्च तर उपसा बंदी कालावधी -2 फेब्रुवारी पर्यंत, 6 ते 16 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी ते 1 मार्च व 5 मार्च ते पुढील आदेश होईपर्यंत राहील.
2) कणेरीवाडी ल.पा.तलाव धरणपायथ्यापासून ते बोलोली को.प.बंधाऱ्यापर्यंतचा उपसा कालावधी 11 ते 16 फेब्रुवारी, 3 ते 8 मार्च, 24 ते 29 मार्च, 14 ते 19 एप्रिल, 5 ते 10 मे व 26 ते 31 मे पर्यंत तर उपसा बंदी कालावधी - आजपासून ते 10 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी ते  2 मार्च, 9 ते 23 मार्च,  30 मार्च ते 13 एप्रिल, 20 एप्रिल ते 4 मे, 11 ते 25 मे व 1 जून ते पुढील आदेश होईपर्यंत राहील.
3) कंदलगाव ल.पा. तलाव धरणपायथ्यापासून ते बोलोली को.प. बंधाऱ्यापर्यंतचा उपसा कालावधी 11 ते 16 फेब्रुवारी, 3 ते 8 मार्च, 24 ते 29 मार्च, 14 ते 19 एप्रिल, 5 ते 10 मे व 26 ते 31 मे पर्यंत तर उपसा बंदी कालावधी - आजपासून ते 10 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी ते 2 मार्च, 9 ते 23 मार्च, 30 मार्च ते 13 एप्रिल, 20 एप्रिल ते 4 मे, 11 ते 25 मे व 1 जून ते पुढील आदेश होईपर्यंत
4) राजाराम ल.पा. तलाव धरणपायथ्यापासून ते बोलोली को.प. बंधाऱ्यापर्यंतचा उपसा कालावधी 11 ते 16 फेब्रुवारी, 3 ते 8 मार्च, 24 ते 29 मार्च, 14 ते 19 एप्रिल, 5 ते 10 मे व 26 ते 31 मे पर्यंत तर उपसा बंदी कालावधी - आजपासून ते 10 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी ते 2 मार्च, 9 ते 23 मार्च, 30 मार्च ते 13 एप्रिल, 20 एप्रिल ते 4 मे, 11 ते 25 मे व 1 जून ते पुढील आदेश होईपर्यंत
5) दऱ्याचे वडगाव ल.पा. तलाव धरणपायथ्यापासून ते बोलोली को.प. बंधाऱ्यापर्यंतचा उपसा कालावधी 11 ते 16 फेब्रुवारी, 3 ते 8 मार्च, 24 ते 29 मार्च, 14 ते 19 एप्रिल, 5 ते 10 मे व 26 ते 31 मे पर्यंत तर उपसा बंदी कालावधी - आजपासून ते 10 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी ते 2 मार्च, 9 ते 23 मार्च, 30 मार्च ते 13 एप्रिल, 20 एप्रिल ते 4 मे, 11 ते 25 मे व 1 जून ते पुढील आदेश होईपर्यंत
            उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसा यंत्रधारकांचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल. असा इशाराही  सहाय्यक अभियंता शशांक शिंदे यांनी दिला आहे.
000000







अंत्योदय कार्डधारकांसाठी
जानेवारीचे साखर नियतन
        कोल्हापूर दि. 27 (जि.मा.का.)  : जिल्हयातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना वीस रुपये प्रति किलो प्रमाणे प्रतिकुटुंब एक किलो साखर मंजूर करण्यात आली असून जानेवारीसाठीची मंजूर साखर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
       जानेवारी ते मार्च 2020 या तिमाहीसाठी अंत्योदय रेशन कार्डधारकांना प्रतिकुटुंब एक किलो प्रमाणे पुरवठा करण्याकरिता 1484 क्विंटल साखरेची मागणी करण्यात आली असून जानेवरी 2020 करिता तालुकानिहाय नियतन पुढीलप्रमाणे आहे.
            शासकीय गोदाम रमणमळा, ता. करवीर 13.60 क्विंटल, शासकीय गोदाम रमणमळा, कोल्हापूर शहर- 30.91 क्विंटल, शासकीय गोदाम पोर्ले तर्फे ठाणे, ता. पन्हाळा- 35.91 क्विंटल, शासकीय गोदाम हातकणंगले 49.92 क्विंटल, शासकीय गोदाम इचलकरंजी 48.05 क्विंटल, शासकीय गोदाम जयसिंगपूर ( ता. शिरोळ ) 46.42 क्विंटल, शासकीय गोदाम कागल 40.90 क्विंटल , शासकीय गोदाम शाहूवाडी 32.31 क्विंटल, शासकीय गोदाम गगनबावडा 8.79 क्विंटल, शासकीय गोदाम भूदरगड 27.80 क्विंटल, शासकीय गोदाम गडहिंग्लज 57.88 क्विंटल, शासकीय गोदाम आजरा 37.60 क्विंटल, शासकीय गोदाम चंदगड 60.06 क्विंटल, शासकीय गोदाम राधानगरी 42.98 क्विंटल असून यासाठीचे पुरवठादार गुरु गणेश ट्रेडीग कंपणी हे आहेत.
                                                                 00000






मनरेगांतर्गत उपलब्ध निधी
मार्चअखेर खर्च करा 
                - खासदार प्रा. संजय मंडलिक                
कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का.) :  केंद्र शासन पुरस्कृत मनरेगामधील निधी येत्या मार्चअखेर 100 टक्के खर्च करावा, असे निर्देश देतानाच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंर्तगत सुरु असलेली कामे पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिले.
           केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांची अमंलबजावणी, प्रगती व संनियंत्रण बाबतची आढावा सभा खासदार प्रा. मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाली. यावेळी समितीचे सह अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,  महिला बाल कल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाज कल्याण समिती सभापती स्वाती सासणे, शिक्षण व अर्थ सभापती प्रविण यादव, बांधकाम व आरोग्य सभापती  हंबिरराव पाटील, प्रकल्प संचालक अजयकुमार माने उपस्थित होते.
खासदार प्रा. मंडलिक यांनी प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण योजनांचा आढावा घेतला. पुरग्रस्त भागातील लोकांना घरे मिळण्यासाठी 5 टक्के नैसर्गिक आपत्तीमधून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नॅशनल हायवे अंतर्गत कागल सातारा रस्त्याचे सहापदरीकरण्याच्या कामांची निविदा करुन लवकरात लवकर काम सुरु करावे तसेच देवगड निपाणी रस्त्याचे काम तात्काळ सुरु करा. पुरामुळे ज्या भागात रस्त्यावर पाणी साचून वाहतूक बंद होते अशा ठिकाणी रस्त्याची उंची वाढविण्यात यावी, अशा सूचना सबंधीत विभागास दिल्या.
गांधीनगर येथे पोस्ट ऑफिस आहे परंतु इमारत नाही याबाबत केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे.  विमान सेवाअंतर्गत नाईट लॅंडींगबाबत सुविधा सुरु करण्यासाठी विमान प्राधिकरणास आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिग्रे-इचलकरंजी रेल्वे मार्गावरील पुलाचे कामाबाबतचे प्रस्ताव तसेच भुयारी रेल्वे मार्गाबाबतचे प्रस्ताव सादर  करण्याबाबतच्या सूचना रेल्वे प्रशासनास देण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले.
 बीएसएनएलची रेंज गगनबावडा, भुदरगड, राधानगरी इत्यादी दुर्गम भागामध्ये येत नाही, त्यामुळे आवश्यक तेथे टॉवर उभा करण्याबाबतच्या सूचना बीएसएनएल विभागास दिल्या आहेत. केंद्र शासन पुरस्कृत निधी उपलब्ध होणा-या सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला व केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ सर्व संबंधीत घटकांना मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने कार्यक्षम रित्या अमंबबजावणीसाठी प्रयत्न करावा अशा सूचना खासदार प्रा. मंडलिक यांनी दिल्या.
000000