इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधेसाठी तांत्रिक सल्लागार संस्था नेमण्यात येणार




            कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : जिल्हाधिकारी कार्यालय व 12 तहसिलदार कार्यालयामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा स्थापन करण्यात येणार आहे. सुविधा स्थापन करण्यासाठी तांत्रिक सल्लागार संस्था नेमण्यात येणार असून इच्छुक तांत्रिक सल्लागार संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यानावे दि. 11 नोव्हेंबर 2019 पूर्वी सादर करावेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.
         तांत्रिक सल्लागार संस्थेस व्हिडीओ कॉन्फरन्स संदर्भातील कार्यालयीन इन्फ्रास्ट्रक्चरच्या तांत्रिक बाबी लक्षात घेवून निविदा प्रसिध्द करण्यापासून व्हिडीओ कॉन्फरन्स स्थापन करुन कॉन्फरन्स चालू होईपर्यंत सर्व कामकाम दोन महिन्यात पूर्ण करण्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहे. सल्लागार संस्थेस एकत्रित मानधनाची अंदाजीत 1 लाख 50 हजार रुपये इतकी तरतुद करण्यात आली आहे.  अर्ज तांत्रिक व वित्तीय अशा दोन स्वतंत्र लिफाफ्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे.
            तांत्रिक लिफाफा- संस्था नोंदणीकृत असावी व संस्थेकडे विषयांकित बाबीचे किमान 2 तज्ञ सल्लागार असावेत. सल्लागार संस्थेकडे सदर कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. तसेच त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. वैयक्तिक अर्जदार या कामासाठी पात्र असणार नाही. संस्थेकडील तज्ञ मनुष्यबळाच्या व्यक्तींची शैक्षणिक पात्रता बीई/बीटेक, एमसीए व समकक्ष असणे आवश्यक आहे.नमूद केलेले कामकाज दोन महिन्यात पूर्ण करण्यास तयार असल्याचे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे.
            वित्तीय लिफाफा- यामध्ये संस्थेने काम करण्याचे दरपत्रक द्यावे. दोन्ही लिफाफ्यांपैकी तांत्रिक लिफाफा प्रथम उघडला जाईल व पात्र संस्थेचा वित्तीय दरपत्रकाचा लिफाफा उघडून, लघुत्तम निविदाकारास कामासाठी सल्लागार संस्था म्हणून नेमण्यात येईल. तांत्रिक सल्लागार संस्थेचा नेमणुकीबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी यांच्याकडे राहील.


युवकांच्या स्वयंरोजगार निर्मितीला चालनादेण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना कार्यान्वित



            कोल्हापूर (जि.मा.का.) दि. 31 : उद्योग व्यवसाय क्षेत्रात युवक / युवतीसाठी स्वयंरोजगार रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.  ज्यांचे वय 18 ते 45 वर्षे पर्यंत आहे अशा युवक/युवती या योजनेस पात्र आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी कळविले आहे.
            योजनेचे अर्ज maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत. योजनेत राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड खाजगी बॅकांचा समावेश असून सेवा उद्योग घटका करीता रुपये 10 लाख मर्यादा व उत्पादन प्रक्रिया उद्योग घटका करीता रुपये 50  लाख पर्यत प्रकल्प मर्यादा आहे. योजने अंतर्गत प्रवर्ग निहाय 15 ते 35 टक्के अनुदान/मार्जीन मनी अनुज्ञेय आहे.
            या योजने अंतर्गत वयोमर्यादा सर्वसाधारण प्रवर्गासाठी वय 45 वर्षे विशेष प्रवर्गासाठी (अनुसुचित जाती, अनु. जमाती, महिला, अपंग,माजी सैनिक) वयोमर्यादा 5 शिथील करण्यांत आलेली आहे. तसेच शैक्षणिक पात्रताही उत्पादन प्रकल्प मर्यादा 10 लाखावरील 7 वी पास 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी पास पात्रता आहे.
            जिल्हा उद्योग केंद्र (DIC) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ ( KVIB) या यंत्रणेमार्फत राबविण्यात येणार आहे. जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेकडे -शहरी भाग, तालुक्याची मुख्यालये ग्रामीण भाग (ज्या गावाची लोकसंख्या 20000 चे वर आहे) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यंत्रणेकडे - ग्रामीण भाग (ज्या गावाची लोकसंख्या 20000 चे आत आहे) अशी अंमलबजावणी कार्यक्षेत्रे आहेत.
            कर्ज प्रकरणाकरिता आवश्यक कागदपत्रे (आधारकार्ड,जातीचा दाखला (एससी/एसटी करीता),शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला,शैक्षणिक पात्रताचे दस्तऐवज,उद्योजकता प्रशिक्षण घेतले असल्यास तसे प्रमाणपत्र,नियोजित उद्योग/सेवा उद्योगासाठी आवश्यक असणा-या जागेचे दस्तऐवज/भाडेकरार,वचनपत्र व आवश्यकते नुसार इतर कागदपत्रे.
            योजनेच्या अर्जा करिता जिल्हा उद्योग केंद्र अथवा जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ,उद्योग भवन,कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा.                                                                                               
                                                                 



एचआयव्ही विषयी कामगारांच्या जनजागृतीसाठी बैठकीचे आयोजन करा -जिल्हाधिकारी दौलत देसाई



            कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : विविध कारखान्यांमध्ये असणाऱ्या कामगारांच्यात एचआयव्हीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी कामगार आयुक्त, कारखानदार यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
         जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात झाली. जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी सुरुवातीला मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन केले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर यांनी संगणकीय सादरीकरण करून गेल्या तीन महिन्यातील जिल्ह्याचा आढावा दिला. यामध्ये जिल्ह्यातील संसर्गीतांचे प्रमाण कमी होत चालले असून त्यांना नियमित औषधोपचार सुरु आहे. एचआयव्ही संसर्गाबाबत पूर्णपणे गोपनीयता ठेवली जाते. त्याबाबत संबंधितांच्या नातेवाईकांनाही माहिती दिली जात नाही, असेही त्यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, संसर्गीतांना केएमटीच्या बसचा लाभ मिळवून देण्यासाठी महापालिका आयुक्तांना पत्र द्यावे. त्याचबरोबर संग्रामचे काम पोलीस संरक्षणात करण्याबाबत  पोलीस अधीक्षक यांनाही पत्र द्यावे. संजय गांधी योजनेच्या फायद्यासाठी 15 वर्षे रहिवासाची अट शिथिल करण्याबाबत शासनाकडे एक प्रस्ताव पाठवा. औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या कारखान्यातील कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी कारखानदार, कामगार आयुक्त यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करा. कामगारांमध्ये विश्वास निर्माण करुन त्यांना सुविधा पुरवा.
            गोकुळ शिरगाव मॅनिफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांनीही यावेळी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी विविध 9 संघटनांच्या बैठकीमध्ये हा विषय मांडण्याचे अश्वासन दिले. यावेळी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्र
        तृतीयपंथीयांचे जुन्या नावावर आणि जुन्या छायाचित्रावर सद्या मतदान ओळखपत्र आहे. परंतु तृतीयपंथीयांच्या सद्या नाव आणि ओळखही नवी आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत, अशी माहिती श्रीमती शिपुरकर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील अशा सर्व तृतीयपंथीयांची यादी सादर करुन त्याबाबतची माहिती एकत्रित ऑनलाईन भरावी. तृतीयपंथीयांना नव्या नावावर आणि नव्या छायाचित्रासह नवीन मतदान ओळखपत्र दिले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी दिले.

            याबैठकीला डॉ. सुनील कुरुंदवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अभिजीत वायचळ, डॉ. इमरान जमादार, मैत्री संघटनेच्या अंकिता आळवेकर, बी.जी.काटकर, मोटर वाहन निरीक्षक सुभाष देसाई, डॉ. एस.आर.जगताप, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे डॉ. पी.पी.पाटील, अमित गायकवाड, अक्षरा आळवेकर, जयदिप उबाळे, महेश रावळ, इस्माईल शेख, मोहन सातपुते आदी उपस्थित होते.   
           
00000

राष्ट्रीय एकता,अखंडतेचा संदेश देत धावले कोल्हापूरकर लोहपुरूषांचे एकतेचे कार्य प्रेरणादायी - डॉ. देशमुख










       कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देत राष्ट्रीय एकता दौडीच्या निमित्ताने कोल्हापूरकर आज धावले. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकतेचे कार्य नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी यावेळी केले.
       सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ 31 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा होत आहे. आज कोल्हापुरात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त्‍  रन फॉर युनिटी एकता दौड काढण्यात आली.  या एकता दौडीचा शुभारंभ कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलीत करुन तसेच  हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी  राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथही घेण्यात आली
       दसरा चौकात सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस विशेष पोलीस महानिरीक्षक  डॉ. वारके  यांच्या हस्ते पुषपहार अर्पण करुन या एकता दौडीस सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी प्रसाद संकपाळ, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, क्रीडा प्रबोधिनीचे कुस्ती प्रशिक्षक कृष्णा पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस जवान, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थींनी, खेळाडू तसेच क्रीडा प्रेमी जनता उपस्थित होती. 
          दसरा चौकातून सुरु झालेली ही एकता दौड पुढे लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, वाणिज्य महाविद्यालय, टेंभे रस्ता, केशवराव भोसले नाट्यगृह, प्रायव्हेट हायस्कूलमार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे येऊन या एकता दौडीचा समारोप करण्यात आला. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देण्यात या दौडीत देण्यात आला. या एकता दौडीमध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू जयश्री बोरगी आणि राष्ट्रीय धावपटू स्मिता माने यांचा प्रमुख सहभाग तसेच पोलीस बँड  हे या दौडीचे मुख्य आकर्षण होते.  छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची महती सांगण्यात आली. तसेच राष्ट्रगीतांने या दौडीचा समारोप करण्यात आला.      
लोहपुरूषांचे कार्य प्रेरणादायी - डॉ. देशमुख
          या प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकता, एकात्मता आणि अखंडतेचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे. देशात भौगोलिक ऐक्य आणि एकसंघता साधण्याचे ऐतिहासिक काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरात पोलीस संचलन आयोजित करून एकतेचा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
          या प्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, भारत देश एकसंघ ठेवण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले आहे. अशा या भारताच्या लोहपुरुषाचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर हा संपूर्ण देशभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जात आहे. प्रारंभी तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले.                                        
00000


बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

लघु उद्योग घटकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना जाहीर




          कोल्हापूर (जि.मा.का) दि. 30 : जिल्हयातील स्थायीरित्या लघु उद्योग नोंदणी झालेल्या उद्योग घटकासाठी जिल्हा पुरस्कार योजना जाहीर झाली असून यासाठी 15 नोव्हेंबर 2019 पूर्वी अर्ज जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी केले आहे. यशस्वी उद्योग घटकांना रुपये 15 हजार व रुपये 10 हजार रोख, सन्मानचिन्ह, प्रशंसापत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
      पुरस्काराच्या अटी याप्रमाणे- पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षास पात्र लघुउद्योग घटकांना देण्यात येतील उदा.वैयक्तिक मालकास किंवा फर्मच्या भागिदारास किंवा खाजगी मर्यादित कंपनीच्या कोणत्याही संचालकास जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे तसेच उद्योग घटक संचालनालयाकडे/उद्योग खात्याकडे स्थायीरित्या लघुउद्योग म्हणून नोंदणीकृत झालेला असला पाहिजे. मागील दोन वर्षात सलग उत्पादन किमान निव्वळ नफा करत असणारे घटक सदर पुरस्कारास पात्र ठरतील. विहित नमुन्यात पात्र घटकाकडून मागील 3 वर्षाची वर्षनिहाय माहिती अपेक्षित. उद्योग घटकाची सर्वांगीण प्रगती झालेली असावी. उद्योग घटक वित्तीय संस्थेच्या थकबाकीदार नसावा. उद्योग घटकास महाराष्ट्र शासनाचा किंवा केंद्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला नसावा.
विहित नमुन्यातील अर्ज अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. शेळके यांनी केले आहे.
000000


आजपासून जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा



कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने सन 2019-20 या वर्षातील जिल्हास्तर शालेय महानगरपालिकास्तर शासकीय कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली.
       कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकास्तर क्षेत्रातील खेळाडू मुला-मुलींनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे. शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम - कोल्हापूर जिल्हास्तर शालेय शासकीय कराटे  अंतर्गत 14,17 19 वर्षाखालील मुलांसाठी स्पर्धा गुरूवार 31 ऑक्टोबर रोजी 14,17 19 वर्षाखालील मुलींसाठी स्पर्धा शुक्रवार 1 नोव्हेंबर रोजी महात्मा गांधी मैदान, बॅडमिंटन हॉल, कोल्हापूर येथे  आयोजित करण्यात आल्या आहेत.
          कोल्हापूर महानगरपालिका शालेय शासकीय कराटे अंतर्गत 14,17 19 वर्षाखालील मुले मुलींसाठी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी महात्मा गांधी मैदान बॅडमिंटन हॉल येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
          जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील 0231-2645208 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सुधाकर जमादार क्रीडा अधिकारी सांगली यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8208763736 महानगरपालिका क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9579907999 वर संपर्क करावा.
00000