इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात आजपासून कडक निर्बंध लागू -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 


 

कोल्हापूर, दि. 31 (जिमाका):  ओमायक्रॉन विषाणुचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील अधिकारास अनुसरून जिल्ह्यात दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजीच्या रात्री 12.00 वाजल्यापासून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत.

लागू करण्यात आलेले निर्बंध खालीलप्रमाणे -

a.     लग्न / विवाह समारंभासाठी बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

b.     इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

c.     अंत्यविधी / अंत्ययात्रा बाबतीत उपस्थित व्यक्तींची संख्या 20 पर्यंत मर्यादित असेल.

d.     या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त दि. 29 नोव्हेंबर व 25 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशातील सर्व निर्बंध लागू राहतील.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

0000000

जिल्हा नियोजन समितीची सभा 10 जानेवारी रोजी

 


कोल्हापूर, दि. 31 (जिमाका)  : जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार दि. 10 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वा. ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांनी दिली.

       या बैठकीत दि. 8 नोव्हेंबर 2021 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास व इतिवृत्त कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2021-22 कोविड-19 च्या प्रादुर्भावावरील उपाय योजना करण्यासाठी मान्यता दिलेल्या कामांना व पुनर्विनियोजनास मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 आढवा घेणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 च्या आराखड्यास मान्यता देणे व आयत्यावेळचे विषय, असे विषय होणार आहेत.

00000

कळंबा मध्यवर्ती कारागृहात आरोग्य तपासणी शिबीर

 


कोल्हापूर, दि. 31 (जिमाका)  : कोल्हापूर पोलीस सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पांडूरंग डोंगळे यांच्या सौजन्याने व कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कळंबा यांच्या सहकार्याने कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाने विविध रोगावरील आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

 कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या तर्फे सी.पी.आर ब्लड बँक, ओम हॉस्पीटल कोल्हापूर यांनी या शिबीरामध्ये सहभाग घेतला. यामध्ये रक्तदान, नेत्ररोग, कान, नाक, घसा व सर्वसाधारण तपासणी करण्यात आली. शिबीरामध्ये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधिकारी/कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांची मोफत तपासणी करण्यात आली.

 

सुधारणा व पुनर्वसन शिक्षण घेतलेले शिक्षा बंदी विनायक जाधव व योगेश इंगळे यांनी सामाजिक बांधीलकी जपण्याच्या दृष्टीने रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करुन कारागृहाची सामाजिक बांधिलकी जपली.

00000000

नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी

 


 

कोल्हापूर, दि. 31 (जिमाका)  : केंद्र शासनाने पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी दिली असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

        यामध्ये शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. शेळी-मेंढी पालनाकरिता रुपये 50 लाख, कुक्कुट पालनाकरिता रुपये 25 लाख, वराह पालनाकरिता रुपये 30 लाख आणि पशुखाद्य व वैरण विकास यासाठी रुपये 50 लाख अशी अनुदानाची मर्यादा आहे. प्रकल्पासाठी स्वहिस्सा व्यतिरिक्त उर्वरित निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करुन घ्यायचा आहे.

या योजनेचा लाभ व्यक्तीगत, व्यावसायिक, स्वयं सहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, सहकारी दूध उत्पादक संस्था, सह जोखीम गट (जेएलजी), सहकारी संस्था, खासगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी घेऊ शकतात.      

          या योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा असून, त्यासोबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज देयकाची प्रत), छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक इ. अपलोड करणे आवश्यक असून, अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी इ. उपलब्ध असल्यास सादर करावे.

योजनेच्या मार्गदर्शक सूचना वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न अर्जाचा नमुना इ. पशुसंवर्धन विभागाच्या https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व केंद्र शासनाच्या https://www.nlm.udyamimitra.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी केले आहे.

 

000000

प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी बस मालक, सेवा पुरवठादारांनी दरपत्रक सादर करावेत

 

 


 

कोल्हापूर, दि. 31 (जिमाका)  : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत 17 ते 21 जानेवारी 2022 या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना घेवून जाण्यासाठी प्रवासी बसची आवेदन पत्रे मागविण्यात येत असून इच्छुक बस मालक, सेवा पुरवठादार यांनी आपले दरपत्रक वाहन व सेवा तपशीलासह दिनांक 10 जानेवारीपर्यंत उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावीत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

कोल्हापूर उपविभागातील (तालुका शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहुवाडी) शेतक-यांसाठी प्रक्षेत्र प्रशिक्षण भेट आयोजित केली आहे. या प्रक्षेत्र भेटीचा मार्ग कोल्हापूर- फलटण-पाडेगाव-बारामती-राळेगणसिध्दी -हिवरेबाजार-राहूरी -प्रवरानगर-शिर्डी - नारायणगाव-तळेगाव दाभाडे-गणेशखिंड, पुणे कोल्हापूर असा आहे. या प्रक्षेत्र भेटीसाठी मिळणारी अनुदान रक्कम रुपये 2 लाख 50 हजार इतकी आहे. यामध्ये 50 शेतक-यांची पाच दिवसांसाठी दररोज सकाळी चहा-नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा व रात्रीचे जेवण आणि चार दिवस राहण्याची सोय करण्यात यावी. तसेच संपूर्ण प्रवास व मुक्काम कालावधीत कोविड १९ प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक राहील.

0000000

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट ओपन: पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन


 

संध्याकाळपर्यंत राधानगरी धरणातून विसर्ग बंद होण्याची शक्यता

कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांची माहिती

 

कोल्हापूर, दि.29 (जिमाका): आज सकाळी साडेनऊ वाजता राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे तांत्रिक काम सुरु असताना अचानक अपघाताने सर्विस गेट ओपन झाले आहे. यामुळे नदीपात्रात सुमारे 4 ते 5 फुटांनी पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल, जलसंपदा व संबंधित विभागांच्या वतीने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पब्लिक ऍड्रेस सिस्टीम (पीएएस) द्वारेही नागरिकांना याबाबत माहिती देण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी कपडे धुणे, जनावर अथवा गाडी धुणे, मासेमारी करण्यासाठी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

राधानगरी धरणाचे हे गेट शॉर्ट सर्किटमुळे ओपन झाले असल्याचा पाटबंधारे विभागाच्या इलेक्ट्रिकल टीमचा प्राथमिक अंदाज आहे.  हे सर्विस गेट बंद करण्यासाठी जलसंपदा विभाग व यांत्रिकी विभागाच्या टीम्स राधानगरी धरणावर पोहोचल्या आहेत. इमर्जन्सी गेट टाकून त्यानंतर सर्विस गेट बंद करण्यात येणार आहे. यासाठी साधारण पाच ते सात तासाचा वेळ लागणार असून अंदाजे संध्याकाळपर्यंत राधानगरी धरणातून होणारा विसर्ग बंद होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.

     सध्या धरणातून 4 हजार क्युसेक्स विसर्ग सुरु असून पंचगंगा नदीवरील केटीवेअरचे बर्गे काढून बंधाऱ्यावरुन पाणी वाहणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाकडून घेण्यात येत आहे. पंचगंगा नदीवरील केटीवेअरवर (कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या ठिकाणी) जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित असून नागरिकांना नदीपात्रात उतरण्यापासून परावृत्त करण्यात येत आहे. पाण्याचा अंदाज घेवून शक्य असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नदीकाठावरील मोटार व पंपसेट काढून सुरक्षित ठिकाणी न्यावेत, असे आवाहन जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता(श्रेणी 1) संदीप दावणे यांनी केले आहे.

000000

 

 

 

 

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश -कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर

 


 

कोल्हापूर, दि.29 (जिमाका): राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आज दुपारी 3.15 च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.

 

आज सकाळी साडे नऊ च्या दरम्यान राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघाताने सर्व्हिस गेट ओपन झाले होते. यामुळे नदीपात्राची पाणी पातळी वाढत होती. नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला होता.

 

जलसंपदा विभागाच्या अथक परिश्रमानंतर राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला आहे.. कोल्हापूरकरांसाठी  ही दिलासादायक बाब आहे.

00000

 

 

सामाईक प्रवेश पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी 7 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

 


 कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा सन २०२२ करिता पूर्णवेळ प्रशिक्षणासाठी भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर तसेच मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती अशा सर्व सहा प्रशिक्षण केंद्रामध्ये विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 7 जानेवारी 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक डॉ. लता जाधव यांनी केले आहे.

          याबाबतची  सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधीत इतर सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

000000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 3 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली.

तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याच्या पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याच्या दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.

लोकशाही दिनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा. शासनाकडील दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये अर्ज विहित नमुन्यात असावा. (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड)  तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. चारही  स्तरावरील  लोकशाही दिनांकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठवणे आवाश्यक. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल.  जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनांनतर दोन महिन्यानी  मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल.

न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व, अपिल, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेल अर्ज. अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत. लोकशाही दिनापुर्वी करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आपले तक्रार अर्ज करावेत, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांवर कारवाई करा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार


 



कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक कारणासाठी वापर होणार नाही, याची दक्षता सर्व गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सांगून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करणाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणे बेकायदेशीर आहे. गॅस कंपन्यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व गॅस एजन्सीजची तपासणी करुन याबाबत माहिती घ्यावी. घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यावसायिक आणि गॅस एजन्सी चालकांवर कारवाई करा. सीएनजी वरील गाड्यांमध्ये अनधिकृतपणे घरगुती एलपीजीचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास गॅस कंपन्यांनी तपासणी करुन पोलीस विभाग व पुरवठा विभागाच्या मदतीने संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचना देऊन गॅस सिलेंडर देताना व घेताना कोणती खबरदारी घ्यावयाची याबाबत गॅस वितरक कंपन्यांनी जनजागृती करावी, असे सांगितले.

वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत दुकानातील वजन व मापांची तपासणी करावी. शॉप ॲक्टनुसार नोंदणी झालेल्या वजन, मापाशी संबंधित सर्व दुकानांची गाव, तालुकानिहाय यादी करा. ही यादी अद्ययावत करुन जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रकाशित करा, असे जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सांगितले.

जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी ग्राहकांच्या संरक्षणासाठी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

 गॅस सिलेंडर ग्राहकांनी तक्रार असल्यास एच पी गॅस- 1800 233 3555 तर भारत पेट्रोलियम- 1800 224 344  या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन  यावेळी गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केले.

000000

जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी रजिस्ट्रेशन करा

 


कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत सन 2021-22 वर्षातील युवा महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन दि. 31 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. ज्या संघांना जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या प्रवेशिका दि. 30 डिसेंबर रोजी सायं. 4 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या dsokop@gmail.com  मेलवर पाठवाव्यात व आपले रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

लोकगीत स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या पथकात 10 जणांचा तर लोकनृत्य पथकात 20 जणांचा समावेश बंधनकारक आहे. स्पर्धेसाठी  15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभाग घेता येणार आहे. विजयी संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल. स्पर्धा 31 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून रजिस्ट्रेशन झालेल्या संघाला स्पर्धेची लिंक व पासवर्ड देवून आपली स्पर्धेची वेळ जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून कळविण्यात येईल. वयाच्या पुराव्यासाठी प्रवेशिकेसोबत स्पर्धकाने आपले आधारकार्ड ईमेल करावे व स्पर्धेवेळी सोबत घेवून उपस्थित रहावे. आधिक माहितीसाठी  बालाजी बरबडे ९६७३४५१११५ यांच्याशी संपर्क साधावा.

00000000

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

पुरबाधितांनी अनुदान मिळण्यासाठी बँक खाते अद्यावत करावे - तहसिलदार शितल मुळे-भामरे

 


कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): करवीर व शहरामध्ये माहे जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबे, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे मयत व वाहून गेलेल्या पशुधनाचे तसेच कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. ज्यांचे खाते बंद आहे, बँक मर्ज झाली आहे किंवा अन्य तांत्रिक कारणास्तव ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम अद्यापही वर्ग झालेली नाही, त्यांनी पंचनामे करतेवेळी सादर केलेले बँक खाते अद्यावत करुन किंवा अन्य बँकेचे पासबुक सादर करावे, असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तथा करवीरच्या तहसिलदार शितल मुळे-भामरे यांनी केले आहे.

व्यावसायिक/ कारागीर (छोटे गॅरेज/ छोटे उद्योग/ व्यावसायिक, हस्तकला/ हातमाग कारागीर/ बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक व इतर) बाधितांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अद्यावत बँक खाते सादर करतेवेळी संपर्क साधावयाच्या कार्यालयाचे नाव

अनुदानाचा प्रकार-संपर्क करावयाच्या कार्यालयाचे नाव खालीलप्रामणे-

सानुग्रह अनुदान, घर पडझड/ गोठा पडझड अनुदान व्यावसायिक, टपरीधारक, बारा बलुतेदार यांसाठीचे अनुदान- शहरी भागात -कोल्हापूर मनपा येथील ब्युरो कार्यालय व ग्रामीण भागात- संबंधित गाव तलाठी कार्यालय, ग्राम पंचायत कार्यालय.

कृषी पिकांच्या नुकसानीचे तसेच खरबडून गेलेल्या जमीनींसाठीचे अनुदान-  शहरी भागात- तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करवीर तसेच करवीर, कसबा बावडा, जाधववाडी उंचगाव कृषी सहायक व ग्रामीण भागात- तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करवीर तसेच संबंधित गावचे कृषी  सहायक याप्रमाणे राहील.

0000000

 

 

 

 

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

जिल्हयात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी

 

 

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी  साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील अधिकारांस अनुसरून जिल्ह्यात दि. 25 डिसेंबर 2021 रोजीच्या रात्री 9.00 वाजल्यापासून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत.

 

a. संपूर्ण जिल्ह्यात सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.

 

b. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल त्यास परवानगी असेल.

 

c. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल त्यास परवानगी असेल.

 

d. उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थितीस परवानगी असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असता कामा नये.

 

e. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीस परवानगी नसेल.

 

f. वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या संपूर्ण खुल्या असलेल्या (open to sky) जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (उदा. स्टेडियम इ.) संबंधित मनपा आयुक्त, मुख्याधिकारी किंवा तहसिलदार (ग्रामीण भागात) ही क्षमता निश्चित करतील.

 

g. उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीस परवानगी राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

 

h. या आदेशात विशेषतः नमूद केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त सर्व विद्यमान निर्बंध वाचले क्र. 6 चे आदेशानुसार लागू राहतील.

 

      या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

0000000

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

नाताळ सण साध्या पध्दतीने साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी

 


 

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसामध्ये ‘ओमिक्रॉन हा नवीन विषाणू आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

नाताळच्या पार्श्वभूमीवर खालील प्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत :-

1)   ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी  देखील नाताळाचा सण आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करावा.

2)  कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसुल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्र.DMU/2020/CR92/Dis-1, दिनांक 27/11/2021  अन्वये  सुधारित मार्गदर्शन सुचनांचे तंतोतंत पालन करणे आत्यावश्यक आहे.

3)  नाताळ/ ख्रिसमस निमित्याने चर्चमध्ये उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी असेल. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व  सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.तसेच चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.

4) नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी  सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम पाळण्यास योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

5) चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा (Choiristers) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळया माईकचा वापर करुन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

6)   चर्चच्या बाहेर/परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नयेत.

7)   सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे.

8)   कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये.

 

 

 

 

9)    फटाक्यांची आतीषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणा संदर्भातील ‍नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

10)            कोवीड-19 व विशेषत्वाने  ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग,मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच इकडील कार्यालयाकडून, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

11)            तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष नाताळ सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिध्द  झाल्यास त्यांचे  देखील अनुपालन करावे.

00000000

 

प्रकल्पग्रस्तांनी जमीन व भूखंड मागणी अर्ज समक्ष सादर करावेत - अश्विनी सोनवणे-जिरंगे

 


कोल्हापूर, दि.24 (जिमाका): प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणींचा निपटारा होण्यासाठी व प्रकल्पग्रस्तांचे कामकाज जलदगतीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या होत्या. यानुसार जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमीन व भूखंड वाटपाबाबत कार्यक्रम निश्चित केला आहे. त्या-त्या प्रकल्पातील जमीन व भूखंड मिळण्यास शिल्लक असलेल्या प्रकल्पग्रस्तांनी जमीन व भूखंड मागणी अर्ज नमुद केलेल्या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत समक्ष उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहन पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे यांनी  केले आहे.

प्रकल्पाचे नाव, उपविभागाचे नाव, अर्ज करावयाचा दिनांक व अर्ज सादर करावयाचे ठिकाण खालीलप्रमाणे-

दुधगंगा प्रकल्प- उपविभागीय अधिकारी, करवीरसाठी दि. 27 जानेवारी 2022 रोजी जिल्हा पुनर्वसन कार्यालय.

उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी उपविभागासाठी दि. 2 व 3 फेब्रुवारी 2022 रोजी तहसिलदार कार्यालय हातकणंगले.

दि. 9 व 10 फेब्रुवारी 2022 रोजी तहसिलदार कार्यालय शिरोळ.

 उपविभागीय अधिकारी, कागलसाठी दि. 16 व 17 फेब्रुवारी 2022 रोजी तहसिलदार कार्यालय कागल.

दि. 23 व 24 फेब्रुवारी 2022  रोजी तहसिलदार कार्यालय राधानगरी

तुळशी प्रकल्प- उपविभागीय अधिकारी, करवीरसाठी  दि. 3 व 4 मार्च 2022 रोजी जिल्हा पुनर्वसन कार्यालय व उपविभागीय अधिकारी राधानगरी-कागलसाठी  दि. 9 व 10 मार्च 2022 रोजी तहसिलदार कार्यालय राधानगरी  याप्रमाणे राहील.

नमुद केलेल्या दिनांकास व ठिकाणी ज्या प्रकल्पग्रस्तांना जमीन व भूखंड मिळालेला नाही त्यांनी अर्ज व त्यासोबत 65 टक्के रक्कम भरल्याचा पुरावा व बुडीत जमिनीची कागदपत्रे सादर करावीत.

0000000

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरात 'ग्राहक राजा'च्या हस्ते स्टॉल्सचे उद्घाटन ग्राहकांनी फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागावी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 








कोल्हापूर, दि.24 (जिमाका): ग्राहक हा देशाच्या अर्थकारणाचा राजा आहे. आपण दररोज ग्राहक असतो. ग्राहक म्हणून वावरताना आपल्या हक्कांसाठी जागरुक रहा. कोणतीही वस्तू खरेदी करताना अथवा सेवा घेताना फसवणूक झाल्यास ग्राहकांनी स्वतःहून पुढे येऊन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. 

अन्न व नागरी पुरवठा विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भवानी मंडप येथे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा सविता भोसले, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक राजेंद्र गायकवाड, तहसीलदार शितल मुळे- भामरे, प्रबोधन प्रचार प्रमुख संदीप जंगम, वीज वितरण ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य कमलाकर बुरांडे आदी  उपस्थित होते. 

यावेळी ग्राहक पंचायत प्रबोधन विभाग व शहाजी लॉ कॉलेज यांच्या वतीने ‘ग्राहक राजा जागा हो’ विषयावर पथनाट्य सादर केले. ग्राहक प्रबोधनामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कोल्हापूर प्रतिनिधी वैदेही पाध्ये व वैदेही जोशी यांचा जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या ठिकाणी लावण्यात आलेल्या विविध विभागांच्या ग्राहक जागृतीपर स्टॉल्सचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते तसेच त्यांच्या संकल्पनेतून उपस्थित ग्राहक यास्मिन जमादार, हिंदुराव कांबळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

          ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986 रोजी मंजूर झाला. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. देशात ग्राहकांची चळवळ आणि जागरूकता मोठ्या प्रमाणात झाल्यामुळेच ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा नवीन स्वरूपात मंजूर करण्यात आला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, ग्राहकांना जागरूक करुन त्यांचे अधिकार मिळवून देण्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा महत्वपूर्ण आहे. आपल्या हक्काच्या पैशातून विकत घेतलेली कोणतीही वस्तू, साहित्य, सेवेमध्ये फसवणुक झाली किंवा त्रुटी आढळून आली तरीही ग्राहकाला निश्चित न्याय मिळेल, अशी खात्री जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी व्यक्त केली.

          जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा सविता भोसले म्हणाल्या, जिल्हा ग्राहक आयोगामध्ये पाच लाखापर्यंतच्या फसवणुकीची तक्रार दाखल करण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. दिशाभूल करणाऱ्या फसव्या जाहिराती, ठरल्याप्रमाणे सेवा-सुविधा न मिळाल्यास देखील ग्राहक तक्रार दाखल करू शकतात. ग्राहकांनी कोणतीही वस्तू अथवा सेवा घेताना जागरूक रहावे. फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करावी. ‘हे ग्राहक राजा, मागुन काही मिळत नाही... त्यासाठी लढावंच लागतं...’ ही छोटी कविता सादर करून त्यांनी ग्राहकांना आवाहन केले.

राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अरुण यादव म्हणाले, देशाच्या कोणत्याही भागातून आपण वस्तू खरेदी केली असली आणि ती वस्तू खराब असल्याचे आढळले तरीदेखील जिल्हा ग्राहक आयोगाकडे दाद मागता येते. वस्तू अथवा सेवा घेतल्यानंतर एक कोटी रुपयांपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल करता येते. ग्राहक आणि विक्रेता यांनी सामोपचाराने प्रकरण मिटवावयाचे असल्यास या कायद्यांतर्गत ‘मध्यस्त कक्षा’ची निर्मिती केली आहे. ऑनलाईन वस्तू खरेदी केल्यास फसवणूक झाली तरीही दाद मागण्याचा हक्क ग्राहकांना आहे. 

ग्राहकांच्या हक्काबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी मार्गदर्शन केले. अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 मधील मूलभूत बदलाबाबत त्यांनी माहिती दिली. औषध खाद्यपदार्थ खरेदी करताना मुदतबाह्य होणारी तारीख आवर्जून पहा. वस्तूंचे बिल घ्या, अन्न पदार्थांमध्ये भेसळ असल्याचे आढळल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी  संपर्क साधा, असे त्यांनी सांगितले. 

खरेदी केलेल्या वस्तूचे वजन अथवा माप कमी आढळल्यास वैधमापन शास्त्र विभागाशी 0231- 2542549 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक राजेंद्र गायकवाड यांनी केले.

0000000