इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाकडून डिसीपीएसधारकांना पावत्या वाटप

 

 

कोल्हापूर दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक अनुदानित शाळांकडील ३१८ डीसीपीएसधारक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन २०२०-२१ मधील जमा रक्कमेच्या पावत्या वाटप करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षक वसुंधरा कदम यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा १० टक्के तर राज्य शासनाकडून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगार रक्कमेच्या 14 टक्के असे एकूण २४ टक्के अशी सुमारे २२ कोटी इतकी रक्कम व्याजासह डिसीपीएस धारक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्या असून या रक्कमेच्या पावत्या कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आल्या आहेत.

डिसीपीएस धारक २९५ कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेले Permanent Pension Account Number (PRAN) 'प्राण किट' यांचे वाटपही कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. प्राण किटच्या माध्यमातून डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांना आपल्या खात्यावर जमा रक्कम व व्याज याचा तपशिल पाहता येणार आहे.

जिल्ह्यातील १०८ कर्मचाऱ्यांची ६७ लाख रक्कमेची वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. याकामी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सहा शिक्षण संचालक सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे सहकार्य लाभले आहे.

0000000

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

 


 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 2 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली आहे.

तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.

अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे-

अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड), तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, चारही स्तरावरील लोकशाही दिनांकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहिल, तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल.

 

 

 

 

चारही स्तरावरील लोकशाही दिनात खालील बाबींशी संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाहीत-

न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर अशा प्रकारचे अर्ज लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत.

लोकशाही दिनापूर्वी करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आपले तक्रार अर्ज करावेत, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

 

ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा उदंड प्रतिसाद

 






 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास कोल्हापूरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला. दि २८ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न होणाऱ्या या ग्रंथप्रदर्शनाचे, कोल्हापुरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक किरण गुरव आणि सोनाली नवांगुळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले .

याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी .टी शिर्के, विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, हे ग्रंथप्रदर्शन सर्वांसाठी खुले असून शाहू महाराजां बद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे.जिल्हावासियांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट देवून याचा लाभ घ्यावा तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेले विशेष ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी एक पर्वणी ठरणार असून करवीरवासियांनी त्याला, ' न भूतो न भविष्यते ' असा प्रतिसाद द्यावा . असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले.

उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. शिर्के व जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह मान्यवरांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध ग्रंथ प्रकाशक व वितरकांच्या स्टॉल्सची पाहणी करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावरील ११० ग्रंथांचे शिवाजी विद्यापीठाचे विशेष दालन तर करवीर नगर वाचन मंदिरातील महाराजांवरील ४० पुस्तके हे या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या ग्रंथ प्रदर्शनात राज्यभरातील सुमारे ५८ प्रकाशक सहभागी झाले असून एकूण ९५ स्टॉल्स लावण्यात आले आहेत. त्याद्वारे या प्रदर्शनात सुमारे ५० हजारांहून अधिक ग्रंथ वाचकांना पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच या प्रदर्शनामध्ये शाहू महाराजांच्या जीवनावरील ४४ प्रकाशित प्रबंध आणि संशोधन उपलब्ध आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या ज्ञान महोत्सवात विविध बुक स्टॉलकडून, वाचकांना पुस्तक खरेदीवर १० ते ४० टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट देण्यात येणार आहे. या संधीचा लाभ वाचकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अध्यात्मिक, क्रीडा, संशोधन, स्पर्धा परिक्षा, ऐतिहासिक कथा - कांदबऱ्या, चरित्रे / आत्मचरित्रे, बाल साहित्य, इंग्रजी साहित्य तसेच पाककृती, आरोग्य, धार्मिक आदी पुस्तकांचा समावेश आहे .

सकाळच्या सत्रात उद्घाटनानंतर जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या ग्रंथ प्रदर्शनाला उपस्थिती दर्शविली . कोल्हापूरवासियांनो ! पुस्तकाचा - मस्तकाशी संबंध जोडण्यासाठी या प्रदर्शनाला येताय नव्हं ! नव्हं - नव्हं, यावंच लागतयं !

00000

 

रविवार, २४ एप्रिल, २०२२

अपूर्व उत्सहात अल्ट्रा रन मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ

 








कोल्हापूर दि.24 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा प्रशासन , रगेडियन स्पोर्ट्स क्लब व कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने ' छ . शाहू स्मृती शताब्दीनिमित्त 'अल्ट्रा रन' मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पोलीस ग्राउंड येथे झेंडा दाखवून उद्घाटन केले .

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले , या स्पर्धेत सुमारे ३ हजाराहून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून .या स्पर्धेद्वारे 'सदृढ कोल्हापूर - निरोगी कोल्हापूर ' ही ओळख जगात निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करून, प्रत्येक कोल्हापूरकराने फिटनेसकडे लक्ष दयावे असा आशावाद व्यक्त केला.

स्त्री आणि पुरुष गटात ही स्पर्धा घेण्यात आली आहे , स्पर्धकासाठी 5,10,21,42 आणि 50 किमी इतक्या वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये ही रनिंग स्पर्धा घेण्यात आली आहे . शाहूं महाराजांचे मल्लविद्या ,मल्लखांब या मर्दानी खेळाबद्दल असणारे प्रेम तसेच सुदृढ आरोग्यासाठी खेळाचे महत्व , महाराष्टातील खेळाडूंसह बाहेरील राज्यातून येणाऱ्या खेळाडूंना या निमित्ताने अनुभवता येईल .शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व देणाऱ्या शाहूंच्या विचारांचा संदेश या निमित्ताने संपूर्ण भारतात पोहचेल.

ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना पदक (मेडल ) देवून आणि विजेत्या खेळाडूंना स्मृतीचिन्ह ( ट्राफी ) देवून गौरविण्यात येणार आहे.

याप्रसंगी योगेश जाधव , ध्रुव मोहिते , विश्वजय खानविलकर , फुटबॉलपटू अनिकेत जाधव आदी उपस्थित होते .या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुढारी टोमॅटो एफ एम ,एस जे आर टायर्स ,आणि वायू डाईन टेक अप यांचे सहकार्य लाभले .

 

-         पहाटेच्या सुमारास आल्हाददायक वातावरणात व अपूर्व उत्साहात स्पर्धेला प्रारंभ .

-         छोट्या चिमुकल्यांपासून आबालवृद्धांचा यामध्ये सहभाग .

-         माजी आ . चंद्रदीप नरके , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प ) मनिषा देसाई यांचाही या मॅरेथॉनमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग .

-         ५ कि .मी. अंतराच्या गटात दिव्यांग बांधवांचाही लक्षणीय सहभाग .

-         या मॅरेथॉन स्पर्धेसाठी संयोजकांकडून नेटके आयोजन .

 

000000

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

 


 

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे दि. 10 ते 20 मे दरम्यान दोन सत्रात आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये जास्तीत-जास्त मुला-मुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.       

शिबीरामध्ये कुस्ती, योगासन, बुध्दीबळ, टेबल टेनिस, जलतरण, फुटबॉल, हॉकी, नेमबाजी शिवाजी स्टेडीयम, कोल्हापूर येथे व नेमबाजी सकाळी 6.30 ते 9 वाजेपर्यंत व सायं. 4 ते 6 वाजेपर्यंत या खेळाचे क्रीडा प्रशिक्षण शिबीर होणार आहे. खेळाडूंना अनुभवी व राष्ट्रीय दर्जाचे क्रीडा मार्गदर्शन व प्रशिक्षक यांच्याकडून केले जाणार आहे. शिबीराकरिता वरील प्रत्येक खेळातील 8 ते 14 वयोगटातील प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या 25 मुले व 25 मुली अशा एकूण 50 प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येईल. सहभागी प्रशिणार्थीं खेळाडूंना क्रीडा गणवेश, (टी शर्ट, शॉटस) अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडीयम, कोल्हापूर येथील राज्य क्रीडा मार्गर्शक उदय पवार-9890770649, प्रवीण कोढंवळे-9823792879 व रविभूषण कुमठेकर-9403570358 यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. साखरे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करावेत -सहायक आयुक्त विशाल लोंढे

 


 

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना ‘राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टलची’ माहिती होण्यासाठी जास्तीत जास्त पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी National Portal For Transgender Persons या वेबसाईटला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच तक्रारीसंदर्भात तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे.

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत, विभाग ६ व ७ नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची तजविज आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी National Portal For Transgender Persons या वेबसाईटवर भेट देवून Apply Online यावरती युजर आयडी व पासवर्ड तयार करून सर्व माहिती भरावी. तसेच ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे संलग्न करावीत, असेही श्री. लोंढे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

मंगळवार, १९ एप्रिल, २०२२

ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती महाराणी ताराराणींचा रथोत्सव संपन्न राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाची सुरुवात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती

 







कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): फुलांच्या पाकळ्यांनी घातलेल्या पायघड्या.. ठिकठिकाणी काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या.. चित्तथरारक व रोमांचकारी मर्दानी खेळ आणि  ढोल-ताशांचा गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती ताराराणी महाराणी की जय! राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय! अशा घोषणांनी दुमदुमणारा आवाज आणि अभूतपूर्व उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज व करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव पार पडला..

 राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त' लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाला सोमवारी भवानी मंडपातून रथोत्सवाने सुरुवात झाली.  छत्रपती शिवाजी महाराज व करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव ढोल ताशांच्या गजरात शाही लवाजम्यासह संपन्न झाला. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांसह पालकमंत्री सतेज पाटील यांनी रथ ओढून रथोत्सवाला प्रारंभ झाला. पारंपरिक लवाजम्यासह हा रथ भाविकांनी ओढून मार्गस्थ केला.. यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरु डॉ. पी.एस.पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा अविस्मरणीय रथोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. भवानी मंडप- महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल- मिरजकर तिकटी- बिनखांबी गणेश मंदिर- महाद्वार रस्ता- महाद्वार चौकात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराकडून पुढे- गुजरी - भाऊसिंगजी रस्ता- नगारखाना मार्गे पुन्हा भवानी मंडप मार्गाने रथोत्सव संपन्न झाला. अभूतपूर्व उत्साहात साजरा झालेल्या रथावर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

      छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमान आणि त्यांच्या कार्याचा वारसा आपल्या प्रजेतही रुजावा व वाढावा यासाठी शिवराय आणि महाराणी ताराराणी या देवतुल्य व्यक्तिमत्वांच्या समारंभांना धार्मिक उत्सवाचे स्वरूप देऊन १९१४ साली राजर्षी शाहू महाराजांनी रथोत्सव केला. जोतिबा यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा रथोत्सव संपन्न होतो. याच रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा  रथोत्सव सुरु केला. कै. नानासाहेब यादव यांनी सांगितलेल्या आठवणी नुसार हा रथोत्सव म्हणजे फक्त एक धार्मिक सोहळा नव्हता, तर करवीर संस्थानचे एक लष्करी संचलनच असायचे. सर्व शाही लवाजम्यासह होणारा हा रथोत्सव करवीरनिवासिनीच्या रथाच्या मार्गानेच होत असे.

00000

सेवा रुग्णालयात 21 एप्रिल रोजी मोफत आरोग्य मेळावा

 


 

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग आयोजित भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन गुरुवार दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सेवा रुग्णालय, लाईन बाझार, कसबा बावडा, येथे करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये ॲपल हॉस्पिटल, कॉन्टाकेअर आय हॉस्पिटल, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडीक ॲन्ड ट्रॉमा, सेवा रुग्णालय, लाईन बाझार ही रुग्णालये सहभागी होणार आहेत.

           मेळाव्यामध्ये पात्र लाभार्थींना डिजीटल हेल्थ आयडी व आयुष्यमान भारत कार्ड तयार करुन दिले जाणार आहे. यासाठी पासपोर्ट साईज दोन फोटो, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, आधार कार्ड यांचे मूळ कागदपत्र व त्यांच्या दोन प्रती झेरॉक्स व आधार लिंक मोबाईल आवश्यक आहे. याबरोबर सर्व रोग मोफत तपासणी तज्ञ डॉक्डरांमार्फत होणार आहे. उदा. ह्दयरोग, मधूमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनीचे आजार, डोळ्याचे आजार (मोतीबिंदू), हाडांचे आजार, गरोदर माता व लहान मुलांचे आजार, कान-नाक-घसा, दातांचे आजार, क्षयरोग, कुष्ठरोग, एचआयव्ही, आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार व आहाराबाबत मार्गदर्शन केले जाणार  आहे.

          शिबीरामध्ये रक्त, लघवी, एक्सरे, ईसीजी व इको या तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत मोफत केल्या जाणार असून याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांनी केले आहे.

0000000

शाहूपुरीतील मे. सह्याद्री ऑटोमोबाईल काळ्या यादीत वितरकांकडून यंत्र/अवजारे खरेदी न करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): कृषि विभागाकडून विविध कृषि यांत्रिकीकरण योजनेमधून ट्रक्टर, पॉवर टिलर व अन्य अवजारे खरेदीकरिता अनुदान अनुज्ञेय आहे. मे. सह्याद्री ऑटोमोबाईल, शाहूपुरी यांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून या वितरकाकडून यंत्र/ अवजारे खरेदी केल्यास ते अनुदानास पात्र राहणार नाहीत. या फर्ममधून ट्रॅक्टर, पॉवर टिलर अथवा अन्य कृषि अवजारे खरेदी केल्यास या अवजारे/यंत्र यांना अनुदान मंजूर केले जाणार नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

 केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थांकडून तपासणी केलेल्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर व अवजारांची यादी farmech.dac.gov.in या पोर्टलवर वेळोवेळी अद्यावत करण्यात येते. या यादीमध्ये समाविष्ट असलेली किंवा ट्रॅक्टर, पॉवर टिलर वगळता इतर अवजारांच्याबाबतीत केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेकडील वैध तपासणी अहवाल उपलब्ध असलेल्या अवजारांनाच कृषि विभागाकडील यांत्रिकीकरणाचे विविध योजनांमधून अनुदान अनुज्ञेय आहे. जिल्ह्यामधील मे. सह्याद्री ऑटोमोबाइल, शाहूपुरी या वितरकाने या योजना मार्गदर्शक सूचनेस अनुसरुन राबविण्यामध्ये सहभागी न होता चुकीच्या पध्दतीने कामकाज केलेले आहे. यामध्ये त्यांच्याकडून पॉवर टिलर घेतलेल्या शेतकऱ्यांची त्यामुळे फसवणुक झाली आहे.

           

00000

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवारी जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

 


 

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका):  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवार दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा होणार आहे. या मेळाव्यास स्थानिक तसेच इतर मोठ्या शहरातील नामवंत कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. इच्छुक आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य रविंद्र मुंडासे यांनी केले आहे.  

             मुलाखतीस येताना उमेदवारांनी आयटीआय पास गुणपत्रक, आधारकार्डच्या दोन छायांकित प्रतीसह उपस्थित रहावे, असेही श्री. मुंडासे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

बालविवाह होत असल्यास उपस्थितांवर गुन्हा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 


कोल्हापूर,  दि. 19 (जिमाका) : एखादा बालविवाह होत असेल तर या बालविवाहामध्ये उपस्थित सर्व (उदा. मंगल कार्यालयाचे मालक, भटजी, कॅटरर्स, इतर नातेवाईक ) यांच्यावर गुन्हा नोंद करावा.  मंगल कार्यालयात विवाह करण्याआधी मंगल कार्यालयाच्या मालकांनी मुलीचे व मुलाचे वय पूर्ण आहे का ? याची खात्री करूनच विवाह करण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.

चाईल्डलाईन सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 8 एप्रिल रोजी संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, ग्रामीण भागामध्ये बालविवाह झाल्यास गावातील ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, ग्राम बाल संरक्षण समितीचे सर्व सदस्य जबाबदार राहतील. तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनीही बालविवाह होऊ नये याबाबतची जबाबदारी त्यांच्यावर राहील. शहरी भागामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी, नगरसेवक, अंगणवाडी सेविका हे जबाबदार राहतील. बालविवाह घडल्याचे आढळल्यास या सर्वांवर कारवाई करण्यात येईल.

जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे १०९८ या मोफत नंबरचा सर्व लोकांनी वापर करावा. जे कोणीही फोन करणार त्या व्यक्तीचे नाव व सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.  बालविवाह संबंधी जिल्हा पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या पाच ग्राम बाल संरक्षण समितींना "बाल योद्धा" हा पुरस्कारही देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

000000

सोमवार, १८ एप्रिल, २०२२

धान व नाचणी विक्रीकरिता 30 एप्रिल पर्यंत नोंदणी करावी

 


 

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): ज्या शेतक-यांनी हंगाम 2021-22 मध्ये धान (भात) व नाचणी पिकाची रब्बी हंगामात लागवड केली आहे. तशी सातबा-यावर ऑनलाईन रब्बी लागवडीची नोंद आहे व त्यांना त्यांचा माल हमीभाव केंद्रावर विक्री करायचा आहे, अशा शेतक-यांनी दिनांक 30 एप्रिल 2022 पूर्वी विक्रीकरिता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी केले आहे.

 पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान व नाचणी खरेदीकरिता शेतक-यांची एन. ई. एम. एल. पोर्टलद्वारे दि. 11 ते 30 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान (भात) खरेदीसाठी दिनांक 1 मे ते दि. 30 जून 2022 असा कालावधी ठेवण्यात आला असून नाचणी खरेदीसाठी स्वतंत्र सूचना काढण्यात येणार आहे.                                       

सर्व अटी व शर्तीच्या अधिन राहून दिलेल्या कालावधीत हंगाम 2021-22 (रब्बी) मध्ये उत्पादीत केलेला धान व नाचणी विक्रीसाठी नोंदणी करीता शेतक-यांनी आधारकार्ड, वोटींग कार्ड, शेतीचा रब्बी हंगाम 2021-22 मधील रब्बी कालावधीतील धान व नाचणी पिक लागवडीची ऑनलाईन नोंद असलेला डिजिटल स्वाक्षरीचा 7/12, 8-अ व बँक खाते पासबुक इत्यादी संपूर्ण माहितीसह पुढील संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करावी.

 आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ लि; आजरा.

चंदगड ता. शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. तुर्केवाडी, ता. चंदगड,

चंदगड ता. कृषिमाल फलोत्पादन सहकारी खरेदी विक्री संघ मर्या, अडकूर, ता. चंदगड,

राधानगरी तालुका जोतिर्लिंग भाजीपाला व फळे सह खरेदी विक्री संघ लि; पणोरी,

 ता. राधानगरी,

राधानगरी तालुका शेतकरी सह. संघ लि. सरवडे, ता. राधानगरी,

          राधानगरी तालुका शेतकरी सह. संघ लि. सरवडे, ता. राधानगरी, 

          भुदरगड ता. शेतकरी सह. खरेदी विक्री संघ लि. गारगोटी, ता. भुदरगड,

          कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि उद्योग खरेदी विक्री संघ मर्या. बामणी, ता. कागल

          दि महाराष्ट्र स्टेट को- ऑप मार्केटिंग फेडरेशन लि; गोकुळ शिरगांव, कोल्हापूर   

              अधिक माहितीकरिता कृषि उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, श्री शाहू मार्केट यार्ड, कांदा बटाटा लाईन, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही  जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

 

रविवार, १७ एप्रिल, २०२२

लोकसहभागातून ' लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व' यशस्वी करा -पालकमंत्री सतेज पाटील

 





कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने आयोजित करण्यात आलेला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

   जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

  राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने, शासन आणि लोकांच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.. या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कृतज्ञता पर्वच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील यांनी, शाहू मिलच्या ठिकाणी आज रविवारी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी सुरु असलेली साफसफाई आणि इतर कामांचीही त्यांनी पाहणी करुन आवश्यक त्या सूचना केल्या. या पाहणीनंतर त्यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांची माहिती घेतली. 18 एप्रिल ते 22 मे या कालावधीत राबविण्यात येणारे उपक्रम नियोजनबद्धरित्या चांगल्या पद्धतीने राबवा. या सर्व उपक्रमामध्ये, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटना आणि नागरिकांनी उ्स्फूर्तपणे सहभागी होण्याबरोबरच लोकसहभागातून लोकराजा कृतज्ञता पर्व यशस्वी करा, अशा सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीत केल्या.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणि त्यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याबरोबरच त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व आयोजित करण्यात येत आहे. या पर्वांतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम नियोजनबद्धरीत्या राबवा.

लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व आयोजित करताना १८ एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता जुना राजवाडा, भवानी मंडप येथून त्याची सुरुवात होणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार  मालोजीराजे  छत्रपती, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ,  राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, तालीम, मंडळे, विविध सामाजिक संस्था - संघटनांचे  कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.

यासंदर्भातही पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेत, सूचना केल्या.

 जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी, बैठकीत आयोजित उपक्रमांची माहिती देवून प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंदासाठी, संपूर्ण जिल्ह्यात स्तब्धता पाळण्यात येणार आहे. याची माहिती पब्लिक अड्रेस सिस्टीम तसेच गाव पातळीपर्यंत देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी सांगितले. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, संयोजन समितीचे आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड, अजय दळवी, ऋषिकेश केसरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

000000

 

काळम्मावाडी थेट पाईपलाईन कामाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम जलदगतीने पूर्ण करा - पालकमंत्री सतेज पाटील

 





 

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) :-  कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामासाठी गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ घ्या, रात्रंदिवस काम सुरु ठेवा, पण हे काम जलदगतीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामाची पाहणी करुन उर्वरीत अपूर्ण कामांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी, पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता भाग्यश्री पाटील, प्रकल्प सल्लागार विजय मोहिते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या एकूण कामांपैकी साधारण ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. जॅकवेलचे काम प्रगतीपथावर आहे. जॅकवेलसह उर्वरित अन्य सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

 यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी योजनेच्या हेडवर्क्सच्या कामाची पाहणी करुन सद्यस्थितीच्या कामाचा आढावा घेतला. ही योजना मार्गत्वास नेताना येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण करुन योजना मार्गी लावा, अशा सूचना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री श्री.पाटील यांनी केली.

   आजपर्यंत काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे एकूण ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. जॅकवेलचे काम मे अखेर पूर्ण होण्यासाठी नियोजन करा तसेच त्यानंतर योजनेच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यासाठी नियोजन करावे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

 डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, प्रकल्प अधिकारी व ठेकेदारांसोबत दर आठवड्याला बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल.

     हर्षजीत घाटगे म्हणाले, प्रकल्पाचे काम गतीने सुरु असून वेळोवेळी भेट देऊन कामाचा आढावा घेण्यात येत आहे.

 यावेळी प्रकल्प अभियंता राजेंद्र माळी म्हणाले, हे काम युद्धपातळीवर सुरु असून जॅकेवेलचे २५ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर पाण्याच्या टाकीचे काम ९७ टक्के झाले आहे. तर या योजनेच्या एकूण ५२.९७ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याच्या कामापैकी ५२ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. महावितरणचे २७ किलोमीटरचे काम मे अखेर पूर्ण होईल, अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

शनिवार, १६ एप्रिल, २०२२

276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव विजयी घोषित

 




 

कोल्हापूर, दि. 16(जिमाका): 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव यांना 19 हजार 307 मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले.

विजयी उमेदवार जयश्री जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक नारायण स्वामी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कापसे, संतोष कणसे, रंजना बिचकर आदी उपस्थित होते.

विजयी उमेदवार श्रीमती जाधव यांना प्रमाणपत्र देतेवेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री जाधव यांना 97 हजार 332 तर भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना 78 हजार 25 इतकी मते मिळाली.

उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते खालीलप्रमाणे-

 

अ.क्र.

उमेदवाराचे नाव

पक्ष

मिळालेली मते

1

जाधव जयश्री चंद्रकांत (आण्णा)

इंडियन नॅशनल काँग्रेस

97332

2

सत्यजीत (नाना) कदम

भारतीय जनता पार्टी

78025

3

यशवंत कृष्णा शेळके

नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)

326

4

विजय शामराव केसरकर

लोकराज्य जनता पार्टी

165

5

शाहीद शहाजान शेख

वंचित बहुजन आघाडी

469

6

देसाई सुभाष वैजू

अपक्ष

98

7

बाजीराव सदाशिव नाईक

अपक्ष

66

8

भोसले भारत संभाजी

अपक्ष

43

9

मनिषा मनोहर कारंडे

अपक्ष

49

10

माने अरविंद भिवा

अपक्ष

58

11

मुस्ताक अजीज मुल्ला

अपक्ष

96

12

मुंडे करुणा धनंजय

अपक्ष

134

13

राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक

अपक्ष

114

14

राजेश सदाशिव कांबळे

अपक्ष

111

15

संजय भिकाजी मागाडे

अपक्ष

233

16

नोटा

-

1799

17

रिजेक्टेड

-

36

000000