इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

यशवंत पंचायत राज अभियानात कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यस्तरावर तर गडहिंग्लज पंचायत समिती विभागस्तरावर द्वितीय



       
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : यशवंत पंचायत राज अभियान 2018-19 सालाकरिता राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेची द्वितीय क्रमांकासाठी तसेच विभागस्तरावर पुणे विभागात गडहिंग्लज पंचायत समितीची द्वितीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. याबाबत ग्राम विकास विभागाने आजच शासन निर्णय प्रसिध्द केला आहे.
       राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्राम पंचायतींसाठी 2005-06 या आर्थिक वर्षापासून विभागस्तर व राज्यस्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. 2018-19 साठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांकासाठी कोल्हापूर आणि तृतीय क्रमांकासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेची निवड करण्यात आली आहे.
          प्रत्येक विभागस्तरीय समितीने पुणे‍ विभागात पंचायत समिती कडेगाव, जि. सांगली प्रथम, पंचायत समिती गडहिंग्लज,जि. कोल्हापूर द्वितीय तसेच पंचायत समिती कोरेगाव जि. सातारा तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. कार्यासन अधिकारी शरद यादव यांनी आजच शासन निर्णय प्रसिध्द केला आहे.
 00 0 0  00

..माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती ...गाभारा सलामत तो देव पचास कुसुमाग्रजांच्या काव्य वाचनाने माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन







       कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) :  'गांधींनी गळ्यातला गहिंवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !' 'तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच  महत्व अंतिम असतं. गाभारा सलामत तो देव पचास.' कवी कुसुमाग्रजांच्या प्रवासी पक्षी या काव्यसंग्रहाचे वाचन करुन विभागीय माहिती कार्यालयात आज मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
       जिल्हा माहिती  अधिकारी प्रशांत सातपुते यांनी मराठी भाषेच्या उगमाविषयी सांगून, त्यांनी कुसुमाग्रजांच्या प्रवासी पक्षी काव्यसंग्रहातील 'अखेर कमाई', 'गाभारा' 'ज्योतीराव','नट' आणि 'कणा'  या कवितेंचे वाचन केले.
       'पण एक लक्षात ठेवा, ज्योतीराव,
       तुम्ही आता फक्त पुतळा आहात,
       पुतळ्यांना अधिकार नसतो संतप्त होण्याचा,
       भोवतालच्या व्यवहारात उतरण्याचा,
       त्यांना अधिकार असतो फक्त जयंतीमयंतीच्या हारांचा,
       आणि एरव्ही काकादिक पक्ष्यांच्या विष्ठाप्रधान सहवासाचा.
निवृत्त माहिती अधिकारी सखाराम माने आणि माहिती सहाय्यक एकनाथ पोवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक रामदास परब यांनी यावेळी मराठीतील म्हणी सांगितल्या. कार्यक्रमास जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थितीत होते.
000000

इंग्रजी माध्यमातील शाळा प्रवेश प्रस्ताव सादर करावेत




        कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : भटक्या जमाती (क) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळावेत यासाठी समाज कल्याण विभागामार्फत योजना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील, शहरामधील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित इच्छुक शाळांनी या योजनेतून विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतचे  प्रस्ताव 3 मार्च  पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत. 
       इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतचे शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख इतके आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास दूरध्वनी क्रमांक 0231-2651318 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त  बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
00000


पाच दिवसांचा आठवडा : सुट्टीच्या मोबदल्यात कामाची हमी वचनाचे पावित्र्य जपण्याठी अधिकारी -कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ



        कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली, सुट्टीच्या मोबदल्यात अधिकारी-कर्मचारी संघटनाने कामाची हमी दिली असून जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्यासाठी आज सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांनी कर्तव्य भावनेतून वचनबध्दतेची शपथ दिली.
        महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात या शपथ कार्यक्रमास  महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे,  जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सतीश पायस, जिल्हा सांख्यिकी अधिकारी भूषण देशपांडे, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह अधिकारी- कर्मचारी  उपस्थित होते.
          अधिकारी - कर्मचाऱ्यांनी दिलेली शपथ अशी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुरोगामी भूमितील नागरिक असण्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. या थोर पुरुषांच्या महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे अथक प्रयत्नशील असतो. यापुढेही कार्यालयीन कामाच्या वेळेत जनतेची कामे अधिक वेगाने व सकारात्मक दृष्टीने सदैव करीत राहू. आमच्या रजा अथवा सुट्ट्या यामुळे जनतेच्या कामांत कोणतीही अडचण येणार नाही. आमची सर्व ऊर्जा, सर्जनशीलता आणि उत्साह याद्वारे 21 व्या शतकातील वैभवशाली नवमहाराष्ट्राच्या उभारणीसाठी आम्ही वचनबध्द होत आहोत. वचनाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी जनतेचे सेवक या नात्याने आमच्या कार्यसंस्कृतीद्वारे आम्ही स्वीकारत असून त्याची हमी महाराष्ट्राच्या जनतेला देत आहोत.
00000
         



जनगणना आता मोबाईल ॲपद्वारे अधिकारी -कर्मचाऱ्यांनी डिजीटल जनगणनेची अचूक माहिती घ्यावी -जिल्हाधिकारी दौलत देसाई जनगणनेची माहिती नियोजन व देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत -जिल्हाधिकारी






       कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : जनगणना ही आता मोबाईल ॲपद्वारे होणार असल्याने ती अधिक अचूक आणि प्रभावीपणे होईल, यासाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी डिजीटल जनगणनेची अचूक माहिती घेऊन काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
       जनगणना संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जनगणना 2021 साठी नियुक्ती केलेल्या जिल्हास्तरीय जनगणना अधिकारी आणि चार्ज अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण सत्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात आयोजित केलेल्या या प्रशिक्षण सत्राच्या शुभारंभास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सतीश पायस, जिल्हा सांख्यिकी अधिकारी भूषण देशपांडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जनगणनेची माहिती नियोजन व देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत -जिल्हाधिकारी
          जनगणना 2021 ही भारताची प्रथम डिजीटल जनगणना असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, सन 1872 पासून भारताची दशवार्षिक जनगणना अखंडपणे सुरु असून यावेळची ही सोळावी जनगणना आहे. जनगणनेतून संकलित होणाऱ्या माहितीला अनन्य साधारण महत्व असून ही माहिती नियोजन व देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत माहिती म्हणून मानली जाते, त्यामुळे या जनगणनेला महत्व आहे.    भारताच्या जनगणनेच्या इतिहासामध्ये ही पहिलीच मोबाईल ॲप तसेच पत्रकावर माहिती भरणे अशा दोन पध्दतीद्वारे होत असून घरयादी व घरगणना करण्यासाठी सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकाद्वारे मोबाईल ॲप अत्यंत सोपे आणि सोईस्कर ठरणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जनगणनेची व्याप्ती मोठी असून ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर घरयादी तयार करण्याचे काम होणार आहे.
          कोल्हापूर जिल्ह्याने आर्थिक जनगणनेचे काम अतिशय उल्लेखनिय पध्दतीने केले असून जनगणेनेचे कामही त्याचपध्दतीने होईल, असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे काम पथदर्शी पध्दतीचे व्हावे यासाठी जनगणेनेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मनापासून आणि संवेदनशीलपणे जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.         
          महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी याप्रसंगी बोलताना म्हणाले, भारतीय जनगणनेच्या इतिहासामध्ये 2021 ची जनगणना ही जगातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय स्तरावरची असून यंदाही सलग सोळावी जनगणना आहे. ही जनगणना मोबाईल ॲपद्वारे होणार असल्याने नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांनी जनगणनेच्या सर्व प्रक्रियेची सविस्तर  माहिती घेऊन जनगणनेचे राष्ट्रीय कार्य पार पाडावे तसेच जनगणना हे राष्ट्रीय कार्य असून देशाच्या विकास व नियोजनासाठी अतिशय उपयुक्त असल्याने सर्वांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहनही महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
          याप्रसंगी जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सतीश पायस यांनीही जनगणनेच्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा सांख्यिकी अधिकारी भूषण देशपांडे यांनी स्वागत केले तर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी जिल्ह्यातील जनगणनेच्या कार्यपध्दतीची आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
000000

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन




        कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : शासकीय वसतिगृहात प्रवेश पात्र असलेल्या भटक्या जमाती (क) प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आदीवासी विकास योजनेच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर नवीन स्वतंत्र योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. यासाठी प्रवेश पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींनी 3 मार्च  अर्ज पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत.  
       या योजनेचा लाभ महानगरपालिकेच्या 5 किमी क्षेत्राच्या आत मॅट्रीकोत्तर उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु स्थानिक नसलेल्या व पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींना देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी (दूरध्वनी क्रमांक- 0231-2651318) सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर, सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
0000

मुंबई येथे डाक अदालतीचे आयोजन




        कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबईव्दारे 112 वी डाक अदालत दिनांक 17 मार्च रोजी सकाळी 11 वा. मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
        महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.
          संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहाय्यक निर्देशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. इमारत, दुसरा माळा, मुंबई- 400001 यांच्या नावे दोन प्रतीसह दिनांक 4 मार्च पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या वेबासाइट www.maharashtrapost.gov.in  वर उपलब्ध आहे.
00000


अंत्योदय कार्डधारकांसाठी फेब्रुवारीचे साखर नियतन



        कोल्हापूर दि. 27 (जि.मा.का.)  : जिल्ह्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना वीस रुपये प्रति किलो प्रमाणे प्रतिकुटुंब एक किलो साखर मंजूर करण्यात आली असून माहे फेब्रुवारी व मार्चसाठी मंजूर साखर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
       फेब्रुवारी ते मार्च 2020 या दोन माहसाठी अंत्योदय रेशन कार्डधारकांना प्रतिकुटुंब एक किलो प्रमाणे पुरवठा करण्याकरिता 1481 क्विंटल साखरेची मागणी करण्यात आली असून जानेवरी 2020 करिता तालुकानिहाय नियतन पुढीलप्रमाणे आहे.
          शासकीय गोदाम रमणमळा, ता. करवीर 13.60 क्विंटल, शासकीय गोदाम रमणमळा, कोल्हापूर शहर- 30.91 क्विंटल, शासकीय गोदाम पोर्ले तर्फे ठाणे, ता. पन्हाळा- 35.91 क्विंटल, शासकीय गोदाम हातकणंगले 49.92 क्विंटल, शासकीय गोदाम इचलकरंजी 48.05 क्विंटल, शासकीय गोदाम जयसिंगपूर ( ता. शिरोळ ) 46.42 क्विंटल, शासकीय गोदाम कागल 40.90 क्विंटल , शासकीय गोदाम शाहूवाडी 32.31 क्विंटल, शासकीय गोदाम गगनबावडा 8.79 क्विंटल, शासकीय गोदाम भूदरगड 27.80 क्विंटल, शासकीय गोदाम गडहिंग्लज 57.88 क्विंटल, शासकीय गोदाम आजरा 37.60 क्विंटल, शासकीय गोदाम चंदगड 60.06 क्विंटल, शासकीय गोदाम राधानगरी 42.98 क्विंटल असून यासाठीचे पुरवठादार गुरु गणेश ट्रेडीग कंपनी हे आहेत.
                                                               00000


बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

गॅस वितरण गाडीवर दर फलक लावा जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश






        कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : जिल्ह्यातील प्रत्येक गॅस वितरण गाडीवर गॅस दराचे दरपत्रक प्रसिध्द करावे. गॅस वितरण करणाऱ्या व्यक्तींने उध्दट वर्तन केल्यास त्यांच्यावर संबंधित गॅस कंपनीने कारवाई करावी, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत दिले.  
       जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती शाहूजी सभागृहात आज झाली. बैठकीस पोलीस निरीक्षक (शहर वाहतूक) वसंत बाबर, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहूल माने, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर, सहायक पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील,   अशासकीय सदस्य अरुण यादव आदी उपस्थित होते. 
            जिल्हा पुरवठा अधिकारी  श्री. कवितके म्हणाले, गॅस वितरणाबाबत खूप तक्रारी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे येत असून गॅस कंपन्यांनी ग्राहकाबरोबर संवेदनशिलपध्दतीने वागणे आवश्यक आहे. गॅस कंपन्यांमधील अधिकाऱ्यांनी सर्व गॅस एजन्सीमध्ये भेट द्यावी. जादा दराने गॅस सिलेंडरचे वाटप करणाऱ्या वितरकांवरही कारवाई करावी.  त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला बदलणाऱ्या दराची प्रसिध्दी करावी, अशा सूचनाही श्री. कवितके यांनी दिल्या.
            अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील औषध दुकानांची तपासणी करावी. वैद्यकीय व्यवसायाची नोंद नसणाऱ्या डॉक्टरांवर कडक करावाई करावी.  फार्मासिस्ट उपलब्ध नसणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित करावेत. संबंधित विभागाने तक्रारीचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर निवेदनाचे उत्तर संबंधित तक्रारदारास देणे आवश्यक आहे.  एस.टी.चा मार्ग काही कारणास्तव रद्द होणार असेल तर एस.टी. महामंडळाने प्रवाशांना सूचना द्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रसाधन गृह, हवा व पाण्याची सोय आहे काय याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत  पेट्रोल कंपन्यांच्या सेल्स ऑफीसर यांना  यावेळी सूचना देण्यात आल्या.
             स्वस्त धान्य दुकानाची तपासणी होण्याबाबत, गॅस ग्राहक यांची आर्थिक शोषण होत असल्याबाबत, गॅस वेळेत मिळत नाही, गॅसचे वजन करुन न देणे, पावती न देणे, जादा दराचे गॅस विक्री करणे, उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस जोडणी जादा दराने करणे असा तक्रारी अर्ज  अरुण यादव यांनी दाखल केला आहे.  याबाबत गॅस कंपन्यांची गॅस एजन्सीच्या बैठक घेवून तक्रारी निदर्शनास आणून द्याव्या असे करणाऱ्यांवर कडक करावाई करावी, अशा सूचना गॅस कंपन्यांना दिल्या. अनिल जाधव यांनी दूधगंगा नदी पात्रामध्ये वैद्यकीय कचरा तसेच प्रदूषण युक्त कचरा टाकला जातो असा तक्रार अर्ज दाखल केला असून याबाबतही संबंधित विभागाने चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
                         शहरातील रिक्षा चालकांना गणवेश आणि मीटर प्रमाणे भाडे आकारणी याबाबत पुढाकार घेतला. नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई केल्याबद्दल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांचा  अखिल भारतीय ग्राहक परिषदेमार्फत सत्कार करण्यात आला.

000





राज्यपालांचे विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत





        कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.)  :  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे कोल्हापूर विमानतळावर महापौर निलोफर अजरेकर आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वागत केले.
            यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शितल मुळे-भामरे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाच्यावतीने राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.
000000




त्याग-सदभावाचे कार्य समाजाला प्रेरक - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी








       कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.)  :  त्याग, सदभाव, साधना हा मानवी जीवनाचा ठेवा असून त्याग आणि सदभावाचे साधु-संतांचे कार्य समाजाला प्रेरक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
        श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्या वतीने येथील भक्तीपूजानगरमध्ये तेरापंथ समुदायाचे 11 वे अधिशास्ता आचार्य महाश्रमण यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय नागरिक अभिनंदन सोहळयात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. या सोहळ्यास  महापौर निलोफर अजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते.
            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या अहिंसा यात्रेतून सदभावना, नैतिकता आणि नशामुक्तीचा संदेश देवून समाजाला नवा विचार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. सर्वानी सदप्रवृत्ती आणि त्याग तसेच व्यसनमुक्तीचा विचार घेवून या यात्रेत सहभागी व्हावे. साधू-संतांचे सदप्रवृत्तीचे आणि नशामुक्तीचे सुरू केलेले कार्य समाज हिताचे महान कार्य असल्याचेही ते म्हणाले.
            राज्यपाल म्हणाले, त्यागातून आणि साधनेतून नवा विचार आणि समाधान मिळते, त्यामुळे त्यागी पुरूषांचा समाजात सन्मान होत आहे. त्यांचे विचार समाजात आंगिकारले जात आहेत. महापुरूषांच्या सात्विक वाणीचा आणि विचारांचा समाजावर प्रभाव पडतो, या विचारातून समाज मन जीवंत व तेजस्वी राहिल, भारतीय संस्कृतीमध्ये त्यागाला अनन्य साधारण महत्व असून साधू-संतांनी असे जीवन जगून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. समाजानेही साधू-संतांचा सन्मान राखून त्यांच्या विचारांचा अंगिकार केला आहे, हिच भारताची विशेषत: म्हणावी लागेल. सदप्रवृत्ती ही समाजाला जीवंत ठेवणारी असून सदप्रवृत्ती आणि त्यागी जीवनाचा मार्ग साधू-संतांच्या विचारातून समाजाला मिळतो आहे. हा विचार सूर्य प्रकाशासारखा तेजस्वी प्रेरणास्त्रोत ठरेल, असा विश्वासही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केला.
            त्यागी जीवन आणि सदमार्गावर चालणाऱ्या साधू-संतांचे विचार ऐकण्याची आणि त्यांच्या सहवास मिळण्याची संधी या कार्यक्रमामुळे उपलब्ध झाल्याबद्दल राज्यपाल महोदयांनी  समाधान  व्यक्त केले.
            आचार्य महाश्रमण यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, सदभावना, नैतिकता आणि नशामुक्तीचा विचार प्रत्येकाने जोपासणे समाज हिताचे आहे. संपूर्ण जीवन उच्च विचाराने जोपासून शांती आणि सदभावाचा मार्ग स्वीकारणेही तितकेच महत्वाचे आहे. माणसाने बाह्य आभूषणापेक्षा आंतरमन स्वच्छ ठेवून सत्य, स्वच्छ विचार याला महत्व द्यावे.
            कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील यांचा शुभेच्छा संदेश वाचन करण्यात आला. याप्रसंगी महापौर निलोफर आजरेकर, कुमार श्रवणजी, साध्वी प्रमुखाक्षी, विजय कोराणे आदींनी विचार व्यक्त केले. प्रारंभी उत्तमचंद पगारिया यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समारंभास उद्योजक सुरेश जैन, उपमहापौर संजय मोहिते, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, संचालक ललित गांधी, जयेश ओसवाल, राहुल चिकोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शितल मुळे-भामरे यांच्यासह अनेक मान्यवर, साधू-साध्वी आणि तेरापंथी समुदायाचे श्रावक उपस्थित होते.
000000



मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०



इंडियन पोस्ट पेमेंट बँक खात्यासाठी पोस्टाची विशेष मोहीम
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका)  : इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही लोकाभिमुख असून प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्याची माहिती पोहचविण्यासाठी डाक विभागामार्फत दिनांक 27 ते 29 फेब्रुवारी 2020 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवर अधिक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व जनतेने दिनांक 27 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावून अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.
00000


दिव्यांगांच्या योजनांची शासनाकडून प्रभावी अंमलबजावणी -रामदास आठवले







कोल्हापूर, दि. 25 (जिमाका)  :-  दिव्यांगांना बळ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्वाचे आहे. यासाठी  शासनाने त्यांच्यासाठी सुरु केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्यावतीने शिवाजी विद्यापीठ येथे  जिल्ह्यातील दिव्यांगांना सहाय्यक साधन साहित्य वाटप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले व रतन लाल कटारिया यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.        कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, महापौर निलोफर आजरेकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने,  शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अतीरिक्त  पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आदी उपस्थित होते.
सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला सामाजिक समतेचा मोठा वारसा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष योजना सुरु केल्या. शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन सरकारने सामाजिक न्याय विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. यामध्ये  दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 950 कोटीची तरतूद करण्यात आली  असून यातून या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील. दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनांचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय विभागांनी पुढाकार घ्यावा. जिल्हा परिषदेने  जिल्ह्यात दिव्यांग उन्नती अभियान यशस्वीपणे राबविले असून या योजनेतून दिव्यांगाना उपलब्ध होत असलेल्या साहित्यामुळे त्यांच्या जीवनात उभारी येणार असल्याचे श्री. आठवले म्हणाले.
 सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. कटारिया म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरु केल्या आहेत. दिव्यांगांना आधार मिळावा, त्यांचे जीवन सुखद व्हावे यासाठी त्यांना आवश्यक असणारी अत्याधुनिक समग्री उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  यासाठी अनेक नामवंत कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. दिव्यांगाना आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करुन देण्यासाठी आतापर्यंत देशात 575 शिबिराचे आयोजन केले.  सरकाराने या शिबिरातून सुमारे 5 लाख  10 हजार दिव्यांगांना आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन दिली असल्याचे श्री. कटारिया म्हणाले.  तसेच  देशात अटल भूजल योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून या योजनेतून भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी  काम केले जात असून  प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यासाठी  जलशक्ती मंत्रालयामार्फत नियोजन केले जात असल्याचे ते म्हणाले.
खासदार धैर्यशील माने व संजय मंडलिक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी स्वागत करुन  प्रास्ताविकात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या दिव्यांग उन्नती अभियानाची माहिती दिली.  ते म्हणाले. या अभियानातून जिल्ह्यात 45 हजार 496 दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली असून ती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  यामधील 15 हजार 695 दिव्यांगांना  23 हजार 495 उपकरणाचे वितरण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. दिव्यांगाना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या साहित्य वितरणाची शिबीरे तालुकास्तरावर आयोजित केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
000000






ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर जिल्ह्यातील 4 ग्रामपंचायतींचा समावेश



कोल्हापूर, दि. 25 (जिमाका)  :  माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 1570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 4 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाचाही समावेश आहे.
 सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक गुरूवार दिनांक 27 फेब्रुवारी 2020. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) शुक्रवार दिनांक 6 मार्च 2020 ते शुक्रवार दिनांक 13 मार्च 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. (दिनांक 8 मार्चचा रविवार व दिनांक 10 मार्च रोजीची सार्वजनिक सुट्टी वगळून ) नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) सोमवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) बुधवार दिनांक 18 मार्च 2020 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक वेळ बुधवार दिनांक 18 मार्च 2020 रोजी दुपारी 3 नंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक रविवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत. (गडचिरोली जिल्ह्यासाठी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत) मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) सोमवार दिनांक 30 मार्च 2020. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार दिनांक 4 एप्रिल 2020 पर्यंत
0000

यावर्षी जिल्हयात 44 लाख 8 हजाराचा गुटखा साठा जप्त - सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर



कोल्हापूर, दि. 25 (जि.मा.का.) : अन्न व औषध प्रशासनाने गुटखा तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात आली असून यावर्षी आतापर्यंत 44 लाख 8 हजार 626 रुपयांचा साठा जप्त केला असल्याचे स्पष्टीकरण  अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी केले.
जिल्हयात सन 2019-जाने 2020 अखेर 45 कारवाया करण्यात आल्या असून यामध्ये 831.04 किलो वजनाचा 44 लाख 8 हजार 626.5 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. यापुढेही ही मोहिम अधिक गतीमान केली जाईल,असेही श्री. केंबळकर यांनी स्पष्ट केले.
00000



सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

30 दिवसांचे कुक्कूटपालन प्रशिक्षण



कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र या कुक्कुटपालन प्रक्षेत्रावर दर महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत एकुण 30 दिवसांचे कुक्कूटपालन प्रशिक्षण आयोजित केले जाते. या प्रशिक्षणासाठी प्रतिमाह 200 रूपये फी राहिल.
प्रशिक्षणासाठी इच्छूक व्यक्तींनी दर महिन्याच्या 25 ते 30 तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहनही पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
00000

कुक्कुट खाद्य गोण्याचा बुधवारी लिलाव



       कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) :  मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील कुक्कुट खाद्याच्या रिकाम्या गोण्यांचा जाहीर लिलाव बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी  11 वाजता करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे..
 माध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, सर्किट हाऊसजवळील या कार्यालयाच्या सूचना फलकावर लिलावाच्या अटी/शर्ती प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. गोणी पाहण्यासाठी व्यवस्थापनाशी कार्यालयीन वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 0231-2651729 याव दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
000000

शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करण्यास 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ -शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे




कोल्हापूर, दि. 24 (जिमाका)  :  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करण्यास 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती शिक्षण  सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टल 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगून डॉ. अशोक उबाळे म्हणाले,आतापर्यंत एकूण 40 हजार 957 एवढे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज करताना ॲडमिशन पावती, पासिंग सर्टीफिकेट/ मार्कशीट, डोमेशिएल दाखला, उत्पन्नाचा दाखला व रेशन कार्डाची झेरॉक्स प्रत किंवा प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रांची पुर्तता करावयाची आहे.
विद्यार्थ्यांनी www.Mahadbtmahait.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. महाविद्यालयांमध्ये याबाबत कक्षाची स्थापना करण्यात आली असून एका प्राध्यापकाची शिष्यवृत्ती समन्वयक म्हणून निवड करण्यात आली असल्याचेही डॉ. उबाळे म्हणाले.
00000