इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० मे, २०२३

शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 31 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत

 


 

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे  शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी दि. 22 सप्टेंबर 2022 पासून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सद्यस्थितीमध्ये बराच कालावधी उलटून गेला असला, तरीही जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अत्यंत कमी प्रमाणात अर्ज नोंदणी केली आहे. त्यामुळे अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मे 2023 पर्यंत ऑनलाईन भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व  महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणाऱ्या अर्जांची पडताळणी करुन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे पाठवावेत. महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामार्फंत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज भरावेत, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

000000

गुरुवार, २५ मे, २०२३

जनसुरक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या -जिल्हाधिकारी राहुल रेखावार






कोल्हापूर, दि.25 (जिमाका) : जनसुरक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत सामावून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.

 

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर जन सुरक्षा मोहीम राबवण्याबाबत विशेष जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय व्यवस्थापक किरण पाठक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन कांबळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक विश्वजीत करंजकर, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव, गटविकास अधिकारी, बँकांचे जिल्हा समन्वयक आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

            प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेनंतर्गत तालुकानिहाय व गावनिहाय कार्यपूर्तीचा आढावा घेवून जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, या अभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन  जनजागृती वाढवा. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घ्या. बचत गटातील शंभर टक्के महिलांना या मोहिमेअंतर्गत सामावून घेण्याबाबतही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महिला आर्थिक विकास महामंडळाला त्यांनी सूचना केल्या. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारे शिबिर यशस्वी होण्यासाठी  त्या त्या विभागांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सूचित केले.

 

गावांमध्ये होणाऱ्या शिबिरांपुर्वी गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात व्यापक जनजागृती करावी. बँकांनी आपल्या सर्व खातेदार व कर्जदारांना या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत.  या योजनेचे ऑटो नूतनीकरण दि. 25 ते 31 मे दरम्यान सुरु झाले आहे. सर्वांनी दोन्ही विमा नूतनीकरासाठी 456 रुपये रक्कम बँक खात्यात जमा राहील याची दक्षता नागरिकांनी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

 

दिनांक 1 एप्रिल ते 30 जून 2023 दरम्यान जनसुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान बँकांच्या मदतीने ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे घेण्यात येत आहेत. विमाधारक व्यक्तीचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू ओढवला तर त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य मिळवून देणाऱ्या या विमा योजना आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा (अपघाती) योजनेचा केवळ 20 रुपये वार्षिक हप्ता असून ही योजना 18 ते 70 वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा (नैसर्गिक/अपघाती)योजनेचा वार्षिक हप्ता केवळ 436 रुपये असून ही योजना 18 ते 50 वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. केवळ 456 रुपये इतक्या अत्यल्प वार्षिक हप्त्यामध्ये या दोन्ही विमा सुरक्षा योजनांमध्ये नागरिक सहभागी होवू शकतात, अशी माहिती गणेश गोडसे यांनी दिली.

00000

 


बुधवार, २४ मे, २०२३

लोक कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी “शासन आपल्या दारी”

 

 

 



 

राज्य शासनाकडून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोक कल्याणकारी योजना राबवल्या जात असतात. या लोकाभिमुख योजनांची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.


            या अभियानाचा मुख्य उद्देश शासकीय योजनांचा, उपक्रमांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे स्थानिक स्तरावर होऊन लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ मिळतील. पात्र लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जात आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ (13 मे) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.


           राज्यातील सर्व जिल्ह्यांत दिनांक 15 एप्रिल
 ते 15 जून 2023 या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’  हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा राज्य स्तरावरुन  समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येत आहे. तर सर्व जिल्हाधिकारी यांनी  जिल्हास्तरावर   तालुकास्तरावर जनकल्याण कक्षाची स्थापना करुन या अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत आहे.


      कोल्हापूर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा जनकल्याण कक्षाची तर तालुका स्तरावर तालुका जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या अनुषंगाने जिल्हा व तालुका स्तरावर संबधित यंत्रणेसोबत विविध आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. यानुसार सर्व संबंधित विभागांनी आपापल्या स्तरावरुन गावोगावी जावून लाभार्थ्याचे सर्वेक्षण करुन पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षाशी योग्य समन्वय ठेवण्यात येत आहे.

 

जिल्ह्यातील 95 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन

 'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असले तरीदेखील 95 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्याचे जिल्हा प्रशासनाने  नियोजन केले आहे. करवीर 10 हजार, गगनबावडा 4 हजार,  शिरोळ 10 हजार, हातकणंगले 10 हजार, पन्हाळा 8 हजार, शाहूवाडी 8 हजार,  कागल 8 हजार, राधानगरी 8 हजार, आजारा 8 हजार, भुदरगड 7 हजार, चंदगड 7 हजार व गडहिंग्लज 7 हजार याप्रमाणे तालुकानिहाय लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.



 

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे.  सर्वसामान्यांना लाभ मिळवून देणारी शासकीय कार्यालये वेगवेगळया ठिकाणी असतात. ती सर्व एका छताखाली आणून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे,  कागदपत्रातील त्रुटींबाबत संबंधित लाभार्थ्याला तात्काळ अवगत करुन त्यांच्याकडून त्रुटींची पूर्तता करुन घेतली जाते. यामुळे लाभार्थ्यांना जागेवरच लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' हा जिल्हास्तरीय उपक्रम माहे जून 2023 रोजीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे संभाव्य नियोजन आहे.


       या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांची गतिमान अंमलबजावणी करुन सर्वसामान्यांना थेट लाभ मिळवून दिला जाणार आहे. तसेच शासन व प्रशासन यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण केला जात आहे. तसेच जिथे गरज तिथे मदत अथवा लाभ मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासन गतीमान झालेले आहे.


      विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांना अवगत असतेच असे नाही, तर अशा शेवटच्या घटकांतील लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या वतीने  ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या अभियानात सहभागी होवून आपल्या दारापर्यंत आलेल्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

 

-सुनील सोनटक्के

जिल्हा माहिती अधिकरी

       कोल्हापूर

           00000

 

 

सोमवार, २२ मे, २०२३

शबरी, पारधी आवास योजनेसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


          कोल्हापूर, दि. 22 (जिमाका):  शबरी, पारधी आवास योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांकडे अनुसूचित जमाती (ST) जातीचा दाखला आहे, अशा लाभार्थ्यांना नियमानुसार अटींची पुर्तता होत असल्यास घरकुलचा लाभ देण्यात येणार आहे. शबरी, पारधी आवास योजनेच्या लाभापासून कोणत्याही अनुसुचित जमातीचा लाभार्थी वंचित राहणार नाही, या दृष्टीने सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या गावातील पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे नियमानुसार तात्काळ सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी केले आहे.

 शबरी, पारधी आवास योजनेसाठी अटी-

यापूर्वी शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी, पक्के घर नसावे, 1.20 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला व जागेचा उतारा इत्यादी बाबी पूर्ण करुन प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाकडे सादर करावयाचा आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय अथवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्रीमती देसाई यांनी कळविले आहे.

000000

'ढाई आखर' पत्र लेखन स्पर्धेत कोल्हापूर डाक विभाग राष्ट्रीय स्तरावर प्रथम


 

            कोल्हापूर, दि. 22 (जिमाका):  भारतीय टपाल विभागातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील 'ढाई आखर' पत्र लेखन स्पर्धेत कोल्हापूर डाक विभागातील पत्राची राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासाठी 'उत्कृष्ट पत्र' म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर डाक विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी दिली.

विजन फॉर इंडिया 2047 या विषयांतर्गत भारतीय टपाल विभागातर्फे 'ढाई आखर' पत्र लेखन स्पर्धेचे जुलै 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 18 वर्षाखालील व 18 वर्षावरील असे 'आंतरदेशीय पत्र' 500 शब्द मर्यादा आणि ए-4 साईज कागद 1 हजार शब्द मर्यादा असे दोन गट करण्यात आले होते. स्पर्धेत राज्य स्तरावर प्रथम क्रमांक 25 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 10 हजार रुपये व तृतीय क्रमांक 5 हजार रुपये तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक 50 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 25 हजार रुपये व तृतीय क्रमांक 10 हजार रुपये व प्रमाणपत्र असे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पूर्ण देशपातळीवर लाखो स्पर्धक सहभागी झाले हेाते.

स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्य पातळीवर कोल्हापूर डाक विभागास प्रथम क्रमांकाची दोन बक्षीसे तर व्दितीय क्रमांकाचे एक बक्षीस प्राप्त झाले. तसेच राष्ट्रीय स्तरावर 'आंतरदेशीय पत्र' गटात कोल्हापूर डाक विभागामधील न्यू कॉलेजची विद्यार्थ‍िनी कु. पुजा अरविंद पवार हिच्या पत्राची राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासाठी उत्कृष्ट पत्र म्हणून निवड करण्यात आली.

प्रथम क्रमांक विजेती पुजा पवार हिला कोल्हापूर डाक विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांच्या हस्ते 50 हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अधीक्षक डाकघर, कोल्हापूर येथे पार पडला असून कार्यक्रमास न्यू कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख अविनाश पाटील, बालकल्याण संकुलच्या अधिक्षीका नजीरा नदाफ, डाक निरीक्षक नीलकंठ मंडल व सर्व डाकघर कर्मचारी उपस्थित होते.

00000

सोमवार, १५ मे, २०२३

ज्येष्ठांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कक्ष

 


 

   कोल्हापूर, दि.15 (जिमाका):  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची ज्येष्ठांना एकाच छताखाली माहिती जोडून देण्याचे काम समाज कल्याण विभागामार्फत सुरु आहे. या योजनांचा लाभ संबंधित वृद्धांना देण्यासाठी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वावरील अनुच्छेद 39 क व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या पद्धतीने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, यासाठी राज्याचे जेष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या या ज्येष्ठ नागरिक कक्षाला कोल्हापूर जिल्ह्यातील मुक्तांगण या ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य परशुराम नांदवडेकर, राजश्री नांदवडेकर, विद्या रमेश चव्हाण तसेच बाळासाहेब भोगम या ज्येष्ठ नागरिकांनी या कक्षास आज भेट दिली. परशुराम नांदवडेकर वय 62, राजश्री नांदवडेकर वय 60, विद्या रमेश चव्हाण वय  60 या ज्येष्ठ नागरिकांनी माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला.  या अनुषंगाने समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. ज्येष्ठ नागरिक समाजाच्या आदर्शस्थानी असतात. ज्येष्ठांपासून अनुभवाच्या गोष्टी शिकायला मिळतात, तसेच चांगला समाज घडवण्यामध्ये  ज्येष्ठांचा विशेष समावेश असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ नागरिकांच्या मनोगतामध्ये बाळासाहेब भोगम (76 वर्षे) यांनी 1992 पासून मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवत अनेक तालुकास्तरीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल संपादन केल्याच्या अनुषंगाने त्यांचाही समाज कल्याण विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला. विद्या चव्हाण यांनी एवरेस्ट गाठण्यासाठीचे आपले थरारक अनुभव सांगताना 5 हजार 364 मीटर एव्हरेस्ट गाठून कोल्हापूरचे नाव उंचावले. परशुराम नांदेडकर यांनी शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची दखल घेऊन या विभागाने नक्कीच ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल या विभागाचे शतशः आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा डवर यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक कल्पना पाटील यांनी मानले. कार्यक्रमास कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

000000

मंगळवार, ९ मे, २०२३

कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुट्टी जाहीर

 

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२३ चा कार्यक्रम जाहिर केला आहे. निवडणुकीचे मतदान बुधवार दिनांक १० मे २०२३ रोजी होणार आहे.

कर्नाटक राज्यातील जे मतदार महाराष्ट्र (सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत, तथापि, त्यांची नावे कर्नाटक राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी खालीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहे

राज्यातील सीमा लगतच्या निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार,अधिकारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येत आहे. सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना सुट्टी लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल. यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल.

00000

कासारी नदीच्या दोन्ही तीरावरील भागात पाणी उपसाबंदी

 


 कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) :कासारी नदीच्या दोन्ही तीरावरील भागात उन्हाळी हंगाम 2022-23 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर पाणी उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत.

       कासारी(गेळवडे), ता. शाहुवाडी धरणापासून ठाणे-आळवे कोल्हापूर पाटबंधाऱ्याच्या उर्ध्व भागापर्यंत नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणी फुगीच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदी लागू केली आहे. ही उपसाबंधी चालू मे महिन्यातील 14 व 15 मे 2023 असे 2 दिवस, 21 व 22 मे 2023 असे 2 दिवस, 28 व 29 मे 2023 असे 2 दिवस या कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे.

उपसाबंदी कालावधीत पाण्याचा अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असेही श्री. बांदिवडेकर यांनी कळविले आहे.

000000

पणजी येथे 54 वी डाक अदालत

 


 

कोल्हापूर दि. 9 (जिमाका) :  गोवा रिजन पणजी कार्यालयामध्ये दि. 21 जून  2023 रोजी दुपारी 12 वाजता 54 व्या रिजनल स्तरावरील डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक ए.व्ही.इंगळे यांनी दिली आहे.

गोवा रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. (उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ.)

संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक अदालतीचे सेक्रेटरी  यु. विजय कुमार, सहायक निदेशक आणि सचिव, डाक अदालत, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 31 मे 2023 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.

000000

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व : शाहू मिलमध्ये कार्यक्रमांची रेलचेल व प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

 

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व :

शाहू मिलमध्ये कार्यक्रमांची रेलचेल व प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा

                                  -जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

आज मातीशिल्प कार्यशाळा व शास्त्रीय सुगम संगीताचा कार्यक्रम

कोल्हापूर, दि.9 (जिमाका) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व 2023 निमित्त शाहू मिलमध्ये आयोजित कापड, आब्यांची जत्रा, ग्रंथ व बचतगटांच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे तसेच विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

दिनांक 10 ते 14 मे दरम्यान शाहू मिलमध्ये आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे

दिनांक 10 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री. सत्यजित निगवेकर यांची माती शिल्प कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता "महात्मा फुले" 1954 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            दिनांक 11 मे रोजी सकाळी 10.30 वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी गौरव काईंगडे यांची मातीकाम (पॉटरी कला) बद्दलचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता "आनंदी गोपाळ" 2019 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता राजा माझा रयतेचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            दिनांक 12 मे रोजी सकाळी 10.30 वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी चेतन चौगुले यांची चित्ररेखांकन आणि रंगकाम कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" 2000 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक नागपूरद्वारा आयोजित विविध राज्यातील लोक कलाकारांकडून त्यांच्या कलेद्वारे राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे.

            दिनांक 13 मे रोजी सकाळी 10.30 वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी भाऊसो पाटील यांचे ॲनिमेशन आणि कार्टून फिल्म निर्मिती आणि त्यातील चित्रकलेचे योगदान याबद्दल प्राथमिक माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता "सिंहासन" 1979 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक नागपूरद्वारा आयोजित विविध राज्यातील लोक कलाकारांकडून त्यांच्या कलेद्वारे राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे. 

            दिनांक 14 मे रोजी "देवकीनंदन गोपाला" हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक नागपूरद्वारा आयोजित विविध राज्यातील लोक कलाकारांकडून त्यांच्या कलेद्वारे राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे.

आंबा, ग्रंथ, कापड प्रदर्शन व बचत गटांच्या उत्पादनांना वाढता प्रतिसाद

शाहू छत्रपती मिल येथे 14 मे पर्यंत ग्रंथ प्रदर्शन, दुर्मिळ शस्त्रास्त्रे, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, रोबोटिक साहित्यांचे तसेच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणारे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तसेच विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री होत आहे. प्रामुख्याने कोल्हापूरची ओळख असणारे परंपरागत सोन्याचे व चांदीचे दागिने, गूळ, कापड, चप्पल, माती व बांबूच्या वस्तू, घोंगडी, जान, खाद्य पदार्थ, तांदूळ, मिरची, मध, भडंग,  हस्तकला, ठिकपूर्लीची बर्फी, बचत गटाची उत्पादने, आजरा  घनसाळ तांदुळ, काजू, रेशीम, तृणधान्य, वन उत्पादने आणि माफक दरात कापड विक्री व आंबा महोत्सव त्याचबरोबर आयटी असोसिएशन व उद्योगधंद्यांशी संबंधित स्टॉल्स याठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व प्रदर्शनांना नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000