इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २८ मार्च, २०२३

श्री क्षेत्र जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी

 

 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दि. 3 ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत  श्री  क्षेत्र  जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा  यात्रा  होत  आहे. यात्रा  कालावधीत  जोतिबा  डोंगरावर  येणाऱ्या  भाविकांची सुरक्षा, मोटार वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी  पोलीस अधीनियम 1951 चे कलम 34 प्रमाणे दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 5 एप्रिल  रोजी रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूक नियमन आदेश जारी केले आहे.

            श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी या ठिकाणी जोतिबा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतुकीची परिस्थिती विचारात घेवून जुने आंब्याचे झाड, (दानेवाडी क्रॉसिंग) ते जुने एस.टी.बसस्थानक, मेन पार्किंग- यमाई पार्किंग ते गिरोली फाटा ते दानेवाडी फाटा, दानेवाडी फाटा ते दानेवाडी क्रॉसिंग या दरम्यानच्या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व पार्कींग करण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

 

 कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) :  धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता  पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत लाभ घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे  सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय/ तंत्रनिकेतनांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांकरीता वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती -क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे - विद्यार्थी धनगर समाजातील असावा. जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था /महाविद्यालये ज्या शहराच्या ठिकाणी आहेत अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित असावा. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी पात्र राहतील. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद, वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परीषद, वस्तुकला परीषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मान्यता प्राप्त महाविद्यालये/ संस्थेमध्ये मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश मिळाला असावा. इयत्ता 12 वी नंतरच्या तंत्रशिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीकृत (कॅप) प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. विद्यार्थ्यी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील. तसेच प्रत्येक वर्षी त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांस अदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. योजनेतंर्गत पात्र विद्यार्थ्यांस भोजन भत्ता 25 हजार रु., निवास भत्ता 12 हजार रु., निर्वाह भत्ता 6 हजार रु.असे एकूण 43 हजार रु. अनुज्ञेय राहतील.

0000000000

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

 


कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 3 एप्रिल 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.

तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.

अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे-

अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड), तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, चारही स्तरावरील लोकशाही दिनांकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहिल. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल.

चारही स्तरावरील लोकशाही दिनात खालील बाबींशी संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाहीत-

न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर अशा प्रकारचे अर्ज लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत.

लोकशाही दिनापूर्वी 15 दिवस अगोदर विहीत नमुन्यात करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आपले तक्रार अर्ज करावेत, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

बुधवार, १ मार्च, २०२३

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश अर्ज ऑनलाईन स्विकारण्याची प्रक्रिया सुरु

 

 


कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश अर्ज दि. 1 ते 17 मार्च 2023 या कालावधीत ऑनलाईन स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. तरी इच्छुक पालकांनी आरटीई पोर्टलवर नमुद कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे यांनी केले आहे.

            आरटीई  अंतर्गत सामाजिक वंचित घटक, आर्थिक दुर्बल घटक, घटस्फोटीत तसेच विधवा महिलांचे पाल्य, अनाथ, दिव्यांग, एचआयव्ही  किंवा कोव्हिड प्रभावित बालके इ. घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. 17 मार्च नंतर  ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये अल्पसंख्यांक शाळा वगळता राज्यातील सर्व अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यता तत्वावरिल प्राथमिक शाळांना पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 टक्के पर्यंतच्या जागा नजिकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामधील पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीसाठी 25 टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील आरटीई पोर्टल या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.

          आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी आवश्यक कागदपत्रे-

जन्माचे प्रमाणपत्र (सर्व घटकांना अनिवार्य), निवासी पुरावा (सर्व घटकांना अनिवार्य), सामाजिक वंचित घटक यांच्यासाठी पालकांचा/ बालकांचा जातीचा दाखला/ प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (रु. एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा), घटस्फोटीत व न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या मुलांसाठी आवश्यक कागदपत्रे (न्यायालयाचा निर्णय अथवा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, आईचा रहिवाशी पुरावा), विधवा महिलांच्या मुलांसाठी (पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा), एकल पालकत्व असल्यास आई किंवा वडील यापैकी निवडलेल्या व्यक्तीची कागदपत्रे ग्राह्य, अनाथ बालकांसाठी- अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. जर बालक अनाथालयात रहात नसेल तर जे पालक सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक, कोव्हिड प्रभावित बालके (ज्यांचे एक किंवा दोन्ही पालकांचे निधन  दि. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कोव्हिडमुळे झाले) यांच्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र.कोव्हिडमुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र. वैद्यकीय प्रमाणपत्र हे शासकीय/ पालिका/ मनपा, रुग्णालय अथवा आय.सी.एम.आर. नोंदणीकृत खासगी रुग्णालय/ प्रयोगशाळा यांचा अहवाल. एचआयव्ही बाधित/ एचआयव्ही प्रभावित बालकांसाठी-जिल्हा शल्यचिकित्सक/ वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपंगत्व प्रमाणपत्र व अर्ज करणाऱ्या बालकाचे पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.

0000000

प्रकल्पग्रस्तांनी जमीन व भूखंड मागणी अर्ज समक्ष सादर करावेत - अश्विनी सोनवणे-जिरंगे

 

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणींचा निपटारा होण्यासाठी व प्रकल्पग्रस्तांचे कामकाज जलदगतीने होण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमीन व भूखंड वाटपाबाबत कार्यक्रम निश्चित केला आहे. त्या-त्या प्रकल्पातील जमीन व भूखंड मिळण्यास शिल्लक असलेल्या प्रकल्पग्रस्तांनी जमीन व भूखंड मागणी अर्ज नमुद ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत समक्ष उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहन पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे यांनी  केले आहे.

प्रकल्पाचे नाव, उपविभागाचे नाव, अर्ज करावयाचा दिनांक व अर्ज सादर करावयाचे ठिकाण खालीलप्रमाणे-

चांदोली प्रकल्प- उपविभागीय अधिकारी, इचलकरंजीसाठी दि. 9 मार्च 2023 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, इचलकरंजी.

धामणी प्रकल्प- उपविभागीय अधिकारी, राधानगरी- कागलसाठी दि. 14 मार्च 2023 रोजी राई, ता. राधानगरी.

नागनवाडी प्रकल्प- उपविभागीय अधिकारी, राधानगरी- कागलसाठी दि. 23 मार्च 2023 रोजी तहसील कार्यालय, भुदरगड.

आंबेओहोळ प्रकल्प- उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लजसाठी दि. 29 मार्च 2023 रोजी तहसील कार्यालय, गडहिंग्लज.

नमुद केलेल्या दिनांकास व ठिकाणी ज्या प्रकल्पग्रस्तांना जमीन व भूखंड मिळालेला नाही त्यांनी अर्ज व त्यासोबत 65 टक्के रक्कम भरल्याचा पुरावा व बुडीत जमिनीची कागदपत्रे सादर करावीत, असेही श्रीमती सोनवणे-जिरंगे यांनी कळविले आहे.

0000000

गिरीराज जातीची एक दिवशीय पिल्ले व अंडी विक्रीसाठी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रास संपर्क करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर प्रक्षेत्रामार्फत दर आठवड्याला गिरीराज जातीची एक दिवशीय पिल्ले विक्री केली जातात. या एक दिवशीय पिल्लांची किंमत रक्कम रु. 20 प्रति नग असून 100 पिल्लांसाठीच्या चिकबॉक्सची किंमत रक्कम रु. 50 आहे. तसेच अंडी उपलब्ध असून त्याचा दर रक्कम रु. 11 प्रति नग प्रमाणे आहे. तरी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे पशुसंवर्धन सहायक आयुक्तांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी 0231-2651729 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

30 दिवसांचे कुक्कूटपालन प्रशिक्षण

 


 

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र या कुक्कुटपालन प्रक्षेत्रावर दर महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत एकुण 30 दिवसांचे कुक्कूटपालन प्रशिक्षण आयोजित केले जाते. या प्रशिक्षणासाठी प्रतिमाह 200 रूपये फी राहिल. प्रशिक्षणासाठी इच्छुक व्यक्तींनी दर महिन्याच्या 25 ते 30 तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहनही पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी 0231-2651729 क्रमांकावर संपर्क साधावा.

 

00000

विविधरंगी कोल्हापूर खुली छायाचित्र स्पर्धेसाठी 13 मार्चपर्यंत छायाचित्रे पाठवावीत

 


 

      * सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारांना अनुक्रमे 51, 35, 21 हजार रुपयांचे पारितोषिक

 

कोल्हापूर दि. 1 (जिमाका) : पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याची जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे व पर्यटन विषयक बाबींवर आधारित ‘विविधरंगी कोल्हापूर..!’ खुली छायाचित्र स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निवड होणाऱ्या छायाचित्रांचा समावेश जिल्ह्याच्या कॉफी टेबल बुक (छायाचित्र पुस्तिका) मध्ये छायाचित्रकारांच्या नावासह करण्यात येणार आहे.

 

स्पर्धेसाठी छायाचित्र पाठविण्याची अंतिम मुदत 13 मार्च 2023  रोजी रात्री 12.00 पर्यंत  राहिल. स्पर्धेची सविस्तर माहिती  जिल्हा प्रशासनाच्या www.kolhapur.gov.in  या संकेतस्थळावर https://kolhapur.gov.in/en/notice/vividharangi-kolhapur-photography-competition-2023/ येथे उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याची पर्यटनविषयक आकर्षक छायाचित्रे जगासमोर यावीत व जगभरातील पर्यटकांनी कोल्हापूरला भेट द्यावी, यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

 

         अंतिम निवड करण्यात आलेल्या प्रत्येक छायाचित्रासाठी 3 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारांना प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक 35 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 21 हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी  15 हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे, असेही श्री. रेखावार यांनी सांगितले आहे.

0000000