इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ


 


कोल्हापूर, दि. 31 (जिमाका):  जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही. सर्व कार्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे करेन.. अशी शपथ महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतली.

  

राज्यात भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर  या कालावधीत ‘भ्रष्टाचारमुक्त भारत, विकसित भारत’ ही संकल्पना घेऊन दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली. 

 

यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त शपथ घेण्यात आली. 

 

निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी या प्रतिज्ञेसह मा. राज्यपाल आणि मा. मुख्यमंत्री यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विवेक काळे, अपर चिटणीस तथा तहसीलदार संतोष कणसे, तहसिलदार अर्चना कापसे, सरस्वती पाटील, नायब तहसीलदार मनिषा माने, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

000000

 

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

सैन्य भरतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना आवश्यक सोयीसुविधा द्याव्यात -अपर जिल्हाधिकारी किशोर पवार



      कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): कोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान होणाऱ्या  अग्निवीर सैन्य भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना आवश्यक त्या सोयीसुविधा द्याव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी केल्या.

  अग्निवीर सैन्य सैन्य भरती मेळावा नियोजनाबाबत आज अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल विक्रमादित्य सिंह पाल तसेच सैन्य भरती सहायक अधिकारी, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भगवान कांबळे, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर तहसीलदार संतोष कणसे तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी किशोर पवार  म्हणाले, सैन्य भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना पिण्याचे पाणी, ये-जा करण्यासाठी के.एम.टी. बसेसची सोय, तात्पुरती स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने चहा, नाष्टा, भोजनाची सोय होण्यासाठी प्रयत्न करावा. या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची संख्या पाहता गर्दी होवू नये याचे नियोजन करावे तसेच वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था राखावी.

अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती मेळाव्यामध्ये कोल्हापूरसह आसपासचे जिल्हे व गोवा राज्यातील सुमारे 58 हजार उमेदवारांची टप्प्याटप्प्याने जिल्हानिहाय वेळापत्रकानुसार भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने आवश्यक ते नियोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालक कर्नल विक्रमादित्य सिंह पाल यांनी दिली.

 यावेळी सैन्य भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने मैदान व्यवस्था, विद्युत व्यवस्था, उमेदवारांची भोजन व राहण्याची व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, वाहन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळ उपलब्धता आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

00000

 

 

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे - प्रा.डॉ.दीपक भोसले


       कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन सायबर महाविद्यालयाचे प्रा.डॉ. दीपक भोसले यांनी केले. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली. या घटनेला 15 ऑक्टोबर 2022 रोजी 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या दिनाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

         कार्यक्रमास शाहू कॉलेजचे प्राचार्य एल.डी. कदम, हुपरी नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक श्रीमती तातोबा हांडे (तृतीयपंथी), जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे संशोधन अधिकारी सचिन साळे व समाज कल्याण  विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरंग पाटील यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरीत करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.  श्री. साळे व श्री. लोंढे यांनी मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी तर आभार प्रदर्शन समाज कल्याण विभागाचे निरीक्षक डी. एस. पाटील यांनी केले.

00000000


दीपावलीमध्ये छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग सुरु


 कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता व रुग्णांच्या सोयीसाठी दीपावली दरम्यान छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग रविवार दि. २३ ऑक्टोबर व मंगळवार दि. २५ ऑक्टोबर रोजी नियमित वेळेत सुरु राहील. सोमवार दि. २४  व बुधवार दि. २६ ऑक्टोबर रोजी बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे यांनी दिली आहे.

0000000


रोजगार मेळाव्यात 2623 उमेदवारांचा सहभाग

     * 1 हजार 738 उमेदवारांची प्राथमिक व 436 नोकरी इच्छुक उमेदवारांची अंतिम निवड

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्यात 2 हजार 623 बेरोजगार उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवला. रोजगार मेळाव्यात एकूण 3 हजार 251 मुलाखती झाल्या असून त्यापैकी 1 हजार 738 उमेदवारांची प्राथमिक व 436 नोकरी इच्छुक उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. मेळाव्यामध्ये 46 आस्थापनांची 3 हजार 891  रिक्तपदे होती.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य म.शी.आवटे,                                 कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांना रोजगार मेळावा व कौशल्य,रोजगार, नाविन्यता व उद्योजकता या विभागाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी श्रीमती खंदारे यांनी उपस्थित मान्यवर व आस्थापनांचे आभार मानले.

                                                                   0000000


सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

दुध खरेदी-विक्री मधील गैरप्रकार टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांची नोंद करावी - उपनियंत्रक रा.ना.गायकवाड

 

        कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : राज्यातील दुग्ध संकलन केंद्रावर दुध खरेदी-विक्री मधील गैरप्रकार रोखणे व ग्राहकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी ग्राहक हितार्थ दुग्ध संकलन केंद्रांवर दुध मापनासाठी इलेक्ट्रीक तोलन उपकरणांचा वापर करण्यात येतो. त्या ठिकाणी 10 ग्रॅम अचुकतेचे वर्ग -3 असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांची नोंद करावी, असे आवाहन वैधमापन शास्त्राचे उपनियंत्रक रा. ना. गायकवाड यांनी केले आहे

        जिल्ह्यातील सर्व दुध संकलन केंद्रांवर आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही दि. 1 जानेवारी 2023 पूर्वी करावी, असेही आवाहन उपनियंत्रक वैधमापन शास्त्र, कोल्हापूर यांच्याकडून करण्यात येत आहे. अन्यथा आदेशाप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची दुध संकलन करण्यासाठी वापर करणाऱ्या तोलन उपकरणांच्या उपयोगकर्त्यांनी नोंद घ्यावी.

000000

ऊसतोड कामगार ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन -सहायक आयुक्त विशाल लोंढे

 

     

 

           कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : ऊसतोड कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र मिळण्याबाबत नोंदणी करावी, असे आवाहन  समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाले लोंढे यांनी केले आहे.

            राज्यातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील तीन वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांची ग्रामसेवकाने संबंधित गावातील, वस्त्यांमधील, तांड्यामधील व पाड्यांमधील व इतर नोंदणी करावी.

            जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी ओळखपत्र मिळण्याबाबत नोंदणी करण्यासाठी अर्ज स्वत: भरुन अथवा ग्रामसेवक यांच्याकडून सादर करावा. जेणे करुन ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे शक्य होईल. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील ग्रामसेवक यांच्याकडून माहिती घेण्यात यावी अथवा सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारेमाळ, दूरध्वनी 0231/2651318 वर संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

0000000

शेतकऱ्यांना अनुदानित दरात मिळणार महाबीजचा हरभरा शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

 


 

           कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाबीजचे हरभरा बियाणे अनुदानित दरात मिळणार आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एन. जी. इनामदार यांनी केले आहे.

सोयाबीन व भात कापणी व मळणीला सुरुवात झाल्याने रब्बी हंगामाची लगबग दिसून येत आहे. त्या अनुषंगाने शासनातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन योजना जिल्ह्यात कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेमध्ये जिल्ह्याला ४२८ क्विंटल बियाणे वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परमिट वाटप होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेंतर्गत हरभरा (दहा वर्षाआतील वाण) ४५  रुपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे तर ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत हरभरा (दहा वर्षाआतील वाण) ४५ रुपये प्रति किलो व (दहा वर्षावरील वाण) ५२ रुपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे महाबीजच्या वितरकांकडे उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत दहा वर्षाआतील हरभरा फुले विक्रम, राजविजय- २०२, एकेजी ११०९, BGM -१०२१६  व दहा वर्षावरील विजय, दिग्वीजय, विशाल व जॅकी- ९२१८ हे वाण उपलब्ध होणार आहेत.

या योजनेत एका शेतकऱ्याला सातबारा, आधारकार्ड घेऊन एक बॅग वितरित करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असेही श्री. इनामदार यांनी कळविले आहे.

00000000

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

अभय योजना; दंडात 50 टक्के सवलत लाभ घेण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : अभय योजनेतील 50 टक्के दंड सवलतीचा लाभ 30 नोव्हेंबर पर्यत लागू असल्याने जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच गाव नमुना नंबर 7/12 वरील मुद्रांक शुल्क बोजाच्या नोंदी कमी करुन घ्याव्यात, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले आहे.

मुद्रांक शुल्क कमी भरलेल्या रक्कमेवर आकारण्यात येणा-या दंडामध्ये सवलत देण्यासाठी 31 मार्च 2022 पूर्वी ज्या प्रकरणात दंड वसुलीबाबत पक्षकारास/दस्त निष्पादकास किमान एक तरी नोटीस बजावलेली आहे, अशा नोटीस निर्गमित केलेल्या मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांचे अधिनस्त असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रलंबित प्रकरणातील कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कावरील दंड सवलतीसाठी ही अभय योजना लागू आहे.

मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार दस्त निष्पादीत झालेल्या दिनांकापासून कमी भरलेल्या मुद्रांक शुल्क रक्कमेवर दरमहा 2 टक्के  (जास्तीत जास्त चौपट ) दंड अनुज्ञेय आहे.

           या योजनेअंतर्गत दुसऱ्या  टप्प्यामध्ये दि. 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीकरिता दंड सवलत 50 टक्के (दंड रकमेच्या) इतकी देण्यात येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणांनाही मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजना लागू राहील, त्यासाठी संबंधितांना न्यायप्रविष्ट प्रकरण बिनशर्त मागे घ्यावे लागेल व तसे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. दि. 1 एप्रिल रोजी किंवा त्यानंतर दाखल होणा-या नवीन प्रकरणांना अभय योजना लागू राहणार नाही, असेही मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. माने यांनी कळविले आहे.

000000

 

 

'स्टार्ट अप' शिबिरातून जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत -कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के

 





 

तरुणांनी जिद्दीने वाटचाल करुन यशस्वी उद्योजक बनावे

 

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): तरुणांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग करुन उद्योगनिर्मिती करताना अपयश आल्यास खचून न जाता जिद्दीने वाटचाल करुन यशाच्या दिशेने पुढे जावे, असे सांगून प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अशा 'स्टार्ट अप' शिबिरातून जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि शिवाजी शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा च्या दुसऱ्या टप्प्यामधील जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते झाले, या यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, नवउद्योजक कृष्णराज धनंजय महाडिक, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता एम. एस. देशमुख, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता श्रीकृष्ण महाजन, तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रा. डॉ. एस. एन. सपली, रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रकाश राऊत तसेच विभाग प्रमुख, प्राध्यापक, नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणारे नवउद्योजक, विद्यार्थी उपस्थित होते. 

कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करुन स्टार्टअप सुरु करण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. समाजात आढळणाऱ्या बाबींकडे टीकात्मक नजरेतून न बघता त्यातून चांगला बदल घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी सर्वप्रथम आपली मानसिकता बदलून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे.  विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी प्रयत्न करावा, यासाठी विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

            प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, नवकल्पनांवर आधारित स्टार्टअप मध्ये तरुणांचा सहभाग आवश्यक आहे. रस्त्यावरील पालापाचोळा, खराब प्लास्टिक अशा टाकाऊ वस्तूंचा वापर करुन पर्यावरणपूरक नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी पुढे येत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. अशा प्रकारची स्टार्ट अप शिबीरे, यात्रांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या मनातील नव संकल्पनांना मूर्त स्वरुप येइपर्यंत जिद्दीने वाटचाल करायला हवी.

नवउद्योजक कृष्णराज धनंजय महाडिक यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी ते कार रेसर ते उद्योजक होईपर्यंतचा जीवन प्रवास उलगडून दाखविला. विद्यार्थ्यांनी, तरुणांनी ध्येय, चिकाटी ठेवून नवउद्योगनिर्मिती करावी. तसेच खडतर परिश्रमाने आणि जिद्दीने उद्योगधंद्यात यशस्वी व्हावे, असे सांगितले. अनेक व्यक्ती वयाच्या 45 ते 50 व्या वर्षीदेखील उद्योगनिर्मिती करुन यशस्वी उद्योजक बनल्या आहेत. त्यामुळे उद्योग निर्मितीसाठी वय अथवा अन्य कोणत्याही गोष्टीचे बंधन नसून जिद्द, खडतर मेहनत महत्वाची असल्याचे दाखले त्यांनी दिले. केंद्र सरकार आणि राज्य शासन सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगधंद्यासाठी मोलाचे सहकार्य करत असून त्याचा लाभ तरुणांनी घ्यायला हवा, असे सांगून नवउद्योजक बनताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करु, असे त्यांनी सांगितले.

 

प्रास्ताविकातून सहायक संचालक संजय माळी यांनी स्टार्टअप यात्रा सुरु करण्यामागील उद्देश विशद केला. तसेच उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या नवसंकल्पनांना जिल्हा व राज्यपातळीवर आकर्षक बक्षिस देण्यात येणार असल्याचे सांगितले. आभार डॉ. प्रकाश राऊत यांनी मानले.

0000000

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

स्टार्ट अप यात्रा प्रशिक्षण शिबीराचे 14 ऑक्टोबरला शिवाजी विद्यापीठात आयोजन नाविन्यपूर्ण संकल्पना असणाऱ्या व्यक्तींनी नोंदणी करावी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) :  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने शिवाजी विद्यापीठात शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना असणाऱ्या व्यक्तींनी (स्टार्टअप) www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in  या संकेतस्थळावर नवकल्पना नोंदवून शिबीरात आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. 

 

नोंदणीकृत नवकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी तंत्रज्ञान विभाग (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सकाळी 10 वाजता एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र होणार आहे. यात पहिल्या सत्रामध्ये विभागाच्या विविध योजनांची माहिती, स्टार्टअपच्या प्रवासातील टप्पे याबाबत मार्गदर्शन व स्थानिक उद्योजकांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. दुस-या सत्रात दुपारी 12 वाजता सादरीकरणाची संधी देण्यात येईल. नोंदणी केलेल्या उमेदवार, उद्योजकांनी सादरीकरणाच्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. 

प्रत्येक जिल्ह्यामधून अव्वल 3 विजेते घोषित केले जातील. यामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास (कचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणी, उर्जा अशा सर्व क्षेत्रांचा समावेश असेल. ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, इतर कुठलीही समस्या व त्यावरील नाविन्यपूर्ण उपाय यावर सादरीकरण   

अधिक माहितीकरिता जिल्हा  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 येथे संपर्क साधावा. स्टार्टअप यात्रेकरीता वयाची कोणतीही अट नाही.  कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक, विद्यार्थी  व नाविन्यता परिसंस्था यांनी सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा. 

स्टार्टअपच्या नवकल्पना सुचवा बक्षीस मिळवा

सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हास्तरीय पहिल्या क्रमांकाचे 25 हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाचे 15 हजार रुपये, तर क्रमांकाला 10 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्तम  सादरीकरणातून राज्यस्तरावर  निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर प्रत्येक सेक्टर मधून महिला उद्योजिका, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक अशी निवड केली जाणार आहे. त्यांना अनुक्रमे 1 लाख रुपये, 1 लाख रुपये व 75 हजार रुपये अशी 21 बक्षिसे दिली जाणार आहेत.

राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन सत्रे तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स यासारखे लाभ पुरवण्यात येतील.

0 0 0 0 0 0 0

वार्षिक प्रशिक्षण शिबीर : वस्तुंच्या पुरवठ्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

 

 

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक कोल्हापूर, कार्यालयामार्फत दि. 18 ते 25 नोव्हेंबर पर्यंत पन्हाळा येथे वेगवेगळी वार्षिक प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी लागणाऱ्या वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत समादेशक अधिकारी, 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेना पथक, एनसीसी भवन, दुसरा मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर येथे दरपत्रक सादर करावीत, असे आवाहन पथकाच्या समादेशक अधिकाऱ्यांनी केले आहे.

       वार्षिक प्रशिक्षण शिबीर क्र. 326 मध्ये 450 छात्र सहभागी होणार आहेत. या छात्रांसाठी सकाळी न्याहरी, चहा-बिस्कीट, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा-बिस्कीट, संध्याकाळी शाकाहारी व मांसाहारी जेवण प्रति दिन प्रती व्यक्ती याप्रमाणे दरपत्रक मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी 0231-2694582 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रस्ताव सादर करण्यास 14 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

 


                                              

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : एशियन डेव्हलपमेंट बँक व महाराष्ट्र शासन सहकार व पणन विभागांतर्गत मागील वर्षीपासून मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे. मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत 9 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. ब-याच संस्थाना विहीत मुदतीत प्रस्ताव सादर करता न आल्याने इच्छुक संस्थांसाठी शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष घुले यांनी दिली आहे.

 प्रकल्पाचा मुख्य उद्देश पिकांचे काढणीत्तर होणारे नुकसान कमी करणे, साठवणुक क्षमता वाढवणे त्याचबरोबर पायाभुत सुविधा अंतर्गत मुल्य साखळी विकसीत करणे व मागणीनुसार शेतमालाचे मुल्यवर्धन करणे आहे. त्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल उत्पादक संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार, अॅग्रीगेटर व माविम अंतर्गत नोंदणीकृत संस्था यांचेकडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

0000000

ई-आर-1 विवरणपत्र 31 ऑक्टोबर पर्यंत भरण्याचे आवाहन

 


               कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन व राज्य शासन अंगिकृत व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र   31 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन  कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

 सप्टेंबर 2022 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-1 (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकउडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती  (पुरूष/स्त्री एकूण) संकलीत करण्याचे काम चालू आहे. सांख्यिकी विभागाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. ई-आर रिटर्नची सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in  संकेतस्थळ पहावे व  0231-2545677 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत व संपर्क साधावा.

000000

दुधगंगा प्रकल्पावरील विद्युत उपसायंत्र परवान्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : दुधगंगा प्रकल्पावर विद्युत उपसायंत्र परवाना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याकरीता विशेष मोहीम आयोजित करण्यात येत आहे. (प्रथम येईल त्यांना प्रथम या तत्वानुसार) दुधगंगा खो-यातील जास्तीत-जास्त शेतक-यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभाग (उत्तरचे) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.

 दुधगंगा प्रकल्पावरील नदी पातळीपासून दोन्ही तीरावरील लाभक्षेत्र सिमीत उंची पर्यंतचे मर्यादित क्षेत्र ओलीताखाली येणे अपेक्षित आहे. दुधगंगा प्रकल्पाव्दारे सिंचनाखाली येणा-या सर्व वैयक्त‍िक लाभधारक, सहकारी पाणी पुरवठा संस्थांना आमदार प्रकाश अबिटकर यांच्या पुढाकाराने दुधगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील दुधगंगानगर, सरवडे, कागल या पाटबंधारे शाखांच्या कार्यक्षेत्रातील गावांमधील शेतकरी, बागायतदार यांना सिंचनाचे परवाने देण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे.

 मोहिमेची सुरुवात मौजे सरवडे, ता. राधानगरी येथून होत असून, आमदार प्रकाश अबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अर्जदारांना तातडीने त्याच दिवशी परवाने देण्यात येणार आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील मौजे सरवडे येथे  17 ऑक्टोबर रोजी व 19 ऑक्टोबर रोजी मौजे पनोरी येथे व 29 ऑक्टोबर रोजी कागल ता. कागल येथे सिंचनासाठीच्या परवान्यांचे वितरण करण्यात येणार आहे. परवान्यासाठी अर्जदारांचा विनंती अर्ज, 7/12 व 8 अ चे उतारे या कमीत-कमी कागदपत्रांच्या अधारे प्रचलित शासन निर्णयामधील अटी व शर्तीचे अधिन राहून, परवाने देण्यात येणार आहेत.

000000

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना

 


कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन 2022-2023 मध्ये राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. आंबिया बहारात जिल्ह्यात  द्राक्षे, केळी, आंबा व काजू या फळपिकासाठी अधिसुचीत महसुल मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी एच.डी.एफ.सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा म्हणून निवड करण्यात आली आहे.

आंबिया बहार सन 2022-23 मध्ये नमूद फळपिकांकरीता प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता आणि योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत खालीलप्रमाणे आहे.

          द्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 3 लाख 20 हजार रू. दि. 15 ऑक्टोबर अंतिम मुदत. केळी फळपिकासाठी 1 लाख 40 हजार रु., शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता 11 हजार 200 रु., अंतिम मुदत 31 ऑक्टोबर,  आंबा- 1 लाख 40 हजार रु. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता 14 हजार रु. अंतिम मुदत 31 डिसेंबर व काजू या फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख रु. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता 9 हजार रु. व अंतिम मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत राहील.

आंबिया बहारामध्ये अतिरिक्त विमा हप्ता भरून गारपीटीपासून विमा संरक्षण घेता येईल. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची असून कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे नसल्यास अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर तसे घोषणापत्र संबंधित बँकेस/वित्तीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या प्राधिकृत बँका / प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी पतसंस्था / संबंधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधींशी संपर्क साधून अथवा पिक विमा संकेतस्थळ किंवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे विहित प्रपत्रात विमा प्रस्ताव योग्य त्या विमा हप्त्यासह तसेच आवश्यक त्या कागदपत्रांसह विहीत वेळेत सादर करावेत.

अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधार कार्ड/ आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतक-यांचा करारनामा / सहमती पत्र घोषणापत्र आणि बँक पासबुकची प्रत इ. कागदपत्रे सादर करून प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे.

 योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तसेच मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा अथवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा. वरील अधिसूचित फळपिकांच्या नुकसानीची जोखीम विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य त्या योजनेत होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक उमेश पाटील यांनी केले आहे.

000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 13 ऑक्टोबर पासून सुरु

 

     

 

      कोल्हापूर, दि. 11 (जिमाका):  खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GC दि. 12 ऑक्टोबर पर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-GD  दि. 13 ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 13 व 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेतच खिडकी क्र. 9 येथे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली.

      लिलाव पध्दतीव्दारे वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.                                      

      पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी. (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये.

धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही.

पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि.12 व 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.45 ते 2 या कालावधीत कार्यालयात सादर करावा. धनाकर्ष शक्यतो स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच असावा. 

धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहीणे आवश्यक आहे.

एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराकडून सोमवार दि. 17 ऑक्टोबर रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात सकाळी 9 ते दु. 2 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एका पेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव सोमवार दि. 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वा. कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. फक्त अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी  यांनाच लिलावास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल. लिलावास येताना अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे  प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे,  असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पाटील यांनी  कळविले आहे.

000000