इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३० जून, २०२३

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील ई-पीक पाहणीची नोंदणी पूर्ण करुन घ्यावी

 

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : खरीप हंगामाची प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे करण्यासाठी दिनांक १ जुलै २०२३ पासून सुरुवात करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ई-पीक पाहणी प्रकल्प (पुणे) चे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे.

 ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरुन आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई - पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.

खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सर्व खातेदार शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी नवीन व्हर्जन अपडेट करुन घेणे आवश्यक आहे, असे ही पत्रकात नमुद आहे.

00000

ॲट्रॉसिटी प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी समन्वयाने काम करा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 

 



कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : ॲट्रॉसिटी प्रकरणातील पीडितांना जलद गतीने न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी दिल्या.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला समिती सदस्य तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.

अनुसूचित जाती जमाती अत्याचार (ॲट्रॉसिटी) अंतर्गत पीडितांचे जातीचे दाखले प्राप्त करुन घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे, असे सांगून ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीत पोलीस तपासावरील २०, कागदपत्रांअभावी 19 प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत पोलीस विभागामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच पोलीस तपासावरील प्रकरणांची निर्गतीही लवकरच करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय समितीमार्फत एकूण 25 प्रकरणांतील पिडीतांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली. तालुकास्तरावर उपविभागीय समिती स्थापन करणे, अशासकीय सदस्यांमार्फत जातीचे दाखले प्राप्त करुन घेणे, एकदिवसीय कार्यशाळांचे आयोजन करणे या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. अर्थसहाय्यासाठी मंजूर झालेल्या प्रकरणांना अनुदान प्राप्त होताच नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला. समितीचे सदस्य सचिव विशाल लोंढे यांनी ॲट्रॉसिटी प्रकरणांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

सोमवार, २६ जून, २०२३

जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज पुरस्कार व अन्य पुरस्कारांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु करणार -पालकमंत्री दीपक केसरकर




 

कोल्हापूर, दि.26 (जिमाका): छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींचे जतन होण्यासाठी आवश्यक ते प्रकल्प पुन्हा सुरु करण्यात येतील. छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून लवकरच सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

 जिल्हा परिषद येथील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात आयोजित राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार व विशेष उल्लेखनीय शिक्षक गौरव पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई- शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे आदी उपस्थित होते.

 दीपप्रज्वलन करुन शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच बचत गटाने तयार केलेली शिदोरी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देवून स्वागत करण्यात आले.

 पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उत्कृष्ट शासन व्यवस्था कशी असावी या संदर्भात काढलेले शासननिर्णय आजही समाजाला दिशादर्शक आहेत. जीवनात प्रगती हवी असेल तर शिक्षण आवश्यक आहे, हा विचार शाहू महाराजांनी रुजवला. शिक्षण केवळ एका समाजापुरते मर्यादीत न राहता समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी त्यांनी विविध हॉस्टेल्स काढले, स्त्री शिक्षणाचे महत्व त्यांनी आपल्या संस्थानामध्ये दिले. उत्कृष्ट शिक्षण देवून शाहू महाराजांचे स्वप्न पूर्ण करत असलेल्या शिक्षकांचे तसेच ज्या पत्रकारांनी पत्रकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा सर्व पत्रकारांचे व शिक्षकांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले. तसेच शाहू महाराजांना अभिप्रेत असलेला समाज, देश, महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी योगदान घावे, असेही त्यांनी सांगितले.

 प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पुरस्कार प्राप्त कर्मचारी, शिक्षक तसेच पत्रकारांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळेच जिल्हा परिषदेला विविध पुरस्कार मिळाल्याचे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कुंभार व संदीप मगदूम यांनी केले. आभार मनीषा देसाई यांनी मानले.

राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार प्राप्त कर्मचारी (जिल्हा परिषद)-

संजय सीताराम जाधव, कक्ष अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद,

अमोल आनंदा दबडे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, भुदरगड,

विकास आनंदराव फडतारे, वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग (प्राथमिक),

फिरोज महंम्मदअली हेतवडे, कनिष्ठ सहायक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,पंचायत समिती,

हातकणंगले, 

उमर बादशाह मुल्ला, वाहन चालक, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी, शिरोळ,

कृष्णात हिंदूराव पाटील, परिचर, सामान्य प्रशासन विभाग,जि.प.,

मोहन गोविंद सुर्यवंशी, परिचर, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प.,

शिल्पा अशोक गोडंगे, आरोग्य सेवक (महिला) प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी अंतर्गत उपकेंद्र पारेवाडी,

आजरा,

जीवन सीताराम बोकडे, आरोग्य सहायक (पुरुष), प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रे,

मनिषा बाळासाहेब भांडकोळी, आरोग्य सहायक (महिला), प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण, आजरा,

महेंद्र ज्ञानू बामणे, औषध निर्माता, प्राथमिक आरोग्य केंद्र उचगांव,

पुष्पलता उल्हास गजभिये, आरोग्य पर्यवेक्षक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती,

गडहिंग्लज,

मयंक बापू कुरुंदवाडकर, कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग क्र. 5 गडहिंग्लज,

गीतांजली राजेंद्र येडूरकर, पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समिती हातकणंगले,

 राजू यशवंत माने, पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समिती करवीर,

सुबराव रामचंद्र पोवार, वरिष्ठ सहायक (लेखा) आरोग्य विभाग, जिल्हा परिषद याप्रमाणे आहेत.

 

शिक्षण विभाग- माध्यमिक गट-

संतोष दत्तात्रय सनगर, सहायक शिक्षक करवीर,

 कुंडलिक महादेव जाधव, सहायक शिक्षक, गगनबावडा,

सुषमा अरुण पाटील, सहायक शिक्षक, करवीर

5 वी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक–

संजय आनंदा शिंदे, विद्या मंदिर मुधाळ,

गणेश पाटील, विद्या मंदिर पुंगाव,

नकुशी देवकर, विद्या मंदिर बाचणी,

निलिमा नितीन पाटील, कन्या विद्या मंदिर उत्तूर,

राजाराम रायकर, विद्या मंदिर खामकरवाडी,

धनाजी केशव पाटील, विद्या मंदिर कारभारवाडी,

 बेबीताई पांडूरंग कदम, विद्या मंदिर बोरवडे,

अनिल साताप्पा पाटील, विद्या मंदिर म्हाकवे,

नामदेव निकम, विद्या मंदिर घुडेवाडी,

अरुण जयसिंग पाटील, विद्या मंदिर तिरवडे,

 चंद्रकांत पांडूरंग लोकरे, विद्या मंदिर वाळवे खुर्द,

संदीप पाटील, विद्या मंदिर बेले,

शर्वरी अरविंद भंडारी, विद्या मंदिर बाचणी

 8 वी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक-

विक्रम शामराव पाटील विद्या मंदिर, परखंदळे याप्रमाणे आहेत.

जिल्हा व तालुकास्तर आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2023-

विकास पांडूरंग सुतार, आजरा, दै. पुढारी,

प्रकाश सदाशिव सांडुगडे, भुदरगड, दै. तरुण भारत,

निंगाप्पा शिवाजी बोकडे, चंदगड, दै. लोकमत,

 विनायक हिंदूराव पाटील, गडहिंग्लज, दै. तरुण भारत,

चंद्रकांत बळवंत पाटील, गगनबावडा, दै. लोकमत,

पोपटराव शामराव वाकसे, हातकणंगले, दै. पुढारी,

 विजयकुमार वसंत कदम, करवीर, दै. लोकमत,

सदाशिव तुकाराम आंबोशे, कागल, दै. तरुण भारत,

निवास खंडेराव मोटे, पन्हाळा, दै. सकाळ,

आशिष लक्ष्मणराव पाटील, राधानगरी, दै. पुढारी,

 मुकुंद चंद्रकांत पोवार, शाहूवाडी, दै. शाहूवाडी टाईम्स,

अतुल सुभाष भोजणे, दै. पुण्यनगरी, शिरोळ व

रमेश प्रकाश सुतार, दै. लोकमत, शिरोळ याप्रमाणे आहेत.

000000

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांचे व छायाचित्रांचे प्रदर्शन खुले पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

 


 



कोल्हापूर दि. 26 (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट उलगडणाऱ्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांचे व छायाचित्रांचे एक दिवसीय प्रदर्शन केशवराव भोसले नाट्यगृह येथील भालजी पेंढारकर कलादालन येथे भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन कोल्हापूर महानगरपालिका व पुरातत्व विभागाच्यावतीने भरविले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक विधान, महाराजांचे राज्यारोहन, शाहू कालीन पत्रव्यवहार, शाहू महाराजांनी दीन-दुबळ्यांसाठी, समाजाच्या उद्धारासाठी केलेले कार्य, शाहू महाराजांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला, क्रीडा व अन्य विविध क्षेत्रातील कार्य, प्रशासकीय आदेश तसेच महाराजांनी राज्यकारभार करताना वेळोवेळी घेतलेले निर्णय यांची महत्त्वाची निवडक कागदपत्रे प्रदर्शनात ठेवली आहेत. त्याचबरोबर शाहूकालीन दुर्मिळ छायाचित्रेही लावण्यात आली आहेत.

 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, पुरालेखागार विभागाच्या सहायक संचालक दिपाली दिवटे, मोडीज्ञान सहाय्यक बाजीराव वाडकर, गणेश खाडके, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव आदी उपस्थित होते.

00000000

 

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित समता दिंडीला भरघोस प्रतिसाद राजर्षी शाहू महाराजांना शाहू महाराज छत्रपती व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिवादन

 






कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय ! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन व सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या वतीने दसरा चौकात समता दिंडीसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

 

समता दिंडीचे उद्घाटन श्री शाहू महाराज छत्रपती व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवून करुन करण्यात आले.

 

  यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, महानगरपालिकेचे रविकांत अडसूळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

दसरा चौकात सुरुवात झालेली समता दिंडी पुढे -व्हिनस कॉर्नर- आई साहेबांचा पुतळा- बिंदू चौकात येवून या दिंडीचा समारोप झाला.

 

या समता दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ, झांज, ढोल ताशा, लेझीम आदी कलाप्रकार सादर केले. दिंडीत एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट गाईडचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले. शाहू महाराजांच्या वेशभूषेत उपस्थित मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा समाजकल्याण कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथामध्ये पारंपरिक वेषभुषा परिधान करुन जिवंत देखावा सादर करण्यात आला. कोल्हापूर नगरी ही खेळाडूंची नगरी असल्याने कुस्ती, फुटबॉल सह इतर खेळाडू त्यांच्या खेळाशी निगडीत वेषभूषा करुन यावेळी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. तर बहुतांशी विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे आयोजित समता दिंडी साठी विविध विभागांनी सहभाग घेतला.

 

दरम्यान शाहिरी पोवाड्यातून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध शाळांचे शेकडो विद्यार्थी, शाहू प्रेमी, इतिहास प्रेमी नागरिक उपस्थित होते.

   

 

 

 

 

 

 

श्री शाहू महाराज छत्रपती व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले शाहू महाराजांना अभिवादन

 

दरम्यान श्री शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे यांनी दसरा चौक येथे राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक यांनीही आदरांजली वाहिली. यावेळी इतिहास प्रेमी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिवादन

 

 



कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

00000

शुक्रवार, २३ जून, २०२३

पंचगंगा नदीवरील इचलकरंजी ते शिरोळ भागात पाणी उपसाबंदी

 


 

 कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : पंचगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील भागात उन्हाळी हंगाम 2022-23 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर पाणी उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत.

 पंचगंगा नदीवरील इचलकरंजी ते शिरोळ पर्यंत दिनांक 23 जून 2023 ते पुढील आदेशापर्यंत ही उपसाबंदी लागू राहिल. उपसाबंदी कालावधीत पाण्याचा अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असेही श्री. बांदिवडेकर यांनी कळविले आहे.

0000

जिल्हा परिषदेच्या वतीने 26 जूनला पुरस्कार सोहळा

 


 

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) :  जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, पत्रकारांसाठी आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार व‍ शिक्षकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम पालकमंत्री दीपक केसकर यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद येथील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी कळविले आहे.

00000

राजर्षी शाहू जयंती निमित्त समता दिंडी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दिंडीची सुरुवात

 


कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) :  लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिन "सामाजिक न्याय दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे.  यादिवशी सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता, दसरा चौक, कोल्हापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येवून समता दिंडीची सुरुवात होईल.

या निमित्त कोल्हापूरत होणाऱ्या समता दिंडीचा मार्ग दसरा चौक- व्हिनस कॉर्नर-माई महाराजांचा पुतळा- बिंदू चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक - छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय समोरुन- दसरा चौक येथे समारोप होईल.

समता दिंडीचे नियोजन प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागा सहभागी होत आहेत. विविध शाळा महाविद्यालय मधील विद्यार्थी, नागरिक सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी सर्व शासकीय कार्यालयांमधील अधिकारी/कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. बारा बलुतेदारांच्या पारंपरिक वेशभूषेत साधारणपणे शंभर विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्ह्यामधील विविध खेळाडू, एनसीसी, एनएसएस विद्यार्थी देखील उपस्थित राहणार आहेत. संवैधानिक मूल्य आणि महामानवांच्या विचारांचा जागर या दिंडीमध्ये होईल, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त  विशाल लोढे यांनी दिली आहे.

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वनअमृत प्रकल्प व सह्याद्री रक्षणार्थ मोहिमेचे उद्घाटन

 

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) :  वनअमृत प्रकल्प व सह्याद्री रक्षणार्थ मोहिमेच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सोमवार दिनांक २६ जून २०२३ रोजी दु. 12.15 वा. मौजे मानोली ता-शाहूवाडी येथे होणार आहे.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धैर्यशील माने उपस्थित राहणार असून आमदार विनय कोरे व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुंबई डॉ.व्ही. क्लेमेंट बेन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.

 कोल्हापूर वनविभागांतर्गत शाश्वत रोजगार आणि वनसंवर्धनाच्या मोहिमेसाठी नाविण्यपूर्ण वनअमृत प्रकल्पाचा विस्तार कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये नियोजनबध्द करण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी दिली आहे.

वनअमृत प्रकल्पाच्या विस्तारासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून विशेष सहकार्य लाभलेले आहे. सह्याद्री पर्वत रांगांतील जैवविविधता संवर्धन व जंगल भागातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी वनअमृत प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार आहे.

00000

 

 

 

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्यवीरांचे योगदान महत्वपूर्ण आनंदाराव पाटील 75 वर्ष पूर्ण ज्येष्ठ नागरिकांचा गारगोटीमध्ये सत्कार समारंभ संपन्न

 

            कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : देश पारतंत्र्यात असताना अनेक थोर स्वातंत्र्यविरानी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये स्वातंत्र्यवीरांचे योगदान महत्वूपर्ण आहे.   

            यावेळी भारती विद्यापीठचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, पुणे तसेच मार्गदर्शनासाठी रवी देशपांडे सातारा यांची प्रमुख उपस्थित होते.

            इंग्रजांच्या काळामध्ये भारतीयांवर होणारा अत्याचार आणि त्या अत्याचाराचे साक्ष असणारे आम्ही ज्येष्ठ नागरिक याठिकाणी उपस्थित असल्याचे सांगून  स्वातंत्र्यपूर्वचा भारताचा इतिहास व स्वातंत्र्यानंतरचा भारताचा इतिहास ज्येष्ठ नागरिकांसमोर अध्यक्ष आनंदरावदादा पाटील यांनी  व्यक्त केला.

        भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, देशाचा अमृत महोत्सव सध्या सर्वत्र साजरा होत आहे. याचे औचित्य साधून गारगोटी येथील ‘आम्ही गारगोटीकर’ संघाच्यावतीने अमृत महोत्सवी जेष्ठ नागरिक बंधू-भगिनींचा सत्कार सोहळा  इंदुबाई सांस्कृतिक भवन गारगोटी येथे झाला .सदर सत्कार समारंभासाठी गारगोटी भागातील ज्या वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्याज्येष्ठ नागरिकांचा  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा  निमित्त शाल व श्रीफळ देऊन सत्कार समारंभ करण्यात आला.

            या कार्यक्रमामध्ये रवी देशपांडे यांनी ज्येष्ठांचे आरोग्य करमणूक आणि निरोगी जीवनासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती  दिली. पंचायत समिती भुदरगडचे विस्तार अधिकारी अमोल दबडे यांना शाहू पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचाही सत्कार  आम्ही गारगोटीकर यांच्यावतीने करण्यात आला.

             समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .समाज कल्याण विभागाच्यावतीने तालुका समन्वयक सुरेखा डवर यांनी शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजना तसेच सामाजिक न्याय विभागामध्ये असणारा ज्येष्ठ नागरिक कक्षाबाबत माहिती दिली .राष्ट्रीय हेल्पलाइनबाबत सागर कोगले यांनी ज्येष्ठांना या हेल्पलाइनचा होणारा उपयोग याबाबत मार्गदर्शन केले . श्रीमती कल्पना पाटील यांनी ज्येष्ठांचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. 

            या कार्यक्रमासाठी बजरंग अण्णा देसाई , सरपंच,आनंदराव आबिटकर,  ग्रामीण रुग्णालय गारगोटीचे  डॉ.कदम, ग्रामपंचायत गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, समाज कल्याण विभागाच्या समाज कल्याण निरीक्षक कल्पना पाटील, सुरेखा डवर तसेच जन सेवा फाउंडेशनचे सागर कोगले, दिलीप पाटील व भागातील  200 हून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

00000

प्लेसमेंट ड्राईव्हचे मंगळवारी आयोजन जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा - सहायक आयुक्त सं.कृ.माळी

 


 

            कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २७ जून रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी बिल्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले असल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सं.कृ.माळी यांनी कळविले आहे.

            या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे १३ पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे २०० पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्याकरिता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान ८ वी, ९ वी उत्तीर्णांसह, १० वी, १२ वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

            इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवावा. उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना पाच प्रतीत बायोडाटा आणावा. यामध्ये विविध कंपन्यांकडील रिक्तपदांसाठी उद्योजकांकडून मुलाखती घेऊन निवड करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा आणि जागेवरच थेट नोकरी प्राप्त करून घ्यावी असे आवाहन श्री. माळी यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0

 

बुधवार, २१ जून, २०२३

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी 5 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील

 

 

  कोल्हापूर, दि. 21 (जि.मा.का.) : महिला व बाल विकास विभागाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार  सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व सन २०२३-२४ या कालावधीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती/संस्थाकडून दिनांक ५ जुलै २०२३ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी कळविले आहे.

राज्यस्तरीय पुरस्कार :- एक लाख एक रुपये, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. या पुरस्काराकरिता महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये किमान २५ वर्षांचा  सामाजिक कार्याचा अनुभव असावा. तसेच ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार, अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशा महिला  पुरस्कार मिळाल्याच्या ५ वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

 विभागीय पुरस्कार :- पंचवीस हजार एक रुपये, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये किमान ७ वर्षे कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार  प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच संस्थेचे कार्य व सेवा ही पक्षातील व राजकारणापासून अलिप्त असावी.  

  जिल्हास्तरीय पुरस्कार :- दहा हजार एक रुपये, स्मृती चिन्ह, सन्मान पत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये किमान १० वर्षे सामाजिक कार्य असावे. ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे त्या महिलांना जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही. ह्या अर्हता असणाऱ्या इच्छुक व्यक्ती/संस्थांनी संबंधित कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावेत.

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी चारित्र्य चांगले असल्याबाबत, कोणताही फौजदारी तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र.        प्रस्ताव धारकाने सामाजिक आणि  महिला व बालविकास विषयक केलेल्या कार्याचा तपशील. केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, फोटो इत्यादी. सद्यस्थितीत कोणत्या पदावर कार्यरत आहे. यापूर्वी कोणते पुरस्कार मिळालेले आहेत त्याचा तपशील इत्यादी कागदपत्रे सादर करावीत.

विभागीय पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल. संस्थेचे पदाधिकारी यांचे  चारित्र्य चांगले व कोणताही  फौजदारी तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याबाबतची व संस्था राजकारणापासून अलिप्त असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र. केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, फोटो इत्यादी. संस्थेस यापूर्वी कोणता पुरस्कार मिळालेला असल्यास त्याचा तपशील. संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत इत्यादी कागदपत्रे सादर करावीत.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा. आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आपला परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कसबा बावडा रोड, डी.एस.पी. ऑफिस जवळ, कोल्हापूर येथे सादर करावा, असेही श्रीमती पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

 

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करावेत

 

 

कोल्हापूर, दि. 21 (जि.मा.का.) :  सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12वी पदवी पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनार्थ ‘अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती' देण्यात येणार असल्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी कळविले आहे.

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे- उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, ओळखपत्राच्या आकाराची 2 छायाचित्रे, पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेला पुरावा इ. या कागदपत्रांसह अर्ज दिनांक 15 जुलै 2023 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, डॉ. बाबर हॉस्पीटलच्या मागे, सदर बजार, ताराराणी पुतळ्याजवळ, कोल्हापूर या कार्यालयात सादर करावा.

000000

'करा योग.. रहा निरोग' -जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांचे आवाहन योगदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात योगाची प्रात्यक्षिके

 

 







        कोल्हापूर, दि.21 (जिमाका) : दैनंदिन ताणतणाव दूर ठेवून निरोगी जीवनासाठी नियमित योगासने करा, असे आवाहन करुन 'करा योग.. रहा निरोग' असा मूलमंत्र जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिला.

 

            जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, महाराष्ट्र, गोवा नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती व मलाबार गोल्ड अँड डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात 9 वा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने योग पटूंसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगा प्रात्यक्षिके केली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी, तालुका क्रीडा अधिकारी अभय देशपांडे, सचिन चव्हाण, योगाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक रवी कुमठेकर, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, रोहिणी मोकाशी, मनीषा पाटील, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक पूजा सैनी आदी उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय योगपटू पूर्वा किनरे व प्राप्ती किनरे यांनी योगाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.

 

जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी योगाचे महत्त्व विशद केले. आपले स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी योग आवश्यक आहे. योगा हा केवळ योग दिनापूरता मर्यादित न राहता नियमितपणे करा,असे  त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना 'फिट इंडिया' प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य भित्तीपत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील बाल योग पटूंनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तर कॉमन योगा प्रोटोकॉल मधील विविध योगासने उपस्थितांनी केली. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अर्ध हालासन यासारखी योगासने तसेच प्राणायाम व ध्यान करण्यात आले. ताणतणावापासून कमी करणाऱ्या हस्ययोगाचे प्रकारही सादर करण्यात आले. योग प्रार्थनेने प्रात्यक्षिकांची सुरुवात करण्यात आली. संकल्प व शांतीपाठाणे समारोप करण्यात आला. मलाबार गोल्ड अँड डायमंड यांच्या वतीने योग पटूंना खाऊ वाटप करण्यात आले.

00000

सोमवार, १९ जून, २०२३

गिरीराज पक्षांच्या अंड्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.) : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र कोल्हापूर प्रक्षेत्रावर गिरीराज पक्षी संगोपनाचा कार्यक्रम सुरू आहे. गिरीराज पक्षी पशुवैद्यकीय महाविद्यालय बंगलोर यांच्याकडून खरेदी केलेले असून या पक्षापासून उत्पादित होणारी अंडी विक्री करावयाची आहेत. यासाठी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहाय्यक आयुक्त ए. एस. इंगळे यांनी केले आहे.

मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र कोल्हापूर प्रक्षेत्रावर उत्पादित होणाऱ्या उकडून खाण्यासाठी अंडी विक्रीचा दर पुढीलप्रमाणे आहे. दि. 1 मार्च 2023 ते 30 जून 2023 पर्यंत 4 रूपये प्रति अंडे व  दि. 1 जुलै 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत 7 रूपये प्रति अंडे असा आहे. अधिक माहितीसाठी 0231-2651729/ 8624030358/ 9130055577/9822475213 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

शासकीय आय.टी.आय. कोल्हापूर येथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

 


 

कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.) : शासकीय आयटीआय कळंबा रोड कोल्हापूर येथे प्रवेश सत्र 2023 करीता एकूण 30 व्यवसायांकरीता ऑनलाईन प्रवेश प्रकियेची कार्यवाही सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन ITIAdmission Portal: http: http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावेत. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर ही माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी व त्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटच्या माध्यमातून जमा करावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य महेश आवटे यांनी केले आहे.

मागासवर्गीय उमेदवारांना प्रवेश अर्ज शुल्क 100 रूपये व सर्वसामान्य उमेदवारांना 150 रूपये निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जातील माहिती गोठविण्यात येईल व त्यानंतर या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरलेल्या उमेदवारांनी पुढील सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांचा पासवर्ड जतन करून ठेवणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी एकूण सहा प्रवेश फेऱ्या होतील. शासकीय आयटीआय कोल्हापूर येथे प्रवेशाकरीता मार्गदर्शन कक्ष सध्या सकाळी 10 ते 11 या वेळेत स्थापन करण्यात आला आहे.  याचा लाभ सर्व उमेदवारांनी घेवून प्रवेशासाठी व्यवसाय विकल्प सादर करावा.

या संस्थेत एकूण 30 व्यवसाय असून एक वर्ष मुदतीचे एकूण 15 व्यवसाय आहेत. तर दोन वर्ष मुदतीचे एकूण 15 व्यवसाय आहेत. चालू वर्षी दोन्ही मिळून एकूण 1 हजार 412 जागा भरल्या जातील. प्रवेशासाठी महिलांना, मुलींना सर्व व्यवसायात 30 टक्के आरक्षण असून मुलींसाठी बेसिक कॉस्मॉटोलॉजी, कर्तन शिवण, फळ भाज्या टिकवणे, इ. स्वतंत्र व्यवसाय अभ्यासक्रम आहेत. प्रवेशासाठी एकच अर्ज भरणे आवश्यक आहे. दुबार अर्ज केल्यास उमेदवार प्रवेश प्रक्रियेमध्ये अपात्र ठरला जाईल. गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांकडे सर्व मुळ प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे, अन्यथा प्रवेश नाकारला जाईल. संस्थेत 450 प्रशिक्षणार्थ्यांची राहण्यासाठी मुलांच्या वसतिगृहाची सोय उपलब्ध असून शासकीय नियमाप्रमाणे एसटी, बस पास, रेल्वे पास सवलत तसेच इबीसी सवलत आहे. संस्था व्यवस्थापन समितीमधून STRIVE प्रकल्पांतर्गत फक्त महिला प्रशिक्षणार्थ्यांना बस, एसटी प्रवासाची प्रतिपूर्ती करण्यात येते. जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 90 टक्के तर जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेवलेल्या असल्यामुळे प्रवेश सत्रामध्ये अधिकाधिक उमेदवारांना प्रवेशासाठी जास्तीच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी त्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे आवाहनही प्राचार्य श्री. आवटे (दूरध्वनी क्रमांक 0231-2323559) यांनी केले आहे.

संस्थेमध्ये प्रवेश 2023 साठी एक वर्ष मुदतीचे बेसिक कॉस्मॉटोलॉजी, वुड वर्क टेक्नीशियन, कॉम्प्युटर ऑप ॲण्ड प्रोग्रॅमिंग असि., फौंड्रीमन, फ्रुट व्हेजीटेबल ॲण्ड प्रोसेसिंग, मेसन (बिल्डींग कन्स्ट्रक्शन) यां.डिझेल, या.कृर्षित्र, प्लॅस्टीक प्रोसे. ऑपरेटर, नळकारागीर, सुईंग टेक्नॉलॉजी, पत्रेकारागीर, स्टेनोग्राफी (इंग्रजी), सरफेस ऑर्नामेंटस टेकनिक्स व संधाता हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दोन वर्ष मुदतीचे आरेखक स्थापत्य, आरेखक यांत्रिकी, वीजतंत्री, जोडारी, आयसीटीएसएम, यंत्रकारागीर, यंत्रकारागीर घर्षक यां. कृषी व यंत्रसामुग्री, मेक मशिन टूल मेन्टेनन्स, यांत्रिक मोटारगाडी, यां. प्रशितन व वातानुलीकरण, रंगारी जनरल, टूल ॲण्ड डाय मेकर, कातारी व  तारतंत्री हे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असल्याचे प्राचार्य श्री. आवटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

दूधगंगा धरणाच्या स्थैर्यता व सुरक्षिततेसाठी पाणीसाठा कमी केला

 


कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.) : दूधगंगा धरणामध्ये सन 2022-2023 मध्ये जाणीपूर्वक 6 अ.घ.फु. ने पाणीसाठी कमी करण्यात आला. ही कार्यवाही धरणाच्या स्थैर्यता व सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देवून पूर्णत: तांत्रिक अभ्यासानुसार करण्यात आली आहे, अशी माहिती दूधगंगा कालवे विभाग क्र. 1 च्या  कार्यकारी अभियंता  विनया बदामी यांनी दिली.

राधानगरी तालुक्यातील दुधगंगा प्रकल्प अंतर्गत 25.40 अ.घ.फु. क्षमतेचे धरण (मातीचे धरण, वक्र द्वारासहित सांडवा प्रकार) बांधण्यात आले. सन 2006 पासून या धरणात पूर्ण क्षमतेने म्हणजेच 25.40 अ.घ.फु. इतका पाणीसाठा करण्यात येत असून सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील 41 हजार हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या आंतरराज्यीय करारानुसार कर्नाटक राज्यास नदी, कालवा या माध्यमातून 4 अ.घ.फु. पाणी देण्यात येते. धरण प्रकल्पाचा सांडवा व काही भाग (490 मीटर लांबी) हा दगडी बांधकाम प्रकाराचा असून या भागातून धरणामध्ये प्रथम साठा करण्यात आला तेव्हापासून म्हणजेच सन 2007 पासून गळती निदर्शनास आली आहे. सुरुवातीस ती 360 लि./से. इतकी नोंदविण्यात आली. तर सन 2010 ते 2014 मध्ये गळती प्रतिबंधक उपाय योजनेचे काही प्रमाणात काम करण्यात आल्याने सन 2016 मध्ये ती किमान 166 लि./से. इतकी निदर्शनास आली. (वस्तूतः IS 11216-85 प्रमाणे अनुज्ञेय गळती ही कमाल 70 लि./से. इतकीच आहे.)

सन 2021-22 च्या हंगामात दगडी धरणातील गळती पुन्हा साधारणतः 350 लि./से. इतकी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जलसंपदा विभागांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व केंद्र शासनाच्या CW&PRS, पुणे या संस्थेकडून या विषयी पहाणी करून याबाबत अभ्यास करण्यात आला.  त्याप्रमाणे गळती ही धरणाच्या पूर्ण अंगास छेद देऊन खालील बाजूस पाणी उसळत असल्याने, धरणास उर्ध्व बाजूस Concrete Septum नसल्याने, धरणाच्या बांधकामाची घनता कमी झाल्याने, अनुज्ञेय गळती (70 लि./से.) पेक्षा निदर्शनास आलेली गळती 350 लि./से. ही जास्त प्रमाणात असल्याने मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे यांच्या पहाणीनंतर धरणाच्या स्थैर्यता व सुरक्षिततेकरिता गळती प्रतिबंधक उपाय योजनेचे काम सर्व प्रशासकीय मान्यता, सोपस्कार पूर्ण करून प्रत्यक्ष हाती घेईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून धरणामध्ये सन 2022-23 च्या हंगामात पाणीसाठा हा कमाल उंचीने (68 मी.) न करता तो 5 मी. कमी उंचीने म्हणजेच 25.40 अ.घ.फु. ऐवजी 19.68 अ.घ.फु. इतकाच करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले. जेणेकरून धरणाचे दगडी बांधकाम, स्थैर्यता व अंतर्गत मजबुतीवर कमीत कमी गळतीचा परिणाम होईल.

 गळती रोखण्याकरिता सर्व आवश्यक चाचण्या, अभ्यास विविध संस्था यांच्याकडून पूर्ण करण्यात आल्या असून त्याप्रमाणे सुचविण्यात आलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणण्याकरिता ग्राऊटिंग व इतर बांधकाम पद्धतीचे 80.36 कोटी रूपये इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रक शासनाच्या वेगवेगळ्या छाननी टप्प्यातून मंजुरी घेऊन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, यांच्याकडे अंतिम मंजुरी (प्रशासकीय मान्यता) साठी सादर करण्यात आले आहे.

सन 2022-23 चा सिंचन हंगाम देखील उपलब्ध पाण्यामधून यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे. सद्यस्थितीत उपलब्ध साठा (1 अ.घ.फु. अचल साठा मधील) हा पावसाळा लांबल्यामुळे 15 जुलै पर्यंत पिण्याच्या पाण्याकरिता सर्वोच्च प्राधान्य देवून राखून ठेवण्यात आला असल्याचे दुधगंगा कालवे विभाग 1 च्या कार्यकारी अभियंता श्रीमती बदामी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

00000