इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

महारेशीम अभियान 2023: शेतकऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन

 


 

 कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यात महारेशीम अभियान 2023 राबविण्यात येत असून या अंतर्गत नवीन तुती क्षेत्र नोंदणीचा कार्यक्रम 15 डिसेंबरपर्यंत असणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी राजेश कांबळे यांनी केले आहे.

जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. यात लाभार्थी निवडताना अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भूसुधार योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्प भूधारक सीमांत शेतकऱ्यांना निवडण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये अकुशल व कुशल मजुरी देण्यात येते. यात तुती लागवड व जोपासनेसाठी 682 मनुष्य दिवस व किटक संगोपन गृहासाठी 213 दिवस असे एकूण 895 दिवसांची मजुरी देण्यात येते. स्वत: मजुर म्हणून स्वत:च्या शेतात काम करणे आवश्यक आहे.

लाभार्थी निवडताना इच्छुक लाभार्थ्यांकडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमीन असावी. नवीन तुती लागवड क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. सर्व खर्च वजा जाता एकरी वार्षिक किमान दिड लाख रुपये उत्पन्न निश्चित मिळेल. जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी वाव आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आठमाही सिंचनाची सोय व खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, 564 ई वॉर्ड, व्यापारी पेठ, शाहुपुरी, कोल्हापूर 416001 येथे संपर्क साधावा, असेही श्री. कांबळे यांनी कळविले आहे.

अधिक माहितीसाठी 0231-2654403 व 2666682 वर संपर्क साधावा.

000000

बालगृहातील मुला-मुलींनी सुविधांचा लाभ घेऊन जीवनात आदर्श निर्माण करावा - संजयसिंह चव्हाण

 

 


 

कोल्हापूर,दि. 28 (जिमाका) : सर्व बालगृहातील मुला-मुलींनी सुविधांचा लाभ घेऊन शुन्यातून विश्व निर्माण करुन जीवनात आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी चाचा नेहरु बाल महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी केले.

विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, जिल्हा परिवक्षा अनुरक्षण संघटनेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वैशाली बुटाले, बाल कल्याण समिती सदस्य शिल्पा सुतार, अश्विनी खाडे, श्रीमती गारे तसेच बाल न्याय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

परिवक्षा अनुरक्षण संघटनेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले म्हणाल्या, मागील तीन वर्षात महोत्सव घेता आला नाही. सध्या घेण्यात आलेला महोत्सव सर्व मुलांनी मनापासून आनंदाने साजरा करावा.

 

 

 

 2018 नंतर प्रथमच या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागाच्या नऊ बालगृहातील 350 मुले- मुली सहभागी झाली आहेत. हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे. यामध्ये खो-खो, कबड्डी, धावणे, कॅरम, बुध्दीबळ या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. तसेच दोन दिवस सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

कार्यक्रमास सर्व संस्था अधीक्षक, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

000000

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी अर्ज करावेत


 

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना ‘राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल’बाबतची माहिती व्हावी यासाठी जास्तीत-जास्त पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी संबंधित वेबसाईटला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण  विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

 

राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य स्तरावर व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे.

 

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियमानुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची तजविज आहे. त्यानुषंगाने सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी राष्ट्रीय पोर्टल (National Portal For Transgender Persons) वर भेट देवून ॲप्लाय ऑनलाईन यावर आपला युजरआयडी व पासवर्ड तयार करून आपली सर्व माहिती भरावी. तसेच ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे संलग्न करावीत.

 

अधिक माहितीकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ, बाबर हॉस्प‍िटल शेजारी कोल्हापूर येथे ०२३१- २६५१३१८ वर संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

 

00000

ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केलेले उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र

 


 

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर केला नाही, अशी व्यक्ती राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये पाच वर्षांच्या कालावधीकरीता पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असेल. निरर्ह उमेदवारांची यादी kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी  श्रावण क्षीरसागर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 (ब) (1) अन्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये जिल्ह्यातील हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, शाहूवाडी, गडहिंग्लज, पन्हाळा व करवीर तालुक्यातील एकूण 446 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या  आदेशान्वये अनर्ह ठरविण्यात आले आहे. अनर्ह उमेदवारांची माहिती शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ, पुणे विभाग, पुणे असाधारण क्रमांक 5 दिनांक 24/01/2019 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.  

000000

 

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधण्यावर शासनाचा भर - उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत दादा पाटील

 





कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : आपल्या देशात तरुणांची संख्या अधिक आहे. शिक्षणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शिक्षणाच्या माध्यमातून राज्याचा व देशाचा विकास साधण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

 सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालय, कोल्हापूर व इंडो काऊन्ट फाऊंडेशन, गोकुळ शिरगांव एम. आय. डी. सी., कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील आश्रमशाळांना शैक्षणिक साहित्य ( ई-लर्निंग किट ) सुपूर्द सोहळा कार्यक्रम राधाबाई शिंदे सभागृह, सायबर महाविद्यालय, कोल्हापूर या ठिकाणी झाला, या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी इंडोकाऊंट इंडस्ट्रीजचे डायरेक्टर कमल मित्रा, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी नारी शक्ती पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापिका अंजली पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्य शासनाने अभियांत्रिकी तसेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे मराठीकरण करण्याचे काम पूर्ण केले असून त्या पुस्तकांचे विमोचन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असून भविष्यात वैद्यकीय शिक्षणसुध्दा मराठीतूनच उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील.

 देशातील खासगी कंपन्यांनी आपल्या नफ्यातील काही रक्कम सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविण्याबाबत केंद्र सरकारने निर्बंध घातले असून त्यामुळे अशा शैक्षणिक संस्थांना आणि पर्यायाने विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

इंडो काऊन्ट फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या शैक्षणिक साहित्य (ई-लर्निंग किट) चा वापर करुन आश्रमशाळेतील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवतील. अशा शैक्षणिक साहित्याची भविष्यात गरज असून त्यामुळे रोजगार निर्मितीसही हातभार लागेल. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता कौशल्यावर आधारीत शिक्षण घेण्यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी ई-लर्निंग साहित्याचा वापर करुन विविध क्षेत्रात ज्ञान मिळवावे तसेच संशोधनामध्येही अग्रेसर रहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

 इंडो काउन्ट सारख्या कंपन्यांनी संशोधन केंद्रे उभारणीसाठी तसेच संशोधन झालेले उत्पादन, शोध यांची संबंधितांना मालकी हक्क मिळवून देण्याकरीता सहकार्य करण्याचे त्यांनी सूचित केले.

कार्यक्रमाची सुरुवात आश्रमशाळा, कुशिरे येथील विद्यार्थीनींच्या स्वागत गीताने झाली. प्रास्ताविकामध्ये सहायक आयुक्त विशाल लोंढे म्हणाले, विमुक्त जाती, भटक्या जमाती मधील कुटूंबे ही उदरनिर्वाहासाठी सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत असतात. तसेच अत्यंतिक गरीब परिस्थितीमुळे त्यांना आपल्या मुलामुलींना शिक्षण देता येत नाही. दुर्बल घटकातील मुलामुलींचा शैक्षणिक विकास व्हावा व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी राज्य शासनाने आश्रमशाळा सुरु केल्या आहेत.

विजाभज समाजातील मुलामुलींना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. शिक्षण घेऊन या समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या या आश्रमशाळा मोलाचे कार्य करीत आहेत. त्याचबरोबर इंडो काउन्ट फाऊंडेशनने त्यांच्याकडील सीएसआर फंडामधून जिल्ह्यामधील आश्रमशाळांना शैक्षणिक साहित्य ( ई-लर्निंग किट ) उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील.

 इंडोकाऊंट इंडस्ट्रीचे डायरेक्टर कमल मित्रा यांनी इंडो काऊन्टच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच भविष्यातही राज्य शासनाच्या विविध विभागांबरोबर काम करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे आश्वासित केले.

शैक्षणिक साहित्य ( ई-लर्निंग किट ) दिल्याबद्दल कमल मित्रा यांचा मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारार्थी अंजली पाटील तसेच पूर्वा कांबळे व समृध्दी कांबळे या विद्यार्थिनींनी  मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन इंडो काऊन्टचे सीएसआर सल्लागार अमोल पाटील यांनी केले तर आभार समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी मानले.

कार्यक्रमासाठी इंडोकाऊंट इंडस्ट्रीजचे सिनीअर व्हाईस प्रेसिडेंट शैलेश सरनोबत, जिल्ह्यातील विजाभज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सायबर महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,  उपस्थित होते.

000000

 

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

शिरोळ तहसिलदार कार्यालयातील निर्लेखित वाहनाचा लिलाव

 

                       

            कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : शिरोळ तहसिलदार कार्यालयातील निर्लेखित वाहनाचा जाहीर लिलाव दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय, शिरोळ, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरोळ येथे होणार आहे, अशी माहिती इचलकरंजी विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली आहे.

 

(मॉडेल - महिंद्रा बोलेरो, वाहन क्र. - MH-09-AG-0122, मेक- 2007 व अपसेट किंमत 75 हजार रुपये)

तहसिलदार शिरोळ यांच्या ताब्यात असलेले वाहन ‘आहे त्या परिस्थितीत’ जाहीर लिलावाव्दारे विक्री करावयाचे असून लिलावाच्या सर्वसाधारण अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत(सुट्टीच्या दिवसा व्यतिरिक्त) उपविभागीय अधिकारी कार्यालय इचलकरंजी व तहसिल कार्यालय शिरोळ यांच्या नोटीस बोर्डवर पहावयास मिळेल, असेही श्री. खरात यांनी कळविले आहे.

0000000

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान: शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) :  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 अंतर्गत जिल्ह्याकरिता एकूण 350.83 लाखाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

या अभियानामध्ये विदेशी फळपिक लागवड (ड्रॅगन फ्रुट लागवड), पुष्पोत्पादन कार्यक्रम (कंदवर्गीय फुले सुट्टी फुले लागवड), मसाला पिके (मिरची, हळद आले लागवड), सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती (हरितगृह, शेडनेट, प्लॅस्टिक मल्चिंग) मधुमक्षिका पालन, फलोत्पादन यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर, पॉवर टिलर) पॅक हाऊस, शीतखोली, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, प्रक्रिया युनिट फिरते विक्री केंद्र या घटकांचा समावेश आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक कृषी सहायक यांना संपर्क साधावा इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर (www.mahadbt.gov.in ) अर्ज करावेत, असेही श्री. पांगरे यांनी कळविले आहे.

00000

 

अग्निपथ योजनेअंतर्गत “अग्निवीरवायू” पदाकरिता भरती इच्छुकांनी 23 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत -संजय माळी

 

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) :  भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरवायू  पदाकरिता 17 ½  ते  21 वर्षाच्या आतील नोकरी इच्छुक अविवाहित मुले, मुलींकरिता पदभरती होणार आहे. इच्छुक मुला-मुलींनी https://agnipathvayu.cdac.in  या संकेत स्थळावर दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

अर्ज करण्याकरिता आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक अहर्ता, वेतन  तसेच नियम व  अटीबाबत सविस्तर माहिती https://agnipathvayu.cdac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, असेही श्री. माळी यांनी कळविले आहे.

00000

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश

 


 

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) सोमवार दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 नंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत. (गडचिरोली, गोंदीया जिल्ह्यासाठी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत) मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 पर्यंत राहील.

0000

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक

 








        कोल्हापूर, दि. 4 (जिमाका):- महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या.

        महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय सामायिक मुद्यांबाबत कोल्हापूर येथील रेसिडेन्सी क्लब येथे दोन्ही राज्यांची समन्वय बैठक महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी महाराष्ट्रातील सीमा भागातील पाच जिल्हे व कर्नाटक राज्यातील चार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती.

            राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमेलगतच्या जिल्ह्यात परस्परात चांगला समन्वय आहे. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून ज्या काही समस्या राज्यस्तरावरुन सोडविल्या जाणे आवश्यक आहे त्याबाबत राज्य शासनाला सुचित करण्यात येईल, असे सांगून ही समन्वय बैठक पुढील काळात नक्कीच लाभदायक ठरेल असेही त्यांनी सुचित केले.

            कर्नाटकचे राज्यपाल श्री. गेहलोत यांनी या राज्यस्तरीय समन्वय बैठकीबाबत समाधान व्यक्त करुन या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सर्व संबंधित स्थानिक प्रशासनाने परस्परात अधिक चांगला समन्वय निर्माण करुन त्या भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.

आजच्या सामायिक मुद्यांबाबत आयोजित समन्वय बैठकीत सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जे सादरीकरण सादर केले त्या सादरीकरणाचे प्रस्ताव दोन्ही राजभवनकडे पाठवावेत. त्यातील राज्यस्तरीय मुद्यांच्या अनुषंगाने दोन्ही राज्य शासनाला राजभवन कडून सुचित करण्यात येईल, असे दोन्ही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

 

            या आंतरराज्य समन्वय बैठकीत जिल्हानिहाय पुढीलप्रमाणे चर्चा झाली.

          यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. रेखावार, दिनांक 26 जून 2020 च्या आंतरराज्य बैठकीत ठरल्याप्रमाणे कृष्णा नदीतील पुराचे पाणी प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी आणि पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 517 मिटर ते 517.50 मिटर च्या मर्यादेत राखली जावी. तर आजरा तालुक्यातील 3.10 टीएमसी क्षमता असलेला किटवडे मध्यम प्रकल्प कृष्णा नदी खोऱ्यातील घटप्रभा उप खोऱ्यात असून हा नवीन प्रकल्प आहे. दोन्ही राज्यासाठी फायदेशीर प्रकल्प असल्याने परस्पर सहमत असलेल्या अटी व शर्तीसह आंतरराज्य प्रकल्प म्हणून हा प्रकल्प घेतला जाऊ शकतो, अशी माहिती दिली. 

            गोवा राज्यातून अवैध दारू वाहतूक होऊ नये यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागाने शिनोली, संकेश्वर, कोगनोळी अंतर्गत मार्गांवर वाहनांची कसून तपासणी करुन अवैध दारू वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी एकमेकांशी समन्वय साधणे आवश्यक आहे. गुरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव कमी करणे, पशुखाद्य आणि चाऱ्यासाठी सुलभ व्यापार आणि बाजारपेठ, कर्नाटकातून हत्तीचे स्थलांतर आणि मानव-प्राणी संघर्षात झालेली वाढ, विद्यार्थ्यांना नॅशनल मिन्स स्कॉलरशिप मिळण्याबाबत, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचा कोविड आजारामुळे कर्नाटक राज्यात मृत्यू झालेला आहे अशा नागरिकांना भरपाई मिळणे तसेच सीमावर्ती भागात पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी ची मागणी श्री रेखावर यांनी केली. पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी कर्नाटक राज्यातील पोलीस विभागाशी समन्वय चांगला असल्याचे सांगितले.

            सांगलीचे जिल्हाधिकारी श्री. दयानिधी यांनी सन 2016-17 मध्ये महाराष्ट्र राज्याने कर्नाटक राज्यातील अवर्षण प्रवण भागासाठी 6.865 टीएमसी पाणी सोडले होते, त्याप्रमाणे कर्नाटक शासनाने महाराष्ट्र राज्यातील जत व अक्कलकोट भागासाठी पाणी सोडणे, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना सांगली जिल्ह्यात बस स्थानकावर प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिले जातात, त्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही जिल्ह्यातील बसेसना प्लॅटफॉर्म उपलब्ध करु द्यावेत. आरोग्य, उत्पादन शुल्क व पशुसंवर्धन तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दोन्ही राज्यातील पोलिसांनी परस्परात समन्वय ठेवण्याबाबतची मागणी केली.

            सोलापूरचे उपजिल्हाधिकारी श्री. वाघमारे यांनी जिल्ह्यातील 40 साखर कारखान्यांव्दारे मोलॅसिस तसेच गुळ पावडरची निर्मिती होते. तीन वर्षात मोलॅसिस वाहतुकीच्या अनुषंगाने 24 गुन्हे नोंदले आहेत. गेल्या तीन वर्षात सुमारे 703 मेट्रीक टन मोलॅसिसची अवैध दारुसाठी विक्री झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन्ही राज्यातील उत्पादन शुल्क प्राधिकरणामध्ये योग्य तो समन्वय ठेवणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यात जेथून बेकायदेशीर मोलॅसिस उचल केली जाते त्या साखर कारखान्यात तपासणीच्या अनुषंगाने सहज प्रवेश करणे त्याचबरोबर अवैध दारु विक्री, मोलॅसिस गुन्ह्या संदर्भात दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये माहितीचे आदान प्रदान आवश्यक व संबंधित अधिकाऱ्यांव्दारे संयुक्तरित्या छापेमारी आवश्यकता असल्याची माहिती त्यांनी दिली.

            उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री. ओंबासे यांनी कलबुर्गी येथे बेकायदेशीर लिंग निदान बाबत ऑनलाईन तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. याबाबत उस्मानाबाद आरोग्य प्रशासनाने स्टिंग ऑपरेशनही केलेले आहे. त्याप्रमाणेच कलबुर्गी प्रशासनाने बेकायदेशीर लिंगनिदान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात खुशखबर योजनेअंतर्गत लिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयाचा निधी दिला जातो व नावही गोपनीय ठेवले जाते, त्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही ही योजना लागू करावी. तसेच अन्नसुरक्षा मानक अधिनियम २००६ च्या कलम 30 (2)नुसार गुटखा पान मसाला व अनुषंगिक अन्य बाबीवर महाराष्ट्र राज्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

            लातूरचे जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीराज यांनी कारंजा धरणातून पाणी सोडणे व हे पाणी बिदर जिल्ह्यातील चंद्रपूर बॅरेज पर्यंत नेण्यासाठी सिंधीकामठ  केटीवेअरचे गेट्स काढणे व बसवणे बाबतची थकबाकी,  कर्नाटक येथील शेतकरी पाण्याचा वापर करतात त्याची थकबाकी देण्याची मागणी केली.  सीमावर्ती भागातील वाळू उत्खनन व स्वातंत्र्यसैनिकांच्या नोंदी, कायदा व सुव्यवस्था सीमावर्ती भागात अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांमध्ये परस्पर समन्वय ठेवणे. तसेच गुन्हेगारांच्या माहितीची देवाणघेवाण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

            बेळगावीचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कृष्णा आणि प्रमुख नद्यांमध्ये महाराष्ट्रातील धरणांमधून पाणी सोडल्यामुळे पूरस्थितीचे व्यवस्थापन करणे. व्यापाराला चालना देण्यासाठी आंबोली घाटमार्गे बेळगावी आणि महाराष्ट्र दरम्यान दर्जेदार रस्ते जोडणीची गरज आहे.  महाराष्ट्रातील शहरांमध्ये माल पोहोचवण्यासाठी बेळगावी येथून मालवाहू वाहनांना विना अडथळा प्रवेश मिळणे. बेळगावीच्या एमएसएमईने पुरविलेल्या साहित्यासाठी उद्योगांकडून वेळेवर देयक देणे व दोन्ही राज्यांच्या सीमेपलीकडील गुन्हे, तस्करी, अवैध दारू वाहतूक आणि इतर पोलीस आणि सुरक्षा समस्यांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी दोन्ही बाजूंमधील परस्पर सहकार्य गरजेचे असल्याबाबत सांगितले.

            विजयपुराचे जिल्हाधिकारी डॉ. दनम्मानवर यांनी द्राक्ष बाजारातील समस्या जसे की सीमेवरील चेकपोस्ट, वेळेवर पेमेंट इ. तसेच दोन्ही राज्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि यात्रेकरूंना पुरवल्या जाणाऱ्या दळणवळण आणि मूलभूत सुविधांबाबत, लिंग गुणोत्तरात घट, PCPNDT कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी समान मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे. रस्त्यांच्या पायाभूत सुविधा, समस्या. तस्करी आणि इतर गुन्ह्यांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी दोन्ही बाजूंनी उत्तम समन्वय ठेवण्याची मागणी केली.

            बिदरचे जिल्हाधिकारी श्री. रेडी यांनी चोंडीमुखेड गावाशी संबंधित पायाभूत सुविधांबाबत समस्या- प्रामुख्याने वीज, कर्नाटक राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात जाण्यासाठी सहकार्य करणे, रस्त्यांच्या उत्तम सुविधा निर्माण करणे व रोजगार निर्मितीला चालना देणे तसेच सीमेपलीकडून गुन्हेगारांच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची आवश्यकता सांगितली.

            कलबुर्गीचे जिल्हाधिकारी श्री. गुरुकर यांनी  सीमा ओलांडून अबकारी उत्पादनांची बेकायदेशीर वाहतुक थांबवणे. दोन्ही राज्यांतील धार्मिक स्थळांना (देवळा गाणगापूर, गट्टारगा भाग्यलक्ष्मी ) भेट देणाऱ्या पर्यटक आणि यात्रेकरूंना दळणवळण आणि मूलभूत सुविधा, लिंग गुणोत्तरात घट, PCPNDT कायद्याची कठोर अंमलबजावणी, महाराष्ट्र राज्याच्या लगतच्या गावांमधील कन्नड माध्यमाच्या शाळांना मूलभूत सुविधा देण्याबाबत सूचित केले.

     यावेळी दोन्ही राज्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणावर मराठी व कन्नड भाषिक सामान्य नागरिक धार्मिक, पर्यटन, रोजगार, आरोग्य व अन्य कारणासाठी ये-जा करत असतात त्यांना दिशादर्शक फलक हे दोन्ही भाषेत( मराठी व कन्नड) करण्याबाबत समन्वय बैठकीत एकमत झाले. यावेळी अनेक सामाईक मुद्द्यावर दोन्ही बाजूने चर्चा होऊन त्यातील काही मुद्याबाबत बैठकीतच एकमताने निर्णय झाले. तर काही मुद्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठरले. तर राज्यस्तरावरील मुद्यांबाबत दोन्ही राज्यपाल संबंधित राज्य शासनाला सदरील प्रश्न सोडवण्याबाबत सूचित करणार आहेत.

            रेसीडन्सी क्लब येथील महाराष्ट्र, कर्नाटक आंतरराज्य बैठकीस महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राजभवन येथील सचिव श्वेता सिंघल, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, बेळगावीचे प्रादेशिक आयुक्त के.पी. मोहनराज, कलबुर्गीचे प्रादेशिक आयुक्त कृष्णा वाजपेयी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कलबुर्गीचे जिल्हाधिकारी यशवंत गुरुकर, बीदरचे जिल्हाधिकारी गोविंद रेडी, विजयपुराचे जिल्हाधिकारी डॉ. विजयमहानंदेश दनम्मानवर, बेळगावीचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, लातुरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी, सोलापूरचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, बीदरचे पोलीस अधीक्षक डेक्का बाबु, विजयपुराचे पोलीस अधीक्षक डॉ. आनंद कुमार, उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.

0 0 0 0 0 0 0