इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

कागलमध्ये सैनिकांचे स्मारक उभारण्यात येणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 







* स्वातंत्र्य वीरांच्या स्वप्नातील बलशाली देश बनवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया

 सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबध्द

       

कोल्हापूर, दि.१४(जिमाका): देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी प्राणाचे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्य वीरांच्या स्वप्नातील बलशाली देश बनवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल शहरात सैनिकांसाठी सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे. या ठिकाणच्या जागेत सनिकांचे स्मारक लवकरच उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले.

          कागल नगरपरिषदेच्यावतीने 'मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' उपक्रमांतर्गत विविध  कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण व अमृतवाटिकामध्ये वृक्षारोपण करुन 'वसुधा वंदन' करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी श्रीराम पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सोनल केसरकर यांच्यासह अधिकारी, माजी सैनिक उपस्थित होते. यानंतर गैबी चौकात महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार घालून आभिवादन करण्यात आले. तसेच 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.

               मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले,  देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तसेच देशाच्या संरक्षणासाठी आजवर अनेक स्वातंत्र्यवीर व सैनिक शहीद झाले आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांप्रति आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्यासह देशभरात अनेक उपक्रम राबवण्यात येत असून देशाच्या वीरांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे, त्यांचा आदर राखणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अनेक तरुण अत्यंत कमी वयात सैन्यदलात भरती होवून देशसेवा बजावतात. सेवा निवृत्तीनंतर जीवन व्यतीत करण्यासाठी त्यांना नोकरी, व्यवसाय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

              कागल शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वीर पत्नी व त्यांचे नातेवाईक तसेच शिवराम दत्तात्रय बालीघाटे, विष्णू विठ्ठल सणगर, गंगाराम बाळू घस्ते, चंदुलाल इब्राहिम नदाफ, बापू कृष्णात संकपाळ, लक्ष्मण गोविंद मिसाळ, शंकर राघू परिट, गोविंद गोपाळ सुर्यवंशी, रत्नचंद् रामचंद्र शहा, गणपती बापू निंबाळकर, शिदगोंडा दत्तात्रय पाटील या स्वातंत्र्य वीर जवानांच्या कुटुंबीयांचे वृक्षरोपे देऊन सत्कार करण्यात आले.

          माजी कर्नल विलास सुळकुडे यांनी माजी सैनिकांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मुख्याधिकारी श्रीराम पवार यांनी 'माझी माती माझा देश' उपक्रमांतर्गत कागल नगरपरिषदेमार्फत शिलाफलक उभारणी, वसुधा वंदन, पंच प्रण शपथ, विरांना वंदन, ध्वारोहण आदी विविध उपक्रमांची माहिती दिली.

         यानंतर शाहू सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला पंचप्रण शपथ घेण्यात आली. तसेच मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला. यावेळी कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार, आजी- माजी सैनिक संस्था कागलचे संस्थापक, अध्यक्ष माजी कर्नल विलास सुळकुडे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय, प्रशासन अधिकारी स्नेहल नरके, श्रध्दा माने, नितीन कांबळे, आदील फरास, माजी नगराध्यक्ष नवल बोते, प्रवीण काळबर, संजय चितारी, आजी- माजी सैनिक व त्यांचे नातेवाईक, कागल नगरपरिषदेचे विविध पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

****

रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

प्लॅस्टीक, कागदी ध्वजाचा वापर करु नका - निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचे आवाहन

 



        कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): दरवर्षी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणादिवशी, १ मे महाराष्ट्र दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते.  शालेय विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात परंतू हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे कागदी व प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

   गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार रस्त्यावर इतरत्र पडलेल्या, खराब झालेल्या व फाटलेल्या ध्वजांचे संकलन करुन राष्ट्रध्वज संहितेमध्ये नमुद कार्यपध्दतीनुसार नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका स्तरावर  समित्या स्थापन करण्यात येत आहेत.

            ग्रामपंचायत स्तरावर- अध्यक्ष- ग्रामसेवक, सदस्य - १) गावातील शाळांचे मुख्याध्यापक, २) गावातील पोलीस पाटील

(२) नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर- अध्यक्ष- मुख्याधिकारी, सदस्य- 1) नगरातील शाळांचे मुख्याध्यापक, २) संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा त्यांचा प्रतिनिधी

(३) महानगरपालिका स्तरावर- प्रभागनिहाय समित्या अध्यक्ष- प्रभाग अधिकारी,  सदस्य-1) प्रभागातील शाळांचे मुख्याध्यापक, २) संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा त्यांचा प्रतिनिधी याप्रमाणे समित्या स्थापन करुन त्या कार्यान्वीत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, पोलीस अधीक्षक व मुख्याधिकारी, नगरपालिका यांना कळविण्यात आले आहे.

            दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी व त्यानंतर कागदी व प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत. राष्ट्रध्वज इतरत्र टाकू नयेत. राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा. तसेच सर्व नागरिक, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था यासंदर्भात नेमण्यात आलेल्या शासकीय समित्या यांनीही  इतरत्र पडलेले, खराब झालेले व फाटलेले राष्ट्रध्वज संकलित करावेत तसेच कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने स्वतःहून गोळा केलेले राष्ट्रध्वज शासकीय समित्यांकडे द्यावेत. या समित्यांनी ते स्वीकारुन खराब व फाटलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नेमण्यात आलेल्या समित्यांनी करावी, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तेली यांनी केले आहे.

00000