इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

'कुमरी' शेतकऱ्यांना आता वनजमिनी कायमस्वरुपी वहिवाटीचा हक्क जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा महत्वपूर्ण निर्णय






चंदगड, राधानगरी, पन्हाळा, आजरा, शाहूवाडी तालुक्यातील 100 वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण


                               कोल्हापूर दि. 30 (जि.मा.का.) :  'कुमरी' पध्दतीने शेती करणाऱ्या वन निवासींना कायमस्वरुपी वहिवाटीस देऊन त्यांची नावे सातबाऱ्यावरील इतर हक्कात घेण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. सुमारे 100 वर्षांपासून असणारी वहिवाटीच्या हक्काची मागणी आता पूर्ण झाली आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, पन्हाळा, भुदरगड, आजरा, शाहूवाडी आणि करवीरमधील 41.29 हेक्टर शेतजमीन आणि 20 हजार चौरस मीटर रहिवासी क्षेत्राचा लाभ 1 हजार 720 लोकसंख्येला मिळणार आहे.
        जिल्ह्यात 1927 व त्यापूर्वीपासून वननिवासी शेतकरी कुमरी पध्दतीने 16 वर्षांच्या फेरपालटाने नागली, वरी ही पिके घेत होती. परंतु या पध्दतीने जंगलातील छोटा झाड-झाडोरा साफ करुन शेतकरी शेती करीत असत. नवीन क्षेत्र निर्माण करण्याकडे लोकांचा कल होता. त्‍यामुळे जंगलाची हानी होत होती.  वनविभाग कुमरी पध्दतीने शेतीसाठी केलेल्या जमिनीचे भाडे दरवर्षी वसूल करुन त्याच्या भाडे पावत्याही देत होती.
            असे शेत वहिवाटीचे हक्क कायमस्वरुपी मिळावेत अशी वननिवासी शेतकऱ्यांची 100 वर्षापासून मागणी होती.  केंद्रशासनाने यासाठी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी, वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 आणि नियम 2008 हा कायदा पारित केल्याने वहिवाटीचे हक्क कायमस्वरुपी मिळण्यास कुमरी धारक शेतकरी पात्र झाले. या शेतकऱ्यांकडे पुरावे असूनही उपविभागीय अधिकारी स्तरावरील समितीने नाकारला होता. याची सुनावणी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर झाली. असे सर्व दावे मान्य करुन या शेतकऱ्यांना वनजमिनी कायमस्वरुपी वहिवाटीस देऊन त्यांची नावे सातबाऱ्याच्या इतर हक्कात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले. यावेळी सदस्य सचिव प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील निकम आदीसह पक्षकार उपस्थित होते.
            जिल्हास्तरीय वन हक्क समितीचे समन्वयक, निवृत्त उपजिल्हाधिकारी डी. के. शिंदे हे 2009 पासून काम पाहत आहेत. आज झालेल्या सुनावणीत एकूण 103 अपील आणि 241 दाव्यानवर सुनावणी झाली. या निर्णयामुळे संबंधित तालुक्यातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबून कायमस्वरुपी रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे.
            चंदगड तालुक्यातील वाघोत्रे, कोदाळी, जांभरे, उमगाव, नगरगाव कोदाळी, गुळंब, कानुरखुर्द, पिळणी, बुझवडे. आजरा तालुक्यातील आवंडी खानापूर, करवीर तालुक्यातील धोंडेवाडी, पन्हाळा तालुक्यातील वाघवे, गोठे, पोर्ले तर्फ ठाणे, निवडे, उत्रे, शाहूवाडी तालुक्यातील पेरीड पैकी गाडेवाडी, भेडसगाव, राधानगरी तालुक्यातील रामणवाडी, बनाचीवाडी, मांडरेवाडी, भुदरगड तालुक्यातील पेठशिवापूर या गावांचा समावेश आहे.  या निर्णयामुळे जिल्ह्यातील एकूण 1 हजार 720 लोकसंख्येला 41.29 हेक्टर शेतजमीन आणि 20 हजार चौरस मीटर रहिवास क्षेत्राचा लाभ मिळणार आहे.
000000

जागतिक एड्स दिन पंधरवडा आजपासून




कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) :  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या मार्फत जागतिक एड्स दिन व पंधरवडा दिनानिमित्तत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या रविवार  दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता सी.पी.आर. रुग्णालय  येथे जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी दिली.  
            सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी जयसिंगपूर महाविद्यालय येथे संदीप तकडे यांचे व्याख्यान. शिवाजी विद्यापीठ येथे  संजय गायकवाड, विद्या चिखले यांचा जनजागृती उपक्रम. समाज बदल घडवू शकतो या विषयावर महाविद्यालयीन युवकांची निबंध स्पर्धा  ए.आर.टी. केंद्र उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे होणार आहे तसेच सकाळी  10 वाजता युवा ग्रामीण विकास संस्था यांच्या मार्फत उचगाव ट्रक टर्मिनल्स येथे माहिती, शिक्षण  व संवाद पत्रिकांचे वाटप होणार आहे.
             मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी समाज माध्यम जनजागृती स्पर्धा  - संदीप पाटील, आय.सी.टी.सी. व एन.जी.ओ. मार्फत लोककला कार्यक्रम. सकाळी 9 वाजता ए.आर.टी. केंद्र उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे एड्स जनजागृती रॅली. सकाळी 9 वाजता युवा ग्रामीण विकास संस्था यांच्या मार्फत उजळाईवाडी स्थलांतरित कामगार एड्स जनजागृती रॅली. लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी यांच्यामार्फत दत्त साखर कारखाना येथे पथनाट्य.
            बुधवार दि.4 डिसेंबर रोजी एन.के.पी. प्लस संस्थेमार्फत महिला मेळावा व कॅन्सर तपासणी. सी.पी.आर. येथे पोस्टर प्रदर्शन - अभिजीत रोटे, इंद्रायणी तारु. आय.सी.टी.सी. शिरोळ व  लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत  जनता कॉलेज शिरोळ येथे जनजागृती व्याख्यान. सकाळी 11 वाजता गोकूळ शिरगाव वसाहत एम.आय.डी.सी. येथे ऑटो रिक्षा रॅली. सकाळी 9 वाजता युवा ग्रामीण विकास संस्थेमार्फत कळंबा कारागृह येथे बंदीजनांसाठी जनजागृती कार्यक्रम. लोटस मेडीकल फौंडेशन मार्फत राजीव सहकारी सूत गिरणी येथे आरोग्य तपासणी शिबीर.
            गुरुवार दि. 5 डिसेंबर रोजी आय.सी.टी.सी. मार्फत फेसबुक लाईव्ह व्याख्यान. ए.आर.टी. केंद्र उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे रांगाळी स्पर्धा. सकाळी 11 वाजता युवा ग्रामीण विकास संस्थेमार्फत तृतीयपंथीयांशी संवाद, उचगाव, गोकूळ शिरगाव, लक्ष्मी टेकडी, कागल. लोटस मेडीकल फौंडेशन मार्फत एलिक्सा पार्क, स्टार बझार येथे पोस्टर प्रदर्शन व पथनाट्य. लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत लक्ष्मी इंडस्ट्री येथे आरोग्य तपासणी शिबीर व पोस्टर प्रदर्शन.
            शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी  टी.आय. एनजीओ मार्फत एड्स बद्दल माहिती देण्यात येणार, युवा ग्रामीण विकास संस्थेमार्फत गोकूळ शिरगाव औद्योगिक वसाहत येथे चालता बोलता कार्यक्रम. लोटस मेडीकल फौंडेशन मार्फत शिरोली येथे पथनाट्य व रॅली.
            शनिवार दि. 7 डिसेंबर रोजी  रंकाळा येथे महाराष्ट्रातील एच.आय.व्ही. सह जगणाऱ्या युवक/युवती चा मेळावा व  (एच.आय.व्ही./एड्स ने मृत्यू पावलेल्यांना) श्रध्दांजली. दुपारी 3 वाजता  युवा ग्रामीण विकास संस्थेमार्फत स्थलांतरीत कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप. रोटरॅक्ट क्लब ऑफ मिडटाऊन फिनिक्स मार्फत युवक जनजागृती मेळावा.
            रविवार दि. 8 डिसेंबर ते शनिवार दि.14 डिसेंबर रोजी पर्यंत  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने प्रबोधनाचे कार्यक्रम पोस्टर प्रदर्शन, समुपदेशन व एच.आय.व्ही. तपासणी, पथनाट्य, कंडोम स्टॉल, माहितीपर सेशन. 
            रविवार दि. 15 डिसेंबर रोजी   घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि. व नागरिका एक्सपोर्टस् लि. येथे जनजागृती कार्यक्रम .
000000




राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान असमान निधी प्रस्तावाची 7 डिसेंबरपर्यंत मुदत



                कोल्हापूर दि. 30 (जि.मा.का.) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या असमान निधी योजनेचे प्रस्ताव इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी 7 डिसेंबरपर्यंत www.rrrlf.gov.in यावर ऑनलाईन अपलोड करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी केले आहे.
        भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. सन 2019-20 पासून असमान निधी योजनांसाठीचे विविध प्रस्ताव www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत. संकेतस्थळावरील असमान निधी योजना या खिडकीखाली देण्यात आलेल्या User guide for applying online assistance  यावर सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
            इच्छुक शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आपणास आवश्यक असलेल्या असमान निधी योजनेचे  प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने दिनांक 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अपलोड करावेत. तसेच या अर्जाची प्रिंट काढून अपलोड केलेल्या आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. तद्नंतर  प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
            पुढील दिलेल्या योजनांचा लाभ राज्यातील इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना घेता येईल. असमान निधी योजना सन 2019-20 साठी ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व  जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापना करण्याकरिता अर्थसहाय्य .
            राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी अधिक माहितीस्तव आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. या योजनेंचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणारा अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्र अपलोड करुन इंग्रजी/ हिंदी भाषेत भरावा, असे आवाहन ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी केले आहे.
0000


छत्रपती शिवाजी पदभ्रमण मोहिमेसाठी तीसरी तुकडी रवाना इतिहासाच्या अभ्यासाबरोबर शारीरिक मानसिक क्षमतेचा विकास -अमन मित्तल







               
                कोल्हापूर दि. 30 (जि.मा.का.) :  छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुघल साम्राज्याला आव्हान देत मराठा साम्राज्याची निर्मिती केली. या पदभ्रमण मोहिमेमधून इतिहासाच्या अभ्यासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा विकास होतो. याचा अनुभव घ्या, यातून शिका आणि आनंदही घ्या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.
        छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय जोशपूर्ण आवाजात घोषणा देत राष्ट्रीय छात्र सैनिकांची तीसरी तुकडी आज शिवाजी पदभ्रमण मोहिमेसाठी रवाना झाली. महापौर सुरमंजिरी लाटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आझाद हिंद ट्रस्टचे डॉ. सुरेद्र जैन, सेवा सदन रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. उमेश कदम, उद्योजक रणजित शहा, रजनीकांत पाटील, निवृत्त मेजर संजय शिंदे, मुंबईचे ग्रुप कंमाडर  ब्रिगेडीयर जी. एस. चिमा,  ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर आर. बी. डोग्रा यांनी या तुकडीला ध्वज दाखविला.
            सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कर्नल आर. बी. होला यांनी शिवाजी पदभ्रमण मोहिमेचे उद्दिष्ट सांगून पदभ्रमण मार्गाची माहिती आणि इतिहास सांगितला. ते म्हणाले, सुमारे 360 वर्षापूर्वी नोव्हेंबर 1669 मध्ये पन्हाळागड स्वराज्यामध्ये
महाराजांनी दाखल केला.
            श्री. मित्तल पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ऐतिहासिक मार्ग इतिहासात प्रसिध्द आहे. या मार्गावरुन तुम्ही पदभ्रमण करत असताना महाराजांचा तो ऐतिहसिक क्षण अनुभवा. अशा पदभ्रमण मोहिमेमधून शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते. आयुष्यामध्ये स्वत: ला सिध्द करण्यासाठी अशा मोहिमांचा निश्चित फायदा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचाही जरुर अभ्यास करा, असेही ते शेवटी म्हणाले.
             एन. सी. सी. गीतानंतर उपस्थित मान्यवरांनी ध्वज दाखवून तुकडीला रवाना केले. छत्रपतींच्या आणि भारत मातेच्या जयघोषात ही तुकडी मार्गस्थ झाली. आजच्या या तुकडीत राज्यातील कोल्हापूर, पुणे तसेच देशातील आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील छात्रांचा सहभाग आहे. यावेळी कर्नल राजेशकुमार, कर्नल राजेश शहा, कर्नल के.के. मोरे, कर्नल एम.के. तिवारी, लेप्टनंट कर्नल सुनील नायर आदी उपस्थित होते.
00000

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत मातेच्या जयघोषात एन.सी.सी.ची दुसरी तुकडी पदभ्रमण मोहिमेसाठी रवाना





छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत मातेच्या जयघोषात
एन.सी.सी.ची दुसरी तुकडी पदभ्रमण मोहिमेसाठी रवाना

               
                कोल्हापूर दि. 29 (जि.मा.का.) :  छत्रपती शिवाजी महाराज की जय!, भारत माता की जय!, जय हिंद ! जोशपूर्ण आवाजात घोषणा देत राष्ट्रीय छात्र सैनिकांची दुसरी तुकडी आज शिवाजी पदभ्रमण मोहिमेसाठी रवाना झाली. कोमोडर सुनील बाळकृष्णन (नौसेना मेडल), शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवृत्त कर्नल ए. व्ही. सावंत, ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर आर. बी. डोग्रा आणि रोटरी कल्ब सनराईजचे अध्यक्ष प्रविण कुंभोजकर यांनी या तुकडीला ध्वज दाखविला.
        सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कर्नल आर. बी. होला यांनी शिवाजी पदभ्रमण मोहिमेचे उद्दिष्ट सांगून पदभ्रमण मार्गाची माहिती आणि इतिहास सांगितला. एन. सी. सी. गीतानंतर उपस्थित मान्यवरांनी ध्वज दाखवून तुकडीला रवाना केले. छत्रपतींच्या आणि भारत मातेच्या जयघोषात ही तुकडी मार्गस्थ झाली.
        आजच्या या तुकडीत राज्यातील छात्रसैनिकांसह राजस्थान आणि गुजरात राज्यातील छात्रांचा सहभाग आहे. यावेळी कर्नल राजेशकुमार, कर्नल राजेश शहा, कर्नल के.के. मोरे, कर्नल एम.के. तिवारी, लेप्टनंट कर्नल सुनील नायर आदी उपस्थित होते.
        काल रवाना करण्यात आलेली पहीली तुकडीचे पन्हाळा येथे स्वागत करण्यात आले. पन्हाळा गडाविषयी या तुकडीला माहिती देऊन श्रीलंकन छात्रसैनिकांसोबत बांबवड्याकडे ती मार्गस्थ झाली.
00000

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९


5 हजारची लाच घेताना महावितरणचा
सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
कोल्हापूर दि. 28 (जिमाका) : कोडोली येथील महावितरणचा  सहाय्यक अभियंता राजेश अनिल घुले (वय वर्षे 43) याला 5 हजारची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले.
राधाकृष्ण अपार्टमेंटमधील 14 सदनिका धारकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. त्याचे बक्षीस म्हणून सहाय्यक अभियंता राजेश घुले यांनी 28 हजाराची मागणी केली. तडजोडी अंती 5 हजाराची लाच स्वीकारताना श्री. घुले हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. 
उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार शामसुंदर बुचडे,  पोलिस काँस्टेबल रुपेश माने यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. 
00000


छत्रपती शिवाजी महाराज की जय ! घोषणा देत पदभ्रमण मोहिमेसाठी पहिली तुकडी मार्गस्थ छत्रपतींचा इतिहास प्रेरणा देणारा- जिल्हाधिकारी दौलत देसाई










 
                कोल्हापूर दि. 28 (जि.मा.का.): औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला उपलब्ध साधनसामुग्री आणि काही शेकडो मावळ्‌यांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी नामोहरम केले. मराठा साम्राज्य निर्माण करून इतिहास घडवला. या प्रेरणा देणाऱ्या इतिहासाचा अभ्यास करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
        सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शिवाजी पदभ्रमण मोहिमेसाठी पहिली तुकडी आज मार्गस्थ झाली. एनसीसी गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. देसाई, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर  आर. बी. डोगरा यांनी या तुकडीला ध्वज दाखवून मार्गस्थ केले.
         आजच्या या तुकडीमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि गोवा निदेशालयाचे छात्र सहभागी झाले आहेत. या छात्रांना शुभेच्छा  देताना जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, घनदाट अरण्य, डोंगरवाटा, सतत पडणारा पाऊस आणि तितकाच घनदाट काळोख अशा प्रतिकुल परिस्थितीत सिध्दी जौहरसारख्या शत्रूला चकवा देत कुशल युध्दनितीच्या जोरावर आणि अवघ्या काही मावळ्यांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरून आपली सुटका करून घेतली. हा प्रसंग इतिहास  घडवून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात साम्राज्य उभे केले.  त्यांनी घडवलेला  इतिहास छात्रांना प्रेरणा देणारा आहे. त्याचा जरूर  अभ्यास करा, असेही ते म्हणाले.
            कुलगुरू डॉ. शिंदे शुभेच्छा देताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जगातील महान योध्दा आहेत. गनिमी कावा, कुशल युध्दनितीच्या जोरावर इतिहास घडवला. स्वराज्याचे ध्येय ठेवल्याने हा इतिहास घडला. जीवनात ध्येय ठेवल्यास इतिहास घडू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. तत्कालीन प्रतिकुल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मोजक्या मावळ्यांच्या सहाय्याने ही मोहीम कशी फत्ते  केली असेल, याचा सध्याच्या गुगल मॅपच्या युगात विचार करा.
            कर्नल आर.बी. होला यांनी यावेळी या पदभ्रमण मोहिमेची माहिती दिली. यावेळी निवृत्‍त कर्नल डी.पी. पी. थोरात, कर्नल राजेश शहा, कर्नल गुलशन चढ्ढा, कर्नल के.के. मोरे, लेफ्टनंट कर्नल सुनील नायर, कॅप्टन अंकुश शर्मा आदी उपस्थित होते.
00000

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

दिव्यांगांच्या खेळाडूंना जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याहस्ते बक्षिस वितरण





               
                कोल्हापूर दि. 27 (जि.मा.का.) : 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाच्या विशेष शाळा, कार्यशाळा व रोटरी क्लब ऑफ क्लब ऑफ होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिक महाडिक यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देवून शंभर मी धावणे या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले. स्पर्धेतील इतर विजेत्या स्पर्धकांना रोटरी क्लब  ऑफ होरायझनचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
            या स्पर्धेत 600 विद्यार्थी, 300 शिक्षक, क्रिडाशिक्षक, प्रशिक्षक तसेच पालकवर्ग उपस्थित होते. आभार स्वरुपा भारद्वाज यांनी मानले.
00000

बार्टीच्यावतीने वडणगेत संविधान साक्षर ग्राम



               



                कोल्हापूर दि. 27 (जि.मा.का.): डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) समतादूत प्रकल्प अंतर्गत संविधान साक्षर ग्राम उपक्रमाचा काल वडणगे येथे प्रारंभ करण्यात आला.  25 डिसेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
            करवीर तालुक्यातील वडणगे गावात 17 व्या संविधान दिनानिमित्त संविधान  रॅली  काल काढण्यात आली. ही रॅली कन्या विद्यामंदिर, ग्रामपंचायत मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह काढण्यात आली.  देवी पार्वती हायस्कूल, कन्या व कुमार विद्यामंदिर, द बुध्दिस्ट इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. गटविकास अधिकारी सचिन घाडगे, सरपंच सचिन चौगुले, उपसरपंच दिपक व्हरगे, पी. के. पाटील सविता देसाई, भाग्यश्री खामकर आदी उपस्थित होते.
            बार्टी संस्थेच्या जिल्हा समन्वयक आशा रावण यांनी यावेळी प्रास्ताविक करुन बार्टीविषयी माहिती दिली. शिक्षणाधिकारी किरण लोहार, सर्जेराव वडणगेकर यांनी सरपंच, उपसरपंच यांनी संविधानविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस. एस. धुमाळ यांनी केले. समतादूत प्रतिभा सावंत यांनी शेवटी आभार मानले. मुख्य प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे, प्रकल्प अधिकारी गणेश सव्वाखांडे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण चौगुले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.  कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, आरोग्य सेविका उपस्थित होते.  
00000

दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी संस्थांनी पुढे यावे - रविकांत अडसूळ









               
                कोल्हापूर दि. 27 (जि.मा.का.): दिव्यांगांना स्वावलंबी बनवून कायमस्वरुपी  उदरनिर्वाहाची व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी शासन विविध योजना व अभियान राबवित आहे. या उपक्रमांमध्ये सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनीदेखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी व्यक्त केले.
            समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर  जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व रोटरी क्लब ऑफ होरायझन्‍ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते  ज्योत प्रज्वलीत करुन उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
            यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, रोटरी क्लब ऑफ होरायझनचे अध्यक्ष समीर पाटील, झंवर उद्योग समुहाचे नरेंद्र झंवर, रोटरीचे नामदेव गुरव, अमरसिंह बिचकर, देवराज नाईक-निंबाळकर, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.  
            श्री. अडसूळ म्हणाले, दिव्यांगांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून त्यामध्ये सामाजिक संस्थांनी योगदान दिल्यास दिव्यांगांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी गती मिळेल. या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ होरायझन व झंवर उद्योग समुहाचे त्यांनी आभार व्यक्त केले. स्पर्धेत सहभागी मुलांनी  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून जिल्ह्याचे व आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या. 
            यावेळी नरेंद्र झंवर, समीर पाटील, नामदेव गुरव, देवराज नाईक-निंबाळकर आदींनी मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक श्री. घाटे यांनी केले. सुरुवातीस स्पर्धकांनी उत्कृष्ट संचलन केले. चेतना विकास मंदिरच्या मुलांनी क्रीडा फॅशन शो करुन उपस्थित सर्वांची मने जिंकली. क्रीडा शपथ घेऊन स्पर्धेला सुरुवात झाली.
            यावेळी कोल्हापूर  जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक इतर कर्मचारी, रोटरी क्लब ऑफ होरायझन व झंवर उद्योग समूहाचे इतर अधिकारी, पदाधिकारी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

कोल्हापूर महापालिका हद्दीतील रस्त्यांची कामे 15 दिवसात दुरुस्ती -कार्यकारी अभियंता सं.द.सोनवणे कोल्हापूर - 26 (जिमाका) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मागील दोन वर्षामध्ये खासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, 4 हजार 217 नगरविकास कार्यक्रम या योजनेतंर्गत एकूण 103 एवढी कामे करण्यात आली असून, यापैकी 97 कामे पूर्ण झाली असून, उर्वरित 6 कामे प्रगतीपथावपर आहेत. या कामांमध्ये एकूण 37.83 कि.मी. इतक्या लांबीचे रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सं.द. सोनवणे यांनी दिली. यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे 22 कामांमध्ये किरकोळ खड्डे पडले आहेत. 17 कामे महानगरपालिकेमार्फत केलेल्या ड्रेनेज, पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई केल्यामुळे बाधित झाली आहेत. पावसाळ्यात खड्डे पडलेल्या व खराब झालेल्या लांबीची दोषदायित्व कालावधीमध्ये दुरूस्ती करण्याकरिता संबंधित कंत्राटदारांना नोटिसा देण्याची कार्यवाही करण्यात आली असून कामांची आवश्यक ती दुरूस्ती 15 दिवसात करण्यात येणार आहे. 0000


कोल्हापूर महापालिका हद्दीतील
रस्त्यांची कामे 15 दिवसात दुरुस्ती
                 -कार्यकारी अभियंता सं.द.सोनवणे
कोल्हापूर - 26 (जिमाका) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मागील दोन वर्षामध्ये खासदार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, 4 हजार 217 नगरविकास कार्यक्रम या योजनेतंर्गत एकूण 103 एवढी कामे करण्यात आली असून, यापैकी 97 कामे पूर्ण झाली असून, उर्वरित 6 कामे प्रगतीपथावपर आहेत. या कामांमध्ये एकूण 37.83 कि.मी. इतक्या लांबीचे रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सं.द. सोनवणे यांनी दिली. 
यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे 22 कामांमध्ये किरकोळ खड्डे पडले आहेत. 17 कामे महानगरपालिकेमार्फत केलेल्या ड्रेनेज, पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई केल्यामुळे बाधित झाली आहेत. पावसाळ्यात खड्डे पडलेल्या व खराब झालेल्या लांबीची दोषदायित्व कालावधीमध्ये दुरूस्ती करण्याकरिता संबंधित कंत्राटदारांना नोटिसा देण्याची कार्यवाही करण्यात आली असून कामांची आवश्यक ती दुरूस्ती 15 दिवसात करण्यात येणार आहे.
0000


दुचाकी वाहनाची 2 डिसेंबर पासून नवीन नोंदणी क्रमांकाला सुरुवात/ मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रामार्फत कुक्कुटखत विक्री व प्रशिक्षणाचे आयोजन /टपाल विभाग विम्याची बंद पॉलिसी सुरु करणार /28 नोव्हेंबरला महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन


दुचाकी वाहनाची 2 डिसेंबर पासून
नवीन नोंदणी क्रमांकाला सुरुवात
कोल्हापूर - 26 (जिमाका) : खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका एम.एच.09-एफ.एच. ही शनिवार दि. 30 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असून, नवीन दुचाकी वाहनांची मालिका नोंदणी एम.एच.09-एफ.के. ही सोमवार दि. 2 डिसेंबर पासून नव्याने सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. टी. अल्वारिस यांनी दिली. 
            जिल्ह्यातील दुचाकी वाहनधारकांनी आपल्या पसंतीच्या क्रमांकाचे अर्ज सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्विकारण्यात येथील, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रामार्फत
कुक्कुटखत विक्री व प्रशिक्षणाचे आयोजन
कोल्हापूर - 26 (जिमाका) : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रामधील कुक्कुटपालन प्रक्षेत्रावर रक्कम रुपये 1 हजार 500 प्रती टन या दराने कुक्कुटखत विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, त्याचबरोबर या केंद्रामार्फत दर महिन्याच्या 1 तारिखेपासून 30 दिवसांचे कुक्कटपालन प्रशिक्षण आयोजित केले जात असून, या प्रशिक्षणाची फी फक्त दोनशे रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली.
            या अंडी उबवणी केंद्रामार्फत अंडी विक्री व प्रशिक्षण घेण्यात यावे, अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग ताराबाई पार्क किंवा 0231-2651729 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे, आवाहन करण्यात येत आहे.
0000
टपाल विभाग विम्याची बंद पॉलिसी सुरु करणार
कोल्हापूर - 26 (जिमाका) : टपाल विभागामार्फत टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा या पॉलिसी बंद पडल्या आहेत. त्या पॉलिसींची पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर यांनी दिली.
टपाल विभागामार्फत जीवन विमा व ग्रामीण जीवन विमा या पॉलिसी संध्या ज्या पॉलिसीधारकांच्या बंद पडल्या आहेत, त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. पाच वर्षांची मर्यादा ओलांडलेल्या पॉलिसींना 31 डिसेंबर पर्यंत पुनरुज्जीवनासाठी विशेष योजना राबविली जात आहे. तरी पॉलिसीधारकांनी टपाल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0000




28 नोव्हेंबरला महात्मा जोतिबा फुले यांच्या
स्मृती दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
कोल्हापूर - 26 (जिमाका) राजर्षि छत्रपती मेमोरियल स्ट्रस्टच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या 129 व्या स्मृती दिनानिमित्त गुरुवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता राजर्षि शाहू स्मारक भवन, मिनी सभागृह, दसरा चौक येथे साजरा करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिली.
या स्मृती दिनानिमित्त महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार या विषयावर संपतराव गायकवाड माजी सहाय्यक शिक्षण संचालक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी या स्मृती दिनाच्या व व्याख्यानाच्या कार्यक्रमाला लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0000



दिव्यांग मुलांसाठी आज क्रीडा महोत्सव



कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.) : 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ होरायझन आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून उद्या बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दिव्यांग मुला-मुलींसाठी एक दिवसीय क्रीडा महोत्सव होणार आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
       जिल्हा पोलीस परेड ग्राऊंडवर उद्या सकाळी 8.30 वाजता या क्रीडा महोत्सवाचे उद्धाटन होणार आहे. जिल्ह्यातील अस्थिव्यंग, कर्णबधीर, अंध, गतिमंद प्रवर्गातील 500 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्पर्धेमध्ये धावणे, पोहणे, लांबउडी, स्थिरउडी, हलका  चेंडूफेक बुध्दिबळ आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाने यशस्वी होणाऱ्या क्रीडा स्पर्धकाचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड होणार आहे. विशेष म्हणजे या जिल्हास्तरीय महोत्सवासाठी होणारा संपूर्ण खर्च रोटरी क्लब होरायझन यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. पुढील 5 वर्षाकरिताही संपूर्ण खर्च या क्लबकडून करण्यात येणार आहे.
            9 ऑक्टोबर रोजी दिव्यांग शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांची एक दिवशीय कार्यशाळा राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाली. या कार्यशाहेत माहितीचा अधिकारी अधिनियम 2005, शिक्षक व विद्यार्थी यांचे निकोप मानसिक स्वास्थ्य, बालकांचे आरोग्य व समस्या, दिव्यांग बालकांकच्या सहवासात या जन्मावर शतदा प्रेम करावे अशा विविध विषयावर विशेष तज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले होते. या कार्यशाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तुंचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. तसेच दिपावली करिता दिव्यांग कार्यशाळेमध्ये तयार करण्यात येणाऱ्या हस्तकला वस्तू उदा. आकाशदिवे, सुवासिक उटणे, दिपावली पणती, दिपावली शुभेच्छा कार्ड इ. वस्तूचे प्रदर्शन भरवण्यात आले.
            3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता व दिव्यांग विद्यार्थ्यांची जनजागृती प्रभातफेरी मिरजकर तिकटी ते केशवराव भोसले नाट्यगृहापर्यंत होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, रांगोळी, गायन, वाचन इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विविध गुणदर्शन,  सांस्कृतिक कार्यक्रमदेखील केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी 8.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे.           जिल्हा परिषदेकडील 5 टक्के दिव्यांगाकरिता राखीव स्विय निधीमधून हेलन केलर दिव्यांग प्रेरणा पुरस्कार अंतर्गत दिव्यांग शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना व सवलती याबाबतची माहितीदेखील दिली जाणार असल्याचे श्री. घाटे म्हणाले.
            या पत्रकार परिषदेला रोटरी क्लबचे ईव्हेंट चेअरमन नामदेव गुरव, अध्यक्ष समीर पाटील, उद्योजक नरेंद्र झंवर उपस्थित होते.
0000000


गुरूवारपासून छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक देश-विदेशातील 1 हजार एनसीसी छात्रांचा सहभाग




          कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.) : एनसीसी गट कोल्हापूरच्यावतीने गुरूवार दि. 28 नोव्हेंबरपासून पन्हाळा ते विशाळगड असा छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक शिबिराला  सुरुवात होणार आहे. 28,29,30 नोव्हेंबर  आणि 1 डिसेंबर 2019 अशा चार बॅचेसमध्ये सुरूवात होणाऱ्या या ट्रेकमध्ये श्रीलंका आणि देशातील 1 हजार एनसीसी छात्र सहभागी होणार आहेत. राज्य शासनाने कोल्हापूर येथील फ्लाईंग हबला मंजुरी दिली असून पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव एअरपोर्ट ऑथारिटीकडे पाठवल्याची माहिती  ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर आर.बी. डोगरा यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
या ट्रेकबाबत कर्नल आर.बी. होला माहिती देताना म्हणाले, 28 नोव्हेंबरपासून होणारा हा ट्रेक 31 वा आहे. 8 दिवस होणाऱ्या या ट्रेकमध्ये पन्हाळा ते विशाळगड या मार्गावर पन्हाळा, बांबवडे, शाहूवाडी, पांढरपाणी, गजापूर या ठिकाणी कॅम्प होणार आहेत. विशाळगडावर समारोप होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य, त्या इतिहासाची प्रेरणा एनसीसी छात्रांना देणे हा प्रमुख उद्देश या ट्रेक मागील आहे. आंतरराज्य तसेच श्रीलंकेतील छात्रांना राज्य,देश यामधील ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक माहिती करून देणे हाही एक उद्देश आहे. यासाठी स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ब्रिगेडीयर डोगरा यांनी यावेळी एनसीसी युनिट ग्रुपबाबत सविस्तर माहिती दिली. कोल्हापूरच्या अंतर्गत सातारा, कराड, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालय आणि शाळांचा समावेश आहे. 300 हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एनसीसीचा समावेश आहे. 51 वर्षानंतर प्रथमच 75 ते 80 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एनसीसीची वाढ झाली आहे. युनिट ग्रुपच्या अंतर्गत 1 नौदल युनिट, 9 आर्मी आणि 1 वायुदलाचा समावेश आहे. कोल्हापूर येथे फ्लाईंग हब होण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून राज्य शासनाने पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये पाठवला आहे. या हबमुळे छात्रांना प्रशिक्षण मिळणार असून पायलट बनू इच्छिणाऱ्या छात्रांना फायदा होणार आहे. राज्य शासनामुळे मुलींचे वसतिगृह,सुसज्ज इमारत, गन गॅरेज, स्वयंपाकगृह,शौचालय आदीसह पायाभूत सुविधा पूर्ण झाल्याचे सांगून त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.
या पत्रकार परिषदेला कर्नल राजेश शहा, कर्नल एम. के. तिवारी, लेफ्टनंट कर्नल सुनील नायर उपस्थित होते.
0000

संविधानाचा सन्मान हाच आमचा आभिमान.. भारत माझी माऊली संविधान त्याची सावली.. हजारो विद्यार्थ्यांची घोषणा देत शहरात संविधान रॅली










            कोल्हापूर दि. 26(जि.मा.का.): ‘संविधानाचा सन्मान हाच आमचा आभिमान, भारत माझी माऊली संविधान त्याची सावली, संविधान एक परिभाषा है समता उसकी आशा है !’ अशा घोषणा देत संविधान दिनानिमित्त आज शहरातून रॅली काढण्यात आली.राष्ट्रीय छात्र सैनिकांसह हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या रॅलीत सहभागी झाले होते.
            दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास महापौर सुरमंजिरी लाटकर  आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि झेंडा दाखवून आज सकाळी या रॅलीचा प्रारंभ झाला. ही रॅली आईसाहेब महाराज पुतळा चौकातून बिंदू चौक येथे आली.. राजर्षी शाहू महाराज की जय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, हमारी आण बाण शान - संविधान, संविधानाचा सन्मान-हाच आमचा आभिमान, भारत माझी माऊली -संविधान त्याची सावली, संविधान एक परिभाषा है - समता उसकी आशा है ! अशा घोषणा देत भारतीय संविधानाचा जयजयकार केला.     संविधान रॅलीचा ऐतिहासिक बिंदू चौक येथे समारोप करण्यात आला.बिंदू चौक येथील  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास महापौर सुरमंजिरी लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदींनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थितांना संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करून तिचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
            यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, समाज कल्याण वरिष्ठ निरीक्षक संजय पवार कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते बाळासो भोसले, सुभाष देसाई, डी.जी. भास्कर, कादर मलबारी, यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी तसेच शहरातील विविध शाळामधील विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000