इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २६ जून, २०१७

राजर्षी शाहुंचे अभुतपूर्व कार्य आणि विकास विषयक विचार नव्या पिढीस अनुकरणीय --पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर शाहूंनी जीवनभर सामान्यांच्या सुखाचाच विचार केला-- पालकमंत्री


                     




कोल्हापूर, दि. 26 : राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी आपल्या जीवनात सामान्य माणसासाठी अभुतपूर्व काम केले असून शाहूंचे हे कार्य आणि विकास विषयक विचार नव्या पिढीस अनुकरणीय आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे केले.
                     राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा 'राजर्षी शाहू पुरस्कार' यंदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना येथील शाहू स्मारक भवनमध्ये आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून  महापौर हसिना फरास,  शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, सौ. वैशाली माशेलकर, ट्रस्टचे सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे आदि मान्यवर उपस्थित होते.
                     राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण आणि भविष्य ओळखून 21 सप्टेंबर 1917 रोजी सक्तीच्या शिक्षणाचा हुकूमनामा जारी केला. हा हुकूमनामा शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक असल्याचे स्पष्ट करुन पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, शाहूंच्या या हुकूनाम्याला 21 सप्टेंरला 100 वर्ष पूर्ण होत असून हा दिवस सर्वांनी साजरा करणे आवश्यक आहे. शाहूंचे कार्य आणि विचारांचा वारसा जोपासणे आवश्यक असून त्यांचे विचार 21 व्या शतकातही मोलाचे आणि प्रेरणादायी असून शाहूंच्या कारर्कीदीवर आधारीत 'अखंड प्रेरणा शाहू विचाराची' हे पुस्तक लिहिले जावे, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
                     राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक आणि सामाजिक विकासाचे बहुमोल काम केले असल्याचे सांगून पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, शाहू महाराजांनी शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग यांचा समन्वय साधून कारभार केला. शिक्षण सक्तीचे करुन शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली. योग्य शिक्षण हे महत्वाचे असून आजच्या शिक्षण पध्दतीत बदल होणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. समता, न्याय, कला, क्रिडा, आरक्षण, शिक्षण, शेती, सहकार, जलसिंचन अशा विविध क्षेत्रात राजर्षी शाहूंनी राबविलेली धोरणे आजही उपयुक्त आणि मार्गदर्शक असल्याचेही ते म्हणाले.
                     राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे देशात कोल्हापूरची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.  त्याकाळी शाहूंनी राबविलेले कार्य व धोरण जगाच्या पुढेच असून कोल्हापूरही जगाच्या पुढे आहे, हा संदेश नव्या पिढीला देणे गरजेचे आहे. ध्येयवादी, समता प्रेमी, सामान्यांचा कैवारी अशा द्रष्ट्या लोकराजा शाहू महाराजांच्या नावाने मिळालेला पुरस्कार आपल्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असल्याचेही पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
शाहूंनी जीवनभर सामान्यांच्या सुखाचाच विचार केला-- पालकमंत्री
                     जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जीवनभर सामान्य माणसाचा विकास आणि सामान्य माणसाच्या सुखाचा आणि सन्मानाचाच विचार केला. सामाजिक समतेचा आणि सार्वत्रिक शिक्षणचा विचारही त्यांनी प्रत्यक्षात राबविला. विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, आरक्षण अशी क्रांतीकारी पाऊले शाहूंनी आपल्या राज्यात त्यावेळी टाकली. अशा द्रष्ट्या लोकराजाचे विचार आणि कार्य नव्या पिढीला  प्रेरणादायी आहे.
                     पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्याला स्वत:च्या पायावर उभ करण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहूंनी त्याकाळी केले. सामान्य माणसाच्या शेतीला पाणी मिळावे, शेतीचं उत्पादन वाढावे, शेती उत्पादनाला बाजार पेठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी राबविलेले धोरण सर्वार्थाने महत्वाचे आहे. राज्य शासनानेही राजर्षी शाहुंचा हाच विचार डोळ्यासमोर ठेवून राज्यातील शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटीची कर्जमाफी केली आहे. शाहूंनी जीवनभर सामान्यांचाच विचार केला, अशा या दुरदृष्टी लोकराजाचे विचार आणि कार्य आदर्शावतच असल्याचे ते म्हणाले.
                     श्रीमंत शाहू छत्रपती महाराज याप्रसंगी बोलताना म्हणाले, शिक्षणाने माणूस घडतो, याची प्रचीती डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या रुपाने जगासमोर आली आहे. कष्ट आणि जिद्दीने शिक्षण घेवून डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी देशातच नव्हे तर जगभरात लौकिक प्राप्त केला आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ. माशेलकर यांच्यावर सोपविलेली जबाबदारी ही सुध्दा देशवासीयांनसाठी महत्वाची बाब आहे. संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान गतिमान झाले असून यापुढे शहरे आणि महामार्गावरील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही या अभियानातून हाती घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
                     प्रारंभी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.   प्रास्ताविकात त्यांनी राजर्षी शाहूंच्या विचाराने दैदीप्यमान व उतुंग कार्य करणाऱ्या व्यक्तीला राजर्षी शाहू पुरस्कार प्रत्येक वर्षी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम होत असल्याचे ते म्हणाले.  शाहीर आझाद नायकवडे यांच्या शाहू गौरव गीताने सुरुवात झालेल्या या सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी मानपत्राचे वाचन केले. शेवटी विश्वस्त डॉ. अशोक चौसाळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
                     या समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी संगीता चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

शाहू जन्मस्थळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन









       
कोल्हापूर, दि. 26 : राजर्षी शाहू महाराज यांच्या 143 व्याजयंती निमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देवून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
             यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती,  कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक,  जिल्हाधिकारी  अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार,  कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, अप्पर पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत आर. एस. पाटील,  जेष्ठ विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, वसंतराव मुळीक, इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत, स्थयी समितीचे सभापती संदीप नेजदार, संदीप देसाई  यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शाहु जन्मस्थळाचे काम उत्कृष्ट झाले असून या ठिकाणी जागतीक किर्तीचे संग्रहालय व्हावे यासाठी शासनाने सुमारे 13 कोटीचा निधी घोषीत केला आहे. त्यासाठीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून कामालाही लवकरच सुरुवात होईल. जसजसी कामे पुर्ण होत जातील तसतसे निधी उपलब्ध करुन दिले जातील. यासंदर्भात 28 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येऊन कामासंदर्भात झालेली पुर्व तयारी व पुढील कामांची आवश्यकता यांचा आढावा घेण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलाला 13 कोटीचा निधी स्मारकासाठी निश्चतपणे उपलब्ध करुन दिला जाईल.

दसरा  चौकातही  जयजयकार
          दरम्यान दसरा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळयाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आमदार सतेज पाटील ,कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी  सामाजिक न्याय विभागातर्फे समाता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शाहू महाराजांची वेषभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झांज पथक, लेझीम पथक, शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्षवेधी चित्ररथासह शाहू महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

000000

शनिवार, २४ जून, २०१७

लष्करी व शासकीय इतमामात शहीद सावन माने यांना अखेरचा निरोप हजारोंचा जनसमुदाय गहिवरला


        






कोल्हापूर, दि. 24  : अमर रहे... अमर रहे, शहीद जवान सावन माने अमर रहे..  भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदे्मातरम अशा गगनभेदी घोषणांनी साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान सावन माने यांना शाहूवाडी तालुक्यातील गोगवे येथे लष्करी व शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद सावन माने यांच्या पार्थिवास त्यांचे सैन्य दलात सेवेत असणारेच बंधू सागर माने यांनी मुखाग्नी दिला. यावेळी वडील बाळकू माने, आई शोभाताई माने यांच्यासह उपस्थित असणारा हजारोंचा जनसमुदाय गहिवरला.
                यावेळी शहीद सावन माने यांच्या पार्थिवास राज्य शासनाच्यावतीने सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. याबरोबरच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार चंद्रदिप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार सत्यजीत पाटील, 109 इंन्फट्री बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.एस.लेहल, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनीही शहीद सावन माने यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली., कर्नल कावेरीअप्पा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पन्हाळा प्रांताधिकारी अजय पवार, शाहूवाडीचे पोलीस उप अधीक्षक आर.आर.पाटील,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने, निवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड यांच्यासह शहीद सावन माने यांचे नातेवाईक  यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
                शहीद सावन माने यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव आज सकाळी मूळ गावी गोगवे येथे आणण्यात आले. वडील बाळकू माने, आई शोभाताई माने, तसेच नातेवाईक आणि जनसमुदायांनी साश्रुनयनांनी अंत्यदर्शन घेतले. गोगवे गावातून शहीद सावन माने यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. पंचक्रोशीतील प्रत्येक चौकात सावन माने अमर रहे.. वीर जवान तुझे सलाम अशा घोषणांचे बॅनर्स लावण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा महिला, आबालवृध्द, तरूण मुले, मुली, शाळेची मुले, शहीद सावन माने अमर रहे च्या घोषणा देत होते. यावेळी लष्करी व पोलीस दलातील जवानांनी शहीद सावन माने यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाच्या शोकभावना अनावर झाल्या. याप्रसंगी पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी, शैक्षणिक, सहकारी क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
                सकाळी 9 वाजता शहीद सावन माने यांचे पार्थिव कोल्हापूर विमानतळावर आले यावेळी सैन्य दल आणि प्रशासन यांच्यावतीने त्यांना विमानतळावर मानवंदना देण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यांच्यासह जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अदरांजली वाहिली. कोल्हापूर स्टेशन हेड कॉर्टरचे ॲडम कमांडंट कर्नल कावेरीअप्पा, मेजर नवीन पवार, सुभेदार रघुनाथ रेहमान यांच्यासह उपस्थित असणाऱ्या सैन्य दलाच्या पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवान सावन माने यांना मानवंदना दिली.
                यावेळी शहीद सावन माने यांचे संपूर्ण कुटुंबिय सैन्य दलाच्या सेवेत आहे असे सांगून कर्तव्य बजावत असताना देशासाठी दिलेले सावन माने यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. महाराष्ट्र शासन या कुटुबाच्या पाटीशी ठामपणे उभे राहील. दुखा:च्या या काळात हा परिवार एकटा नसून संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे. शहीद सावन माने यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केली. 
               

00000

मंगळवार, १३ जून, २०१७

संपूर्ण निधी वेळेत खर्च करण्याची खबरदारी घ्या - जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार कृषि विभागाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश





कोल्हापूर, दि. 13 :  कृषी विभागाकडील उपलब्ध निधी समर्पित होणार नाही, याची दक्षता घेऊन यापुढे निविदा प्रक्रिया वेळेत राबवून ऑक्टोबरपर्यंत कामे सुरु झाली पाहिजेत, मिळणाऱ्या निधीचा विनियोग संपूर्णत: त्याच वर्षी होईल, याची खबरदारी घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.
 कृषी विभागाकडील विविध योजनांची जिल्हास्तरीय कार्यकारणी समित्यांची बैठक 40 ठाणा येथील आत्मा सभागृहात सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत झाली.   यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .कुणाल खेमणार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.जी. किणिंगे, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, कृषि उपसंचालक सुरेश मगदुम, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, एन.ए.आर.सीचे संचालक एन.वाय.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गतीमान पाणलोट विकास अंतर्गत गतवर्षी 3 कोटीचा निधी समर्पीत करण्यात आला असून वेळेत नियोजन न झाल्याने निधी समर्पीत करावा लागला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कृषी विभागाकडून निधी समर्पीत होत आहे हे योग्य नसून मिळणाऱ्या निधीचा विनियोग विहित मुदतीत करण्याची खबरदारी संपूर्ण यंत्रणेने घ्यावी असे सांगून मागेल त्याला शेततळे ही मुख्यमंत्री देवेंन्द फडणवीस यांची प्राधान्यक्रमाची योजना असून या योजनेमधील कामे अधिक गतीमान होण्याची गरज अधोरेखित केली. तसेच मृदा आरोग्य प्रत्रिका अभियानामध्ये 15 जून पर्यंत 70 टक्के काम पूर्ण होणे आवश्यक होते त्या दृष्टीनेही कामाची गती वाढवावी असे त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संदर्भात इंन्श्यूरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहत नसल्याबद्दल तसेच प्रकरणाच्या निर्गतीकरणाचे प्रमाणही कमी असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कृषी खात्याकडील विविध योजनांचा लाभ देत असताना प्रत्येक वेळी लाभार्थी बदलले जावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या उपस्थितीत कृषी विभागाकडील विविध येाजनांच्या जिल्हास्तरीय कार्यकारणीच्या बैठका झाल्या. यामध्ये उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान बैठकीत 25 मे ते 8 जून 2017 या कालावधीमध्ये उन्नत शेती समृध्द शेतकरी पंधरवडा साजरा करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले. या पंधरवड्यात 1112 गावांमध्ये 77 शास्त्रज्ञ, 1020 मार्गदर्शक अधिकारी आणि 1444 प्रगतशील शेतकरी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात आले.  आत्मा अंतर्गत कॅफेटेरिया मधील पिक प्रात्यक्षिके, अभ्यास दौरा, प्रशिक्षण, शेती शाळा, किसन  गोष्टी आदी कार्यक्रमांच्या आराखड्यावर  चर्चा करण्यात आली. या आराखड्यामध्ये कृषिसाठी 57.53 लाख तर कृषि संलग्न विभागासाठी 8.15 लाखाची तरतुद करण्यात आली आहे. रेशिम विकाससाठी 3.55 लाखाची मागणी करण्यात आली आहे. तर उप वनसंरक्षक कोल्हापूर वन विभाग यांनी 2 लाखाची मागणी केली आहे. तथापी या दोन्ही यंत्रणांनी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावे असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
 राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेमधील कामाचा आढावा घेताना सन 2016-17 मध्ये 50 शेतकऱ्यांचा 50 एकर क्षेत्राचा एक गट या प्रमाणे हे अभियान राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 30 गट मंजूर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सन 2014-15 मध्ये 123 प्रस्ताव विमा कपंनीला पाठविण्यात आले होते त्यापैकी 38 प्रस्ताव नामंजूर झाले. सन 2015-16 मध्ये 5 प्रस्ताव नामंजूर झाले अनेक प्रस्ताव कंपन्यांकडे प्रलंबित आहेत. आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी जिल्हास्तरीय बैठकांना उपस्थित राहत नाहीत याबद्दल याबैठकीत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येवून संबंधितांना याबद्दल कळवावे अशा सूचना देण्यात आल्या.
 प्रधानमंत्री पिक विमा योजना ही कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एैच्छिक आहे. या योजनेमध्ये 8905 कर्जदार शेतकरी तर 1438 बिगर कर्जदार शेतकरी सहभागी आहेत. सन 2016-17 मध्ये जिल्ह्यात एकूण 20 लाख 52 हजार रुपयाची रक्कम विविध शेतकऱ्यांना विम्या पोटी देण्यात आली आहे.
महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राच्या उभारणीसाठी स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.लि.  या कंपनीची निवड करण्यात आली असून जिल्ह्यात 76 महसूल मंडळांपैकी 24 ठिकाणी केंद्रांच्या उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. उर्वरित ठिकाणीही गतीने कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी यावेळी दिले.
 राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-कडधान्य या योजनेचा उद्देश जिल्ह्यात कडधान्य पिकाचे क्षेत्र व उत्पादन, उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांना या पिकातील सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती देणे हे आहे. यामध्ये 10 हेक्टरच्या क्लस्टरवर पिक प्रात्यक्षिक घेण्यात येणार असून प्रती शेतकरी कमीत कमी 0.40 हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे. एकात्मिक किड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव व्यवस्थापन, कृषी अवजारे आदींबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
कृषी उन्नती योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी सन 2017-18 मध्ये 544 औजारे प्राप्त झाली असून यासाठी सुमारे साडे तीन हजार अर्ज प्राप्त झाले आहेत यातून लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थी निवडण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकासमध्ये सन 2017-18 साठी जिल्ह्यातील मुमेवाडी (ता. आजरा), कासार कुतळे, आपताळ  (ता. राधानगरी), मजले (ता. हातकणंगले), पैझारवाडी (ता. पन्हाळा) या सहा गावांची निवड करण्यात आली आहे.
            मृद व जलसंधारण कामाचा आढावा घेत असताना जिल्ह्यात सन 2016-17 मध्ये 58179 मृदा आरोग्य पत्रिका वितरणाचे उद्दिष्ट होते याच्या तुलनेत 62659 आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आल्या. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 768 आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. सन 2017-18 साठी जिल्ह्यातील 43 हजारचे उद्दिष्ट होते 15 जून पर्यंत 70 टक्के काम होणे आवश्यक असल्याने या कामांचीही गती वाढवा असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची प्राधान्य क्रमाची योजना आहे. या अंतर्गत निवडलेल्या गावातील पाणलोट विकासच्या कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करुन द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सन 2017-18 साठी गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून 8 कोटी 16 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार मधील कामांसाठी 6 कोटी 52 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सन 2016-17 मध्ये एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात विशेष घटक योजनामधून 6 कोटी 55 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. यापैकी 77 कामांसाठी  3 कोटी 74 लाख निधी खर्च झाला व उर्वरित निधी समर्पीत करण्यात आला. यावर्षी कृषी विभागाने अत्यंत काटेकोर नियेाजन करुन निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी व ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी. कोणत्याही परिस्थितीत निधी अखर्चीत राहू नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
            मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत 61 कामे पूर्ण झाली असून  66 कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्याला उद्दिष्ट 407 शेततळ्यांचे असून या योजनेमधील कामांची गती वाढविण्याची गरज जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केली. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत उपजीविका कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
            या विविध बैठकांना कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

0 0 0 0 0 0