इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

दातृत्वाची वज्रमुठ... कोल्हापूरकरांची बात काही औरच...सलाम कोल्हापूरकरांना... माणुसकीचा महापूर अशा शब्दात कोल्हापूरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त





















            कोल्हापूर दि. 31 (जिमाका) : महापुराने अनेकांचे संसार वाहून गेले. कोल्हापूरकरांच्या दातृत्व पुढे आले आणि त्यांचे वज्रमुठ नव्या संसार उभारणीत कामी आली. कोल्हापूरकरांच्या मदतीचा रस्त्यावर उतरलेला महापूर पाहून बात काही औरच आहे. अशा कोल्हापूरकरांना सर्वांचा सलाम, अशा शब्दामध्ये आज विविध वक्त्यांनी कोल्हापूरकरांविषयी आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली.
       नुकत्याच येवून गेलेल्या आपत्तीमध्ये कोल्हापुरातील विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, रेस्क्यू टिम, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार उल्हास पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प.पू. काडसिध्देश्वर स्वामी, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उप महापौर भुपाल शेटे आदी उपस्थित होते.
            सुरुवातील विनायक म्हेत्तर यांनी महापुरावर बनवलेली चित्रफीत दाखविण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, आपत्तीच्या काळात स्वयंस्फूर्तीने नागरिक पुढे आले. रेस्क्यू आणि रिलिफचं आदर्श काम केलं. हे काम पाहून पोलीस दलातर्फे मी सलाम करतो. भविष्यामध्ये याविषयी संशोधन आणि अभ्यास केला जाईल त्यावेळी त्याला कोल्हापूर पॅटर्न म्हणून ओळखले जाईल.
            आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, कोल्हापूरकरांचा मला अभिमान वाटतो. जयंती नाला सफाईच्या कामात ही मंडळी हिरिरीने सहभागी झालीत. कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपचं नियोजन अत्यंत सुंदर पध्दतीने सुरु होत. प्रत्येकाने संघटनात्मक पातळीवर काम केल्याने आपण यशस्वी राहीलो. सर्व संघटनांनी निरोगी कोल्हापूरसाठी मोठ्या प्रमाणात जनजागराणाचे काम सुरु केले.  या सर्वाला सलामचं.
            डॉ. योगेश जाधव म्हणाले, तिपटीने पाऊस पडला अनेकांचे संसार वाहून गेले, शेती वाहून गेली, कित्येक वर्ष सांगली, कोल्हापूर मागे जाण्याची भिती निर्माण झाली. अशातच कोल्हापूरकरांचे दातृत्व पुढे आले. जीवाचं रान करुन ज्ञात, अज्ञात लोकांनी मदतीचं काम सुरु केलं. ही वज्रमूठ अनेकांचे संसार उभं करण्यासाठी उपयोगी पडली. अशा कामाला मी सलाम करतो.
            मदतीच्या कार्यात माता भगिनी सुध्दा मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या, असे सांगून पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव पुढे म्हणाले, इतक्या मोठ्या आपत्तीमध्ये मनुष्य हानी झाली नाही. अशी आपत्ती येवू नये म्हणून अभ्यास करुन आपल्याला तयारी करावी लागेल. त्याचबरोबर अंमलबजावणीही करावी लागेल. पश्चिम देवस्थान समितीकडून बाधित झालेली मंदिरे आणि शाळा यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. पंचगंगा हॉस्पिटल आणि बावड्यातील शासकीय रुग्णालयाला प्रत्येकी 15 लाखांची मदत देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
            झालेले अतिक्रमण, चुकीची बांधकामे, चुकीचा विसर्ग आणि अतिरिक्त पाऊस या सर्वांमुळे महापूर आला. अल्लमट्टी आणि हिपरगी या दोन धरणामुळे सांगली, कोल्हापूर दोन्ही जिल्हे महापुरात अडकले, असे सांगून आमदार उल्हास पाटील पुढे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण दरीवर बांधलं. मिरज ते कोल्हापूर रेल्वे सुरु केली या मार्गावर 7 ठिकाणी पुल बांधले, प्रत्येक पुलाला कमानी ठेवल्या, कुठेही नदी अडवली गेली नाही.  एवढ्या मोठ्या महापुरातही कोठेही भराव वाहून गेला नाही मात्र 2005 नंतर आम्ही तयार केलेले रस्ते भरावासकट वाहून गेले. हिपरगी धरण उंचावर बांधलं गेलं बॅरेजमधून आखीनदी 22 गेट मधून जाते. 90 किलो मीटर अंतरात माझा जिल्हा बुढाला.  अशा आपत्तीमध्ये जनतेला धक्का लागता कामा नये यासाठी आपल्याला टक्कर द्यावी लागेल. महापुरातून वाचले आणि धक्याने गेले अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. अशा धक्यातून पुन्हा जगण्याची नवी उमेद द्यावी लागेल. पूर नावाची आपत्ती गावाकडं पुन्हा येणार नाही अशा विश्वास द्यावा लागेल. हे काम कित्येक जण करत आहेत या सर्वांना मनापासून धन्यवाद.
            जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी महापुरातील अनेक प्रसंग सांगितले. ते म्हणाले,  ज्या गणरायाचं गोड कौतुक करत घरी आणयाचं त्याची पुजाअर्चा करायची आणि वाजत गाजत विसर्जन करायचं, अश गणरायालाही घरी आणण्यापूर्वीच पुरात विसर्जित व्हावं लागलं. आपत्तीग्रस्तांच्या मदतीला माणसांच्या मदतीचा महापूर रस्त्यावर उतरला होता. यात मुलीसुध्दा प्रलयात बोटी चालवत होत्या. यावेळी झालेल्या समाजाचा सहभाग हा रोल मॉडेल म्हणून जगात उदाहरण निर्माण करेल. प्रथमच हायवे बंद करण्याचा निर्णय घ्यावा यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील लाईफ लाईन बंद पडली होती. अशा कठीण परिस्थितीतही प्रशासनाच्या विरोधात आक्रोश दिसला नाही याचे सर्व श्रेय कोल्हापूरकरांना जाते. मदतीत सुध्दा ते कुठेही कमी पडले नाहीत. 80 ते 90 हजार कुटुंबांपर्यंत पोहोचले. संकटाची दाहकता कमी झाली. कोल्हापूरकरांची बात काही औरच, अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
            आपत्तीच्या काळात प्रशासन सतर्क आणि सज्ज होते, असे सांगून शाहू महाराज म्हणाले, सामाजिक संघटना पुढे आल्या, सर्वांनी हातभार लावला यात माणुसकीची एकजूट दिसली.  कोल्हापूरकरांनी आपत्तीग्रस्तांना स्वत:च्या पाण्यावर उभे राहण्यासाठी साथ दिली. योग्य दिशा मिळाली आणि योग्य लोकांपर्यंत मदत देखील पोहचली. यासर्वांमधून निसर्गाचा आदर केला पाहिजे, त्याच्या विरोधात जावू नये, असा संदेश मिळाला आहे.
            आपलं कार्य संपलय असं न समजता उद्या पासून कुटुंब उभारण्याच्या नव्या कार्याला सुरुवात करा, असा संदेश प.पु.काडसिध्देश्वर स्वामींनी दिला. ते म्हणाले, भाड्याची घरं मिळवून देणं हे आवश्यक काम आहे. 100 ते 150 तात्पुरती घरं आम्ही उभी करतोय. अजूनही जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता आहे उद्यापासून चारा छावण्या सुरु करा. सरकारी यंत्रणेने रोगराई होवू दिली नाही, मनुष्य  हानी होवू दिली नाही. स्वयंसेवकासारखे सरकारी अधिकारी काम करत होते. आपल्याला संयम सोडून चालणार नाही, माणुसकीचा महापूर थांबवून चालणार नाही. उद्यापासून नव्या कार्याला सुरुवात करा. उपमहापौर श्री. शेटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            यावेळी डेंग्युबाबत जनजागरण करणाऱ्या पोस्टरचे प्रकाशनही करण्यात आले. 80 हून अधिक सेवा संस्था, तरुण मंडळे, रेस्क्यू टिम्स, संघटना यांना कृतज्ञता पत्र देवून गौरविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी स्वागत प्रास्ताविक तर मोहन घाडगे यांनी आभार प्रदर्शन केले.
           
000000000


आपत्तीग्रस्तांच्या विशेषत: शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करावे -जिल्हाधिकारी दौलत देसाई





कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यामधील आपत्तीत सापडलेल्या विशेषत: शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाबाबत असणाऱ्या कर्जाची पुनर्गठण करावे. त्याचबरोबर नवीन कर्जाला सहानुभूतीपूर्वक पात्र ठरवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात विशेष जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रबंधक नितीन देशपांडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय प्रबंधक किशोर कुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, नाबार्डचे नंदू नाईक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने आदी उपस्थित होते.
          सुरूवातील अग्रणी जिल्हा प्रबंधक राहूल माने यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या निर्देशानुसार आपत्तीग्रस्त भागामधील कर्जदारांसाठी घ्यावयाच्या निर्णयानुसार ही बैठक बोलवल्याचे सांगून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे परिपत्रकाचे वाचन श्री. माने यांनी केले.
          जिल्हाधिकरी श्री. देसाई यावेळी म्हणाले, आपत्तीग्रस्त भागातील कर्जदारांबाबत सर्व बँकांनी सहानुभूतीपूर्वक व्यवहार करावेत. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभे असणारे पीक याबाबत कर्ज, कृषी मुदत कर्ज, कृषीपुरक व्यवसाय कर्ज तसेच कृषी व्यतिरिक्त इतर अन्य कर्जांचे पुनर्गठण करावे. बाधित क्षेत्रातील कर्ज खाती एनपीए करू नयेत. इचलकरंजीसारख्या भागात यंत्रमागधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी संधी द्यावी.  नवीन कर्जाची मागणी आली तर ती पूर्ण करा. विशेषत: शेतकऱ्यांचा ओघ कर्जासाठी राष्ट्रिय बँकेकडे राहील. त्यांना सहकार्य करा, असेही ते शेवटी म्हणाले.
          या बैठकीला युनियन बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय व्यवस्थापक सुचित्रा नारकर, फेडरल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अजय देशपांडे यांच्यासह विविध बँकांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.
000000

पोषण माह अभियान राबवून जिल्ह्याचा नाव लौकीक वाढवाल -जिल्हाधिकारी दौलत देसाई









        कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : पूर्ण आत्मविश्वासाने आणि जोशपूर्ण वातावरणात पोषण माह अभियान चांगल्या पध्दतीने राबवून अंगणवाडी सेविका जिल्ह्याचा नावलौकीक वाढवतील, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज व्यक्त केली.
       जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पोषण माह अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला व बालविकास समितीच्या सभापती वंदना मगदूम आदी उपस्थित होते.
          वृक्षाला पाणी देऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर अभियानाच्या लोगोचेही उपस्थितांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना केवळ अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या आत्मविश्वासावर आणि त्यांना दिलेल्या जबाबदारीवर संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त केला होता. प्रत्येक सेविकेकडे दिलेल्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली होती.
          जिल्ह्यावर आलेल्या आपत्तीमध्ये अंगणवाडी शाळांचे तसेच साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासाठी विशेष निधी दिला आहे. या परिसारातील स्वच्छतेसाठी प्राधान्य द्या. त्यामुळे अंगणवाडीमध्ये बालकांचे आरोग्य चांगले राहील. याकामी आवश्यकती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटी दिले.
          अंगणवाडी सेविकांनी मागील वर्षी चांगले काम केले आहे, असे सांगून श्री. मित्तल पुढे म्हणाले, याही वर्षी आपला जिल्हा देशात आघाडीवर राहील असे काम व्हायला हवे. जिल्ह्यातील आपत्तीमुळे अंगणवाडींचे झालेले नुकसान 3 महिन्यांमध्ये भरून काढले जाईल, असेही ते म्हणाले.
          अध्यक्ष श्रीमती महाडिक म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांमुळे देशात कोल्हापूरला ओळख मिळाली. याही वर्षी करवीर प्रकल्प 2 ला पारितोषिक मिळाले. हे सर्व तुमच्यामुळे घडले आहे. त्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार आणि अभिनंदन. सभापती श्रीमती मगदूम, सदस्य आकांक्षा पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
          महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यामध्ये पोषण माह दरम्यान घेण्यात येणारे कार्यक्रम व उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. बालविकास प्रकल्प अधिकारी एम.एम. पालेकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालविकास प्रकल्प अधिकारी पी.एस.कुंभार यांनी केले. यावेळी महिला व बालविकास समितीच्या सदस्य पद्माराणी पाटील, शिवानी भोसले, कल्पना चौगुले, रेखा हत्तरकी, सुनीता रेडेकर, आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, राजेंद्र भालेराव आदी उपस्थित होते.
000000

अलमट्टीतून 12825 क्युसेक विसर्ग तर राधानगरीतून 800 क्युसेक विसर्ग



कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : अलमट्टी धरणातून 12825 क्युसेक तर  राधानगरी विद्युत विमोचकातून 800 क्युसेक व कोयणेतून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज दिली.
            पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 16.8 फूट असून,    5 बंधारे पाण्याखाली आहेत. तुळशी मोठा प्रकल्प, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, कासारी व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
           पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी, राजाराम,सुर्वे व रूई. भोगावती नदीवरील खडक कोगे हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या अलमट्टी धरणात 123.081  टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 103.53 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
            जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.47 टीएमसी, वारणा 33.61  टीएमसी, दूधगंगा 24.73 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.65 टीएमसी, पाटगाव 3.64 टीएमसी, चिकोत्रा 1.51, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
            बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 16.8 फूट, सुर्वे 18.6 फूट, रुई 44.9 फूट, इचलकरंजी 41 फूट, तेरवाड 38.6 फूट, शिरोळ 30 फूट, नृसिंहवाडी 25.6 फूट, राजापूर 15.6 फूट तर नजीकच्या सांगली 7.3 फूट आणि अंकली  6.11 फूट अशी आहे.
000000

गगनबावडा तालुक्यात सर्वात जास्त 69 मिमी तर सर्वात कमी हतकणंगलेत 1.13 मिमी पाऊस



        कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात 139.55 मि.मी इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2216.37 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 11.63 मिमी इतकी नोंद झाली.         
आजअखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले - 1.13 एकूण 774.79, शिरोळ - 2.14 एकूण 535, पन्हाळा -7.14 एकूण 2107, शाहूवाडी 21.50 एकूण 2525.67, राधानगरी 13.33 एकूण 2635, गगनबावडा - 69 एकूण 5500.50, करवीर - 4.73 एकूण 1608.27, कागल 3.71 एकूण 1715, गडहिंग्लज - निरंक  एकूण 1311.86,  भुदरगड 7.20 एकूण 2341.80, आजरा 6 एकूण 2819.50 व चंदगड 3.67 मिमी एकूण 2722 इतका पाऊस झाला आहे. 
00000

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

केंद्रीय पथकाची भेट आपत्तीग्रस्तांशी संवाद साधत नुकसानीची केली पाहणी




















        कोल्हापूर - दि. 30  (जिमाका) : सह सचिव तथा केंद्रीय पथक प्रमुख डॉ .व्ही. थिरुपुगाझ यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आज कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, भैरेवाडी, इचलकरंजी, अंबेवाडी, कोल्हापूर परिसरातील महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणी दरम्यान पथकाने आपत्तीग्रस्तांशी संवाद साधत झालेल्या घरांच्या पडझडीची, यंत्रमाग व्यवसायाची, शेत पिकाची माहिती घेतली.
            सह सचिव तथा केंद्रीय पथक प्रमुख डॉ .व्ही. थिरुपुगाझ यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग, अव्वर सचिव व्ही.पी.राजवेधी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे अधीक्षक अभियंता संजय जस्वाल  या सदस्यांचे पथक आज सकाळी 11 च्या सुमारास शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे दाखल झाले. महापुरामुळे वाहून गेलेली जमीन, पिकांचे झालेले नुकसान आणि महावितरणचे झालेल्या नुकसानीची पाहणी या पथकाने याठिकाणी केली.  आमदार उल्हास पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी यावेळी माहिती दिली.
            यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, घालवाड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र अर्जुनवाडची पाहणी केली. महापुरामुळे उपकेंद्रामधील नुकसान झालेल्या साहित्यांची पाहणी करुन येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. अर्जुनवाड मधील घर पडलेल्या कुमार कोळी, दशरथ कोळी, सदाशिव वाणी यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. येथील दलित वस्तीमध्येही पडझड झालेल्या घरांची या पथकाने भेट देवून माहिती घेतली. सरपंच विकास पाटील यांनी यावेळी पथकाला माहिती दिली.  पडलेल्या अंगणवाडी इमारतीचीही पाहणी केली.
            शिरोळ मधील घर पडलेल्या गुंडू मुजावर, हणमंत काळे यांच्याशी पथकाने संवाद साधत वस्तुस्थितीची माहिती घेतली. यानंतर नृसिंहवाडी येथील नुकसान झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी पथकाने केली. महापुरामुळे आरोग्य केंद्रातील नुकसान झालेल्या साहित्याची माहिती घेतली. प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार गजानन गुरव यांनी यावेळी पडझड झालेल्या घरांची त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेची माहिती दिली. कुरुंदवाड मधील भैरेवाडी येथील चंद्रकांत आलासे, संजय आलासे यांच्या नुकसान झालेल्या यंत्रमाग कारखान्याला भेट दिली. महम्मद बागवान यांच्या सोयाबीन पिकाचे महापुरामुळे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यांच्याशीही पथकाने संवाद साधला. शेतकरी आनंद पाटील, शिवप्रभु आवटी यांच्या ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी यावेळी नुकसान झालेल्या पिकाची माहिती दिली.
            इचलकरंजी येथील अवधुत आखाडा येथील यंत्रमाग कारखान्याला या पथकाने भेट देवून तसेच महावितरणच्या आवाडे  उपकेंद्राच्या नुकसानीची पाहणी केली. हातकणंगले तहसिलदार सुधाकर भोसले यांनी यावेळी त्यांना माहिती दिली. यानंतर हे पथक राजाराम बंधाऱ्याची पाहणी करुन केर्ली-रत्नागिरी वाडी रस्त्याच्या पाहणीसाठी तसेच दुसरे पथक आंबेवाडी येथील नुकसानीची पाहणीसाठी गेले. केर्ली-वाडी रत्नागिरी येथील महापुरामुळे खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी यावेळी महापुरामुळे झालेल्या रस्त्यांच्या नुकसानीची माहिती दिली. 
            आंबेवाडी येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करुन त्यांनी आपत्तीग्रस्तांशी संवाद साधला. चिखली येथील डेअरी पाणंद रस्त्यावरील झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच आंबेवाडी-वडणगे मार्गावरील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, गट विकास अधिकारी सचिन घाडगे,  तहसिलदार सचिन गिरी यांनी यावेळी माहिती दिली.
            शिवाजी पुल ते गंगावेश या दरम्यानचा उखडलेल्या रस्त्याची पाहणी या पथकाने केली. पंचगंगा हॉस्पिटल, कुंभार गल्ली येथील झालेले नुकसान त्याचबरोबर नुकसान झालेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह आणि महावीर गार्डन येथील नुकसानीची पाहणी केली. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी झालेल्या नुकसानीची माहिती दिली. आजच्या या केंद्रीय पथक दौऱ्यात अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे,  इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, करवीरचे पोलीस उप अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आजच्या दौऱ्यामध्ये उपस्थित होते.
000000

अटल महापणन अभियानात जिल्हा राज्यात अग्रेसर 230 संस्थांनी घेतला सहभाग : एक कोटीवर मिळविले उत्पन्न




        कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) : अटल महापणन विकास अभियानाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असून जिल्ह्यातील 230 वि.का.स. सेवा संस्था आणि खरेदी विक्री संघानी या अभियानात सहभाग घेऊन विविध व्यवसाय उद्योगाव्दारे एक कोटीवर उत्पन्न मिळविले आहे. यापुढील काळात जिल्ह्यातील अधिकाधिक विकास सेवा संस्थांनी या अभियानात सहभागी होवून आर्थिक दृष्टया सक्षम व्हावे, अशी अपेक्षा कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी आज येथे बोलताना केली.
        सहकार विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या अटल महापणन विकास अभियानांतर्गत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लोकसंवाद मोहीमेचा शुभारंभ माहिती उपसंचालक अनिरुध्द अष्टपुत्रे यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा उप निबंधक कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सहायक निबंधक टी.बी. बल्लाळ, प्रदीप मालगावे, संभाजी पाटील,अमित गराडे यांच्यासह जिल्ह्यातील विकास सोसायट्यांचे चेअरमन, सचिव उपस्थित होते.
            अटल महापणन विकास अभियानामध्ये जिल्ह्यातील 224 विकास सेवा संस्था आणि 6 खरेदी विक्री संघ सहभागी झाले असून या संस्थांनी 14 कोटी 69 लाखाची गुंतवणूक विविध व्यवसायत केली आहे. या गुंतवणुकीद्वारे 15 कोटी 47 लाखाची उलाढाल करुन 1 कोटी 6 लाखाचे उत्पन्न तर 58 लाखाचा निव्वळ नफा मिळविला आहे. विकास संस्थांनी या अभियानाद्वारे सुरु केलेल्या विविध व्यवसाय उद्योगामुळे 135 जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. यामध्ये कितेक विकास सेवा संस्थांनी महत्वपूर्ण योगदान  दिले असून गावकऱ्यांना सहायभुत ठरतील असे व्यवसाय विकसित करुन आर्थिकदृष्टया सक्षम बनण्याची नवी दिशा स्विकारलेली आहे. यामध्ये वॉटर एटीएम, सांस्कृतिक भवन, सोलर ऊर्जा प्रकल्प, मॉल, झेरॉक्स सेंटर, खत विक्री, धान्य विक्री, केटरिंग, पिठाची गिरणी असे कित्येक व्यवसाय यशस्वीपणे चालविले जात आहेत. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून विकास सेवा संस्था गटातून कसबा बावडा येथील श्रीराम विकास सेवा संस्थेस प्रथम पुरस्कार, कोथळी विकास सेवा संस्थेस द्वितीय पुरस्कार, शेडशाळ ग्राम विकास सेवा संस्थेचे तृतीय पुरस्कार तर कोल्हापूर विभागातून खरेदी विक्री संघ गटांतर्गत  चंदगड तालुका खरेदी विक्री संघ, मर्या. तुर्केवाडी प्रथम पुरस्कार आणि आजरा तालुका सहकारी खरेदी विक्री संघास तृतीय पुरस्काराने सन्मानित केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
            अटल महापणन विकास अभियान ही राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना असल्याचे स्पष्ट करुन श्री. अष्टपुत्रे म्हणाले, या योजनेद्वारे विकास सेवा संस्था अधिक सक्षम होण्याबरोबरच रोजगार निर्मितीचे केंद्र म्हणून विकसित होवू लागले आहे. या अभियानाद्वारे मिळणारा नफा संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी उपयुक्त ठरणार आहे. यापुढील काळत जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्था व खरेदी विक्री संघांनी या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग घेवून सहकार क्षेत्र अधिक सक्षम बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले. या अभियानांतर्गत गावातील 100 टक्के शेतकऱ्यांनी विकास सोसायट्यांचे सभासद होवून सहकाराद्वारे ग्राम विकासाची नवी सुरुवात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
            सहकार विभागाच्यावतीने गा्रमीण भागाच्या उन्नतीसाठी राबविण्यात येत असलेले अटल महापणन विकास अभियान गावा गावापर्यंत प्रभावीपणे पोहचावे तसेच या अभियानाचा लाभ घेवून विकास सेवा संस्था आर्थिकदृष्टय सक्षम आणि कार्यक्षम बनाव्या यासाठी सहकार विभागाने हे अभियान गतिमान करावे, असे सांगून श्री. अष्टपुत्रे म्हणाले, या अभियानांतर्गत सहभागी झालेल्या संस्थांच्या यशोगाथा तयार करण्यास माहिती विभागामार्फत पुढाकार घेतला जाईल. जेणेकरुन इतर विकास सेवा संस्थांना या अभियानाची माहिती व प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
            प्रारंभी सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात अटल महापणन विकास अभियानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी या अभियानाच्या अनुषंगाने सहायक निबंधक टी.बी. बल्लाळ, संभाजी पाटील, बाळासाहेब पाटील तसेच चिखली विकास सोसायटीचे सचिव विकास पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी सहायक निबंधक अमित गराडे आभार मानले. समारंभास जिल्ह्यातील विकास सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सचिव उपस्थित होते.
 00 0 0 0 0 0

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

महापुरामुळे ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करा - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे




            कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : महापुरामुळे ग्रामीण भागात झालेल्य नुकसानीचा अहवाल ग्राम विकास विभागास त्वरीत सादर करावा. यामध्ये ग्राम पंचायत हद्दीतील रस्ते, मालमत्ता, इमारती, स्मशानभूमी शेड, इतर मालमत्ता, अंगणवाडी इमारती, ग्रामीण भागातील घरांचा समावेश असावा, अशा सूचना ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.
            जिल्ह्यात महापुरामुळे ग्रामीण विभागाकडील झालेल्या नुकसानीचा आढावा महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल जिल्हा परिषदेत घेतला.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            श्रीमती मुंडे म्हणाल्या, ग्राम पंचायत हद्दीतील रस्ते, मालमत्ता, इमारती, स्मशानभूमी शेड, इतर मालमत्ता, अंगणवाडी इमारती, ग्रामीण भागातील घरांच्या नुकसानीचा अहवाल ग्राम विकास विभागास सादर करावा. त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पुरबाधीत गावांमधील पाणी पुरवठा योजना, हातपंप, पाझर तलाव, जॅकवेल, ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग रस्ते, प्रा.आ.केंद्र इमारत उपकेंद्र इमारत, पशुवैद्यकीय दवाखाने, शाळा इमारती, पशुधनाचे झालेले नुकसान याबाबतचा आढावा त्यांनी घेतला.  या नुकसानीबाबत अहवाल ज्या-त्या मंत्रालयीन विभागास सादर करुन त्याची प्रत ग्राम विकास विभागास द्यावी. ग्राम विकास विभाग याबाबत पाठपुरावा करेल, असेही त्या म्हणाल्या.
            जिल्हयातील ग्रामीण भागातील 35000 घरांचे नुकसान झाले असून, सदर गावांना नुकसानीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष घरांना भेटी देवून, नुकसान झालेल्या घरांची माहिती आवास सॉफ्ट मध्ये नोंद करण्यात यावी.  त्या सर्वांना घरे मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येईल. जी घरे अतिक्रमणात आहेत, त्या नुकसान झालेल्या घरांचे अतिक्रमण नियमीत करुन देण्यात येतील किंवा पर्यायी जागा उपलब्ध झाल्यास त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या. 
            हातकणंगले तालुक्यातील हालोंडी या पुरग्रस्त गावास भेट देवून, नुकसानीबाबत माहिती घेतली, यावेळी त्यांनी गावांतील शाळा, अंगणवाडी तसेच घरे पडलेल्या ग्रामस्थांना भेटी दिल्या. ग्रामस्थांच्या भेटी घेवून जे नुकसान झालेले आहे,  त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना श्रीमती मुंडे यांना दिल्या.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी पुरहानीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली.
 0 0  0 0 0 0

नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था यांची 30 ऑगस्ट रोजी सभा/ अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे राष्ट्रीय नमूना पाहणी अभियानाला सुरुवात/ आरोग्याची काळजी घेण्यासाठी चित्ररथाद्वारे शिक्षण/ पर्युषण महापर्वानिमित्त 2 सप्टेंबर पर्यंत कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवावीत


नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था यांची
30 ऑगस्ट रोजी सभा
        कोल्हापूर - 29 (जिमाका) : जिल्हा परिषदेकडे नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था यांच्याकडून कामकाज वाटप समितीची बैठक शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता व सुशिक्षित बेरोजगार (स्थापत्य) अभियंते यांची बैठक दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद जूने सभागृह कागलकर हाऊस कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सदस्य सचिव कामकाज समिती तथा कार्यकारी अभियंता यांनी केली.
        जिल्ह्यातील सर्व सुबेअ व मजूर संस्था यांचे जिल्हा परिषदेकडे नोंदणी असलेल्या व स्वत:चे पासबुक आहे अशांनी या बैठकीला हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे
राष्ट्रीय नमूना पाहणी अभियानाला सुरुवात
       कोल्हापूर - 29 (जिमाका) : 77 वी राष्ट्रीय नमूना पाहणी फेरीमध्ये शेती, शेतकरी व ग्रामीण विकासाच्या विविध योजना, धोरणांच्या नियोजनासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने राष्ट्रीय नमूना पाहणी अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांची व नागरिकांची विविध माहिती संकलीत करण्यात येत असून, ही माहिती शासनाकडे गोपनीय राहणार आहे. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सर्वेक्षकांना खरी आणि सविस्तर माहिती देण्यात यावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी भू. वि. देशपांडे यांनी केले.
        याबाबतच्या सर्वेक्षणला सुरुवात करण्यात आली असून ते डिसेंबर अखेर पर्यंत सुरु राहणार आहे. सर्वेक्षक कुटुंबनिहाय माहिती संकलीत करीत आहेत. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आपले आर्थिक राहणीमान, जमीन, पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, पशुधनांची संख्या व त्यापासून मिळणारे उत्पन्न, स्थावर मालमत्ता, कर्ज, दायित्व व्याजासह आदी माहितीचा समावेश यामध्ये करण्यात यावा. ही माहिती शासनाकडे गोपनीय राहणार असून, शेतकरी व नागरिकांनी न घाबरता याबाबतची माहिती देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
आरोग्याची काळजी घेण्यासाठी चित्ररथाद्वारे शिक्षण
        कोल्हापूर - 29 (जिमाका) : महापूर ओसरल्यानंतर आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी यामध्ये हातकणंगले, करवीर, शिरोळ आदी 121 गांवामध्ये चित्ररथाद्वारे फिरुन आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केली.
        जिल्ह्यात चित्ररथाद्वारे डेंगी, हिवताप, अतिसार, स्वाईन फल्यू इत्यादी आजारांचा प्रसार, प्रतिबंध, उपचार याबाबतची माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून दाखविण्यात येत आहे. पाणी शुद्धीकरण, पाणी साठवण, मेडीक्लोरचा वापर याचीही माहिती देण्यात येत आहे. पशुधन विभागाची गोठा व्यवस्थापन, जनावरांचे खाद्य, स्वच्छता याबाबतचीही माहिती या चित्ररथातून दिली जात आहे.
            साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनाची माहिती, पाणी शुद्धीकरणाची काळजी, 104, 108 या टोल फ्री क्रमांकाबातची ऑडीओ क्लीप तयार करण्यात आली असून, त्याची सतत या चित्ररथावर स्पीकरद्वारे ऑडीओ क्लीप लावली जात आहे.
या आरोग्य चित्ररथाची पाहणी व शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ योगेश साळे म्हणाले सामाजिक जीवनात संवादामार्फत बदल घडविण्यासाठी आरोग्य शिक्षण देणे फार महत्वाचे आहे. हा चित्ररत श्री साई संस्थान शिर्डी या निधीमधून करण्यात आला असून, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या संकल्पनेतून व आरोग्य व बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
 या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे आदी उपस्थित होते. शेवटी आभार डॉ. देसाई यांनी सर्वांचे मानले.
00000
पर्युषण महापर्वानिमित्त 2 सप्टेंबर पर्यंत
कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवावीत
कोल्हापूर दि. 29  : जैन धर्मीयांचा पर्युषण महापर्व सुरु असल्याने या महापर्वाच्या कालावधीत दिनांक 2 सप्टेंबर 2019 पर्यंत जिल्ह्यातील कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवावीत, असे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  
00000