इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

मौजे लिंगनूर दुमाला ग्रामस्थांना नवीन वर्षाची भेट मंजूर भूखंडाची नोंद 15 दिवसात 7/12 वर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


49 मागासवर्गीयांचा समावेश; 29 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात
        कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : कागल तालुक्यातील मौजे लिंगनूर दुमाला येथील गायरान क्षेत्रातील 31 मार्च 1990 रोजीच्या आदेशाने मंजूर झालेल्या भूखंडाची नोंद 7/12 वर 15 जानेवारी पर्यंत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कागल तहसिलदारांना आज दिले. यामध्ये एकूण 200 भूखंड मंजूर झाले असून 164 लाभार्थ्यांपैकी 49 भूखंड मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना मोफत वाटप करण्यात आले आहेत. या आदेशामुळे 29 वर्ष 9 महिन्यांपासून असणारी प्रतीक्षा संपली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या या निर्णयाने लिंगनूर दुमाला ग्रामस्थांना जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन वर्षाची भेट ठरली आहे.
       मौजे लिंगनूर दुमाला येथील गायरान गट क्रमांक 120 क्षेत्र हे. 7.93 आर मध्ये उप विभागीय अधिकारी करवीर यांच्याकडील क्र एल.क्यू.एन./वशी/87/1990, दि. 31 मार्च 1990 रोजीच्या आदेशाने एकूण 200 भूखंड मंजूर झाले. 50x30 चौ.फू. अशी लांबी व रुंदी आहे. त्यामधील 49 भूखंड मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना मोफत वाटप करण्यात आले आहे. उर्वरित भूखंड कब्जेहक्काची रक्कम भरुन घेवून मंजूर करण्यात आले आहेत.
          या भूखंड धारकांची नोंद 7/12 वर अद्याप झालेली नाही. 7/12 वर गायरान अशी नोंद दिसून येत आहे. या बाबत लिंगनूर तलाठी यांनी मंजूर भूखंडाची सनद प्राप्त करुन सादर केल्या. वाटप भूखंडावर धारकांनी बांधकामे केली आहेत. परंतु त्यांची नावे मूळ आदेशाप्रमाणे 7/12 वर दाखल झाली नाहीत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
          200 पैकी 164 भूखंडावर भूखंडधारकांनी कब्जेहक्काची रक्कम भरली असल्यास अशा सर्व कागल गावच्या हद्दीत भूखंड क्रमांक 1,2,3,19,20,21 व 37 आणि यापूर्वी शर्तभंग नियमित केलेले भूखंड क्रमांक 28,112,126 व 109 असे एकूण 12 भूखंड क्रमांक वगळून गावठाण वाढीमध्ये वाटप केलेल्या भूखंडधारकांनी कब्जे  हक्काची रक्कम अद्याप भरली नसल्यास मूळ कब्जेहक्काच्या रक्कमेवर वाटप दिनांकापासून आज अखेर प्राईम लॅंडींग रेट नुसार व्याजाची रक्कम आकारणी करावी, अशी कब्जेहक्काची रक्कम व्याजासहीत वसूल केल्यानंतर भूखंडधारकांची नावे 7/12 वर कब्जेदार नोंद फेरफार नोंदीच्या आधारे करण्याची कार्यवाही करावी.
          मोजणी वेळी क्रमांक 1,2,3,19,20,21 व 37 कागल हद्दीमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. या भूखंडधारकांना शिल्लक भूखंडामधून वाटप न झालेले भूखंड वाटप करण्यात यावेत. मात्र या भूखंडधारकांनी कब्जे हक्काची रक्कम भरली नसल्यास मूळ कब्जेहक्काच्या रक्कमेवर प्राईम लँडींग रेट नुसार व्याजाची रक्कम आकारणी करावी आणि अशी कब्जेहक्काची रक्कम व्याजासहीत वसूल केल्यानंतर भूखंडधारकांची नावे 7/12 वर नोंद करण्याची नियमानुसार कार्यवाही करावी.
          गावठाण वाढीचा मंजूर रेखांकंन व उप अधीक्षक भूमी अभिलेख कागल यांच्याकडील मोजणी नकाशाप्रमाणे क.जा.प. तयार झाल्यानंतर भूखंड निहाय स्वतंत्र 7/12 उतारा तयार करुन सर्व भूखंडधारकांचे स्वतंत्र 7/12 उतारे करण्यात यावेत. ही प्रक्रिया 15 जानेवारी 2020 पूर्वी पूर्ण करुन तसा अहवाल देण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
          अशा प्रकारे हक्कापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील भूखंडधारकांची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सर्व तहसिलदारांना दिले आहेत. 
00000

शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

संत वाङ् मयाच्या सहायाने शिक्षणाचा पाया मजबूत करु -उद्योग खनीकर्म मंत्री सुभाष देसाई






      कोल्हापूर, दि. 28 (जि.मा.का.) : मराठी ही भक्तीची आणि शक्तीची भाषा आहे. शालेय शिक्षणातील मुल्य शिक्षणात संत वाङ् मयाचा समावेश करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. संत वाङ् मयाच्या सहायाने शिक्षणाचा पाया मजबूत करु, अशी ग्वाही उद्योग, खनीकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 
            वारकरी साहित्य परिषदेच्या 8 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्योगमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, वीणा पूजन आणि साहित्य पूजनाने आज करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. अमृतमहाराज जोशी, श्रीमद शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी पाटील, महापौर सूरमंजिरी लाटकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.
            उद्योगमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, हे वारकरी  साहित्य संमेलन राज्याला मार्गदर्शन करेल. संतांच्या परंपरेत जात, धर्म, वर्ण, लहान, मोठा असा भेदभाव न करता ज्यांनी पांडुरंगाचा जयजयकार केला, त्याला महाराष्ट्राने मस्तकी धरला आहे. समाजातील विषमतेवर संतांनी आपल्या कीर्तनातून, भजनातून आघात केला. महाराष्ट्राने साहित्याच्या अभ्यासकांनाही सन्मान दिला आहे, त्यांना मुजरा केला आहे.  महाराष्ट्र शासन ज्ञानोबा, तुकाराम यांच्या नावाने पुरस्कार देवून नेहमीच सन्मानित करते. वृध्द कलाकारांना मानधन देण्याची तरतूद हा एक कीर्तनकार, भजनकार यांचा सन्मान आहे. 
            जीवन भरकटत असताना संतांचे विचारच मानवांना मार्गावर ठेवतात, असे सांगून उद्योगमंत्री पुढे म्हणाले, मराठी भाषा ही भक्तीची आणि शक्तीची भाषा आहे. राज्यातील प्रत्येकाला ही भाषा आलीच पाहिजे. मराठीचा सन्मान कदापीही कमी होवू देणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तात्काळ मिळावा, अशी मागणी प्रधानमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे, ती निश्चित मान्य होईल, असा विश्वास आहे. संतांच्या वाङ् मयाचा  आपल्या शिक्षणाला स्पर्श व्हावा. यासाठी त्याचा समावेश शालेय शिक्षणातील मुल्य शिक्षणात झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. 
            अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. अमृतमहाराज म्हणाले, वारकऱ्यांनी कीर्तनातून आणि भजनातून क्रांतीचे विचार विज्ञान युगापर्यंत पोहचविले. शेख महंमद आणि माणकोजी महाराजांचे वाङ् मय संशोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत यायला हवं  ज्ञानदेव आणि तुकारामांचं नाव घेतलं की, जगातील सगळ्या संतांचं नाव त्यात आलं. जीवनातील विकासात्मक प्रकल्पांचं विषय संत साहित्यामध्ये दिलं आहे.  येणाऱ्या काळात परिवर्तनवादी व्हायला हवं. वर्तमानकाळ वाचक जीवन जगण महत्वाचं आहे, असेही ते म्हणाले. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. ह.भ.प. निवृत्तीमहाराज  नामदास, ह.भ.प. प्रभाकर बोधलेमहाराज, ह.भ.प. भानुदासमहाराज आणि ह.भ.प. उषाताई कांबळे यांना विशेष विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमद शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनीही यावेळी आशीर्वचन दिले. 
            पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव यांनी स्वागत तर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटन सत्राचं आभार ह.भ.प. यादव महाराज यांनी आभार मानले.  कीर्तनकार उषाताई कांबळे यांनी म्हटलेल्या पसायदानानंतर सत्राची सांगता झाली.
0 0 0 0 0 0

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

मायक्रो फायनान्स कंपन्यांबाबत संपर्क करावा




कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील नागरिकांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांबद्दल काही तक्रारी अथवा अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
        तक्रार नोंद करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 18002700317, जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स समन्वयक निलेश गावडे, भ्रमणध्वनी 7028949689 व प्रतिनीधी देवेंद्र शहापूरकर, भ्रमणध्वनी 9167252987 या क्रमांकावर संपर्क करावा.
00000

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

आज काम वाटप समितीची बैठक



कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.) : जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था यांच्यासाठी कामवाटप समितीची बैठक आज शुक्रवार दि. 27 डिसेंबर रोजदुपारी 12.00 वाजता व सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते यांची बैठक दुपारी 1.00 वाजता जिल्हा परिषद जुने सभागृह (कागलकर हाऊस) जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सु.बे.अ./ म.स.स. कामवाटप समितीचे सदस्य सचिवांनी दिली आहे.  
       जिल्ह्यातील जि. प. कडिल सर्व नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते व मजूर सहकारी संस्था यांनी या मिटींगला ज्याच्या नावे सुबेअ व मजूर संस्थाचे जिल्हा परिषदेचे रजिस्ट्रेशन आहे, त्यांनी स्वत: व मजूर संस्थाचे चेअरमन/ सचिव यांनी आपल्या पासबुकासह हजर रहावे, असे अध्यक्ष, सुशिक्षीत बेरोजगार अभियंता/ मजूर सहकारी संस्था कामवाटप समिती तथा अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.
0000




संविधान साक्षर ग्राम अभियानाचा समारोप



कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.) :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत वडणगे येथे  संविधान साक्षर ग्राम अभियानाचा समारोप करण्यात आला.
            या अभियानांतर्गत गावात स्वच्छता अभियान, सांडपाणी व्यवस्थापन, बार्टी तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, कृषी संदर्भात असणाऱ्या योजनेचा कार्यक्रम, स्मशानभूमी येथे वृक्षारोपण, माविम अंतर्गत असणाऱ्या महिला बचत गटांसाठी असणाऱ्या योजनांचा कार्यक्रम, आरोग्य शिबिर, समाज कल्याण अंतर्गत असणाऱ्या योजनांचा कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, व्यसनमुक्ती निमित्त रॅलीचे आयोजन, रक्तदान शिबिर, निबंध स्पर्धा, मानवतेची शिकवण प्रबोधनात्मक कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, संविधान वाचन कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
            कार्यक्रमास प्रांताधिकारी वैभव नावडकर, समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, माजी जिल्हा परिषद सदस्य बी. एच. पाटील, सरपंच सचिन चौगले, उपसरपंच दीपक व्हरगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, जिल्हा समन्वयक आशा रावण, देवी पार्वती शाळेचे मुख्याध्यापक पी. के. पाटील, सर्व शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक,तलाठी जे. डी. पवार ,ग्रामसेवक प्रकाश बागुल, प्रकाश चौगले उपस्थित होते.
            कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून व स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. नावडकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली. जगात भारतीय संविधानाची तोड कोणत्याही राष्ट्रामध्ये नाही त्याचा सर्वांनी अंगीकार करणे अपेक्षित आहे.
            माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. पाटील यांनी संविधान साक्षर ग्राम उपक्रमाचे कौतुक केले. व अशाच पद्धतीचे उपक्रम प्रत्येक गावात राबवावेत असे सांगितले. माध्य. शिक्षणाधिकारी श्री. लोहार यांनी मनोगत करताना संविधानाची आज समाजाला आसणारी गरज सर्व  लोकांनी समजून घेतली पाहिजे व आचरणात आणली पाहिजे व प्रत्येक शाळेमध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
            यावेळी संविधान साक्षर ग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेतील  यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. वडणगे गावचे सरपंच श्री. चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री. सवाखंडे यांनी संविधान साक्षर उपक्रमाचा हेतू विशद केला. कार्यक्रमासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. घाटे  यांनी बार्टीच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी शाहीर श्री. नायकवडी यांनी पोवाडा सादर केला 
            अंगणवाडी सेविका यांनी 'बेटी पढाओ बेटी बचाओ' या उपक्रमाची माहिती देऊन स्त्री भ्रूण हत्येविषयी शपथ दिली. यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीच्या जिल्हा समन्वयक आशा रावण, आभार समतादूत किरण चौगुले व सूत्रसंचालन आर.बी. देवणे यांनी केले.
            कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, विभागीय अधिकारी जागृती गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
00000


मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

चंदगडमधील 50 हजार एकर हेरे सरंजाम जमिनी शेतीप्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग 1 म्हणून पूर्नप्रदान नोंदी करण्याचे निर्देश 47 गावांतील 22 हजार हेक्टरमधील 60 हजार वहिवाटदारांना लाभ सरत्या वर्षाच्या आणि नाताळच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकाऱ्यांचा आणखी एक महत्वपूर्ण निर्णय




कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : चंदगड तालुक्यातील 50 हजार एकर हेरे सरंजाम जमिनी शेतीप्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग 1 म्हणून नोंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गडहिंग्लज उपविभागीय अधिकाऱ्यांना आज दिले. या निर्देशानंतर 18 वर्ष प्रलंबित असणारी अंमलबजावणी पुढील चार आठवड्यात पूर्ण होणार असून 47 गावातील 22 हजार हेक्टर क्षेत्राचा लाभ 60 हजार वहीवाटदारांना होणार आहे.
          मुंबई सरंजाम जहागीर ॲण्ड आदर इनाम्स ऑफ पॉलिटिकल नेचर रिझम्प्शन रूल्स 1952 नुसार जिल्ह्यातील हेरे सरंजाम खालसा करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील 47 गावातील 22 हजार 92 हेक्टर जमिनी (55 हजार 230 एकर) यामध्ये समाविष्ट आहेत. मूळ कब्जेदारांना 1 नोव्हेंबर 1952 पासून नियंत्रीत सत्ता प्रकाराने नवीन व अविभाज्य शर्तीवर पूर्नप्रदान करण्यात आल्या आहेत. मूळ सरंजामदारांना व इतरांना पूर्नप्रदान करण्यात आलेल्या जमिनी वगळून उर्वरित जमिनी वहिवाटदारांना शेतजमीन कमालधारणा कायद्याच्या मर्यादेत नियंत्रीत सत्ता प्रकाराने नवीन व अविभाज्य शर्तीवर देण्याची तरतूद आहे.
          त्यानुसार शिल्लक जमीन निर्गतीबाबत ज्या जमिनी नवीन व अविभाज्य शर्तीवर पूर्नप्रदान करण्यात आलेल्या आहेत, अशा जमिनी बेकायदेशीर हस्तांतरण झालेल्या जमिनी 1 नोव्हेंबर 1952 पासून आजपर्यंत जमीन प्रत्यक्षात कसणाऱ्या व्यक्ती, 1952 नंतर अतिक्रमण करून वहिवाटीत असणाऱ्या व्यक्तींकडून शेतसाऱ्याच्या 200 पट नजराना शासनाकडे भरून अशा सर्व जमिनी शेतीप्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग 1 म्हणून धारण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी 18 डिसेंबर रोजी हेरे येथे ग्रामस्थांची बैठक घेवून अंमलबजावणीबाबत आढावा घेतला असता कार्यवाही करण्यास अक्षम्य दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आले. अशा बहुतांशी सर्व जमिनीवर अद्यापही 'सरकार ' हक्क नमूद आहे. यामुळे जमीनधारक व वहिवाटदारांना जमिनीची सुधारणा करणे, कर्ज काढणे, तारण गहाण देणे, वाटप करणे, हस्तांतरण व्यवहार नोंदणे आदी अडचणींना तोंड द्यावे लागत होते.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी हेरे येथील मूळ सरंजामदार श्री. सावंत-भोसले व वहिवाटदार ग्रामस्थ, सरपंच यांच्याशी थेट संवाद साधून निर्देश दिले. या निर्देशानुसार
* दि. 1 नोव्हेंबर 1952 रोजी हेरे सरंजाम खालसा झाल्यापासून महाराष्ट्र शासन,  महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र. एसपीआर 3893/990/प.क्र.140/ल-4 मंत्रालय 32, 31 मे 2001 शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची खातेदारांची दीर्घकाळ प्रलंबित मागणी पूर्ण होण्यास मदत.
* 7/12 वरील सरकार हक्क कमी होणार आहे.
* भोगवटादार वर्ग 2 बंधन दूर होणार आहे. वाटणी, पोटहिस्सा, कर्ज,
   तारणगहाण, हस्तांतरण यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.
* यापूर्वी झालेले सर्व विनापरवानगरी हस्तांतरण, शर्तभंग नियमानुकुल
    होणार. पूर्नप्रदानानंतर शिल्लक क्षेत्र 'सरकार' हक्कात येणार.
* जमीन पूर्नप्रदान व 200पट शेतसार भरल्यानंतर अर्ज मागणी न करता गावातील      सर्व जमिनी एकाच आदेशाने संगणकीकरणातील हस्तांतरण बंधनातून मुक्त.
* खातेदारांना तहसिलदार, उपविभागीय कार्यालयाकडे हेलपाटे मारावे
    लागणार नाहीत.
* कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही. परिपूर्ण अर्ज तलाठ्याकडे द्यावा
   व पोहोच घ्यावी.
          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला शाहूवाडी तालुक्यातील मौजे मरळे येथील 35 मागासवर्गीय शेतकरी कुटुंबांना कायम मालकी हक्काने जमीन प्रदान करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. सरत्या वर्षाच्या शेवटाला आणि नाताळच्या पूर्वसंध्येला आज हा आणखी एक निर्णय घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी हेरे आणि इतर 46 गावातील  ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे.
00000
         

बेटी बचाओ बेटी पढाओ ही चळवळ लोकसहभागातून यशस्वी करा -शौमिका महाडीक सामाजिक जबाबदारीतून आणि कर्तव्यातून काम करावे- जिल्हाधिकारी







कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : लोकसहभागाशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होत नाही. 'बेटी बचाओ बेटी पढाओ' लोकसहभागातून यशस्वी करा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडीक यांनी तसेच केवळ शासकीय काम म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारातून आणि कर्तव्यातून सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
       जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ आणि बेटी बढाओ या योजनेचा लोगो असणाऱ्या बाहुलीचे लोकार्पण आणि कार्यशाळेचे उद्घाटन  आज जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडीक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महिला व बाल विकास सभापती वंदना मगदूम, आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसुळ, भुयेच्या माजी सरपंच राणी पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील आदी उपस्थित होते.
          महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी यावेळी स्वागत, प्रस्ताविक करून जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराबाबत संगणकीय सादरीकरण केले. श्रीमती महाडीक पुढे म्हणाल्या, देवी लक्ष्मीकडे अर्थ, सरस्वतीकडे विद्या आणि देवी दुर्गेकडे संरक्षण अशी महिलांकडे महत्वाची खाती आहेत. बेटी बचाओ ही लोकचळवळ बनली पाहीजे. ती प्रभावीपणे जिल्ह्यामध्ये राबवावी. महिलांना संरक्षण देण्याची जबाबदारी केवळ पोलीसांची नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील मावळ्यांची आहे. ती खात्री तिला द्या, असे आवाहन त्यांनी केले.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, आपला जिल्हा प्रत्येक क्षेत्रता आघाडीवर असताना मुलींच्या जन्मदर प्रमाणामध्ये पाठीमागे आहे. ही लाजीरवाणी गोष्ट आहे.  मुलगी म्हणजे नकुसा ही भावना बदलायला हवी. कायद्याचा धाक आणि सामाजिक जाणिव यामधून मुलींचे स्वागत व्हायला हवे त्यासाठी कृती कार्यक्रम करा.
          एका मुलीवर किंवा दोन मुलींवर कुटुंब नियेाजन करणाऱ्या कुटुंबाला ताराराणी प्राधान्य कार्ड जिल्ह्यात देण्यात येणार आहे. या कार्डधारकाला कोठेही रांगेत उभे रहावे लागणार नाही. सन्मानाने कार्डधारकाचे स्वागत करून प्राधान्याने त्याला प्रवेश मिळणार आहे. ही योजना राज्यात नव्हे तर देशात प्रथमच आपल्या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
          त्याचबरोबर शासकीय तसेच खासगी शाळा प्रवेशांमध्येही प्रवेश देण्यासाठीही शिक्षण संस्थांना विश्वासात घेवून अशा मुलींना प्रवेश देण्यासाठी कोटा निश्चित केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
          महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी, महिला व बाल विकास समितीच्या सभापती श्रीमती मगदूम आणि राणी पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.  या कार्यशाळेला गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

आपल्या हक्कांसाठी ग्राहकांचा दबाव निर्माण व्हायला हवा -जिल्हाधिकारी दौलत देसाई







कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) :  ग्राहकांना गृहीत धरून वस्तू त्यांच्या माथी मारल्या जातात. आपल्या हितासाठी, हक्कासाठी ग्राहकांचा दबाव निर्माण व्हायला हवा. त्यासाठी जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
       राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भवानी मंडप येथील विविध विभागांच्या जनजागृती केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष सविता भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अरूण यादव उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, ग्राहक दिन हा प्रदर्शनापुरताच मर्यादित राहू नये. ग्राहकांच्या हिताबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी तरच अन्न भेसळ थांबू शकेल. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घरातून पदार्थ आणायला सांगायचे. या पदार्थांची चाचणी करायची. अशा पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी हे पदार्थ ज्या दुकानदाराकडून आणले आहेत त्याच्यासमोर निदर्शने करायचे. केवळ एवढ जरी केलं तरी या चळवळीचा उद्देश सफल होईल. नमुना दाखल जिल्ह्यातील एक-दोन शाळांमध्ये याची सुरूवात व्हावी, असे निर्देश त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले.
          महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यावेळी म्हणाले, ग्राहकांमध्ये त्यांच्या अधिकारांची आणि हक्कांची जाणीव जागृती व्हायला हवी, त्यासाठी जनजागृतीबरोबरच मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिकेही झाली पाहिजेत. श्रीमती सविता भोसले यावेळी म्हणाल्या, विक्रेत्यांच्यासमोर ग्राहकांची निदर्शने झाल्यास त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. जिल्हा ग्राहक न्यायालय 99 टक्के निर्णय हे ग्राहकांच्या बाजूने होतात. ग्राहकांनी स्वत: जागृत झालं पाहिजे.
          श्री. यादव यावेळी म्हणाले, ग्राहक संरक्षण कायदा होवून 34 वर्षे झाली. ग्राहक संघटित न झाल्यामुळे आजूनही तो जागृत झाला नाही. मी फसणार नाही आणि फसवणारही नाही अशी शपथ आजच्या ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपण घेवू. भेसळयुक्त माल विकला जाणार नाही. याबाबत आपण सर्वांनी जागृत राहू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
          अन्न  व औषध प्रशासन, सहाय्यक नियंत्रक वैद्यमापन शास्त्र, भारत गॅस, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, प्रादेशिक परिवहन मंडळ, भारतीय पोस्ट, भारत संचार निगम लि. आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या स्टॉलचे यावेळी उपस्थितांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसिलदार शीतल भामरे -मुळे, अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे-जाधव, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील आदींसह विविध विभागांचे अधिकारी, ग्राहक पंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

इंडियन सराईज ॲक्टनुसार सार्वजनिक संस्थांमधील
स्वच्छतागृहे नागरिकांसाठी -अरूण यादव
इंडियन सराईज ॲक्टनुसार सर्व हॉस्पिटल, हॉटेल अशा सार्वजनिक संस्थांमधील स्वच्छतागृहे, शौचालयांची सुविधा प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, असे सांगून अरूण यादव म्हणाले, या तरतुदीचा जिल्ह्यामध्ये सर्वत्र लाभ देण्यासाठी महापालिका आयुक्त तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी बंधनकारक करावे.


00000


सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

जिल्ह्यात पुढील वर्षासाठीच्या स्थानिक सुट्टया जाहीर



कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) :  कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन 2020 मध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 3 दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.
या स्थानिक सुट्टयांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शुक्रवार दिनांक 26 जून, गौरी गणपती विसर्जन (घरगुती) गुरूवार दिनांक 27 ऑगस्ट आणि धनत्रयोदशी शुक्रवार दिनांक 13 नोव्हेंबर  अशा 3 स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
00000





















इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृती योजना




            कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वी साठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृतीची योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.  
            भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृती योजना इयता 1 ली ते 10 वी  मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू राहील. शिष्यवृत्तीचे दर (प्रतीमाह 10 महिन्यांकरिता) अनिवासी  इयत्तांना 1 ली ते 10 वी 100  रुपये प्रमाणे निवासी इयत्तांना 3 री ते 10 वी  500 रुपये प्रमाणे तसेच तदर्थ अनुदान वार्षिक अनिवासी इयत्तांना 500 रुपये निवासी इयत्तांना 500 रुपये प्रमाणे  राहतील.
योजनेच्या अटी शर्ती - या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ शासनाच्या मान्यता प्राप्त शाळेत शिकत असणा-या विदयार्थ्यांना अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्तीसाठी  विदयार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा वार्षिक 2 लाख 50 हजार रुपये इतकी राहील. विदयार्थी अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्तीचा लाभ बंद करण्यात येईल. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांने तो शिकत असलेल्या शाळेमार्फत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्यांस अन्य मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेची  अमंलबजावणी  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मार्फत करण्यात येईल. शिष्यवृत्तीची  रक्कम संबंधित विद्यार्थ्यांने शाळेत प्रवेश घेतलेल्या दिनांकापासून ते शाळा सोडल्याच्या दिनांकापर्यंत दिर्घ मुदतीची सुट्टी वगळता शैक्षणिक वर्षातील 10 महिन्यांसाठी लागू राहील. (ज्या  विद्यार्थ्यांनी शैक्षणिक  वर्षात उशिरा प्रवेश घेतला असेल किंवा शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी शाळा सोडली असेल असे विदयार्थी वगळता.) एकदा मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचे पुढील शैक्षणिक वर्षामध्ये नुतनीकरण करण्यात येईल. तथापि  मागील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांची किमान 60 टक्के नियमित उपस्थिती असणे अनिवार्य राहील. शिष्यवृत्तीची मंजूर रक्कम विदयार्थ्याच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर जमा करण्यात येईल.
 या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व शाळांनी विदयार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह लवकरात -लवकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,कोल्हापूर कार्यालयात जमा करावेत, असे आवाहनही समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे.
00000