इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

मताधिकार जागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा

 

        कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): दीपावली-दिवाळी हा दिव्यांचा सण. जगभरच्या प्राचीन संस्कृतींमध्ये दिवा हे प्रकाशाचे, सकारात्मकतेचे, आशेचे प्रतीक मानले गेले आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळीच्या सणाला जितके अनन्य महत्त्व आहे; तितकेच भारतीय निवडणुकांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला, अन् ओघाने मतदार यादीला. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमसुद्धा. हे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यंदालोकशाही दीपावली स्पर्धा आयोजित केली आहे.

मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दरवर्षी पुनरीक्षण कार्यक्रम राबवत असते. यंदा हा कार्यक्रम १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबवला जाणार आहे. १ नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल. या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वय असलेले नागरिक मतदार यादीत आपलेनाव नोंदवू शकतील. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

     सक्षम लोकशाहीची पहिली पायरी ही मतदार नोंदणी असते, हे लक्षात घेऊन आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना, नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे. यासाठी आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतीकांचा वापर करता येईल. उदा. डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन  इ. वापरता येईल. शिवाय, मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशिल अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावे. चुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या कराव्यात, याकरता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करता येईल.

 

बऱ्याच मतदारांना असे वाटते की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करू शकतो. पण तसे नाही, मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासावेत, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावेत, १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून करता येईल.

       स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धकांनी स्पर्धेचे साहित्य १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6   या दुव्यावर पाठवावे. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये (प्रथम क्रमांक), सात हजार रुपये (द्वितीय क्रमांक), पाच हजार रुपये (तृतीय क्रमांक) आणि दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा. स्पर्धेची आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यंदाची दिवाळी लोकशाहीमय करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

स्पर्धेची नियमावली :

१.     स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत.

२.     स्पर्धकाला आकाशदिवा आणि रांगोळी यांपैकी एका किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दोन्हींचे साहित्य गुगल अर्जामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र विभागात पाठवावे.

 

३.     आकाशदिवा (आकाशकंदील) स्पर्धा :-

अ.  आकाशदिवा तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले असावे.

आ.           लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार याविषयांना अनुसरून तयार केलेल्या आकाशदिव्याचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.

इ.     प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असाव. तीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.

ई.     फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजा, असे अधिकचे काही जोडू नये. 

उ.    आकाशदिवा स्पर्धेसाठी टांगलेल्या आकाशदिव्याची चित्रफीत पाठवावी, जेणेकरून आकाशदिव्याची सजावट चहुबाजूंनी दिसू शकेल. ही चित्रफीत कमीत-कमी ३० सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाचीअसावी.

ऊ.  आकाशदिव्याच्या चित्रफितीची (व्हिडिओची) साज जास्तीत-जास्त ०० MB असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असाव.

ऋ. आकाशदिव्याची चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना,चित्रफितीत कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजा, असे अधिकचे काही जोडू नये. चित्रिकरण करताना सजावटीचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.

ऌ.   आकाशदिवा स्पर्धेंसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित आकाशदिव्याचे तीन फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.

 

४.    रांगोळी स्पर्धा :-

अ.  लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.

आ.           प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असाव. तीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.

इ.     फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजा, असे अधिकचे काही जोडू नये. 

ई.     रांगोळी स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे तीन फोटो पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.

 

५.     आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये घोषवाक्यांचा वापर केला असेल तर गुगल अर्जामध्ये ती घोषवाक्ये लेखी स्वरूपातही पाठवावीत.

६.     आपले फोटो आणि चित्रफीत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6  या गुगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.

७.     स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून संपर्क साधावा.

८.     दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ ते१५ नोव्हेंबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

9. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांच्या बक्षिसांचे स्वरूप प्रत्येकीपुढीलप्रमाणे असेल प्रथम क्रमांक ११ हजार रु., द्वितीय क्रमांक ७ हजार रु., तृतीय क्रमांक ५ हजार रु. व  उत्तेजनार्थ  १ हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे.

     १०. लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयाशी संबंधित साहित्य पाठवणाऱ्या सर्व

स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, विजेत्यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल.

११. आलेल्या साहित्यामधून सर्वोत्तम साहित्य निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.

   १२. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी  स्पर्धकाची असेल.

    १३. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर

प्रसारित केले जाईल.

 

 

   १४. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमांमध्ये आकाशदिवा स्पर्धकांचे साहित्य   

         प्रसारित केले जाईल. तेव्हा उत्कृष्ट आकाशदिवा स्पर्धकांनी आपले साहित्य जपून ठेवावे.  

        त्यासाठी कार्यालय आपल्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधेल.

0000000

 

आदमापूर-लिंगनूर रस्त्याचे काम सात दिवसात सुरु करा काम वेळेत सुरु न झाल्यास कंपनीचा ठेका रद्द करुन ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार - ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ

 





 

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका):  आदमापूर-लिंगनूर रस्त्याचे काम येत्या सात दिवसात सुरु करा. हे काम मुदतीत सुरू न झाल्यास संबंधित कंपनीचा ठेका रद्द करून कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

आदमापुर -लिंगनुर रस्ता कामाची आढावा बैठक मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

          आदमापूर ते लिंगनूर मार्गावर चार विविध कारखाने आहेत. नागरिक, कामगार व शेतकरी यांच्यासह ऊस वाहतूकही या मार्गावर होते. या मार्गावर होणारे अपघात व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आदमापूर -लिंगनूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिल्या. या रस्त्याची प्रलंबित कामे गतीने पूर्ण करावीत. हा रस्ता चांगल्या दर्जाचा करून रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. रस्ता मुदतीत पूर्ण न झाल्यास संबंधित कंपनी मालकावर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी बैठकीत दिला. तसेच रस्त्याच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी  वैयक्तिक लक्ष द्यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

         आदमापूर ते लिंगनूर मार्ग अत्यंत खराब झाला असून या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. यामुळे नागरिकांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता तात्काळ सुरू करून काम लवकरात लवकर काम पूर्ण करून नागरिकांसाठी रस्ता खुला करावा व वेळेत सुरू न झाल्यास कंपनी मालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या भागातील पदाधिकारी व नागरिकांनी केली.

00000000

 

 

◆ आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जिल्हाधिकारी पंधरवड्यात निर्गत लावणार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आयुक्त व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार ◆आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याच्या दिल्या सूचना

 



 



कोल्हापूर, दि. 29 (जिमाका):  आंबेओहोळ प्रकल्पातील 106 प्रकल्पग्रस्तांना जमीन व आर्थिक सहाय्य देणे बाकी आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जिल्हाधिकारी येत्या पंधरवड्यात निर्गत लावण्यासाठी प्रयत्न करतील. आयुक्त व मंत्रालय स्तरावर स्वतः ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पाठपुरावा करणार असल्याचे आज आंबेओहोळ प्रकल्पाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ठरले.

           ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आंबेओहोळ प्रकल्प पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, पुनर्वसन विभागाचे तहसीलदार वैभव लिपारे तसेच संबंधित अधिकारी व पुनर्वसनग्रस्त उपस्थित होते.

            आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील 21 गावांच्या लाभक्षेत्रातील आंबेओहोळ प्रकल्पांतर्गत पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना जमीन व विशेष आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी पुनर्वसन विभागाने युद्धपातळीवर काम करुन त्यांना लवकरात- लवकर न्याय मिळवून द्यावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्रीहसन मुश्रीफ यांनी केल्या.

         मंत्री मुश्रीफ म्हणाले, या प्रकल्पातील 106 प्रकल्पग्रस्तांना जमीन व आर्थिक सहाय्य देणे बाकी आहे. प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित कामांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. या कामी जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, असे त्यांनी यावेळी सांगितले असता प्रकल्पग्रस्तांच्या

समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याबरोबरच या प्रश्नी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

        आंबेओहोळ प्रकल्पांतर्गत एकूण 849 प्रकल्पग्रस्त असून 65 टक्के रक्कम भरलेले 460 प्रकल्पग्रस्त आहेत. 357 प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन घेतले आहे. 255 प्रकल्पग्रस्तांनी आर्थिक सहाय्य तर 87 प्रकल्पग्रस्तांनी जमीन घेतली आहे. तसेच 39 प्रकल्पग्रस्तांनी जमीन व आर्थिक पॅकेज घेतले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

       यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली या प्रमुखांसह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

000000

दिपावली उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना

 

 


कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): दिपावली उत्सव दि. 2 ते 6 नोव्हेंबर-2021 दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरीकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित नाही. उत्सव साजरा करताना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

1)   कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसुल व वन,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्र.DMU/2020/CR92/Dis-1, दिनांक 04/06/2021, सार्वजनिक आरोग्य विभाग आदेश क्र.No. Corona 2021/CR 366/Arogya-5, दिनांक 11/08/2021 तसेच आदेश क्र. No.  Corona 2021/CR 366/Arogya-5,दिनांक 24/09/2021 अन्वये "ब्रेक द चेन" अंतर्गत दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.

2)  कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरी दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.

3)  दिपावली उत्सवादरम्यान कपडे/फटाके/दागदागिने व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात व रस्त्यावर गर्दी होत असते. तथापि, नागरीकांनी शक्यतो गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरीक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन  रावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.

4) दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठया प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करुन  उत्सव साजरा करावा.

5)    सार्वजनिक आरोग्य विभाग आदेश क्र. No. Corona 2021/CR 366/Arogya-5,दिनांक 24/09/2021 अन्वये "ब्रेक द चेन" अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनेनुसार कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठया प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करताना मार्गदर्शक सूचनेमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन,केबल नेटवर्क,फेसबुक इत्यादी माध्यमांव्दारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.

6)     सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ.आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठया प्रमाणात एकत्रित येऊ नये, याची  दक्षता घ्यावी.

7)    सर्वोच्च  न्यायालयाच्या रिट पिटीशन (सिव्हील अपील) क्र.7238/2015 (निर्णय दिनांक 23/10/2018) तसेच सिव्हील अपील क्र.2865-2867/2021 (निर्णय दिनांक 23/10/2018) मधील आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

8)     कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच इकडील कार्यालयाकडून, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे  देखील अनुपालन करावे.

0000000

निवृत्तीवेतनधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी करावी

 


          कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): दरवर्षीप्रमाणे हयातीचा दाखला बँकेमध्ये देण्यासाठी विहीत नमुन्यातील याद्या ज्या बँकेतून निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक निवृत्तीवेतन घेत आहेत त्या बँकेच्या शाखेकडे पाठविण्यात आल्या आहेत. या याद्यांवर दि. 31 डिसेंबरपर्यंत स्वाक्षरी करावयाची आहेत.

       याद्यांवर स्वाक्षरी करताना आपल्या नावासमोरच स्वाक्षरी करावी. जे निवृत्तीवेतनधारक स्वाक्षरी करणार नाहीत त्यांचे माहे जानेवारी 2022 चे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार नाही. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत याद्यांवर स्वाक्षरी करण्याचे आवाहन कोषागार अधिकारी  म.शि.कारंडे यांनी केले आहे.

00000

कर्जमाफीचा लाभ मिळविण्याठी शेतक-यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी

 

      कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळविण्याठी ज्या शेतक-यांची आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया अपूर्ण आहे, अशा शेतकऱ्यांनी यादीनुसार विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड व बचत खाते पासबुक घेवून बँक शाखेमध्ये/ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेच्या अंमलबजावणी मधील अनेक आधार प्रमाणिकरण बाकी असून अनेक तक्रारींचे निराकरण बाकी आहे. या बाबी निकाली लावण्याच्या उद्देशाने १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. व्यापारी बँकांची आजअखेर एकूण ४८ हजार ९१३ शेतकऱ्यांची  यादी ऑनलाईन प्राप्त झालेली आहे. या प्राप्त झालेल्या यादीपैकी ४८ हजार १८९ कर्जखात्यांची आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून यापैकी ४७ हजार ६६५ शेतकऱ्यांची २८३.८६ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम संबंधीत खात्यावर जमा करण्यात आलेली आहे.

या योजनेच्या प्राप्त यादीनुसार अद्यापही पूर्वीच्या ५३० खात्यांचे व नवीन प्राप्त यादीनुसार १९९ अशा एकूण ७२९ कर्जखात्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रीया अद्याप अपूर्ण आहे. ही योजना शासनामार्फत उर्वरीत पात्र कर्जखात्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह प्रसिध्दीसाठी  दिनांक २३ ऑक्टोबर 2021 योजना पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यादीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील कर्जखाती व व्यापारी बँकांकडील कर्जखाती यांचा समावेश आहे.  या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करून घेण्याबाबतचे संदेश त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आले आहेत.

000000

शासकीय कार्यालयीन जागेत तात्पुरत्या स्वरुपात खासगी आधार संच सुरु करण्यासाठी अर्ज करावेत

 


कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ठिकाणामधील शासकीय कार्यालयीन जागेत तात्पुरत्या स्वरुपात खागी आधार संच सुरु करण्याची कार्यवाही  सुरु आहे. दि. 1 नोव्हेंबर  ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत स्वत:चे खागी आधार संच असणाऱ्या इच्छुकक ग्रामपंचायत अथवा आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (टपाल शाखा) येथे समक्ष कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी  केले आहे.

10 डिसेंबर 2021 या अंतिम दिनांकानंतर आलेले कोणतेही अर्ज किंवा कागदपत्रे स्विकारले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना, अटी, शर्ती व इतर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यापूर्वी ज्या अर्जदारांनी खागी आधार संच सुरु करण्याकरिता मागणी अर्ज केलेले आहेत अशा अर्जदारांनी  नव्याने अर्ज करावयाचे आहेत.

0000000

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत कोविड लसीकरणाचे आयोजन

  



               कोल्हापूर, दि. 28 (जिमाका):
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभागअंतर्गत अशोकराव माने पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

        लसीकरण सत्राचे दीपप्रज्वलन अंबपचे जिल्हा परिषद सदस्य मनीषा माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, माने पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य युवराज गुरव, प्राथमिक आरोग्य केंद्र भादोलेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माहेश्वरी उंब्रजकर, आरोग्य सहाय्यक श्री. साळवी, श्री. पाटील, पूजा घाडगे समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांनी या सत्राचे नियोजन केले होते. या सत्रात एकूण 67 विद्यार्थ्यांनी कोविड लसीचा डोस घेतला.

00000000

 

प्रत्येक तालुक्यात लिंक एआरटी केंद्र व रक्त साठवण केंद्रासाठी प्रस्ताव सादर करा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना

 

          कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर एचआयव्ही संसर्गित रुग्णांना एआरटी औषध पुरवठा होण्यासाठी, लिंक्ड एआरटी केंद्र व ग्रामीण भागातील रुग्णांना अत्यावश्यक वेळी रक्ताची कमतरता भासू नये, याकरिता प्रत्येक तालुक्यात रक्त संकलन व साठवण केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावर एचआयव्ही तपासणी किट साठवणीसाठी शीतगृह उपलब्ध करुन देण्याबाबतही त्यांनी सांगितले.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. यावेळी एचआयव्ही – क्षयरोगबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.बर्गे प्रमुख उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा डोंगराळ व दुर्गम तालुक्यांचा जिल्हा आहे. शस्त्रक्रिया किंवा इतर कारणांसाठी रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास तालुकास्तरावर रक्त तातडीने मिळवण्यास अडचणी येतात, यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये रक्त साठवण सेवा उपलब्ध व्हावी, यासाठीचा  प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आल्यास त्या संदर्भात जलद कार्यवाही केली जाईल. एच.आय.व्ही. संदर्भातील औषधे प्रत्येक तालुकास्तरावर उपलब्ध झाल्यास रुग्णांचा त्रास वाचेल. खासगी दवाखाने व प्रयोगशाळा यांनी पीपीपी तत्त्वावर एचआयव्ही तपासणी करण्यासाठी पुढाकार घेऊन, प्रत्येकाने एचआयव्ही संसर्गितांची माहिती जिल्हा एड्स नियंत्रण पथकाकडे दर महिन्याला सादर करावी. जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या सर्व गरोदर महिलांची एचआयव्ही तपासणी करण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर महिलांची तपासणी उद्दिष्टानुसार झाली नसल्यास याबाबत माहिती घ्यावी. जिल्ह्यातील बंद झालेल्या आयसीटीसी व लिंक्ड एआरटी केंद्रांपैकी गरजेनुसार ती पूर्ववत करण्याची कार्यवाही व्हावी. एचआयव्ही संसर्गित रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाची प्रक्रिया सुलभ व्हावी, एचआयव्ही संसर्गित रुग्णांना डायलिसिस सेवा मिळावी, यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी एचआयव्ही-एड्स संसर्गितांची जिल्ह्याची आकडेवारी व सद्यस्थिती सादर केली. नवीन संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

          स्वागत व प्रास्ताविक विनायक देसाई यांनी केले. यावेळी एआरटी विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिविक्षा अधिकारी, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक पूजा सैनी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. दळवी यांच्यासह एड्स विभागाचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000000