इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

आरबीआयकडे नोंदणीकृत केल्या गेलेल्या बँका, वित्तीय कंपन्या कायदेशीर कर्ज देतात बेकायदेशीर कार्यकृतींना बळी पडू नये भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दायाल

 


 

कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) :  आरबीआयकडे नोंदणीकृत केल्या गेलेल्या बँका, अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि संबंधित राज्यांच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियमासारख्या वैधानिक तर्तुदींखाली राज्य सरकार कडून विनियमत केल्या गेलेल्या इतर संस्था कर्ज देण्याच्या कायदेशीर कार्यकृती करु शकतात. जनतेने बेकायदेशीर कार्यकृतींना बळी पडू नये, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दायाल यांनी केले आहे. 

 ऑनलाईन/ मोबाईल ऍप्स द्वारा कर्ज देऊ करणाऱ्या कंपन्या/ संस्थांचा खरेपणा/ पूर्वइतिहास पडताळून पहावा. त्याशिवाय ग्राहकांनी त्यांच्या केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती, सत्यांकन न केलेल्या/अनधिकृत ॲप्स बरोबर कधीही शेअर करुन नयेत. असे ॲप्स/ॲप्सशी संबंधित बँक खात्यांची माहिती, संबंधित कायदा अंमलबजावणी एजन्सीला कळवावी किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी सतेच पोर्टलचा (https://sachet.rbi.org.in) उपयोग करावा,

लवकरात लवकर व विना अडचण कर्ज देणाऱ्या, अनधिकृत डिजिटल मंचांना/ मोबाईल ऍप्सना, व्यक्ती/ छोटे उद्याग वाढत्या प्रमाणावर बळी पडत आहेत. कर्जदारांकडून अधिकाधिक व्याज दर व छुपे आकार मागण्यात येत असून, कर्ज वसुलीसाठी अस्वीकार्य व दडपशाहीचा रीती अनुसरण्यात येत आहे. कर्जदारांच्या मोबाईल फोन्सवरील डेटा मिळविण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात आहे.

बँका व एनबीएफसींच्यावतीने वापरण्यात येणाऱ्या डिजिटल कर्जदायी प्लॅटफॉर्म्सनी, त्यांच्या ग्राहकांना बँक/बँकांची किंवा एनबीएफसींची नावे सुरुवातीलाच सांगावीत. रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत केलेल्या एनबीएफसीची नावे व पत्ते ऍक्सेस केले जाऊ शकतात. आरबीआयकडून विनियमित करण्यात आलेल्या संस्थांच्या विरुध्दच्या तक्रारी https://cms.rbi.org.in मार्फत ऍक्सेस केले जाऊ शकतात.

0 0 0 0 0

‘माझी वसुंधरा’ अभियान 1 ते 15 जानेवारी कालावधीत - जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


       कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : माझी वसुंधरा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी वसुंधराच्या प्रती आपली जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांनी 1 ते 15 जानेवारी या कालावधीत हरितशपथ म्हणजेच (#Epledge) घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळे, हास्यकल्ब, तरुण मंडळे, शासकीय, राजकीय, सामाजिक तसेच निमशासकीय, कार्यालये तसेच संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी, व्यक्ती यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरितशपथ घ्यावी. त्याची नोंद  www.majhivasundhara.in या वेब पोर्टलवर करावी. राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती  PDF स्वरुपात daokolhapur@gmail.com या ईमेल वर पाठवावी.

0 0 0   0 000

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना दारिद्रय रेषेखालील घटकांना खासगी जमीन खरेदी करुन 100 टक्के अनुदान स्वरुपात देणार - सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे

 


 

                कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिराईत खासगी जमीन खरेदी करुन 100 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.

        अनुसूचित जातीच्या दारिद्रय रेषेखालील भुमिहिन शेतमजूर कुटुबांना उदनिर्वाहाचे अन्य साधन उपलब्ध नसल्याने त्यांना रोजगार हमी योजना किंवा खासगी व्यक्तीकडे मजुरी करावी लागते. त्यांचे उत्पन्नाचे स्तोत्र वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा याकरिता त्यांच्या मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायम स्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून अनुसूचित जाती व नवबौध्द भूमिहीन शेतमजूर कुटुबांना कसण्याकरिता 2 एकर बागायती किंवा 4 एकर जिराईत जमीन 100 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येते.

            अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे. जमीन कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्रा जवळच्या क्षारयुक्त व क्षारपड जमीन असू नये. जमीन सलग असावी, जे जमीन मालक शासनाने निश्चित केलेल्या जमिनीच्या दरानुसार (रेडीरेकननुसार) किंवा जिरायत जमीन कमाल 5 लाख रुपये प्रती एकर व बागायत जमीन कमाल 8 लाख रुपये प्रती एकर प्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत अशा जमीन मालकांनी जमीनीच्या 7/12 व आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त्‍ा, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर यांचेशी संपर्क साधावा.

            ज्या गावात जमीन उपलब्ध झाल्यास त्याच गावातील अनुसूचित जातीचे, दारिद्रय रेषेखालील, भुमिहिन, त्याच गावचा रहिवासी असलेले व 18 ते 60 वयातील त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्या गावात लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या इतर गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. लगतच्या गावातही लाभार्थी उपलब्ध न झाल्यास तालुकास्तरावरील पात्र लाभार्थ्याचा विचार करण्यात येईल. यामध्ये अंतिमत; परिस्थितीनुसार आवश्यक ते निर्णय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल, असेही त्यांनी कळविले आहे.

00000000

लॉकडाऊमध्ये 31 जानेवारी पर्यंत वाढ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 31  (जि.मा.का.):  जिल्हयामध्ये लॉकडाऊनची मुदत दि. 31 जानेवारी पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

       यापूर्वीच्या आदेशा नमुद केलेली प्रतिबंधीत/बंद क्षेत्र व सुट/वगळण्यात आलेली क्षेत्र कायम ठेवण्यात येत आहेत.  यापूर्वी वेळोवळी परवानगी दिलेल्या बाबी/क्षेत्र पुर्ववत सुरु राहतील.  यापूर्वी दिलेले आदेश दि. 31 जानेवारी पर्यंत अस्तिवात राहतील.

            आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.

 

00000

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

आजअखेर 47 हजार 750 जणांना डिस्चार्ज

 


 

         कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 805 प्राप्त अहवालापैकी 802 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 2 (21 अहवाल नाकारले), ॲन्टीजेन चाचणीचे 108 प्राप्त अहवालापैकी 107 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 1,  खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 121 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 111 तर 10 पॉझीटिव्ह, असे एकूण 13 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 519 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 750 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 66 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 13 पॉझीटिव्ह अहवालापैकी चंदगड-2, गडहिंग्लज-1,  पन्हाळा-1,  कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 8 व इतर राज्य 1 असा समावेश आहे.

        आज अखेर  तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 873, भुदरगड- 1231, चंदगड- 1216, गडहिंग्लज- 1489, गगनबावडा- 148, हातकणंगले-5311, कागल-1664, करवीर- 5669, पन्हाळा- 1865, राधानगरी-1245, शाहूवाडी-1356, शिरोळ- 2509, नगरपरिषद क्षेत्र-7469, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 100  असे एकूण 47 हजार 145 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 374 असे मिळून एकूण 49 हजार 519 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 49 हजार 519 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 750 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 703 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 66 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

00000

गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी मानीव अभिहस्तांतरण 1 ते 15 जानेवारी कालावधीत विशेष मोहिम

 


            कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : गृहनिर्माण सहकारी संस्थांना मानीव अभिहस्तांतरण प्राप्त होण्यासाठी सहकार विभागामार्फत 1 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.

          राज्यामध्ये सहकारी संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. विविध प्रकारच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यास मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांचा हातभार आहे. सहकारी संस्था अनेक प्रकारात कार्यरत असून सहकारी गृहनिर्माण संस्था हा प्रकारदेखील त्यामध्ये आहे. जो प्रत्येक व्यक्तिच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत आहे. एखादी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर 4 महिन्यांत विकसकाने इमारतीच्या जमिनीचे संस्थेच्या नावे हस्तांतरण करून देणे, महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क अधिनियम 1963 मधील तरतूदीनुसार बंधनकारक आहे. जोपर्यंत इमारतीखालील जमीन गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची होत नाही, तोपर्यंत वाढीव एफ.एस.आय. व इमारतीची पुनर्बांधणी यासाठी संस्थेला पूर्णपणे विकसकांवर अवलंबून रहावे लागते.

            सहकारी गृहनिर्माण संस्थांना यातून मुक्त करण्यासाठी मानीव अभिहस्तांतरणासाठी महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क अधिनियम 1963 मधील कलम 5,10 व 11 अन्वये या कामासाठी जिल्हा उप निबंधक यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मानीव अभिहस्तांतरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या दि.22 जून 2018 च्या शासन निर्णयानुसार कमी करण्यात आलेली आहे.

            सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमिनीचा मालकी हक्क प्राप्त व्हावा यासाठी  सहकार आयुक्तालयाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांनी सदर संस्था ज्या तालुका उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे अधिपत्याखाली आहे त्या कार्यालयाशी संपर्क साधून या प्रक्रियेसाठी आवश्यक प्रस्तावातील कागदपत्रांची माहिती प्राप्त करुन घ्यावी व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. सदर संबंधातील शासन निर्णय, परिपत्रके आणि इतर माहिती http://housing.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

            या विशेष मोहिमेद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर हक्क, विकसकाकडून प्राप्त करुन घेण्यासंदर्भात प्रयत्न आहे. इमारत संस्थेची, जमिनीची मालकीदेखील संस्थेचीच यानुसार या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग करुन मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन सहकारी संस्थचे, जिल्हा उप निबंधक श्री. शिंदे यांनी केले आहे.

0000000

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन 31 डिसेंबर व नववर्षाचे स्वागत साधेपणाने करावे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन

 


 

                कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :  कोव्हिड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत 31 डिसेंबर 2020 व नुतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याबाबत राज्य शासनाने सूचना जारी केल्या आहेत.  शासनाने जारी केलेल्या सूचनांचे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करुन 31 डिसेंबर व नववर्षाचे स्वागत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

             दिनांक 31 डिसेंबर दिवशी नागरिकांनी तलाव, उद्याने, नदीघाट अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषत: रंकाळा तलाव, कळंबा तलाव, नदी घाट परिसर, उद्याने इत्यादी ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते, त्या दृष्टिने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

            नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात, अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.       

            ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन  करावे.फाटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. कोविड-19 या विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच 31 डिसेंबर, नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सुचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन जिल्ह्यातील नागरिकांनी  करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.

00000

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : 30 डिसेंबर रोजी सायं 5.30 पर्यंत पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास मान्यता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती

 


 

            कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी पारंपरिक पद्धतीने (Offline Mode)  नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने  संगणक प्रणालीद्वारे दिनांक 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्यास मुदत दिली होती. मात्र संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करताना       दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इ. तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही बाब विचारात घेता, इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पध्दतीने (Offline Mode)  सादर करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देखील दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडील सूचनानुसार सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी पारंपरिक पध्दतीने नामनिर्देशनपत्र वाढीव वेळेत स्वीकारावी. नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होतील याची व्यवस्था करावी. तसेच याबाबतची स्थानिक पातळीवर प्रसिध्दी देण्यात यावी.

पारंपरिक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये RO login मधून भरुन घेण्यात यावे, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिली.

00000

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, व सोलापूर या जिल्ह्यातील सर्व शासन मान्यताप्राप्त, अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे विभाग पुणे श्री.बाळासाहेब सोळंकी यांनी केले आहे. 

सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांचा लाभ देण्यात येतो.

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टल दिनांक ०३/१२/२०२० पासून सुरू करण्यात आले आहे. संबंधित जिल्ह्यातील प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे  शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, या योजनांचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज दि.१५ जानेवारी २०२१ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर तपासणी करुन फॉरवर्ड करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही.   महाविद्यालयांनी आपआपल्या महाविद्यालयातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टल वर वेळेवर भरले जातील याची दक्षता घ्यावी व याबाबत एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करावे असे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण  पुणे विभाग पुणे यांनी सुचित केले आहे.

आजअखेर 47 हजार 740 जणांना डिस्चार्ज

 


 

         कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 113 प्राप्त अहवालापैकी 95 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 4 (14 अहवाल नाकारले), ॲन्टीजेन चाचणीचे 107 प्राप्त अहवालापैकी 106 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 1,  खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 117 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 107 तर 10 पॉझीटिव्ह, असे एकूण 15 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 506 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 740 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 63 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 15 पॉझीटिव्ह अहवालापैकी चंदगड-1, गडहिंग्लज-1, हातकणंगले-1, करवीर- 2, पन्हाळा-4,  कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 4 व इतर राज्य 2 असा समावेश आहे.

        आज अखेर  तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 873, भुदरगड- 1231, चंदगड- 1214, गडहिंग्लज- 1488, गगनबावडा- 148, हातकणंगले-5311, कागल-1664, करवीर- 5669, पन्हाळा- 1864, राधानगरी-1245, शाहूवाडी-1356, शिरोळ- 2509, नगरपरिषद क्षेत्र-7469, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 92  असे एकूण 47 हजार 133 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 373 असे मिळून एकूण 49 हजार 506 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 49 हजार 506 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 740 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 703 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 63 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

0 0 0 0 0

जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता अर्ज स्वीकारण्याच्या सूचना

 


            कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : निवडणूक विषयक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावलेला असल्याने विविध जिल्ह्यातून अर्जदार, लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडून याबाबत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकृती करण्याबाबत विनंती केलेली आहे.  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सुरू असल्याने उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची/जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने तसेच अर्जदारांची गैरसोय होवू नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे प्र. उपायुक्त तथा प्रकल्प संचालक मेघराज भाते यांनी सूचना निर्गमित केल्या आहेत.

       दिनांक 29 ते 30 डिसेंबर 2020 केवळ या दोन्ही दिवशीच अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी व आवश्यकतेप्रमाणे पोलीस विभागास संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता आवश्यकतेनुसार अर्ज स्वीकारण्याचा टेबल/खिडकी वाढवण्यात यावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता कार्यालय पूर्ण वेळ तसेच आवश्यकतेप्रमाणे सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत दोन्ही दिवशी कार्यालय सुरू ठेवावीत. ज्या अर्जदारांचे ऑफलाईन पध्दतीने अर्ज दिलेले आहेत त्यांच्यासोबत तक्त्यात माहिती भरून दिनांक 1 जानेवारी 2021 पर्यंत पाठविण्यात यावी. कोणत्याही प्रकारचे अनियमितता तसेच गैरकृत्याबाबत या कार्यालयाकडे तसेच शासनाकडे अर्जदाराची तक्रार होणार नाही याची दक्षता घेवून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

00000

 

पोलीसांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत - जिल्हाधिकारी दौलत देसाई

 



            कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : तपासावरील प्रलंबित प्रकरणे पोलीसांनी तात्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

       जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, डॉ. हर्षदा वेदक, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, अशासकीय सदस्य निरंजन कदम, राजू मालेकर, जिल्हा विधी व सेवाचे सहायक अधीक्षक रा.गो. माने आदी उपस्थित होते.

          सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. त्यानंतर त्यांनी सविस्तर आढावा सांगितला. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध 1989) ॲट्रॉसिटी अंतर्गत व नागरी हक्क संरक्षण अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या सद्यस्थितीबाबत समावेश होता. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 80 गुन्हे घडलेले आहेत.  पोलीस तपासावरील 29 प्रकरणे प्रलंबित आहेत.

          जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. ते म्हणाले, उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे वगळता प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे पोलीस विभागाने लवकरात लवकर मार्गी लावावीत. दोषारोप पत्र पाठवावे जेणेकरुन पीडितांना अर्थसहाय्य देता येईल. पोलीस अधीक्षकांनी पीसीआरला पत्रव्यवहार करून प्रलंबित प्रकरणांबाबत पाठपुरावा करावा. त्याचबरोबर छाननी समितीकडे अहवालासाठी प्रलंबित असणारी प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत. 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीतील श्रीमती शैलजा भोसले यांचे म्हणणे आणि कै. सौ. आर.के.वालावलकर प्रशाला या संस्थेचे म्हणणे याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा.

          आयत्या वेळच्या विषयात पोलीस पाटलांनी गावातील ताणतणावाची माहिती दंडाधिकाऱ्यास न दिल्यास त्यामुळे बौध्द, अनुसूचित जाती- जमातीच्या नागरिकांवर अत्याचार होवून ॲट्रॉसिटी ॲक्टचे गुन्हे दाखल झाल्यास पोलीस पाटलांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत वैभव गीते यांनी दिलेल्या निवेदनाविषयी सर्व एसडीएम यांना पोलीस विभागाने पत्राव्दारे कळवावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

00000

 

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

आजअखेर 47 हजार 719 जणांना डिस्चार्ज

 


 

         कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 221 प्राप्त अहवालापैकी 205 निगेटिव्ह पॉझीटिव्ह 2 (13 अहवाल नाकारले तर 1 नमुना अहवाल पुन्हा सादर ). ॲन्टीजेन चाचणीचे 110 प्राप्त अहवालापैकी 110 निगेटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 128 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 119 तर 9 पॉझीटिव्ह, असे एकूण 11 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 491 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 719 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 71 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 11 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-1,  चंदगड-1, गडहिंग्लज-1, करवीर- 2,   नगरपरिषद क्षेत्र- 1 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 5 असा समावेश आहे.

        आज अखेर  तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 873, भुदरगड- 1231, चंदगड- 1213, गडहिंग्लज- 1487, गगनबावडा- 148, हातकणंगले-5310, कागल-1664, करवीर- 5667, पन्हाळा- 1860, राधानगरी-1245, शाहूवाडी-1356, शिरोळ- 2509, नगरपरिषद क्षेत्र-7469, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 88  असे एकूण 47 हजार 120 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 371 असे मिळून एकूण 49 हजार 491 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 49 हजार 491 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 719 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 701 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 71 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

0 0 0 0 0

अटकावून ठेवलेली वाहने कर व दंड भरून ताब्यात घेण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): थकित वाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसेससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने अटकावून ठेवलेली आहेत. अशा वाहन मालकांनी कर व दंड भरून आपली वाहने ताब्यात घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी केले आहे.

       वाहन मालकांना वारंवार नोटीस पाठवूनही अद्याप ज्यांनी कर व दंड भरून आपले वाहन ताब्यात घेतले नाही त्यांनी आपल्या वाहनाबाबतचा कर व दंड दि. 11 जानेवारी 2021 पूर्वी भरून वाहन ताब्यात घ्यावे. अन्यथा 12 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता ई लिलाव करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

000000

 

 

         

जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन मार्गदर्शन सत्र

 

कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गुरुवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 या  वेळेत  ‘तयारी यशस्वी  करिअरची’  या विषयावर श्री. चेतन रेगे, एम.एस. (केमि.इंजि.) अमेरिका व श्री. निलेश काजळे, करिअर परफॉर्मन्स कोच, लेखक प्रसिध्द वक्ते व आय टी क्षेत्रातील अनुभवी तज्ञ (मुंबई) यांचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. या मार्गदर्शन सत्राचा जास्तीत-जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. संजय माळी यांनी केले आहे.

000000

 

 

         

 

सरकारी मालमत्तांना नाव देताना दक्षता घेण्याचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): सरकारी मालमत्तांना नावे देताना व नावांचा उल्लेख करताना राष्ट्रीय महापुरूष, समाज सुधारक, शहिद जवान यांचा एकेरी उल्लेख टाळून अपमान होणार नाही याबाबतची दक्षता घेण्याचे आवाहन पुणे विभागाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

00000

गगनगडावर होणारी दत्त जयंती रद्द

 


कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): कोव्हिड -19 च्या पार्श्वभूमीवर गगनबावडा तालुक्यातील गगनगडावर सालाबादप्रमाणे उद्या होणारी दत्त जयंती उत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती गगनबावडा तहसिलदार डॉ. संगमेश कोडे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

00000

संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्णशोध अभियान टी.बी. हरेल देश जिंकेल संकल्प करूया, टीबी ला हरवू या

 


संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहिमेसाठी कोल्हापूर ग्रामीण मधील 100 टक्के लोकसंख्या व शहरी भागातील 30 टक्के  लोकसंख्या निवडलेली आहे. कोल्हापूर ग्रामीणमधील सर्व भागात हे  सर्वेक्षण  होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1  ते ३१  डिसेंबर 2020  दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे.

क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख सामाजिक आरोग्य समस्या असून देशात दररोज अंदाजे ६ हजार व्यक्तींना नव्याने क्षयरोग होतो. देशात क्षयरोगाने प्रत्येक ३ मिनटाला २ मृत्यू होतो. अद्यापही निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरोग कुष्ठरुग्ण  गृह भेटीव्दारे शोधून काढण्यासाठी रुग्णशोध मोहीम राज्यामध्ये राबविली जात आहे.  राज्यातील कोव्हिड- 19  च्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत राज्यभर अत्यंत कमी झालेले आहे. (कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील वर्षाचे तुलनेत 45 टक्के कमी रुग्ण नोंद झाली आहे). त्यामुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे कडून रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या गेल्या. त्यापैकी एक उपाययोजना म्हणून संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान कोल्हापूरसह राज्यभर राबविण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाकरिता 12 तालुक्यांतर्गत एकुण 34 लाख 82 हजार 726 लोकसंख्या  6 लाख 96 हजार 545 इतक्या घरांची निवड करण्यात आलेली आहे. या मोहिमेसाठी एकुण 2846 पथके व 5692 इतके कर्मचारी काम करत आहेत. एकुण 31  दिवसांच्या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.  दररोज एका टिममार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात प्रत्येक पथकाद्वारे दर दिवशी 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. घरातील सर्व सभासदांची तपासणी करण्यात येत आहे. महिला सभासदांची तपासणी आशा महिला स्वयंसेविकेमार्फत व पुरुष सभासदांची तपासणी टिममधील पुरुष कर्मचारी स्वयंसेवकामार्फत  करण्यात येत आहे. ऑटो रिक्षाव्दारे माईकिंग, पोस्टर, बॅनर, माहिती पत्रके, पथनाटय, आकाशवाणीवरील मुलाखतीद्वारे या मोहिमेचे जनजागरण करण्यात येत आहे.

दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, छातीत दुखणे,वजनात लक्षणीय घट,थुंकीवाटे रक्त पडणे अशी लक्षणे असणा-या व्यक्तींनी मोहीम कालावधीमध्ये घरी

येणा-या आरोग्य कर्मचा-यांना व स्वयंसेवकांना योग्य ती माहिती  द्यावी व स्वयंसेवकांकडून तपासणी करून घ्यावी. एच.आर.सी.टी./एक्स रे/ सोनोग्राफी इ. निदानासाठी लागणा-या तपासण्या जि.क्ष.केंद्रात पूर्णपणे मोफत केल्या जातात. लवकर निदान, उपचारसाठी तसेच रुग्ण  पोषण आहार इत्यादी योजनांचा लाभ घ्यावा व कुष्ठरोगाची लक्षणे जसे त्वचेवर फिकट/लालसर, बधीर चट्टा, त्या ठिकाणी घाम न येणे. जाड बधीर तेलकट चकाकणारी  त्वचा, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण पणे बंद करता ने येणे अशी लक्षणे असणा-या व्यक्तींनीही मोहीम कालावधीमध्ये स्वयंसेवकांकडून तपासणी करून घेऊन देश, राज्य व आपला जिल्हा क्षयमुक्त व कुष्ठरोग मुक्त निरोगी करण्यास हातभार लावावा.

क्षयरोग जनजागृतीपर व क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विषयक माहिती

भारतात 1906 मध्ये प्रथम क्षयरुग्ण उपचार सुरु केले गेले. 1962 मध्ये भारत सरकारने क्षयरोग कार्यक्रम सुरु केला व त्याची संपुर्ण भारतभर अंमलबजावणी केली. या कार्यक्रमामधील त्रुटी दूर करुन नवीन पथदर्शी मसुदा 1993 मध्ये तयार केला गेला व त्यानुसार 1997 मध्ये सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरूवात केली. व त्याची अंमलबजावणी 1998 मध्ये करण्यात आली. प्रथमतः 1998-2001 पर्यंत 102 जिल्हयामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला व तेथुन पुढे मार्च 2006 पर्यंत संपूर्ण भारतभर त्याची अंमलबजावणी केली गेली. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हा प्रामुख्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक निर्देशानुसार डॉटस/ प्रणालीवर आधारीत आहे. यामध्ये नवीन क्षयरोगी रुग्ण लवकरात लवकर शोधणे व प्रत्यक्ष देखरेखीखाली रुग्णांना त्यांच्या घराजवळ मोफत औषधे पुरवणे हा मुख्य उददेश आहे. यामुळे रुग्णांना  बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नवीन सुक्ष्मदर्शी केंद्रे  व डॉटस/ सेंटर्सचे  जाळे भारतभर विणले गेले.2025 पर्यंत आपल्याला भारत  क्षयमुक्त करायचा  आहे व  मुळापासून क्षयरोगाचा नायनाट करावयाचा असल्याने जानेवारी 2020 पासुन  सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमचे नाव बदलुन राष्ट्रीय  क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम असे करण्यात आले आहे.

जगामध्ये सध्या 100 लाख  इतके क्षयरुग्ण आहेत त्यापैकी जवळपास  27 लाख क्षयरुग्ण हे भारतात आहेत. त्याचबरोबर जगामध्ये जवळपास 12.40 लाख क्षयरुग्णांचे  मृत्यु  झाले असून त्यामध्ये भारतातील क्षयरुग्णांच्या मृत्युचे प्रमाण हे 35 टक्के  आहे.( 4.40 लाख क्षयरुग्ण मृत्यु ) ‘ग्लोबल टीबी रिपोटनुसार जगभरात पसरलेल्या क्षयरोगाचा आढावा घेण्यात आलेला असून त्यामध्ये विविध आजारांमुळे होणा-या मध्ये क्षयरोग हा दहाव्या क्रमांकावरील आजार आहे. या अहवालानुसार क्षयरोगाने एचआयव्ही एडस/लाही मागे टाकले असून दररोज सुमारे चार हजारांहून अधिक लोंकांचे मृत्यू क्षयरोगामुळे होतात. सध्या जिल्हयामध्ये सन 2019 मध्ये शासकीय  आरोग्य संस्थांकडून 2228  क्षयरुग्ण व खाजगी आरोग्य संस्थांकडून 544 क्षयरुग्ण  क्षयरुग्णांची नोंद झालेली  आहे.एकुण 2772 क्षयरुग्ण 2019 मध्ये होते तर २०२० मध्ये कोविड साथरोग मुळे कमी रुग्ण संख्येची नोंद झाली आहे सन २०२० (नोव्हेंबर ) मध्ये शासकीय आरोग्य संस्थांकडून 1008 क्षयरुग्ण व खागी आरोग्य संस्थांकडून  342 क्षयरुग्णांची नोंद झाली आहे. एकुण 1354 क्षयरुग्ण  मध्ये  नोव्हेंबर 2020 पर्यंत आहेत.

केंद्र शासनाच्या आरोग्य धोरणानुसार सन 2025 पर्यंत आपल्याला क्षयमुक्त भारत करायचा असून आपली वाटचाल त्या दिशेने सुरु  आहे. सन 2019 हे वर्ष आरोग्यासाठी उल्लेखनीय वर्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  धोरणानुसार   क्षयमुक्त भारत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय स्ट्रॅटिजिक योजनेनुसार वेगवेगळय रणनिती  2017-2025 मध्ये आखल्या आहेत.  राष्ट्रीय स्ट्रॅटिजिक योजनेनुसार कार्यक्रमामध्ये बदल झाले आहेत. जसे सुलभ क्षयरुग्ण निदानासाठी जिल्हयात 4 ठिकाणी सी.पी.आर. कोल्हापूर, आय.जी.एम. इचलकरंजी , उपजिल्हा गडहिंग्लज, सावित्रीबाई  फुले हॉस्पिटल कोल्हापूर सीबीनॅटची उपलब्धता केली आहे. येणा-या काळात सर्व शासकीय संस्थास्तरावर ट्रूनेट  होणार आहे, सर्व निदान झालेल्या  रुग्णांची सीबीनॅट तपासणी करणे ,गृहभेटींमध्ये क्षयरुग्ण शोध मोहिम (. सी. एफ. ), क्षयमुक्त तालुका मोहिम, शासकीय व खाजगी अंतर्गत सर्व क्षयरुग्णांना पोषण आहार योजना, खाजगी वैद्यकीय व्यवसायिंकांना प्रोत्साहनपर भत्ता, क्षयरुग्णांसाठी सुलभ उपचार प्रणाली, दैनंदिन उपचारपध्दती,99 डॉटस/एफ डी सी,वजनानुसार उपचार पध्दती इ. बदल कार्यक्रमामध्ये केले आहेत. एम.डी.आर.- टी .बी. च्या रुग्णांना बेडाक्वीलाईन सारखे टी. बी. वरील नवीन औषध एप्रिल  2018 पासून उपलब्ध झाले  आहे. टोल फ्री क्रमांक 1800116666 क्षयरोग  सल्ला व मार्गदर्शनासाठी सर्वांसाठी उपलब्ध आहे.

क्षयरोग हा हवेव्दारे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. मायक्रोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसिस नावाच्या रोगजंतूमुळे होणारा रोग आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवाला भागाला क्षयरोग होवू शकतो. फुफुसाला होणाऱ्या क्षयरोगास पल्मोनरी टीबी म्हणतात तर फुप्फुसाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अवयवाचा क्षयरोग असल्यास त्याला  एक्स्ट्रा पल्मनोरी  क्षयरोग म्हणतात. उदा. हाडे, सांधे, मज्जातंतू इ. अवयवाचा क्षयरोग होय.क्षयरोग जंतू मुख्यतः हवेतून पसरतात. फुप्फुसाचा क्षयरोग झालेला रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा क्षयरोगाचे हे जंतू सूक्ष्म थेंबाव्दारे हवेत पसरतात. ज्यावेळी जवळचा निरोगी व्यक्ती श्वास घेतो तेव्हा ते जंतू त्याच्या शरिरात प्रवेश करतात व त्या निरोगी  व्यक्तीला क्षयजंतुचा संसर्ग होतो. मात्र  संसर्ग झालेल्या  सर्वच व्यक्तींना क्षयरोग होत नाही. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात हे जंतु वर्षानुवर्ष सुप्त अवस्थेत असतात व प्रतिकारशक्ती कमी झालेस आजार हा होण्याची शक्यता असते. फुफुसातील क्षयाचे जंतु शरीरात अन्य ठिकाणी गेल्यास इतर अवयवांचाही क्षयरोग होतो. उदा. सांधे, आतडी, लसिकाग्रंथी, जननेंद्रिय इ.अशा अशा संसर्गिक माणसाला क्षयरोग होण्याची आयुष्यभराची शक्यता 10 टक्के असते.एच.आय.व्ही. बाधीत रुग्णांना क्षयरोग होण्याची शक्यता 60 टक्के असते.

          बेडकायुक्त दोन आठवडे किंवा जास्त दिवस खोकला, संध्याकाळी येणारा हलकासा ताप,भूक मंदावणे, वजन घटणे, छातीत दुखणे, रात्री खूप घाम येणे अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तीस  क्षयरोगी म्हणतात.  ही लक्षणे  अढळल्यास  जरूर त्या तपासण्या (स्पुटम, एक्स-रे,इत्यादी ) जवळच्या आरोग्य केंद्रात कराव्यात. निदान झाल्यास त्वरित मोफत  औषधोपचार सुरु करण्यात येईल. सामान्य टिबीच्या औषधांना दाद न देणा-या रोगाला  अतिजोखमीचा एम.डी.आर. म्हणतात. यामध्ये  हा क्षयरोग सामान्य औषधांना दाद  देत नाही.आतापर्यंत 464 एम.डी.आर. रुग्णांची नोंद जिल्हात झाली आहे.  एम.डी.आर . च्या पुढील टप्प्यातील आजारास   एक्स.डी.आर म्हणतात . आतापर्यंत 33 एक्स.डी.आर  रुग्णांची  नोंद जिल्ह्यात झाली आहे. एप्रिल २०१८ पासुन एक्स.डी.आर रुग्णांसाठी वरदान ठरणारे बेडाक्वीलाईन सारखे  नवीन औषध उपलब्ध झाले आहे. हे अत्यंत महाग औषध शासनाने शासकीय संस्थातील रुग्णांना  मोफत उपलब्ध करून दिले आहे.

 राष्ट्रीय  क्षयरोग दुरीकरण  कार्यक्रमांतर्गत पूर्वी क्षयरुग्णांना एकदिवसाआड 7 ते 8 गोळया दिल्या जात होत्या होत्या. त्यामध्ये बदल होऊन वन गटानुसार  सध्या 2 ते 6 गोळया दररोज दिल्या जातात  म्हणजे सोमवार ते रविवार सात दिवस क्षयरुग्णांच्या वजन गटानुसार औषध दिले जातात. ही औषधप्रणाली 17 फेब्रुवारी 2017 पासून सर्व रुग्णांकरीता चालू करण्यात आली. या औषध प्रणालीमुळे पेशंट मध्येच उपचार सोडून देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वजनानुसार डोसेसचे प्रमाण कमी झालेमुळे  पुर्नउदभव होणारा टिबीचा धोका कमी झाला आहे. पेशंटच्या  न गटानुसार औषधोपचार दिले  जातात. जसे 25 ते 34 किलोग्रॅम वन गटासाठी  दररोज 2 गोळया, 35 ते 49 किलोग्रॅम  न गटासाठी  दररोज 3 गोळया,50 ते 64 किलोग्रॅम  न गटासाठी  दररोज 4  गोळया,65 ते 75 किलोग्रॅम  व्जन गटासाठी  दररोज 5  गोळया, तर 75  किलोग्रॅम च्या वर सर्व व्जन गटासाठी दररोज 6 गोळया दिल्या जातात  कालावधी. २८ गोळ्यांचे एक औषधाचे पाकीट असते तर औषधोपचार ६ महिन्यांचा असतो.  पेशंटच्या औषधाबरोबर प्रथिनयुक्त आहाराचासुध्दा समावेश करावा. अंडी, दूध घ्यावे. खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल घ्यावा. मास्क चा वापर करावा, थुंकी दुषित रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. उघडयावर थुंकू नये. कोवळया उन्हात बसावे. पेशंटच्या सहवासीतांची सुध्दा   तपासणी करून घ्यावी.

 

7 मे 2012 च्या शासन निर्णयानुसार क्षयरोग आजाराचा अंतर्भाव सुचनीय आजारामध्ये (नोटीफायबल डिसीजमध्ये) करण्यात आला आहे. सर्व खागी आरोग्य संस्थेकडे निदान होणा-या किंवा उपचाराखाली असणा-या  प्रत्येक क्षयरुग्णांची माहिती विहित नमुन्यात जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडे किंवा संबंधित जवळच्या सार्वजनिक आरोग्य संस्थांना सादर करणे बंधनकारक आहे. क्षयरुग्णांची माहिती निक्षय वेबसाईट सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरणे आवश्यक आहे. खागी वैद्यकीय व्यवसायकांसाठी निदानासाठी रुपये ५०० व औषधपचार पूर्ण केल्यावर रुपये ५००  अनुदान थेट लाभार्थी हस्तांतरण (डी .बी.टी.) च्या माध्यमातून एप्रिल २०१८ पासून देण्यात येत आहेत. क्षयरुग्णांची नोंद न केल्यास कायद्यामध्ये २६९ व २७० कलमांतर्गंत दंड व शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. शासन धोरणानुसार सरकारी आरोग्य केंद्रात उपचार घेणारे क्षयरुग्ण व खागी वैद्यकीय व्यवसायकांकडील क्षयरुग्णांसाठी पोषण आहारासाठी दरमहा औषधोपचार सुरु असे पर्यंत रुपये ५०० अनुदान थेट लाभार्थी हस्तांतरण (डी .बी.टी.) च्या माध्यमातून एप्रिल २०१८ पासून देण्यात येत आहे.

 

डॉ. यु. जी. कुंभार

जिल्हा क्षयरोग अधिकारी,

कोल्हापू

000000