इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३

पोखले, पन्हाळा येथील जनऔषधी केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी व सीईओ यांच्या हस्ते नागरिकांना मेडीकल किटचे वितरण

 










कोल्हापूर, दि. 30 (जिमाका):   केंद्र शासनाच्या भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत श्री बलभीम विकास सेवा संस्था मर्या. पोखले, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या संस्थेसाठी मंजूर झालेल्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरुपात संपन्न झाले. त्यानंतर पोखले येथील या कार्यक्रमात जनऔषधी केंद्राचे उद्घाटन स्थानिक स्तरावर खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते व सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सीईओ संतोष पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, शाहूवाडी विभागाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे-जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, सहाय्यक निबंधक नारायण परजणे, बलभीम संस्थेचे अध्यक्ष धीरज नाईक, उपाध्यक्ष संताजी निकम, विद्यमान सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच डॉ.पांडूरंग निकम, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, संस्थेचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, प्रल्हाद पाटील, दत्तात्रय पाटील, सचिव विलास गायकवाड, राजेंद्र कोळेकर यांच्यासह वारणा समुहातील व पोखले गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 यावेळी देशातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्र योजना यावेळी सुरु केले. कार्यक्रमा दरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर, झारखंड येथे ऐतिहासिक 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले. पुढे, श्री मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरुन 25,000 पर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाची घोषणही केली. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रेला आज १५ दिवस पूर्ण होत आहेत आणि आता यात्रेला वेगही आला आहे. ते पुढे म्हणाले, आरोग्य सेवा परवडणारी आणि सहज उपलब्ध करुन देणे हा पंतप्रधानांच्या निरोगी भारताच्या संकल्पनेचा आधारस्तंभ आहे. स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनऔषधी केंद्राची स्थापना हा या दिशेने एक प्रमुख उपक्रम आहे.

 कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी प्रशासनाकडून एलईडी स्क्रीनची सोय करण्यात आली होती. कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी व सीईओ यांच्या हस्ते नागरिकांना मेडीकल किटचे वितरण करण्यात आले. यात  परवडणारी औषधे व सॅनिटरी किटचा समावेश होता. प्रा.जीवनकुमार शिंदे व प्रा.नामदेव चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.

 

विकसित भारत संकल्प यात्रेच्या चित्ररथाचे फीत कापून खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन

पन्हाळा तालुक्यात दाखल झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रसिद्धी चित्ररथाचे उद्घाटन फीत कापून खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार डॉ.विनय कोरे यांच्यासह सहकार आयुक्त अनिल कवडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते. या वाहनाद्वारे पन्हाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये संकल्प यात्रेबाबत प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे.

00000

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

चिकोत्रा नदीच्या भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसायंत्रावर बंदी

 


कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) :  चिकोत्रा प्रकल्प चिकोत्रा नदीच्या भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदीचे आदेश कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) उप कार्यकारी अभियंता शिल्पा मगदुम यांनी दिले.

              उपसाबंदी क्षेत्र चिकोत्रा नदी को.प.बंधारा 1 ते को.प.बांधारा 29 (बेळुंकी) कालावधी- 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर, 27 नाव्हेंबर ते 6 डिसेंबर तसेच 27 डिसेंबर ते 5 जानेवारी, 26 जानेवारी ते 4 फेब्रुवारी,25 फेब्रुवारी ते 6 मार्च, 25 मार्च ते 3 एप्रिल, 22 एप्रिल ते 1 मे  व 16 ते 28 मे या कालवधीत उपसाबंदी  लागू राहील.

            उपसाबंदी कालावधीत पाण्याचा अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसा यंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, असेही श्रीमती मगदुम यांनी कळविले आहे.

0000000

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

कुणबी नोंदी शोधण्यासाठी चोख नियोजन करा - निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली

 

     कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : कुणबी नोंदी शोधण्यासाठी चोख नियोजन करा, त्याचबरोबरच तपासलेल्या अभिलेख्यांच्या नोंदी बाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला दररोज सादर करा,  अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केल्या.

     कुणबी नोंदी शोधण्यासाठी संपूर्ण राज्यभर मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातही स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात विविध विभागांनी करावयाच्या कामांच्या नियोजनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तेली यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी पुराभिलेखागार विभागाच्या सहायक संचालक दीपाली पाटील, तहसीलदार जयवंत पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तेली म्हणाले, कुणबी नोंदी तपासण्याचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करा. तसेच योग्य समन्वय ठेवून काम पूर्ण करा. कुणबी नोंदीच्या अभिलेख्यांचे तसेच मोडी, उर्दू लिपीतील अभिलेख्यांचे भाषांतर व डिजिटायजेशन करा.

        अभिलेखांची तपासणी करताना अभिलेख्यांचे प्रकार, तपासणी करण्याच्या पानांची संख्या, नोंदीची संख्या, आढळलेल्या नोंदी, तपासलेल्या नोंदीची संख्या, कुणबी जातीच्या आढळलेल्या नोंदीची संख्या, आदी माहिती विहित नमुन्यात भरुन देण्याच्या सूचनाही श्री. तेली यांनी केल्या.

माजी सैनिकांनी कागदपत्रात मराठा कुणबी नोंदी असल्यास संपर्क साधावा - जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

 


कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे मराठा कुणबी नोंदी पडताळणी व त्याचे संगणकीकरण करण्यासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व सेवारत सैनिकांना कळविण्यात येते की, माजी सैनिकांच्या मराठा कुणबी नोंदीची पडताळणी करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) राहुल माने यांनी केले आहे.

ज्या माजी सैनिकांच्या कागदपत्रात कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी अशी नोंद असलेल्या त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील स्पेशल सेलशी कागदपत्रे घेवून संपर्क साधावा असे ही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) श्री. माने यांनी कळविले आहे.

****

8 नोव्हेंबरला कोल्हापूरात प्लेसमेंट ड्राईव्ह : नोकरीची संधी

 


कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नॅशनल करिअर सर्व्हिस, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 8 नोव्हेंबर 2023 रोजी ΄सी बील्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली आहे.

                 या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे 115 पेक्षा जास्त रिक्तपदे या प्लेसमेंट ड्राईव्हकरीता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर, ‍अभियांत्रिकी पदविका, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र राहतील. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपला बायोडाटा, सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी मेघना वाघ, यंग प्रोफेशनल (एन.सी.एस) यांच्याशी उमेदवार आणि उद्योजकांनी 0231-2545677  या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. माळी यांनी केले आहे.

0000

जिल्ह्यात 21 नोव्हेंबर पर्यंत बंदी आदेश लागू

 


कोल्हापूर, दि. 7 (जिमाका): सकल मराठा समाजास ओ.बी.सी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीकरीता जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चा काढण्यात येत असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊसाला प्रतिटन जादा 400 रुपये मिळावे व मागील एफआरपी या मागणीकरीता कारखाना स्थळावर आंदोलने करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात विविध पक्ष/संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. करण्यात येत असून जिल्ह्यात यात्रा, उरूस, सण मोठया प्रमाणात साजरे होणार असून सदर वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 21 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

        हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणे संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित  उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही. 

00000

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण.. विशेष शिबिरात मतदार नोंदणी करा

 


            कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) :    जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.  मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक – प्रारुप मतदार यादी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. दावे व हरकती 9 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करावेत. मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांतर्गत- सर्वसामान्य मतदार नोंदणीसाठी शनिवार दिनांक 4 व रविवार 5 नोव्हेंबर रोजी विशेष शिबीराचे आयोजन, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार 7 नोव्हेंबर 2023,  महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी - शनिवार 18 नोव्हेंबर व रविवार 19 नोव्हेंबर 2023. तृतीयपंथी व्यक्ती, शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी - शनिवार 2 डिसेंबर व रविवार 3 डिसेंबर 2023. या विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. दावे व हरकती निकाली काढण्यासाठी मंगळवार 26 डिसेंबर 2023 पर्यंतची तारीख आहे. अंतिम मतदार यादी सोमवार 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती 274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी दिली आहे.

            1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांसाठी 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना आगाऊ मतदार नोंदणी करीता अर्ज करता येईल. मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया त्या-त्या तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही संधी असल्याने पात्र नव मतदारांनी व नारिकांनी Voter Helpline App चा जास्तीत जास्त वापर करुन मतदार नोंदणी व तपशिल दुरुस्ती करावी, असे आवाहन हरिष धार्मिक यांनी केले आहे.

00000

वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सोमवारी जनता दरबार

 


          कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी, सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.

            जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या वैयक्तीक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जनता दरबारात उपस्थित रहावे. यावेळी आपल्या समस्यांविषयीचा लेखी अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे.

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

ओळख पटलेल्या मुलांना पालकांकडे सुपूर्द करण्यात येणार पालक, नातेवाइकांनी संपर्क साधावा

 



        कोल्हापूर, दि. 2 ( जिमाका ) : शहरात विविध ठिकाणाहून मिळून आलेल्या मुलांच्या पालकांचा नातेवाइकांचा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय कोल्हापूर, बाल कल्याण समिती कोल्हापूर व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर यांच्याकडून शोध सुरु असून बालकांच्या पालक व नातेवाइकांनी दिलेल्या दूरध्वनी,मोबाईल वर संपर्क करण्याचे किंवा प्रत्यक्ष भेटण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पी. बी. शिर्के यांनी केले आहे.

        काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या चार अल्पवयीन मुलांना बाल कल्याण समिती कोल्हापूर यांच्याद्वारे मानव संसाधन विकास मिशन संचलित करुणालय बालगृह, शिये, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे. ही बालके जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यामार्फत समिती समोर हजर करण्यात आली होती. या मुलांना त्यांच्या पालक किंवा नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

               या कु. दत्तात्रय रघूनाथ पाटील- वय 16 वर्ष 4 महिने, कु. रमेश प्रकाश चौगले- वय 15 वर्ष 11 महिने, कु. मंगेश प्रकाश बुरुड- वय 15 वर्ष 8 महिने व कु. अबोली- वय 13 वर्ष 2 महिने या बालकाच्या पालक नातेवाईक यांनी अध्यक्ष, सदस्य, बाल कल्याण समिती कोल्हापूर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर किंवा मानव संसाधन विकास मिशन संचलित करुणालय बालगृह, शिये, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर किंवा चाइल्ड लाइन कोल्हापूर 9923068135, 9660012496, 112 या क्रमांकावर 30 दिवसांच्या आत संपर्क करावा, असे आवाहन श्री. शिर्के यांनी केले आहे.

0000

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी स्वयंम योजनेचा लाभ घ्यावा

 


कोल्हापूर, दि. 2 ( जिमाका ) : धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता  पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत लाभ घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे  सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

               राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय/ तंत्रनिकेतनांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांकरीता वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती -क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे - विद्यार्थी धनगर समाजातील असावा. जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था /महाविद्यालये ज्या शहराच्या ठिकाणी आहेत अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित असावा. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी पात्र राहतील. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद, वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वस्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मान्यता प्राप्त महाविद्यालये/ संस्थेमध्ये मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश मिळाला असावा. इयत्ता 12 वी नंतरच्या तंत्रशिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीकृत (कॅप) प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील. तसेच प्रत्येक वर्षी त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांस अदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. योजनेतंर्गत पात्र विद्यार्थ्यांस भोजन भत्ता 25 हजार, निवास भत्ता 12 हजार, निर्वाह भत्ता 6 हजार रुपये असे एकूण 43 हजार रुपये अनुज्ञेय राहतील.

00000

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम विशेष शिबिरांमध्ये मतदार नोंदणी करा

 


     

            कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) :   १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.  मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक – प्रारुप मतदार यादी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. दावे व हरकती 9 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करावेत. मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांतर्गत- सर्वसामान्य मतदार नोंदणीसाठी शनिवार दिनांक 4 व रविवार 5 नोव्हेंबर रोजी विशेष शिबीराचे आयोजन, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार 7 नोव्हेंबर 2023,  महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी - शनिवार 18 नोव्हेंबर व रविवार 19 नोव्हेंबर 2023. तृतीयपंथी व्यक्ती, शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी - शनिवार 2 डिसेंबर व रविवार 3 डिसेंबर 2023. या विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. दावे व हरकती निकाली काढण्यासाठी मंगळवार 26 डिसेंबर 2023 पर्यंतची तारीख आहे. अंतिम मतदार यादी सोमवार 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती 275-करवीर विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण यांनी दिली आहे.

            1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांसाठी 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना आगाऊ मतदार नोंदणी करीता अर्ज करता येईल. मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया त्या-त्या तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही संधी असल्याने पात्र नव मतदारांनी व नारिकांनी Voter Helpline App चा जास्तीत जास्त वापर करुन मतदार नोंदणी व तपशिल दुरुस्ती करावी, असे आवाहन वर्षा शिंगण यांनी केले आहे.