इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३१ मार्च, २०२१

अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव 9 एप्रिल रोजी

 

कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : थकीत मोटार वाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसेससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव शुक्रवार दि. 9  एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत ई-लिलाव पध्दतीने करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.

www.eauction.gov.in या संकेतस्थळावर दि. 6 एप्रिलपासून माहिती उपलब्ध होईल.

00000

 

 

 

 

 

 

 

 

कृषी पर्यटनामध्ये सहभागी होण्यास इच्छुक माजी सैनिकांना संपर्क करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) :- जिल्ह्यातील बेरोजगार एवं शेती व्यवसायावर अवलंबित तसेच कृषी पर्यटनामध्ये सहभागी होण्यास इच्छुक माजी सैनिक/विधवांना आवश्यक मार्गदर्शन करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनीधीव्दारा जिल्हास्तरीय चर्चासत्र आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. या चर्चासत्रात सहभागी होण्यास इच्छुक जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवांनी आपले नाव, पत्ता, दूरध्वनी संपर्क क्रमांक दि. 10 एप्रिल पर्यंत फोन किंवा ई-मेलव्दारे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

चर्चासत्राची वेळ व ठिकाण नंतर सुचित केले जाईल, असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

 

 

 

 

 

 

भारत-चीन युध्दात सहभागी व निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या माजी सैनिकांना प्रत्यक्ष भेटण्याचे आवाहन

 


कोल्हापूर दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) :- 1962, 1965 आणि 1971 च्या भारत-चीन/पाकिस्तान युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या व निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या माजी सैनिक/विधवा यांनी आपले ओळखपत्र, डिस्चार्ज पुस्तक व युध्दात सहभागी झाल्याप्रित्यर्थ प्रदान केलेल्या नमुद पदकाच्या पुराव्यासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दि. 10 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

भारत सरकारव्दारा 1962 च्या भारत-चीन युध्दामध्ये सहभागी सैनिकांना LADAKH-1962 CLASP/NEFA-1962CLASP हे पदक, 1965 च्या भारत-पाकिस्तान युध्दात सहभागी सैनिकांना रक्षा पदक/समर सेवा स्टार हे पदक व 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात सहभागी सैनिकांना संग्राम पदक प्रदान करण्यात आले असल्याचेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितले.

0000000

 

 

सेंद्रिय गटांना वाहन वाटपाचा कार्यक्रम संपन्न

 


कोल्हापूर दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) :- परंपरागत कृषि विकास योजने अंतर्गत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सेंद्रिय गटांना वाहन वाटपाचा कार्यक्रम काल जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला.

         कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कृषि सहसंचालक दशरथ तांभाळे,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालकजालिंदर पांगरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच सेंद्रिय गटांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पीजीएस ऑरगॅनिक प्रमाणपत्राचे प्राथमिक स्वरुपात वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी गटांना वाहनाचा वापर आपला शेतमाल विक्रीसाठी संत सावता माळी रयत बाजार अभियानअंतर्गत स्थापित झालेल्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्रावर आणण्याबाबत तसेच इतर वाहतुकीसाठी वापर न करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महालक्ष्मी सेंद्रिय गटामार्फत सेंद्रिय भाजीपाला बास्केट भेट म्हणून देण्यात आले.

जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत एकूण 37 गट स्थापन झाले आहेत. या गटांना वाहन खरेदीसाठी  1.20 लाख रूपयांची तरतूद असून श्री. महालक्ष्मी सेंद्रिय शेती उत्पादक गट, धरणगुत्ती ता. शिरोळ, ब्रम्हदेव सेंद्रिय शेतकरी गट, सरंबळवाडी ता.आजरा, शंभू महादेव सेंद्रिय शेती गट, खुटाळवाडी ता.शाहूवाडी या गटांनी वाहन खरेदी केलेले आहे.

00000

           

मंगळवार, ३० मार्च, २०२१

द्राक्ष महोत्सवाचा 'गोडवा' 21 लाखांवर

 




 

कोल्हापूर दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :- राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या फळांना चांगला दर मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळा मार्फत राज्यात व राज्याबाहेर वेगवेगळ्या फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कोल्हापूर विभागातील द्राक्ष उत्पादकांना चांगला दर मिळावा म्हणून उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत गोवा व कोल्हापूर येथे द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर येथे आयोजित द्राक्ष महोत्सवात सुमारे २१ लाखांवर विक्री झाली असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली. 

महोत्सवात सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस व जत तालुक्यातील एकूण १८ शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला होता. कोल्हापूर द्राक्ष महोत्सवात एकूण ३०.१०५ मे. टन द्राक्षांची विक्री करण्यात आली. द्राक्ष उत्पादकांना सरासरी प्रती किलो ६० रु दर मिळालेला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीतून रक्कम १८ लाख प्राप्त झाले आहेत. कोल्हापूर द्राक्ष महोत्सवामध्ये १ मे. टन बेदाण्याची विक्री झालेली असून द्राक्ष उत्पादकांना सरासरी रुपये. २६० प्रती किलो दर प्राप्त झालेला आहे. बेदाणा विक्रीपोटी द्राक्ष उत्पादकांना अंदाजे रुपये २.७३ लाख प्राप्त झालेले आहेत. कोल्हापूर द्राक्ष महोत्सवात एकूण रक्कम रुपये २०.७३ लाखांची उलाढाल झालेली आहे.

अभिनेते राहूल सोलापूरकरांची भेट

   २६ मार्च ते आजअखेर झालेल्या या महोत्सवात अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी आज भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

गोवा राज्यात फोंडा येथे दि. २० मार्च ते २४ मार्च २०२१ या कालावधीन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोवा द्राक्ष महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सावामध्ये एकूण १९ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला होता. महोत्सवामध्ये एकूण १७.५ मे.टन द्राक्ष विक्री करुन द्राक्ष उत्पादकांना रक्कम रु. १५.५ लाख प्राप्त झाली. द्राक्ष उत्पादकांचे ५०५ किलो बेदाणा विक्रीतून रक्कम रुपये २.०२ लाख द्राक्ष उत्पादकांना प्राप्त झाले. गोवा द्राक्ष महोत्सवामध्ये एकूण रक्कम रुपये १७.७७ लाख उलाढाल झाली.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या फळांना चांगला दर मिळावा म्हणून कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, मंत्री (सहकार व पणन), उपाध्यक्ष. शंभुराज देसाई. (राज्यमंत्री पणन), अनुपकुमार, प्रधान सचिव, सुनिल पवार, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे, दिपक शिंदे, सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व राज्याबाहेर वेगवेगळ्या फळ महोत्सवाचे आयोजन करीत असते.

कोल्हापूर विभागामध्ये माहे मे २०२१ मध्ये हापूस व केशर आंबा उत्पादकांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पणजी (गोवा) व बेळगाव येथे आंबा महोत्सव २०२१ चे आयोजन प्रस्तावित असल्याचे उपसरव्यवस्थापक श्री. घुले, यांनी कळविले आहे.

00000

कोरोना टेस्टिंगसाठी नागरिकांनी पुढे यावे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांचे आवाहन

 


कोल्हापूर दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  जिल्ह्यात कोरोना साथ रोग प्रतिबंधासाठी नागरीकांनी टेस्टिंगसाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.

  जिल्ह्यातील कोरोना तपासणी साठी स्वॉब नमुने जास्तीत जास्त घेणे गरजेचे असताना नागरिक टेस्टींगसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे विषाणू संसर्ग झपाटयाने वाढू शकतो. यासाठी  अतिजोखमीचा गट (super sprader) , कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले, सर्दि, ताप, खोकला लक्षणे असलेले, प्रतिबंधीत क्षेत्रातील व सारी सारखे लक्षणे असलेले रुग्ण यांनी स्वता:हुन  स्वॉब तपासणी करुन घेणेसाठी पुढे  आले पाहिजे. त्यामुळे निदान करणे सोपे होईल व आपले नातेवाईक ,कुटुंबीय, मित्रपरिवार, जेष्ठनागरिक, सुरक्षीत राहतील.

स्वॉब तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविघालय, आय.जी.एम. इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, सर्व  तालुक्यातील कोवीड काळजी केंद्रे, ॲस्टरआधार हॉस्पीटल कोल्हापूर, डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, अंबिका लॅबरोटरी कोल्हापूर, जीवन लॅबरोटरी, कोल्हापूर, या ठिकाणी तपसाणी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने स्वॉब टेस्टिंगसाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यामध्ये कोवीड प्रार्दुभाव वाढत आहे प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी जास्तीत जास्त लोकांनी   स्वॉब नमुने तपासणी करणे गरजेचे आहे. कोवीड निदानासाठी आर.टी. पी.सी.आर. व रॅपीड ॲन्टीजन टेस्ट अत्यंत महात्वाची आहे. कोवीड चाचणीचे प्रमाण वाढल्यास रुग्णांस निश्चित निदान होवून सत्वर उपचार  मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांचा आजार बळवणार नाही आणि इतरांना संसर्ग होणार नाही. पर्यायाने पॉझिटिव्ह रेट व मृत्यूदर नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होणार आहेत. जिल्ह्यामध्ये जानेवारी 2021 मध्ये 29166 इतके स्वॉब नमुने घेतले होते तर 431 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. तर फेब्रुवारी 2021 मध्ये 26020 इतके स्वॉब नमुने घेतले होते तर 601 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. 30  मार्च 2021 अखेर 35438 इतक्या रुग्णाने स्वॉब नमुने घेतले असून 1458 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत असून जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण  वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे कडक प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्या बाबत प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.  जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव परत मोठया प्रमाणात वाढू नये यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाया योजना राबविण्यात येत आहे. रात्रीची संचार बंदी,  मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकावर दंड आकारणे, सामाजिक अंतर पालन करणे, धार्मिक, सामाजिक, राजकिय कार्यक्रमावर बंदी, No Mask, No Entry  इ. उपाय योजना राबविण्यात येते आहेत.

000000

आजअखेर 49 हजार 435 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 806 प्राप्त अहवालापैकी 757 अहवाल निगेटिव्ह तर 30 अहवाल पॉझिटिव्ह (19 अहवाल नाकारण्यात आले).  अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 97 प्राप्त अहवालापैकी 93 अहवाल निगेटिव्ह तर 4 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 291 प्राप्त अहवालापैकी 243 निगेटिव्ह तर 48 पॉझीटिव्ह  असे एकूण 82 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 51 हजार 979 पॉझीटिव्हपैकी 49 हजार 435 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 772 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 82 पॉझीटिव्ह अहवालापैकी गडहिंग्लज-1, हातकणंगले-4, कागल-1, करवीर-10, शाहूवाडी-1, शिरोळ-2, नगरपरिषद क्षेत्र-5 कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 44, इतर जिल्हा व राज्यातील-14 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-914, भुदरगड- 1261, चंदगड- 1235, गडहिंग्लज- 1555, गगनबावडा- 155, हातकणंगले-5416, कागल-1703, करवीर-5893, पन्हाळा- 1894, राधानगरी-1268 शाहूवाडी-1376, शिरोळ- 2530, नगरपरिषद क्षेत्र-7712, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 16 हजार 420 असे एकूण  49 हजार 332 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 647 असे मिळून एकूण 51  हजार 979  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 51 हजार 979 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 49 हजार 435 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 772 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 772 इतकी आहे.

0000000

लसीकरणाबरोरच ट्रेसिंग व टेस्टिंग वाढवा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचना

 



कोल्हापूर दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रुग्ण संख्या अटोक्यात ठेवण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाबरोबरच ट्रेसिंग व टेस्टिंग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या.

कोरोना प्रतिबंधात्मक  उपाय योजना आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी, वैद्यकीय अधिकारी  यांच्याशी जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी  दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतीरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, शेजारच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता येणाऱ्या काळात धोका टाळण्यासाठी पुन्हा सर्वांनी जागरुक राहून काळजी  घ्यावी.  आपल्या जिल्ह्यातही रुग्णांचा पॉझिटीव्ह रेट वाढत आहे. मागील वर्षी उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता आता सर्वांनी सतर्क व दक्ष राहून त्यासाठी आतापासूनच सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेले जाबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी. ज्या तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे त्या तालुक्यात रुग्ण संख्या वाढणार नाही यासाठी एका रुग्णामागे 20 ते 30 लोकांचे ट्रेसिंग  करावे.  यामधील संशयित रुग्णांचे टेस्टिंग करुन त्यांना पुढील उपचारासाठी योग्य त्या ठिकाणी पाठविण्याची व्यवस्था करावी. नोडल अधिकाऱ्यांनी माझा तालुका माझी जबाबदारी समजून पुढील काळात काम करुन संपूर्ण तालुक्याची जबाबदारी स्वीकारावी. जिल्हास्तरावरुन देण्यात आलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी आपल्या कार्यक्षेत्रात करुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  सुक्ष्म नियोजन करावे. 

तालुकास्तरावर कोविड काळजी केंद्र कार्यान्वित करा

तालुकास्तरावर कोव्हिड काळजी केंद्र कार्यान्वित करुन प्रत्येक केंद्रात सुमारे 100 रुग्णांची सोय होईल या दृष्टिने नोडल अधिकारी, तहसिलदार व संबंधित यंत्रणेने नियोजन करावे. तालुकास्तरावरील आयसोलेशन सेंटर  गाव पातळीवर सुरु करण्याबाबतही नियोजन करावे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची सोय गाव पातळीवरील आयसोलेशन सेंटरवर करण्यात यावी. यासाठी ग्राम समित्या पुन्हा सक्रीय होणे आवश्यक आहे. ग्राम व प्रभाग समित्यांनी ट्रेसिंगसाठी पुढाकार घ्यावा.  गावात, नगरपालिका क्षेत्रातील हॉट स्पॉट क्षेत्रातील सर्व लोकांची तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिल्या.

नोडल अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावरुन हॉटस्पॉटची यादी पाठविण्यात येत असते. त्यानुसार त्या भागाचा सर्व्हे करुन त्या ठिकाणी आवश्यक उपाय योजना राबविण्यावर भर द्यावा. गतवर्षीप्रमाणे खासगी रुग्णालयातील खाटांचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आतापासून करावे. तसेच खासगी हॉस्पिटलमधील  कोरोना रुग्णांच्या देयकांची तपासणी करण्यासाठी लेखा परीक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. यासाठी आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन जिल्हास्तरावरुन करण्यात येईल.

लसीकरणासाठी 370 केंद्रे

जिल्हाधिकारी म्हणाले, यापूर्वी 60 वर्षावरील व व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात  150 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. आता 45 वर्षावरील लोकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याने यापूर्वीची 150 व आणखी 220 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात येत असल्याने जिल्ह्यात 370 लसीकरण केंद्रे कार्यानिव्त  राहणार आहेत.  60 वर्षावरील व व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरणामध्ये  कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम आहे. त्याच प्रमाणे नोडल अधिकाऱ्यांनी  आताही लसीकरणामध्ये जिल्हा अग्रेसर राहील यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रनिहाय  नियोजन करुन नागरिकांचे लसीकरण करुन घ्यावे. गावात लसीकरणाचे नियोजन करुन त्यानुसार त्या-त्या  लसीकरण केंद्रावर नागरिकांना पाठविण्याची जबाबदारी  पार पाडावी. प्रत्येक केंद्रावर दररोज सुमारे 200 लोकांचे लसीकरण झाल्यास एप्रिल अखेर जिल्हातील 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल. लसीकरणासाठी आवश्यक असणारा लसीचा पुरवठा करण्यासाठी जिल्हास्तरावरुन सर्व उपाय योजना करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले.

पहिल्या व दुसऱ्या डोससाठी स्वतंत्र व्यवस्था करा

            लसीकरण केंद्रावर पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तीसाठी तसेच दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तीसाठी स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक आहे.  यासाठी लसीकरण केंद्रावर दोन कॉऊंटर सुरु करावेत. पहिला डोस ज्या कंपनीच्या लसीचा दिला आहे, त्याच कंपनीच्या लसीचा दुसरा डोस नागरिकांना‍ दिला जाईल यासाठी नोडल अधिकारी व संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदी ठेवून त्याप्रमाणे नागरिकांना डोस द्यावा. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे.

ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करा

            रुग्णांना आवश्यकता भासल्यास त्वरित ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी  नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठीचे नियोजन करावे. गतवर्षी प्रमाणेच यंत्रणा उभी करुन त्याचा वापर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले,  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे.  यासाठी एका रुग्णामागे 20-30 लोकांचे ट्रेसिंग होणे गरजेचे आहे. लोकांमध्ये जनजागृती  होण्यासाठी ग्राम समित्यांनी काम करावे. गतवर्षीप्रमाणेच ग्राम समित्या ॲक्टिव्ह झाल्या तर आपण करोनाच्या दुसऱ्या लाटेचाही मुकाबला करु असे ते म्हणाले. गृहअलगीकरणात असलेल्या व्यक्तींवर ग्राम समितीने नजर ठेवण्याबरोबर लसीकरणासाठी आपल्या गावाचे नियोजनही करावे.

            जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य  उप केंद्रावरही आता लसीकरण केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे.  जिल्ह्यात 220 ठिकाणी ही केंद्रे सुरु केली जाणार असून आज त्यापैकी  50 ते 75 केंद्रे सुरु केली आहेत. लसीकरणासाठी गाव पातळीवर सुक्ष्म नियोजन होणे गरजचे आहे. लसीकरणासाठी  वाडी, वस्ती, पाडे अशा ठिकाणाहून लांबून येणाऱ्या व्यक्तींना लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे.  पहिल्या टप्यात ज्या तालुक्यात लसीकरणाचे काम  कमी झाले आहे त्यांनी लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी काम करावे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज सुमारे 200 लोकांचे लसीकरण पूर्ण होईल अशा पद्धतीने नियोजन करावे.

            ईली व सारीच्या रुग्णांचे सर्व्हेक्षण नियमित होणे आवश्यक आहे. यासाठी गठित करण्यात आलेल्या पथकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात  सर्व्हेक्षणाची मोहीम हाती घ्यावी. सर्व्हेक्षणामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांचा स्वॅब घेण्यासाठी त्यांना केंद्रावर पाठवावे. रुग्णांची वाढ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यावर भर द्यावा. यासाठी ग्राम व प्रभाग समित्यांनी सहकार्य करावे. गृह अलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्ती नियमांचे पालन करतात की नाही याबाबत नियमित तपासणी करावी. गृह अलगीकरणामधील व्यक्तीस आवश्यक ते कीट उपलब्ध करुन द्यावे, अशा सुचना डॉ. साळे यांनी दिल्या.

            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनीही लसीकरण, ट्रेसिंग, टेस्टिंग बाबत सूचना दिल्या.

0000000

शनिवार, २७ मार्च, २०२१

आजअखेर 49 हजार 235 जणांना डिस्चार्ज

 


  कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1524 प्राप्त अहवालापैकी 1475 अहवाल निगेटिव्ह तर 31 अहवाल पॉझिटिव्ह (18 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 114 प्राप्त अहवालापैकी 122 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 268 प्राप्त अहवालापैकी 228 निगेटिव्ह तर 40 अहवाल पॉझिटिव्ह असे एकूण 73 अहवाल पॉझीटिव्ह आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 51 हजार 713 पॉझीटिव्हपैकी 49 हजार 235 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 713 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

       आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 73 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-3,  गडहिंग्लज- 1, हातकणंगले-2, कागल-1, करवीर-7, पन्हाळा-1, शाहूवाडी-1, नगरपालिका क्षेत्र- 9, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 42 व इतर जिल्हा व राज्यातील -6 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-910, भुदरगड- 1258, चंदगड- 1235, गडहिंग्लज- 1551, गगनबावडा- 155, हातकणंगले-5401, कागल-1702, करवीर-5863, पन्हाळा- 1890, राधानगरी-1267, शाहूवाडी-1374, शिरोळ- 2527, नगरपरिषद क्षेत्र-7691, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 16 हजार 277 असे एकूण 49 हजार 101 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 612 असे मिळून एकूण 51  हजार 713  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकुण 51 हजार 713 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 49 हजार 235 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 765 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 713 इतकी आहे.

0000000

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

होळी/शिमगा, धुलिवंदन व रंगपंचमी उत्सव साधेपणाने साजरे करा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचना

 


       कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) :  कोविड -19 च्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर यात्रा,  उत्सव,  उरुस  इ. चे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. "होळी/शिमगा, धुलिवंदन व रंगपंचमी" चा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.

१)                 होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी                      दि. 28 मार्च रोजी होळीचा सण आहे. कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा.

२)                 दि. 29 मार्च रोजी धूलिवंदन व 2 एप्रिल रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतू कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करणे आवश्यक आहे.

३)                 होळी/शिमगा व धूलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत.

 

४)                 कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

"होळी/शिमगा, धूलिवंदन व रंगपंचमी" हे सण / उत्सव साजरा करतेवेळी सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपले अधिनस्त सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात. अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिल्या आहेत.

00 0 0 0 0

गुड फ्रायडे व ईस्टर सन्डे साधेपणाने साजरे करा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचना

 


       कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : ख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे हा दिवस दि. 2 एप्रिल रोजी तसेच ईस्टर सन्डे दि. 4 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन केले जाते. कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वमुमीवर सर्वधर्मीय सण साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. कोविड-19 चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव  साजरा करणे उचित होणार नाही. दि. 28 मार्च ते 4 एप्रिल या 'होली वीक' दरम्यान येणारे "गुड फ्रायडे व ईस्टर संडे" हे सण साधेपणाने साजरे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत. 

1)     दि. 28 मार्च ते 4 एप्रिल, 2021 या दरम्यान 'होली वीक' मध्ये प्रत्येक प्रार्थना सभेच्या वेळी चर्च मधील जागेनुसार लोकांच्या उपस्थितीचे नियमन करावे. मोठे चर्च असल्यास त्यामध्ये जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती व चर्चमधील जागा कमी असल्यास तिथे 10 ते 25 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थनासभेचे आयोजन करावे. जेणेकरुन चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी न होता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील. आवश्यकतेनुसार 4 ते 5 खास प्रार्थना सभांचे (Multiple Masses) आयोजन करावे.

2)     ख्रिश्चन धर्मीय भावीक लोक हे प्रार्थना सभेच्या वेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर करतील याकडे

           विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.

3)     चर्चचे व्यवस्थापक यांनी प्रार्थना सभेच्या ऑनलाईन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. तसेच या सणांसाठी दिले जाणारे संदेश व्हॉटसॲप, फेसबुक, युटयूब यासारख्या सोशल मिडीया माध्यमांतून प्रसारीत करावे.

4)               चर्चच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे वा गर्दी करणे टाळावे.            

 

5)                कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच  

मिरवणूका काढण्यात येऊ नयेत.

6)                 कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

 

"गुड फ्रायडे आणि इस्टर सन्डे" हे सण / उत्सव साजरा करतेवेळी नमुद सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात. अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिल्या आहेत.

 

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री; 30 मार्चपर्यंत शाहू स्मारकमध्ये ‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021’ चे उद्घाटन

 




 


कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून 30 मार्चपर्यंत चालणाऱ्या कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021चे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याहस्ते आज झाले.

दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे 30 मार्चपर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 या कालावधीत हा महोत्सव चालणार आहे. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी फित कापून या महोत्सवाचे आज उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, माजी उपसभापती जीवन पाटील आदी उपस्थित होते.

जंबो सिडलेस खास आकर्षण

महोत्सवामध्ये ग्राहकांना अनुष्का, रेडग्लोब, सुपर सोनाक्का, माणिकचमण, कृष्णा सिडलेस, आर.के.सुपर, शरद सिडलेस आदी जातींची द्राक्षं आहेत. मिरज तालुक्यातील सोनी येथील दिलीप पाटील, प्रतिक लेंगरे या शेतकऱ्यांची जंबो सिडलेस ही द्राक्षं या महोत्सवाची खास आकर्षण ठरली.

          कोव्हिड-19 मुळे शेतकरी वर्गात शेतमाल उत्पादन विक्रीबाबत चिंतेचे वातावरण होते.  विशेषत: द्राक्ष बागायतदारांची निर्यात ठप्प्‍ा होती. त्यामुळे  शेतकरी उत्पादकांच्या मालाची थेट ग्राहकांनी विक्री करण्याच्या उद्देशाने अशा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले, असे सांगून पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक श्री. घुले म्हणाले, गोवा येथेही द्राक्ष महोत्सव भरवण्यात आला होता. ग्राहकांना  तसेच शेतकऱ्यांना याचा चांगला लाभ मिळाला. कोल्हापूर येथील महोत्सवातही ग्राहकांनी भेट देवून सहभाग घ्यावा. निर्यातक्षम, चांगल्या प्रतीची द्राक्ष ग्राहकांना थेट उत्पादकांकडून मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला आर्थिक लाभ होईल, असे आवाहनही त्यांनी केले.

000000

गुरुवार, २५ मार्च, २०२१

कोल्हापूर द्राक्ष महोत्सव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते आज उद्घाटन

 

 

कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : कृषी उत्पन्न समिती सांगली व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली.

या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते उद्या शुक्रवार दि. 26 मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे सकाळी 11.30 वा. होणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे (सरकार), जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, सहकारी संस्थेचे उपजिल्हा निबंधक अमर शिंदे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

द्राक्ष महोत्सवाचे दि. 26 ते 30 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना अनुष्का, रेडग्लोब, सुपर सोनाक्का, माणीकचमण, कृष्णा सिडलेस, आर.के.सुपर, शरद सिडलेस इ. जातींची द्राक्ष असणार आहेत. याचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उत्पन्न समितीचे सभापती दिनकर पाटील व श्री.  घुले यांनी केले आहे.

000000

 

बुधवार, २४ मार्च, २०२१

आजअखेर 49 हजार 115 जणांना डिस्चार्ज

 


  कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1389 प्राप्त अहवालापैकी 1327 अहवाल निगेटिव्ह तर 32 अहवाल पॉझिटिव्ह (26 अहवाल नाकारण्यात आले व 4 परत पॉझीटिव्ह). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 117 प्राप्त अहवालापैकी 107 अहवाल निगेटिव्ह तर 10 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 260 प्राप्त अहवालापैकी 229 निगेटिव्ह तर 31 अहवाल पॉझिटिव्ह असे एकूण 73 अहवाल पॉझीटिव्ह तर एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 51 हजार 476 पॉझीटिव्हपैकी 49 हजार 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 602 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

       आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 73 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2, भुदरगड-1,  हातकणंगले-4, करवीर-10, पन्हाळा-1, शाहूवाडी-2, शिरोळ-3, नगरपालिका क्षेत्र- 15, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 30 व इतर जिल्हा व राज्यातील -5 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-908, भुदरगड- 1253, चंदगड- 1235, गडहिंग्लज- 1544, गगनबावडा- 155, हातकणंगले-5377, कागल-1695, करवीर-5833, पन्हाळा- 1888, राधानगरी-1267, शाहूवाडी-1369, शिरोळ- 2526, नगरपरिषद क्षेत्र-7657, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 16 हजार 187 असे एकूण 48 हजार 826 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 582 असे मिळून एकूण 51  हजार 476  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकुण 51 हजार 476 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 49 हजार 115 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 759 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 602 इतकी आहे.

0000000

.