इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, ३१ मे, २०२०

जिल्ह्यात एकूण 590 पॉझीटिव्ह 134 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील


कोल्हापूर,दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय): आज रात्री 8 वाजेपर्यंत 385 प्राप्त अहवालापैकी 28 अहवाल पॉझीटिव्ह तर 356 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये 1 निगेटिव्ह अहवाल हा कर्नाटक येथील आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 450 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त 28 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा 4, भुदरगड-5, चंदगड-6, कागल-10 व शाहूवाडी 3 असा समावेश आहे
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 45, भुदरगड- 62, चंदगड- 57, गडहिंग्लज- 67, गगनबावडा- 6, हातकणंगले- 5, कागल- 50, करवीर- 12, पन्हाळा- 24, राधानगरी- 62, शाहूवाडी- 155, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 583 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील 7 असे मिळून एकूण 590 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 450 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आरोग्य विभागाच्यावतीने घेतली शपथ



कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ घेण्यात आली.
तंबाखू तसेच तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 तसेच E- cigarette बंदीबाबतच्या अध्यादेशाची प्रभावी अमंलबजावणी करण्याकरिता आज शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या शपथ कार्यक्रमास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आप्पती व्यवस्थापनाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केंम्पीपाटील, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुक देसाई यांच्यासह सीपीआर हॉस्पिटल व राजर्षि शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्षयरोग व उरोरोग विभाग प्रमुख डॉ. अनिता सायबन्नावार, औषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम.व्ही.बनसोडे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. सुधीर सरवदे, मेडिसिन असोसिएट प्रोफेसर डॉ. अनिता परितेकर, समुपदेशक चारुशिला कणसे यांच्यासह सर्व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000


जिल्ह्यातील प्रत्येक केव्हिड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनसुविधा असणारे 10 बेड तर कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये 50 बेड -जिल्हाधिकारी दौलत देसाई




कोरोनाच्या उपचारासंबधी प्रोटोकॉलबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना व्हीसीव्दारे प्रशिक्षण

 कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  जिल्ह्यातील प्रत्येक केव्हिड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा असणारे 10 बेड तसेच कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह 50 बेड आणि प्रत्येक सेंटरला 2 डिजिटल ईसीजी मशिन्स लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज बोलतांना सांगितले.
      कोरोनाच्या उपचारासंबधी प्रोटोकॉलबाबत जिल्हयातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसाठी  तसेच खाजगी तालुका समन्वयक यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीव्दारे आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी दौलत देसाई बोलत होते. कोरोनाच्या उपचारासंबधी प्रोटोकॉलबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सीपीआर हॉस्पिटल व राजर्षि शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्षयरोग व उरोरोग विभाग प्रमुख डॉ. अनिता सायबन्नावार, औषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम.व्ही.बनसोडे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. सुधीर सरवदे, मेडिसिन असोसिएट प्रोफेसर डॉ. अनिता परितेकर तसेच पुण्याच्या बीजे मे‍डिकल कॉलेजचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. कदम या  तज्ञांनी  व्हीसीव्दारे डॉक्टरांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले.
            या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आप्पती व्यवस्थापनाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केंम्पीपाटील, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुक देसाई यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            जिल्ह्यातील प्रत्येक कोव्हिड केअर सेंटर्समध्ये ऑक्सीजन सुविधेसह किमान 10 बेड आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह 50 बेड उपलबध करुन देण्यात येतील तसेच प्रत्येक कोव्हिड केअर सेंटर आणि  कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये प्रत्येकी 2 डिजिटल ईसीजी मशिन्स आणि पल्स ऑक्सीमीटर उपलब्ध करुन दिली जातील, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले की, जिल्हयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेथरेट कमी आहे, तो कमीच राहीला पाहिजे, यासाठी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, जिल्हयात अद्याप सामुहिक संसर्ग झालेला नसून त्याला यापुढेही रोखून ठेवण्याचे काम आरोग्य अधिकाऱ्यांना करायचे आहे. तसेच यापुढे कोरानामुळे मृत्युदरही वाढू नये, यासाठी आपली सारी ताकद पणाला लावा, तालुकास्तरीय कोव्हिड केअर सेंटरमध्ये सिरियस पेशंट असल्यास त्याला सीपीआरकडे रिफर करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील आरोग्‌य  विभागाचे काम चांगल्या पध्दतीने सुरु आहे, ते यापुढेही  सुयोग्‌य समन्वय राखून गतीशिलता जोपासावी, आरोग्य यंत्रणेस आवश्यक त्या सुविधा आणि साधने उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, अशी ग्वाही देऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, कोरोना विरुध्दच्या युध्दात आपण निश्चितपणे जिंकू, अशा आत्मविश्वासाने सर्वानी कोरोनाला हरविण्यसाठी प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, याकामी आरोग्य यंत्रणेचे फार मोठे योगदान असल्याचेही ते म्हणाले. आरोग्य अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहण्याच्या व्यवस्थेसाठी शासकीय विश्रामगृहे तसेच प्रसंगी हॉटेल्स उपलब्ध् करुन देण्याचे निर्देश संबधितांना दिले असल्याचेही ते म्हणाले.
सद्यस्थितीत कोरोना आणि आगामी पावसाळा विचारात घेऊन आवश्यक आरोग्य यंत्रणा तैनात करण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, पावसाळयातील नित्याचे आजार आणि कोरोना याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहून लोकांमध्ये कोणतीही भिती निर्माण होणार नाही, यादृष्टीने त्यांना आजारांबाबतची शास्त्रीय माहिती व शास्त्रशुध्द उपाययोजना आरोग्य शिक्षणाव्दारे तसेच समुपदेशनाव्दाने देण्यावर भर द्यावा, संपूर्ण आरोग्य यंत्रणा दक्ष आणि सजग ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना रुग्णांची काळजी घेतांना आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आपली स्वत:चीही काळजी घेणे तितकेच महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाबाबतच्या उपाययोजना प्राधान्याने राबवाव्यात, असेही ते म्हणाले.
औषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम.व्ही.बनसोडे यांनी कोरोना संशयित रुग्ण, त्यांची लक्षणे तसेच अलगीकरण कक्षातील रुग्णांबाबत घ्यावयाची काळजी तसेच शुगर,बीपी, कॅन्सर, अतिस्थुलत्व, हदयरोग अशा विविध व्याधीग्रस्त रुग्णांनी आणि रुग्णांबाबत काय काळजी घ्यायची याविषयी सविस्तर माहिती दिली. रुग्णांच्या लक्षणानुसार तसेच आजारांबाबतीत पूर्वइतिहासानुसार उपचार तसेच वारंवार मॉनिटरींग याबाबत छोटया-छोटया उदाहरणासह माहिती दिली. तसेच सारी आजाराबाबतही आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याची सूचना केली.
क्षयरोग व उरोरोग विभाग प्रमुख डॉ. अनिता सायबन्नावार यांनी कोव्हिड केअर सेंटरमधील व्यवस्थापनविषयक सविस्तर माहिती दिली. रुग्णांची लक्षणे, वय तसेच इतर व्याधींचा विचार करुन उपचार आणि काळजी घेण्याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये काम करतांना डॉक्टर्स तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी कोणत्या दक्षता घ्याव्यात याविषयी माहिती दिली.
बालरोग विभाग प्रमुख डॉ. सुधीर सरवदे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने संशयित बाल रुग्णाची तसेच माता व बाळ यांची घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. बालकांसाठी लक्षणानुसार उपचार पध्दती राबवितांना डायटकडे तेवढेच लक्ष देणे गरजेचे असून बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याबाबतही अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना आणि अडीअडचणींना तज्ञांनी उत्तरे देऊन त्यांचे शंकासमाधान केले.यामध्ये मेडिसिन असोसिएट प्रोफेसर डॉ. सौ. परितेकर यांच्यासह सर्वच तज्ञांनी सहभाग घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केंम्पीपाटील अणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनीही या व्हीसीमध्ये सहभाग घेऊन महिती दिली.
प्रारंभी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी व्हीसीव्दारे आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली..
00000


जिल्ह्यात एकूण 562 पॉझीटिव्ह 132 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर,दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 वाजता 58 प्राप्त अहवालापैकी 8 अहवाल पॉझीटिव्ह तर 50 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 425 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यत प्राप्त 8 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा 6,  पन्हाळा- 1     शाहूवाडी 1 असा समावेश आहे
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 41, भुदरगड- 57, चंदगड- 51, गडहिंग्लज- 67, गगनबावडा- 6, हातकणंगले- 5, कागल- 40, करवीर- 12, पन्हाळा- 24, राधानगरी- 62, शाहूवाडी- 152, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 555 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील सात असे मिळून एकूण 562 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 425 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

शनिवार, ३० मे, २०२०

जिल्ह्यात एकूण 554 पॉझीटिव्ह 132 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): आजअखेर जिल्ह्यात एकूण 554 पॉझीटिव्ह रुग्ण असून 132 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 9 वाजता 450 प्राप्त अहवालापैकी 47 अहवाल पॉझीटिव्ह तर 391 अहवाल निगेटिव्ह आले. (554 पैकी यापूर्वीच्या तीघांचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आहे, असे मिळून एकूण 450) एक अहवाल नाकारण्यात आला असून 5 अहवाल प्रलंबित आहेत. राज्य आणि जिल्ह्याबाहेरचे तीन निगेटिव्ह अहवाल आहेत.
आज रात्री 9 वाजेपर्यत प्राप्त 47 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, चंदगड 6, राधानगरी 25, कागल 12, राधानगरी 3 व   शाहूवाडी 1 असा समावेश आहे
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 35, भुदरगड- 57, चंदगड- 51, गडहिंग्लज- 67, गगनबावडा- 6, हातकणंगले- 5, कागल- 40, करवीर- 12, पन्हाळा- 23, राधानगरी- 62, शाहूवाडी- 151, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 547 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील सात असे मिळून एकूण 554 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 417 इतकी आहे.

मान्यतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओची कारवाई : यापुढेही तपासणी मोहिम तीव्र करणार -प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस



 कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  जिल्हयात लॉकडाऊनच्या काळात मान्यतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या 4 वाहनांवर आरटीओंनी कारवाई केली असून यापुढेही मान्यतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिला आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने ऑटो रिक्षा व चारचाकी वाहनातून प्रवासासाठी मान्यता देताना काही अटी घालून दिल्या आहेत. ऑटो रिक्षा व चारचाकी वाहनांमध्ये चालकासह 2 प्रवासी नेण्याला मुभा आहे, चालक व प्रवाशांनी मास्क घालणे बंधनकारक आहे तसेच वाहनांचे निर्जंतुकीकरण वरचेवर करावे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे अशी अटी घालून प्रवाशी वाहतूकीस परवानगी दिली आहे.
या अटींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन तपासणीची विशेष मोहिम हाती घेतली असून आज शासनाच्या अटींचे उलंघन करणाऱ्या 4 वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये MH09 J 5933  रिक्षामधून 10 प्रवासी, MH09 EL 0818 रिक्षामधून 4 प्रवासी, मारुती ओम्नी MH09 Y 0077 मधून 9 प्रवासी , महिंद्रा लोगान कार MH09 DB 0304 मधून 5 प्रवासी वाहून नेताना आढळले, या सर्व वाहनावर मोटर वाहन कायदा व नियमानुसार कारवाई करण्यात आली. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव यांनी ही कारवाई केली.
यापुढेही वाहन तपासणीची विशेष मोहिम जिल्हयात अधिक तीव्र केली जाणार असल्याचे सांगून डॉ. अल्वारिस यांनी वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, कोरोनापासून स्वतःला, कुटुंबीयांना व इतरांना वाचवावे, असे आवाहन केले आहे.
00000

सामाजिक संसर्ग रोखणे, मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी ग्राम समित्यांनी सतर्क रहावे - जिल्हाधिकारी दौलत देसाई



                        


कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यामध्ये अजून सामाजिक संसर्ग झालेला नाही. येथून पुढेही कोणत्याही प्रकारे सामाजिक संसर्ग होवू द्यायचा नाही आणि आपल्या जिल्ह्यात कमी असणारा मृत्यूदर यापुढेही वाढू द्यायचा नाही, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी "मी स्वत: सुरक्षित राहणार आणि गावाला सुरक्षित ठेवणार, कोणतीही आपत्ती हरवू शकणार नाही," अशा पध्दतीने सतर्क राहून काम करावे, असा आत्मविश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.
 जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व सरपंच, आशा वर्कर, ग्याम समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक,तलाठी, ग्राम विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. 
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील सर्व यंत्रणेने आजपर्यंत चांगल्या पध्दतीने परिस्थिती हातळल्याने त्याचे परिणामही चांगले दिसत आहेत. सर्व तपासलेल्या बाधित रुग्णांना आपण विलगीकरणात ठेवलेले आहे. त्यामुळे त्यांच्यापासून संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे. त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार मानतो. परंतु, आता कोरोना युध्दाच्या वेगळ्या टप्यावर आपण येवून पोहचलो आहोत. गावात एखादी निगेटिव्ह अहवाल घेवून येणाऱ्या व्यक्तीला संस्थात्मक अथवा गृह अलगीकरणात राहयचं आहे अशा व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत बाहेर फिरु देवू नका. आज तपासणी  अहवाल निगेटिव्ह आला म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित आहे, असे नाही. बाहेरुन गावात येणाऱ्या व्यक्तीला अलगीकरण बंधनकारक आहे. अशी व्यक्ती ऐकत नसेल तर त्यांना सक्तीने अलगीकरणात पाठवा व कारवाई करा.
 1897, 1920 या साली आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याला आपत्ती व्यवस्थापनाचा वेगळा आदर्श घालून दिलेला आहे. त्याचप्रमाणे आजही आपण  कोल्हापूरचे वेगळेपण देशाला दाखवून देवूया. त्याच पध्दतीने सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतोय ही भावना ठेवून प्रत्येकाने काम करावे. अशी संधी क्वचित येते. कोल्हापूरचे हे वेगळेपण राज्याला आणि देशाला दाखवून देवूया.  जिल्ह्यात झालेल्या 4 मृत्यूंपैकी केवळ कोरोनामुळे मृत्यू असा एकही नाही. प्रत्येकाला वेगवेगळी व्याधी होती हे दिसून आले आहे. दोन प्रकरणात मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्थानिक स्तरावरील  संस्थात्मक, गृह अलगीकरणातील व्यक्तींची दररोज एमपीडब्ल्यू ए एन एम, आशा, अंगणवाडी सेविका, खासगी, शासकीय डॉक्टर यांच्यामार्फत वैद्यकीय तपासणी करा. काही लक्षणे दिसत असतील किंवा व्याधीग्रस्त असतील तर त्यांना तात्काळ सीपीआर, डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय आणि जवळच्या कोव्हिड काळजी केंद्रात उपचारासाठी पाठवा.
 माल वाहतूक, दूध वाहतूक टँकर यांच्या चालक, वाहकांसाठी गावामध्ये स्वतंत्र राहयाची व्यवस्था करा, तशी त्यांना कल्पना द्या, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करावी. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून प्रवास करुन येणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत अशा व्यक्तींचा कुटुंबातील अथवा गावातील लोकांशी संबंध येणार नाही, याची खबरदारी ग्राम समितीने घ्यावी. त्यांच्या कुटुंबाचे व अशा व्यक्तीचे योग्य समुपदेशन करावे.

कोरोना फक्त साबण आणि सॅनिटायझरला घाबरतो
पूर्वीच्या काळी घराबाहेर पाणी भरुन बादली ठेवली जायची. बाहेरुन आलेली व्यक्ती या बादलीतील पाण्याने स्वच्छ हात पाय धुवून घरी येत असे. हीच पारंपरिक पध्दत पुन्हा  एकदा आपल्याला लागू करावी लागेल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना फक्त साबण आणि सॅनिटायझरला घाबरतो. पाण्याच्या बादलीसह सोबत साबण ठेवा. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला साबणाने स्वच्छ हात पाय धुवून घरी येण्यास बंधनकारक करा. शक्य असल्यास घरीही सॅनिटायझर ठेवा. गावामध्ये फिरताना मास्क वापरणे बंधनकारक आहे तो वापरावा. कुटुंबियातील ज्येष्ठ, व्याधीग्रस्त आणि लहान मुलांना अजिबात बाहेर पाठवू नका. सामाजिक संसर्ग होणार नाही यासाठी जागरुक रहायला हवे, असा संदेशही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिला.

 मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यावेळी म्हणाले,  बाहेरुन येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ज्या लोकांच्या घरी नियमांचे व्यवस्थित पालन होत असेल, स्वतंत्र जागा असेल अशांना घरी अलगीकरण करा. लक्षणं असतील त्यांचे स्वॅब घेवून त्यांना संस्थात्मक अलगीकरणात पाठवा. ग्राम पंचायतीमार्फत आयुषचे सर्व्हेक्षण करावे. 50 वर्षापुढील तसेच संस्थात्मक आणि गृह अलगीकरणातील व्यक्तींना संजिवनी वटी आणि आर्सेनिक अल्बम-30 औषधांचे वाटप करा. व्याधीग्रस्त व्यक्तींचे पल्स ऑक्झीमीटर, थर्मल स्कॅनिंग, दैनंदिन तपासणी झाली पाहिजे. त्यांचे रिडींग 95 च्या खाली आल्यास पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करा. कोरोनाबरोबरच आपल्याला डेंग्यू, उष्माघात, स्वाईन फ्ल्यू याबाबतही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी संस्थात्मक अलगीकरण केंद्रात पाण्याची व्यवस्था करा. घरा घरात डेंग्यूसाठी कोरडा दिवस पाळा, डासांसाठी फवारणी करा, परिसर स्वच्छ ठेवा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, येथून खडतर कालावधी आहे. येणारा पावसाळा आणि सामाजिक संसर्ग याबाबत आपल्याला दक्षता घ्यावी लागणार आहे. संस्थात्मक अलगीकरणातील प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक आहे. त्याबाबत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनाही आवाहन केले आहे. त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद येत आहे. व्याधीग्रस्त व्यक्तींना तपासणीसाठी नजिकच्या कोव्हिड काळजी केंद्राकडे आणायचे आहे. ग्राम समितीने पाहणी करुन स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल तरच त्या व्यक्तीला गृह अलगीकरणात ठेवायचे आहे. अंगणवाडी सेविका, ए एन एम, आशा वर्कर यांनी प्रभावीपणे सर्व्हेक्षण करावे तरच पुढचा धोका टळणार आहे, असेही ते म्हणाले.
 यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.
0 0 0 0 0 0


शुक्रवार, २९ मे, २०२०

कोव्हिडसाठी सलग 7 दिवस सेवा देणाऱ्या खासगी पदवीधर डॉक्टरांना 2 तर उच्च पदवीधरांना 3 हजार प्रती दिन - जिल्हाधिकारी दौलत देसाई



       कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोव्हिड-19 या रोगाच्या उच्चाटनासाठी खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. सलग 7 दिवस कर्तव्यावर असणाऱ्या खासगी पदवीधर डॉक्टरांना प्रती दिन 2 हजार रुपये तसेच उच्च पदवीधरांना प्रती दिन 3 हजार रुपये मानधन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
       जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांनी आज खासगी डॉक्टरांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, अशा साथीच्या रोगाच्या निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून  खासगी डॉक्टरांनी ऐच्छिक सेवा बजावावी. जिल्हा प्रशासनाकडू त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. सलग 7 दिवस कर्तव्यानंतर पुढील 7 दिवस अलगीकरण अशा स्वरुपाचे नियोजन  अपेक्षित आहे. अपवादात्मक प्रकरणात 3 ते 4 दिवसांची सेवाही स्वीकारली जाईल. यासाठी पदवीधर डॉक्टरांना प्रती दिन 2 हजार रुपये तसेच उच्च पदवीधरांना प्रती दिन 3 हजार रुपये मानधन दिले जाईल.
            समाजासाठी कर्तव्य म्हणून आपत्कालीन सेवा देण्याची संधी 100 वर्षातून एकदा मिळाली आहे. जिल्हाधिकारी म्हणून मला ही संधी मागील वर्षी महापुरामुळे व यावर्षी कोव्हिड-19 मुळे मिळाली आहे. त्यामुळे खचून न जाता या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एक झाले पाहिजे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेवाभावी वृत्तीने कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक एकत्र येण्याचे हे एकमेव उदाहरण असेल. कोल्हापुरकर संकटात एक होतात हे महापुराच्यावेळी आपण दाखवून दिले तीच परंपरा पुढे चालू ठेवूया.  यासाठी विना मानधन सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे स्वागतच असेल. तालुका आरोग्य अधिकारी,‍ जिल्हा आरोग्य अधिकारी, उप जिल्हाधिकारी यांनी बजावलेल्या आदेशाचे जे डॉक्टर पालन करत आहेत त्यांना विमा कवच असेल. कर्तव्य बजावत असताना दुर्दैवाने अपघात घडल्यास त्यालाही विमा असेल. डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी त्यांची राहण्याची, जेवणाची व अलगीकरणासाठी व्यवस्था केली जाईल. त्याचबरोबर त्यांना सुरक्षा किटही दिले जाईल. कोव्हिड-19 साठी कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांना विशेष प्रमाणपत्रही जिल्हा प्रशासनामार्फत दिलं जाईल. कोणत्याही डॉक्टरला दुर्दैवाने लागण झाल्यास शासकीय खर्चातून त्यांच्यावर उपचार केले जातील,अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. खासगी पॅरामेडिकल स्टाफ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रुग्णवाहिका यांनीही कोव्हिड-19 विरुध्दच्या युध्दात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
            यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, स्वीय सहायक विज्ञान मुंडे आदी उपस्थित होते.
 00 0 0 0 0 0

जिल्ह्यात एकूण 361 पॉझीटिव्ह शाहूवाडीत सर्वाधिक 143 -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर,दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): आज रात्री 8 वाजता 359 प्राप्त अहवालापैकी 47 अहवाल पॉझीटिव्ह तर 312 अहवाल निगेटिव्ह. आजअखेर जिल्ह्यात एकूण 361 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 8 वाजेपर्यत प्राप्त 47 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा- 3, भुदरगड- 6, चंदगड- 17, गडहिंग्लज- 9, कागल- 2, राधानगरी- 5, शाहूवाडी- 3, शिरोळ- 2 समावेश आहे
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 35, भुदरगड- 57, चंदगड- 44, गडहिंग्लज- 39, गगनबावडा- 6, हातकणंगले- 5, कागल- 17, करवीर- 12, पन्हाळा- 23, राधानगरी- 57, शाहूवाडी- 143, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 476 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील सात असे मिळून एकूण 483  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील 483 रूग्णांपैकी 118 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 361 इतकी आहे.
0 0 0 0 0 0    

जिल्ह्यात आज 1086 व्यक्तींचा प्रवेश




       कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : मुंबई, नवी मुंबई, पालघर, पुणे, रायगड, सोलापूर, ठाणे व इतर जिल्ह्यातून 1086 व्यक्तींनी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात प्रवेश केला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे यांनी दिली.
          जिल्ह्यातील तालुक्यामध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तींची संख्या याप्रमाणे-आजरा 175, भुदरगड 71, चंदगड 46, गडहिंग्लज 188, गगनबावडा 4, हातकणंगले 36, कागल 46, करवीर 86, पन्हाळा 29, राधानगरी 64, शाहूवाडी 86, शिरोळ 55 व कोल्हापूर महानगर क्षेत्रात 100 असे एकूण 1086 व्यक्तींचा समावेश आहे.
0  0 0 0 0 0

3 मे नंतर बाधित जिल्ह्यांमधून 30 हजार आले; साडेसतरा हजार जणांची स्वॅब तपासणी जिल्ह्यात 483 पॉझिटिव्ह; अलगीकरणातील व्याधीग्रस्तांची विशेष काळजी घ्या - जिल्हाधिकारी दौलत देसाई




     
-          
       कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : पुणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, सोलापूर आणि सांगली या बाधित जिल्ह्यांमधून 3 मे नंतर अंदाजे 30 हजार व्यक्ती जिल्ह्यामध्ये आल्या. जिल्हा प्रशासनाने साडेसतरा हजार व्यक्तींच्या स्वॅब तपासणी केली. यामध्ये आजअखेर 483 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या त्यांच्यावर सीपीआर,    डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय तसेच कोव्हिड काळजी केंद्रात उपचार सुरु आहेत. ज्या व्यक्ती संस्थात्मक आणि गृह अलगीकरणात आणि व्याधीग्रस्त आहेत, अशा व्यक्तींची विशेष काळजी प्रभाग तसेच ग्राम समितीने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
       जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात आलेल्या 483 पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी इतर सर्व व्यक्तींना प्रत्येक गावातील संस्थात्मक अलगीकरण, तालुक्याच्या ठिकाणी असणारे केंद्रीय संस्थात्मक अलगीकरणात आहेत. स्वतंत्र राहण्याची सोय असणाऱ्या व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.  उपचारार्थ दाखल पॉझिटिव्ह रुग्णांची काळजी शासकीय तसेच खासगी डॉक्टर्स घेत आहेत. संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषत: मधुमेह, ह्दयविकार, मूत्रपिंड, रक्तदाब, कर्करोग अशा व्याधीग्रस्तांची ग्राम समितीने विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आशा वर्करमार्फत या सर्वांची आपण सर्व्हेक्षण करत आहे. अशा व्यक्ती गावात बाहे पडणार नाहीत किंवा गावात आलेल्या व्यक्ती या व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
            483 बाधित व्यक्तींचा आकडा मर्यादित ठेवायचा असेल आणि जिल्ह्यातील नागरिकांना सामाजिक संसर्ग होवू द्यायचा नसेल तर आता ग्राम समिती आणि प्रभाग समिती यांच्यावर फार मोठी जबाबदारी आली आहे. संस्थात्मक तसेच गृह अलगीकरणात असणाऱ्या व्यक्ती त्याच ठिकाणी कशा राहतील कोणत्याही परिस्थितीत बाहेर फिरणार नाहीत, समाजात मिसळणार नाहीत याबाबत दक्ष राहणं आवश्यक आहे. या व्यक्तींचा आप आपसातही संपर्क येणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागेल. यातील एकही व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली तर सर्वांची तपासणी करणं आवश्यक होईल. 
             अलगीकरणात असणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांच्या वस्तू एकमेकाला देवू नये, अथवा बाहेर गावाहून आणलेल्या वस्तू कुटुंबाला देवू नये. ग्राम समितीने या व्यक्तींना सुविधा पुरविणे आवश्यक आहे. जेवण डिस्पोजेबल कंटेनरमधून दिलं पाहिजे. घरच्या व्यक्तींशी संपर्क येता कामा नये याची दक्षता ग्राम समितीने घ्यावी. सामाजिक अंतर हे संस्थात्मक तसेच गृह अलगीकरणातील व्यक्तींने ठेवले पाहिजे. हे जर पाळले नाही तर पुढे  ती व्यक्ती बाधित झाली तर कुटुंबातील इतर व्यक्तींना त्याचा प्रादुर्भाव होवू शकतो आणि कुटुंबातील इतर व्यक्ती गावातील व्यक्तींच्या संपर्कात आल्यास त्यांना प्रादुर्भाव होवू शकतो. संस्थात्मक अलगीकरणातील  प्रत्येक व्यक्तीची रोज वैद्यकीय तपासणी होते की नाही याची खात्री ग्राम समितीने करावी. संस्थात्मक अलगीकरण केंद्रातील स्वच्छतागृहे सोडियम हायफोक्लोराईड सोल्यूशनने निर्जुंतूकीकरण ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करावे. घाबरुन न जाता या सर्वांबाबत आपण काळजी घेतली तर सामाजिक संसर्गाचा धोका होणार नाही. ग्राम समिती याबाबत निश्चित चांगलं काम करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पीक कर्ज माफीसाठी जिल्ह्यात 292.75 कोटींचे वाटप - जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे



       कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) :  मागील वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतीचे फार नुकसान झाले. पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 1 हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जास माफी देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला होता. यानुसार जिल्ह्यातील बाधित क्षेत्रावरील कर्जमाफीसाठी 294 कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली असून त्यापैकी 292.75 कोटींचे वाटप करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.
          पूरबाधित क्षेत्राचे चुकीचे पंचनामे व काही तांत्रिक अडचणीमुळे संयुक्त व सामायिक खातेदार शेतकरी यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्ह्यातील संयुक्त व सामायिक खातेदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना दिले होते. त्यानुसार जिल्हृयातील संयुक्त व सामायिक खातेदार यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
          जिल्ह्यातील उर्वरित जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीय बँक व व्यापारी बँकांच्या पात्र वंचित सभासदांना कर्जमाफीचा लाभ देण्याकरिता आवश्यक असलेल्या 25 कोटी रकमेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. लवकरच उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
0000000

विभागीय माहिती कार्यालयाचे लेखापाल चंद्रकांत कारिवडेकर सेवानिवृत्त




कोल्हापूर,दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): विभागीय माहिती कार्यालयाचे लेखापाल चंद्रकांत कारिवडेकर हे आज 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्तीनिमित्त श्री. कारिवडेकर यांना विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, निवृत्त माहिती अधिकारी एस.आर. माने यांच्याहस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री. कारिवडेकर यांचा गुणगौरव करणारी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, निवृत्त माहिती अधिकारी एस.आर.माने, पर्यवेक्षक रामदास परब, सतीश शेंडगे,      अनिल यमकर, रोहित कांबळे, प्रकाश पाटील, दामु दाते यांच्यासह माहिती विभागातील अन्य कर्मचाऱ्यांची भाषणे झाली.
00000


शेतीवर येणाऱ्या टोळधाडीच्या प्रतिबंधासाठी सर्वेक्षणाबरोबरच उपाययोजनांसाठी साहित्य जुळवाजुळव करावी -जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे



कोल्हापूर,दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): शेतीवर येणाऱ्या टोळधाडीच्या प्रतिबंधासाठी शासकीय यंत्रणा, कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शेतकरी आणि ग्रामस्तरीय समित्यांनी दक्ष राहून नियमित सर्वेक्षणाबरोबरच आवश्यक उपाययोजनांसाठी साहित्याची जुळवाजुळव करून ठेवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
देशाच्या आग्नेय दिशेकडून राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश इत्यादी मार्गे महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात शेतीवर टोळधाड या किडीचे आगमन झाले आहे. वाळवंटी टोळ या किडीमुळे पिकांचे आणि इतर झाडे-झुडपे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अंडी, पिल्ले आणि प्रौढ अवस्था या किडीच्या प्रमुख अवस्था आहेत. त्यापैकी प्रौढ अवस्था ही नुकसानकारक आहे. किडीमुळे नुकसान व किडीचे मार्गक्रमणावरून असे दिसून आले आहे की, ही रात्रीच्या वेळी उंच झाडावर थव्याने एकत्र बसते व पानांचा फडशा पाडते तसेच दिवसा हवेच्या प्रवाहाबरोबर मार्गक्रमण करते.
त्यासाठी रात्री पाहणी करून लगेच किटकनाशक फवारणी करावी लागते. उंच झाडावरील किडीचा शोध घेण्यासाठी फ्लड लाईट्स, अस्का लाईट, बॅटरी व फवारणीसाठी अग्नीशमन दलाचे बंब व ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी नगरपरिषदेकडे, तहसिलदार कार्यालयाकडे, पंचायत समितीकडे असणारे आपत्ती निवारण अंतर्गत साहित्य तसेच गावोगावी असणारे ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र इत्यादी साहित्यांची जुळवाजुळव व तयारी करून ठेवणे गरजेचे आहे. लागणारी किटकनाशके उदा. क्लोरोपायरीफॉस याची उपलब्धता कृषी विभागामार्फत करण्यात येईल.
या किडीमुळे आपल्या जिल्ह्यातील शेतीचे नुकसान टाळण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहनही श्री. वाकुरे यांनी केले आहे.
सर्वेक्षण/निरीक्षण :- शेतकऱ्यांनी नियमीतपणे सजग राहून आपल्या शेताच्या परिसरातील झाडा-झुडपांचे निरीक्षण करावे. विशेषत: रात्रीच्या वेळी गट तयार करून शेतात पाहणी व देखरेख करावी. कारण दिवसाउजेडी ही किड फारशी दृष्टिपथात येत नाही. मात्र रात्रीच्या वेळी झाडांवर मोठ्या प्रमाणात दिसून येते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना :- टोळ/किटक आढळल्यास डबे, पत्रे,ढोल, सायरन, ट्रॅक्टर इत्यादीनचा आवाज करून किड पिटाळता येते. संध्याकाळी/ रात्रीच्या वेळी टोळ झाडांवर एकत्र जमा होतात. तसे आढळल्यास शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर्स पेटवून धुर निर्माण करावा. टोळांची सवय थव्याथव्याने एका दिशेने पुढे जाण्याची आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या थव्यांच्या वाटेवर 60 से.मी. रूंद व 75 से.मी. चर खणून त्यात पिलांना पकडता येते.
किटक नाशकांव्दारे नियंत्रण :- थव्यांच्या स्थितीत पिलांची संख्या जास्त असल्यास, निमअर्क प्रति हेक्टरी 2.5 लिटर फवारणी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. विष आमिषांचा वापर- गहू किंवा भाताचे तूस यामध्ये फिप्रोनिल 5 ईसी 3 मिली व त्यामध्ये किडीस आकर्षित करण्यासाठी मळी मिसळून प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये प्रति हेक्टरी 20-30 किलो याप्रमाणे फेकून द्यावे. मिथील पॅराथीआन 2 टक्के भुकटी 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. क्लोरोपायरीफॉस 20 ईसी 24 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 ईसी 10 मिली किंवा डेल्टामिथ्रिन 2.8 ईसी 10 मिली किंवा फिप्रोनील 5 एससी 2.5 मिली किंवा ल्यांब्डा सायहेलाथ्रिन 5 ईसी 10 मिली किंवा मॅल्याथिऑन 50 ईसी 37 मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी शक्यतो रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी करावी. ज्यामुळे विश्रांतीसाठी झाडा-झुडपांवर मोठ्या संख्येने जमा झालेल्या टोळ किडीचे नियंत्रण बऱ्याच प्रमाणात शक्य असल्याचेही श्री. वाकुरे यांनी सांगितले.
0000



आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज







          जिल्ह्यात गेल्या वर्षी महापुराने थैमान घातल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. शासन-प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था आणि कोल्हापूरकरांच्या धैर्य आणि संयमी वृत्तीमुळे महापूरातूनही कोल्हापुरकर सावरल ! पण महापुरामुळे जिल्ह्याची फार मोठी हानी झाली. यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य महापुराची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले असून पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आणि सजग केली आहे.  

            गेल्या वर्षीच्या महापुराचा कटू अनुभव डोळयासमोर ठेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज आणि सतर्क केली आहे. महापुराचा सामना करतांना कोणतीही कमी राहू नये यावर जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भर दिला असून पूर बाधित गांवात पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांचे सुक्ष्म नियोजन केले आहे. गेल्यावर्षीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे मान्सूनपूर्व आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात बोटिंची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच एनडीआरएफची 2 पथके बोटिंसह मागणी केली असून भारतीय तटरक्षक दलही बचाव व मदत कार्यासाठी  सक्रीय झाले आहे. 
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध केली असून, यामध्ये इन्फ्लेटेबल रबर बोट- ओबीएम सह - 8, रबर बोट(जुन्या-नव्या)- 17, एअर पंप फॉर बोट- 6, टॉर्च सर्च लाईट- 40, लाईफ बाईज-30, सेफ्टी हेलमेट-50, मेगा फोन-21, फलोटींग पंप-7, स्कुबा डायव्हिंग सेट -2, लाईफ जॅकेट -200, लाईफ बॉय रिंग- 306, सर्च लाईट -20, हेड लाई विथ झुम – 10, फलोटींग रोप मिटर-100 , इन्फ्लेटेबल लाईफ जॅकेट -50, अंडर वॉटर सर्च लाईत-10 तसेच आस्का लाईट-18 यांचा समावेश आहे. संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली साधनसामुग्री योग्य सुस्थितीत आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यात आली आहे. जिल्हयातील स्वयंसेवी-सेवाभावी संस्था, आपदा मित्र अशा 808 स्वयंसेवकांचा रेस्क्यू फोर्स तैनात केला आहे. गावागावात तरुणांनी फौजच उभी करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी पाऊस आणि अतिवष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे जिल्हयातील 386 गावे बाधीत झाली, यामध्ये कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्यातील 42, हातकणंगले -23, करवीर-57, कागल-41, राधानगरी -22, गगनबावडा-19, पन्हाळा-47, शाहुवाडी-25,गडहिंग्लज -27, चंदगड-30,आजरा-30 आणि भुदरगड तालुकयातील -23 गांवाचा समावेश आहे. या पूरबाधित गांवामध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने शोध व बचाव पथके गठीत केली असून गाव ते जिल्हा पातळीवर प्रशासकीय यंत्रणा गतिमान केल्या आहेत. पूरबाधित गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचेही नियोजन करण्यास प्राधान्य दिले आहे. 
            जिल्ह्यातून प्रामुख्याने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी आणि घटप्रभा या नद्या वाहतात, कृष्णा नदी जिल्हयाच्या ईशान्यपूर्व सिमेवरुन तर वारणा, पंचगंगा, दुधगंगा आणि हिरण्यकेशी या नद्या वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात. वारणा नदी सांगली व कोल्हापूर जिल्हयाच्या सिमेवरुन 120 कि.मी. वाहते, जिल्हयातील कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या उपनद्या पंचगंगा नदीस मिळाल्या आहेत. पंचगंगा नदी नृसिंहवाडीजवळ, तर दुधगंगा नदी जिल्हा सिमेबाहेर थोडयाच अंतरावर कृष्णा नदीस मिळते. तिलारी ही एकच नदी पश्चिमवाहिनी आहे. जिल्हयात राधानगरी, तुळशी, वारणा, दुधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगांव, चिकोत्रा, चित्री,जंगमहट्टी, घटप्रभा जांबरे ही धरणे आहेत, जिल्ह्यातील संभाव्य पुरपरिस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने पाटबंधारे विभागही सज्ज आणि सजग झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस तसेच धरणप्रकल्पातील पाणीसाठा, विसर्ग आणि त्यानुसार नद्यीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या सर्व गोष्टी नियोजनबध्द, शास्त्रसुध्द पध्दतीने करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी केले आहे. महापुरास कारणीभूत मानल्या जाणाऱ्या अलमट्टी प्रकल्पाच्या पाणीसाठा आणि विसर्गाबाबतही  बेळगाव, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर सुयोग्य नियोजन ठेवण्यात येत आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूरनियंत्रणासाठी आवश्यक पूर्वतयारी करुन पूराचा धोका असणाऱ्या गावांबरोबरच तालुका आणि जिल्हा पातळीवरही आपत्ती व्यवस्थापन गट कार्यान्वित करुन आपत्ती निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनाचे प्रशिक्षणही दिले आहे. गाव पातळीवरही शोध व बचावपथके कार्यान्वित केली असून यामध्ये महसूल विभागाबरोबरच पोलीस, जिल्हा परिषद, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कृषी, आरोग्य, गृहरक्षक, अग्निशमन दलाबरोबरच जिल्हयातील विविध रेस्क्यू फोर्स आणि गावातील तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. पूराचा धोका असणा-या गावांमध्ये नियंत्रण कक्ष अहोरात्र सुरु केला आहे. 
जिल्हाधिकारी कार्यालयात 1 जूनपासून 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येत असून संभाव्य पूरपस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज आहे. यासाठी नियंत्रण कक्षाचा 1077 हा टोल फ्री क्रमांक असून अन्य क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 0231-2659232 तसेच पोलीस नियंत्रण कक्षही सज्ज असून यासाठी 100 तसेच 0231-2662333 असे दुरध्वनी क्रमांक आहेत. याशिवाय पाटबंधारे विभागाने सर्व धरण प्रकल्पावर तसेच जिल्हास्तरावरही आपत्ती नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत ठेवण्यात आले आहेत. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही यंदाच्या पावसाळयात करण्यात येणाऱ्या उपाययोजनामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाही करणे क्रमप्राप्त झाले आहे. महापुराच्या काळात पूरबाधित गावात बचाव व मदत कार्य गतिमान करण्याबरोबरच पूरग्रस्थांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरणाची ठिकाणे निश्चित करणे, निवारागृहांची निवड करतांना वीज,पाणी, स्वच्छतागृहे, भोजन, औषधोपचार आदि पायाभूत सुविधाची उपलब्धी महत्वाची आहे. पूरप्रतिबंधक उपायोजना राबवितांना कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, यादृष्टीने पूरपरिस्थितीमध्येही कोरोना प्रतिबंधक उपाय करणे महत्वाचे असून यामध्ये प्रामुख्याने सामाजिक अंतर, स्थलांतरीत लोकासाठींच्या निवारागृहामध्ये निर्जंतुकीकरणाची साधने, मास्क, सॅनिटायझर यांचीही उपलब्धता करण्यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भर दिला आहे.
                                                                                   - एस.आर.माने
                                                                               - कोल्हापूर.
00

जिल्ह्यात एकूण 341 पॉझीटिव्ह शाहूवाडीत सर्वाधिक 140 -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर,दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 वाजता 313 प्राप्त अहवालापैकी 9 अहवाल पॉझीटिव्ह तर 285 अहवाल निगेटिव्ह (सिंधुदुर्गचे 19 अहवाल निगेटिव्ह) आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 341 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यत प्राप्त 9 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, चंदगड 1, राधानगरी 3, शाहूवाडी 4, सोलापूर 1 असा समावेश आहे
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 32, भुदरगड- 51, चंदगड- 27, गडहिंग्लज- 30, गगनबावडा- 6, हातकणंगले- 5, कागल- 15, करवीर- 12, पन्हाळा- 23, राधानगरी- 52, शाहूवाडी- 140, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 429 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण 436  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील 436 रूग्णांपैकी 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 341 इतकी आहे.
0 0 0 0 0 0


गुरुवार, २८ मे, २०२०

पश्चिम बंगाल साठी 1216 लोक रवाना रात्री 10 वाजता ट्रेन गेली..



      कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यामधून हावडा पश्चिम बंगालकडे 1 हजार 216 श्रमिक विशेष रेल्वेने रवाना झाले. यावेळी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी, रेल्वे पोलीस, कोल्हापूर जिल्हा प्रशासन अधिकारी आणि कर्मचारी , कोल्हापूर पोलीस, महापालिका अधीकारी आणि कर्मचारी आरोग्य विभाग यांचा सत्कार करण्यात आला.
            स्टेशन अधीक्षक ए.आय. फर्नांडिस, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव,  महापालिका उपायुक्त निखिल मोरे, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, जलसंपदा उपअभियंता शरद पाटील, शाहूपुरी सहायक पोलिस निरीक्षक कुंदन गाडे, रेल्वे पोलीस निरीक्षक एल.आर. यादव,सहायक पोलिस निरोक्षक अनिल सरवदे,संदीप झा , डॉ.नुपूर लिमये आदींसह रेल्वे स्टेशन परिसरात काम करणाऱ्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
            प्राचार्य डॉ.महादेव नरके, डी.डी.पाटील, एस.एच.पाटील, तानाजी लांडगे, सागर यवलूजे , प्रवीण पाटील,आनंदा करपे, आदित्य कांबळे, सागर पाटील यांच्या हस्ते सत्कार झाले .
       हावडा पश्चिमबंगालकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये कोल्हापूर महानगरपालिका-427, कागल-25, शिरोळ-25, चंदगड-55, गडहिंग्लज-16, इचलकरंजी-155, हातकणंगले-263, करवीरमधील -227, शाहूवाडी-16, पन्हाळा-4 आणि राधानगरी-3  असे एकूण 1 हजार 216 मजुरांचा यामध्ये समावेश आहे.
000000


कोव्हिड काळजी व अलगीकरण केंद्रातील प्रत्येकाचे वैद्यकीय स्क्रिनिंग करा - जिल्हाधिकारी दौलत देसाई



-          
       कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोव्हिड काळजी केंद्र आणि संस्थात्मक अलगीकरण केंद्रातील प्रत्येक व्यक्तीचे थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर याच्या माध्यमातून तपासणी करा. व्याधीग्रस्त व वयोवृध्‍द व्यक्तींची विशेष काळजी घ्या. सीपीआर व डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयाकडे संदर्भीत करा. जिल्हा कोव्हिड आरोग्य केंद्रात किमान 50 टक्के खाटांसाठी प्राणवायू पुरवठ्याची सोय करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.
            जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी तालुकानिहाय आढावा घेवून ते म्हणाले, रेड झोनमधून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद तपासणी नाक्यांवर घेतली जाते. त्याचबरोबर ती प्रत्येक कोव्हिड काळजी केंद्रात पाठवली जाते. नाक्यांवरुन आलेल्या नोंदीनुसार व्यक्ती सीसीसीमध्ये आलेत का, याची तपासणी झाली पाहिजे. ती चौकशी करुन संबंधित व्यक्तींना आयक्यूमध्ये ठेवले पाहिजे. सीसीसीमधील व्यक्तींची तपासणी करुन त्यांना न्युमोनिया, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार अशा व्याधीग्रस्त व्यक्तींना सीपीआर तसेच डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवावे. पॉझिटिव्ह रुग्णांच्याबाबतीत काँन्टॅक्ट ट्रेसिंग करताना अतिशय जलद आणि काटेकोरपणे करावी. सतर्क राहून अशा पध्दतीने काम केल्यास मृत्यूदराचा धोका आपण थांबवू शकू.
            जिल्हा कोव्हिड आरोग्य केंद्रामधील किमान 50 टक्के खाटांसाठी प्राणवायू पुरवठ्याची छोट्या सिलेंडर आणि मास्कच्या माध्यमातून यंत्रणा उभी करा. संस्थात्मक अलगीकरण आणि गावांमधील अलगीकरण केंद्रातील व्यक्तींसाठी डॉक्टरांनी भेट द्यायला हवी. आरोग्य सेतू हे ॲप डाऊलोड करायला सांगा. या ॲपच्या माध्यमातून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती मिळू शकते. सीसीसी आणि आयक्यूमध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक तपासणीसाठी पीपीई किट वापरावा. कोरोना बरोबरच मलेरिया, डेंग्यू, स्वाईनफ्यू यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून काम करावे. यासाठी डास निर्मुलन उपाय योजना कराव्यात. येवू घातलेली टोळधाड, बियाणे, खते याबाबत शेतकऱ्यांना खरीप हंगामात अडचण होणार नाही. तसेच पीक कर्ज वाटपाबाबतही बँक व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे आढावा घेवून यंत्रणा सतर्क करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
            महापालिका आयुक्त डॉ. मलिनाथ कलशेट्टी म्हणाले, डेंग्यूच्या उच्चाटनासाठी कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे. त्यावर भर द्यावा. ग्राम पंचायतींना फॉगिंग यंत्र देण्यात आले आहे. त्याचा वापर करुन डास निर्मूलन करावे. संस्थात्मक अलगीकरणाचा परिसर स्वच्छ असायला हवा. त्याबाबत काळजी घ्या.
            मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, कोव्हिड काळजी केंद्र, संस्थात्मक अलगीकरण यामध्ये सुविधा देवून पूर्ण क्षमतेने कार्यरत करा. पल्स ऑक्सीमीटर वर रिडिंग घेवून नोंद ठेवा. नरेगामधून पंतप्रधान आवास योजनेमधील घरे अंतिम करा.
           






टोळधाड आपत्तीसाठी तयार रहा- ज्ञानदेव वाकुरे
        जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी यावेळी जिल्ह्यात येवू घातलेल्या टोळधाडी विषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, टोळधाड दिवसा दिसत नाही. त्यासाठी रात्री दक्ष रहावे. हिरव्या मोठ्या झाडांवर थवा करुन बसते. आस्का लाईटच्या माध्यमातून ही दिसते. अग्नीशामन दल तसेच ट्रॅक्टर माऊंटेड फवारणी यंत्राद्वारे यावर फवारणी करावी. त्यासाठी क्लोरोपायरीफॉसेसचा वापर करावा.
            शेतकऱ्यांनी बियाणांची पावती घ्यावी. त्यावर दुकानदार आणि शेतकऱ्याची सही असावी. भरारी पथकाने याबाबत तपासणी करावी.   
           
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
000000