इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

25 वर्षांपासून तिरंगा फडकवणाऱ्या दरेकर कुटुंबियांच्या घरी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट

 




  कोल्हापूर, दि.15(जिमाका): मागील 25 वर्षांपासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवणाऱ्या कोल्हापूर येथील अजित दरेकर यांच्या घरी जावून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले, तसेच कुटुंबियांशी संवाद साधला.

दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी श्री दरेकर घरासमोर तिरंगा फडकवतात, ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने श्री. दरेकर कुटुंबीय राबवित असलेल्या या उपक्रमात संपूर्ण देशवासिय सहभागी झाले आहेत.

या उपक्रमाची दखल घेऊन अमृत महोत्सवी वर्षात जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री दरेकर यांच्या या उपक्रमावर आधारित बनवण्यात आलेल्या चित्रफितीला मिळालेला उत्फुर्द प्रतिसाद ही देशभक्तीची भावना जागृत करणारा आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी दरेकर कुटुंबीयांच्या उपक्रमाचा गौरव केला. 'आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकताना पाहण्यात खरा आनंद मिळत असल्याचे अजित दरेकर म्हणाले. यावेळी संगीतकार ऐश्वर्य मालगावे, अजित दरेकर व त्यांचे कुटुंबिय मित्रपरिवार उपस्थित होते.

       00000

स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागाची जाणीव करुन देणारे छायाचित्र, वस्तू प्रदर्शन -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 






कोल्हापूर, दि.15(जिमाका): स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती देणारे छायाचित्र व साहित्य प्रदर्शन नव्या पिढीला स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाची, त्यागाची जाणीव करुन देणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

राजाराम कॉलेजचा इतिहास विभाग व स्वातंत्र्यसंग्राम संग्रह ट्रस्टच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे स्वातंत्र्य संग्रामातील घटनांशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे व साहित्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.महाराज पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष राजेश महाराज, इतिहास विभाग प्रमुख डॉ. ऋषिकेश दळवी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास डोळ्यासमोर आणणारे हे प्रदर्शन पाहून विद्यार्थी व नागरिकांना स्वातंत्र्यसंग्रामातील घटनांची माहिती होईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यसंग्रामातील विविध घटनांचे साक्षीदार असलेली दुर्मिळ छायाचित्रे, पत्रव्यवहार, वस्तू, शस्त्रे, स्वातंत्र्य संग्रामाचे स्मृतीचिन्ह, आझाद हिंद फौज, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, महात्मा गांधीजी यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सेनानींची छायाचित्रेही याप्रदर्शनात लावण्यात आली आहेत.

       00000

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.2 मि.मी. पाऊस

 


कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी 7.2 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिलीमीटर मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 3, शिरोळ -1.3, पन्हाळा- 7.9, शाहूवाडी- 17.7, राधानगरी- 8.9, गगनबावडा- 37.9, करवीर- 4.2, कागल- 4.6, गडहिंग्लज-2, भुदरगड- 7.6, आजरा- 10.4, चंदगड- 9.1 असा पाऊस पडला आहे.

00000

प्रदीर्घ लढ्यातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 






प्रदीर्घ लढ्यातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत देशात 25 कोटी तर

राज्यात अडीच कोटी घरावर तिरंगा ध्वज अभिमानाने फडकावण्यात आला

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात निर्माण करण्यात आलेल्या संविधान स्तंभाचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण

 

कोल्हापूर, दि.15(जिमाका):- भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशात सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसून त्यासाठी स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांना प्रदीर्घ लढा द्यावा लागलेला होता. त्यामुळे मिळालेल्या या स्वातंत्र्याला टिकवण्यासाठी व वैभवशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

       भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा व घरोघरी तिरंगा फडकवण्याचा उत्साह व अभिमान निर्माण झालेला आहे. अमृत महोत्सवानिमित्त 9 ऑगस्ट क्रांतिदिन ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या कालावधीत ठीकठिकाणी प्रभात फेऱ्या, रॅली काढून देशाबद्दल प्रेम व अभिमान जागृत करण्यात आला. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नसून त्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी मोठा प्रदीर्घ लढा दिला आहे. त्यामुळे हे मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी व ते अधिक मजबूत करून बलशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले.

       बाराव्या शतकापर्यंत समृद्ध असणारा आपला देश त्यानंतरच्या काळात मुघल, इंग्रज, पोर्तुगीज व डच या परकीय सत्ता मुळे रसातळाला गेला. दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला. यामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुखदेव, भगतसिंग व ज्ञात-अज्ञात यांनी आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले व 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. क्रांतिकारकांच्या स्मृती नेहमी स्मरणात राहण्यासाठी अनेक ठिकाणी स्मृतीस्तंभ निर्माण करण्यात आले, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.

     


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली, या संविधनामध्ये काय झाल्यास काय करायचे याबाबतची उत्तरे उपलब्ध आहेत. ही राज्यघटना हजार वर्षे बदलावी लागणार नाही, असे सांगून शेतकरी, उद्योगपती व सर्वसामान्य नागरिकांनी मेहनत घेऊन देशाला समृद्धीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सन 2014 नंतर देशाच्या विकासाला अधिक चालना मिळाली. प्रधानमंत्री यांनी सबका साथ सबका विकास हा नारा देऊन सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले, असे श्री. पाटील यांनी सांगून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत 25 कोटी तिरंगा ध्वज तर महाराष्ट्र राज्यात अडीच कोटी तिरंगा ध्वज फडकवण्यात आले. देशाच्या युवा पिढीमध्ये देशाभिमान जागृत करण्यात ही मोहीम अत्यंत मौलिक ठरली आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष व स्वातंत्र्य दिनानिमित्त येथे उपस्थित असलेले स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार यांना श्री. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी ठीक नऊ वाजून पाच मिनिटांनी श्री. पाटील यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तीन रंगांचे फुगे हवेत सोडून स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच येथे उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना श्री. पाटील यांनी भेटी घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संविधान स्तंभाचे अनावरण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या संविधान स्तंभाची उंची 15 फूट आहे. हा आकर्षक संविधान स्तंभ रात्रंदिवस काम करून अवघ्या आठ दिवसात तयार करून घेतल्याबद्दल श्री. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

या संविधान स्तंभाच्या चबुतऱ्याचे दगडी बांधकाम दहा फूट उंचीचे असून त्यावर सोनेरी रंगाची पाच फूट उंचीची आकर्षक राजमुद्रा बसवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला उभारण्यात आलेला हा संविधान स्तंभ जिल्हाधिकारी कार्यालयाचे आकर्षण ठरला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता संजय कुंभार, कार्यकारी अभियंता संजय पाटील, उप अभियंता महेश कांजर, शाखा अभियंता वैभव जाधव यांनी परिश्रम घेतले.

लामण दिवा व सेल्फी पॉईंट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेला लामण दिवा व सेल्फी पॉईंट अभ्यागतांचे आकर्षण ठरत असून याठिकाणी फोटो घेण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील दुर्गम भागात आरोग्य सेवा दिलेले कर्मचारी श्री प्रकाश रामचंद्र नाईक, श्रीमती दिपाली संतोष गोवीलकर, श्रीमती रेखा पांडुरंग दोरूगडे, श्रीमती शांता केरबा जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

पिंपळगाव खुर्द येथे लसीकरण कार्यक्रमात आपल्या सतर्कतेने तोतया डॉक्टर पकडून देण्याचे कार्य करणारे आरोग्य कर्मचारी श्री अजित अशोक चौगुले, श्री देवानंद मुंकुद कांबळे, श्रीमती अर्चना देवेंद्र सरनाईक, श्रीमती माधुरी राजेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

माध्यमिक शिक्षण विभागाचे  राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा सन 2021 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी

योगेश अशोक नेजे, इशान भुषण म्हेत्रे, रोहन शहाजी पाटील, विश्वजीत विनायक बांदल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

स्वच्छ विद्यालय राज्यस्तरीय पुरस्कार 2020-21 प्राप्त शाळांचा गौरव यावेळी करण्यात आला. यामध्ये प्राथमिक, शहरी भागातून, कोल्हापूर पब्लिक स्कूल (राज्यात प्रथम),माध्यमिक,ग्रामीण भागातून, आदर्श विद्यालय कोथळी, ता.शिरोळ(राज्यात प्रथम) याचा समावेश आहे

      तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ॲपल हॉस्पिटल व सावित्रीबाई फुले या हॉस्पिटलचा सत्कार यावेळी श्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

*****

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण

 





 

कोल्हापूर दि.15(जि.मा.का): भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000

जिल्हयातील 50 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 3028, दुधगंगातून 3509 क्युसेक पाण्याचा विसर्ग

 

 

          कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 236.29 दलघमी पाणीसाठा आहे. सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार सध्या धरणातून 3028 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव, तारळे व खडक कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव कडवी नदीवरील- सवते सावर्डे, सरुड पाटणे वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली,  वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची, मांगले सावर्डे, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, तुळशी नदीवरील- बीड,  ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी व कोकरे असे 50 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 236.29 दलघमी, तुळशी 93.30 दलघमी, वारणा 874.71 दलघमी, दूधगंगा 643.39 दलघमी, कासारी 72.36 दलघमी, कुंभी 69.64 दलघमी, पाटगाव 98.75 दलघमी, चिकोत्रा 41.98 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी आणि कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प असे 6 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 39 फूट, सुर्वे 37.11 फूट, रुई 69.6 फूट, इचलकरंजी 65.7 फूट, तेरवाड 59 फूट, शिरोळ 56.9 फूट, नृसिंहवाडी 56.7 फूट, राजापूर 44.10 फूट तर नजीकच्या सांगली  27.3 फूट व अंकली 33.9 फूट अशी आहे.

00000

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

पंचगंगा नदीचा पूर व होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 







 

पुरामुळे बाधितांसाठी निवारा केंद्रे सुरु करा; जेवणासह सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या

 

पुरामुळे स्थलांतरित लोकांसाठी कायमस्वरुपी निवारा केंद्रे निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करा

 

महापालिका हद्दीतील गांधी मैदानावरील पाणी निचरा करण्यासाठी महापालिकेला तीन कोटींचा निधी मंजूर

 

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) :- पंचगंगा नदीचा पूर व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म व लॉंग टर्म या तीन स्तरावर शासनाकडून उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या उपाययोजनांसाठी शासनाकडून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

      जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित जिल्ह्यातील पूर परिस्थिती आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने (ऑनलाईन द्वारे ), आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके यांच्यासह अन्य मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

      मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे या भागातील शेती पिकाचे, जनावरे व अन्य मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. पुरामुळे  स्थलांतराच्या प्रमाणात वाढ होत आहे. या पूर परिस्थितीला आळा बसावा व होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी

 

 

आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल. त्या अनुषंगाने मुंबईत एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

      पुरामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी निवारा केंद्रे सुरु करुन त्या निवारा केंद्रांमध्ये लोकांसाठी शासनाच्या वतीने जेवणासह इतर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. या ठिकाणी स्थलांतरित लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पुरामुळे स्थलांतरित होणाऱ्या एकूण गावांची संख्या व त्या गावातील लोकांसाठी योग्य ठिकाणी कायमस्वरुपी रिलीफ कॅम्प निर्माण करण्यासाठी जागा शोधून ते निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

       अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबतचे पंचनामे पूर्ण झाले की नाही, याबाबतची माहिती घेऊन पुरामुळे मागील वर्षी व या वर्षीच्या नुकसानीचे एकत्रित प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी व पुरामुळे जनावरे दगावणे व घरांची पडझड झालेल्या नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. राज्य शासनाने एनडीआरएफच्या निकषानुसार दुप्पट मदत करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

      महापालिका हद्दीतील गांधी मैदानावर पावसाचे व पुराचे पाणी जाते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ तीन कोटी रुपये निधी महापालिकेला देण्याचे जाहीर केले व हे काम तात्काळ पूर्ण करुन या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच अन्य कामासाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठवावा, असेही सूचित केले. तसेच वीज वितरण कंपनीने अतिवृष्टी व पुरामुळे खंडित झालेली वीज सेवा तात्काळ सुरु करण्यासाठी एक स्वतंत्र आराखडा तयार करावा व नागरिकांना सुरळीत वीज नेहमीच उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सूचित केले.

      प्रारंभी पूर परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका, जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सादरीकरण मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी अतिवृष्टी, पूर परिस्थिती नुकसानीचे पंचनामे व त्यानंतर मिळणाऱ्या मदतीबाबत विविध समस्या मांडल्या व सोडवण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मुख्यमंत्री महोदय व लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्‍या सूचनांप्रमाणे आराखडा करून शासनाला लवकर सादर करण्यात येईल, असे सांगितले.

विमानतळ परिसरात वृक्षरोपण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापूर विमानतळ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

0000

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत

 






 

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांचे स्वागत केले.

खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनीही मुख्यमंत्री महोदय यांचे स्वागत केले.

00000

कोल्हापुरातील 303 फूट उंच राष्ट्रध्वजाला पोलीस दलाकडून सलामी

 








 

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया

                                                        -मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लोकसहभागावर भर

 

कोल्हापूर, दि.13(जिमाका): पर्यटन क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

  कोल्हापूर येथील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशात आणि राज्यात आकर्षण ठरलेला 303 फूट उंचावरील राष्ट्रध्वज आज फडकवण्यात आला. यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील व विशेष निमंत्रित ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रीमती मीनाताई गुरव, वसंतराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस विभागाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अंजलीताई पाटील, समरजितसिंह घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रध्वज उभारण्यासाठी मेहनत घेतलेले तंत्रज्ञ, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी प्राणाची आहुती दिली. अनेकांच्या त्याग, बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा शासकीय पातळीवरच न राहता लोकसहभागातून राबविण्यावर भर देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. याचसाठी राष्ट्रध्वज उभारण्यासाठीच्या नियमावलीत बदल करण्यात आले, असे सांगून कोल्हापूर मधील पोलीस उद्यानातील 303 फूट उंचीवरील राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह मेहनत घेतलेल्या चमुचे त्यांनी कौतुक केले.

 कोविड परिस्थितीमुळे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल, असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गतः साधनसंपत्ती आहे. विविध संस्थांच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती सारखे अनेक चांगले उपक्रम याठिकाणी होत आहेत. अशा मोहिमांत नागरिकांचा सहभाग वाढवण्याबरोबरच अन्य महत्वपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत पोलीस विभागाच्या वतीने विविध घेण्यात येत आहेत. अमृतमहोत्सवी दौड, सायकल रॅली, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही वेगवेगळ्या कार्यक्रम घेण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रास्ताविकातून दिली.

आभार पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन चारुदत्त जोशी यांनी केले. कार्यक्रमाला एनसीसी चे कॅडेट्स, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी

 


                                                                                                                            

`              कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दि. 3 व 4 ऑगस्ट या कालावधीत श्री क्षेत्र चोपडाई देवी श्रावण षष्ठी यात्रा होत आहे.  यात्रा कालावधीत जोतिबा डोंगरावर येणाऱ्या मोटार वाहनांची संख्या तसेच पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटर वाहनांचे पार्कींग होऊन वाहतूकीची समस्या निर्माण होऊ शकते. भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिनांक 3 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यापासून 4 ऑगस्ट  रोजी यात्रा संपेपर्यंत वाहतूक नियमन आदेश जारी केला आहे.

            जुने आंब्याचे झाड, दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते प्रवासी टोल नाक्याजवळील नवीन एस.टी.बसस्थानक ते  पी.डब्ल्यू.डी. रेस्ट हाऊस वाडी रत्नागिरी ते यमाई मंदिर कॉर्नर ते गिरोली घाट या दरम्यानच्या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व पार्कींग करण्यास मनाई करण्यात येत आहे.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

000000