इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

आजअखेर 48 हजार 395 जणांना डिस्चार्ज


   कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 302 प्राप्त अहवालापैकी 286 अहवाल निगेटिव्ह तर 8 अहवाल पॉझिटिव्ह (8 अहवाल नाकारण्यात आले).  अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 164 प्राप्त अहवालापैकी 164 अहवाल निगेटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 274 प्राप्त अहवालापैकी 259 निगेटिव्ह तर 15 पॉझीटिव्ह  असे एकूण 23 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 50 हजार 393 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 395 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 255 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

       आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 23 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, हातकणंगले- 2,  शाहूवाडी-1, नगरपरिषद क्षेत्र-3 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15  आणि इतर जिल्हा व राज्यातील-1 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-892, भुदरगड- 1237, चंदगड- 1230, गडहिंग्लज- 1515, गगनबावडा- 154, हातकणंगले-5329, कागल-1685, करवीर-5737, पन्हाळा- 1871, राधानगरी-1254, शाहूवाडी-1364, शिरोळ- 2514, नगरपरिषद क्षेत्र-7524, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 614 असे एकूण 47 हजार 920 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 473 असे मिळून एकूण 50  हजार 393  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 50 हजार 393 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 395 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 743 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 255 इतकी आहे.

0000000


पशुसंवर्धन विभागाच्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण

 



 

कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत 5 फिरत्या पशवैद्यकीय दवाखान्यांचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते चावी देऊन लोकार्पण करण्यात आले.

       यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण, सहाय्यक आयुक्त डॉ. विनोद पवार उपस्थित होते.

 

सोबत – फोटो जोडला आहे.

0000000

जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला मिळण्यासाठी प्रयत्न करू -पालकमंत्री सतेज पाटील सुंदर इमारती बनवून शहराच्या सौंदर्यात बांधकाम विभागाचे योगदान - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 






कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना काळात संस्थात्मक अलगीकरण केंद्र बनविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा वाटा राहिला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. वैद्यकीय रूग्णालय, नवीन प्रशासकीय इमारत अशा कामांसाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. तर, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय अशा सुंदर इमारती निर्माण करून शहराच्या सौंदर्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे योगदान राहिले आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

       बांधकाम भवन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

          पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगली सुसज्ज इमारत निर्माण केली त्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा देतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना भेटून विनंती केली आहे. वैद्यकीय हॉस्पीटल, प्रशासकीय इमारत व अन्य विकासात्मक कामांसाठी जास्तीत जास्त निधी जिल्ह्यासाठी मिळवून आणण्यासाठी प्रयत्न करू. प्रलंबित असणारी कामे पूर्ण करावीत. कोविड काळातही सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगले काम केले त्याबद्दल मनापासून सर्वांचे कौतुक करतो.

          ग्रामविकास मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्याला शोभेल अशी इमारत सार्वजनिक बांधकाम विभागान उभी केली आहे. यापुढेही सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती उभ्या करून सौंदर्यात योगदान दिले आहे. रखडलेली कामे पूर्ण करणे महत्वाचे आहे. विशेषत: खराब रस्ते, पडलेले खड्डे दुरूस्त करावेत. ग्रामीण भागातील रस्त्यांचे नियोजनबद्ध काम करा. जिल्ह्यासाठी निधी आणण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल.

          अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील कामकाजाबाबत आढावा दिला. कार्यकारी अभियंता संजय सोनावणे यांनीही इमारतीबाबत आढावा दिला. यावेळी, मधुकमल कन्स्ट्रक्शन सांगली, मे. विजयलक्ष्मी फर्निसिंग सांगली, ब्रम्हेश इंजिनिअरिंग, वैशाली चौगुले, कोव्हिड योध्दे पांडुरंग पोवार, राहुल माळी, सारिका कुंभार, धनंजय भोसले, किरण हेगडे, संजय माने, अविनाश पोळ, दया लोहार आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

सोबत – फोटो जोडला आहे.

00000000

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

समाज कल्याण विभागाच्या योजनांची चित्ररथाव्दारे प्रसिध्दी

 




कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय):  समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या योजनांचा चित्ररथ जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रचार व प्रसिध्दीसाठी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते , सतीश कोरे व अरूण नाईक उपस्थित होते.

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ त्याबाबतची माहिती अनुसूचित जाती व नवबौध्द घटातील लोकांपर्यंत पोहचविण्याबाबत या जनजागृती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. त्याचा लाभ निश्चितपणे होईल. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये व्हॅनद्वारे ही मोहीम राबविण्यात येत आहे.

000000

पोलीसांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत - निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे

 



          कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : तपासावरील प्रलंबित प्रकरणे पोलीसांनी तात्काळ मार्गी लावावीत. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लवकरात-लवकर होण्यासाठी पोलीसांनी कागदपत्रे समाज कल्याण विभागाला सादर करावीत, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांनी दिली.

       जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात झाली. या बैठकीला पोलीस उप अधीक्षक (गृह) सुनीता नाशिककर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता नसरीन मणेर आदी उपस्थित होते.

          सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. त्यानंतर त्यांनी सविस्तर आढावा सांगितला. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध 1989) ॲट्रॉसिटी अंतर्गत व नागरी हक्क संरक्षण अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या सद्यस्थितीबाबत समावेश होता. जानेवारी महिन्यात एकुण 12 प्रकरणांपैकी 6 मंजूर असून पोलीसांकडील कागदपत्रांअभावी  6 प्रलंबित प्रकरणेआहेत.

          निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलंडे यांनी सर्व 12 प्रकरणांचा आढावा घेतला.ते म्हणाले, उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे वगळता तपासावर प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे पोलीस विभागाने लवकरात लवकर मार्गी लावावीत. दोषारोप पत्र पाठवावे जेणेकरुन पीडितांना अर्थसहाय्य देता येईल.

          आयत्या वेळच्या विषयात ॲट्रॉसीटीचे गुन्हे दाखल करून घेण्याबाबत आलेल्या अर्जांविषयी पोलीस विभागाने योग्य ते सहकार्य करून कार्यवाही करावी. एप्रिल महिन्यात ॲट्रॉसीटी कायद्याच्या जनजागृती आणि  माहितीसाठी सर्व विभाग प्रमुखांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री. लोंढे यांनी सांगितले.

00000

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव

 


 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय):  थकीत मोटार वाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसेससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने अटकावून ठेवलेली आहेत. अशा वाहनांचा लिलाव दि. 15 मार्च रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत ई-लिलाव पध्दतीने  करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.

       यासाठी इच्छुकांनी होम पेजवर Bidder enrollmant ह्या ऑप्शनमध्ये नोंदणी करावी. या ऑप्शनमध्ये भाग घेण्याऱ्यास ऑनलाईन शुल्क 500 रूपये भरावे लागेल. डीपॉझीटसाठी शुल्क धनाकर्ष (डी.डी.) 25 हजार रूपये कार्यालयात जमा करणे बंधनकारक असेल. अयशस्वी लिलावधारकांना डीपॉझीट स्वरूपातील डी डी परत करण्यात येतील. सदरचा डी.डी. ॲकाऊंट ऑफिसर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस कोल्हापूर यांच्या नावे काढण्यात यावा. शासन फी शुल्क 500 रू. शासन जमा करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

 टिप :- www.eauction.gov.in या संकेत स्थळावर दि. 1 मार्च पासून माहिती उपलब्ध राहील.

00000

 

 

 

 

 

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी अर्थसहाय्य

 


 

          कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशीन युनिट स्थापन करण्याकरिता लागणारा निधी हा सर्वसाधारण योजनेतील असल्याने योजनेकरिता जिल्ह्यासाठी एक युनिट मंजूर झाले आहे. तरी सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनीच यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन  जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.वाय.ए.पठाण यांनी केले आहे.   

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशीन युनिट स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संघ / संस्था,  शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा / पांजरपोळ / गोरक्षण संस्था यांना राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. योजनेसाठी संस्थेची निवड करताना याच प्राधान्यक्रमाने निवड करावयाची आहे. 

मुरघास निर्मितीकरिता सायलेज बेलर मशीन युनिटमध्ये सायलेज बेलर, हेवी ड्युटी कडबा कुट्टी यंत्र, (किमान 2 मे.टन प्रति तास), ट्रॅक्टर ट्रॉली, वजनकाटा, हार्वेस्टर व  मशीन शेड यांचा समावेश राहील. सायलेज बेलर हेवी ड्युटी कडबा कुट्टी यंत्र या मशीनरीची खरेदी करणे आवश्यक आहे. योजनेमधून खरेदी केलेल्या मशीनरीची शासनाच्या संमतीशिवाय परस्पर विक्री करता येणार नाही. यासाठी संस्थेस 500 रूपयांच्या मुद्रांकांवर रितसर करारनामा करुन द्यावा लागेल. तसेच विभागाचे अधिकारी भेटीस आल्यानंतर संस्थेने संबंधित अधिकाऱ्यांना मशीनरी दाखविणे बंधनकारक असेल. 

योजनेचा उद्देश मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देणे आहे. मुरघास निर्मितीसाठी कच्च्या मालाचे (हिरवी वैरण) उत्पादन अथवा खरेदी, मजुरी खर्च, इंधन खर्च इतर अनुषंगिक खर्च, मशीनरी दुरुस्ती खर्च संस्थेला स्वत:ला करावा लागेल. या योजनेसाठी प्रति युनिट रुपये 20 लाख खर्चापैकी 50 टक्के म्हणजे रुपये 10 लाख केंद्र शासनाचे अर्थसहाय्य असून उर्वरित 50 टक्के रुपये 10 लाख संस्थेने स्वत: खर्च करावयाचे आहेत. 

संस्थेच्या स्वहिस्सा निधीकरिता संस्था स्वनिधीमधून खर्च करु शकेल अथवा आवश्यकतेनुसार बँकेकडून कर्ज घेऊ शकेल. बँकेकडून कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड करण्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेची असेल.

          योजनेबाबत अधिक माहिती योजनेसाठीचा अर्ज संबंधित तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्या कार्यालयात उपलब्ध असून दि. 10 मार्चअखेर परिपूर्ण अर्ज सादर करावयाचे असल्याचेही श्री. पठाण यांनी सांगितले आहे.

00000

काळभैरव यात्रेनिमित्त गडहिंग्लजमध्ये वाहतूक नियमन आदेश जारी

 


कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा दि. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च अखेर 50 लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होऊन संपन्न होणार आहे. यात्रा सुरळीत, सुसह्य व सुरक्षित होण्याकरिता पोलीस अधीनियम सन 1951 चे कलम 4 अन्वये रहादरी विनीमय अधिकारान्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दि. 28 फेब्रवारी ते 1 मार्च या एक दिवसाच्या कालावधीकरिता वाहतुक नियमन आदेश जारी केले आहेत.

वाहतुक मार्गात केलेले बदल-

कोल्हापूरकडून काळभैरव मार्गे येणारी वाहतुक ही दि. 28 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वा. ते दि. 1 मार्च रोजी रात्री 10 वा. पर्यंत बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक ही सन साईस हॉटेल बहीरेवाडी मार्गे वडरगे रोडने गडहिंग्लजकडे वळवण्यात येणार आहे.

गडहिंग्लजमार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतुक ही गडहिंग्लज- लाखे नगर कमान-शेंद्री-हनिमनाळ, हिटणी (कर्नाटक) मार्गे तवंदी घाट कोल्हापूरकडे वळविण्यात येणार आहे.

00000

पोलीसांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत - निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे

 


          कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : तपासावरील प्रलंबित प्रकरणे पोलीसांनी तात्काळ मार्गी लावावीत. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लवकरात-लवकर होण्यासाठी पोलीसांनी कागदपत्रे समाज कल्याण विभागाला सादर करावीत, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांनी दिली.

       जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात झाली. या बैठकीला पोलीस उप अधीक्षक (गृह) सुनीता नाशिककर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता नसरीन मणेर आदी उपस्थित होते.

          सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. त्यानंतर त्यांनी सविस्तर आढावा सांगितला. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध 1989) ॲट्रॉसिटी अंतर्गत व नागरी हक्क संरक्षण अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या सद्यस्थितीबाबत समावेश होता. जानेवारी महिन्यात एकुण 12 प्रकरणांपैकी 6 मंजूर असून पोलीसांकडील कागदपत्रांअभावी  6 प्रलंबित प्रकरणेआहेत.

          निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलंडे यांनी सर्व 12 प्रकरणांचा आढावा घेतला.ते म्हणाले, उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे वगळता तपासावर प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे पोलीस विभागाने लवकरात लवकर मार्गी लावावीत. दोषारोप पत्र पाठवावे जेणेकरुन पीडितांना अर्थसहाय्य देता येईल.

          आयत्या वेळच्या विषयात ॲट्रॉसीटीचे गुन्हे दाखल करून घेण्याबाबत आलेल्या अर्जांविषयी पोलीस विभागाने योग्य ते सहकार्य करून कार्यवाही करावी. एप्रिल महिन्यात ॲट्रॉसीटी कायद्याच्या जनजागृती आणि  माहितीसाठी सर्व विभाग प्रमुखांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री. लोंढे यांनी सांगितले.

00000

 

तृतीयपंथीयांच्या तक्रार निवारण समितीवर नियुक्तीकरिता संपर्क करण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या /तक्रारी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीवर सदस्य म्हणून नियुक्तीकरिता इच्छुक उमेदवारांनी दि. 10 मार्चपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

समितीमध्ये तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या नामवंत संस्थांमधील दोन तृतीयपंथीय व्यक्ती (त्यापैकी किमान एक ट्रान्सवुमन असणे आवश्यक) व सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती यांची सदस्य म्हणून नियुक्ती करावयाची असून संबंधित इच्छुकांनी आपला बायोडेटा व या घटकांसाठी केलेल्या कामाबाबतच्या माहितीसह दि. 10 मार्चपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी सांगितले आहे.

00000

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

श्री जोतिबा खेटे आयोजित करु नयेत; कमीतकमी मानकरी, पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीस परवानगी -जिल्हाधिकाऱ्यांचे देवस्थान व्यवस्थापन समितीला पत्र

 


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे श्री. जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी/पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे. असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अवर सचिव तथा सचिवांना आज पाठविले आहे.

दरवर्षी श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे होणाऱ्या श्री जोतिबा खेटे कार्यक्रमावेळी भाविकांची/नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर व परिसरात होत असते. यावर्षी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पासून पुढील चार रविवारी श्री जोतिबा खेटे कार्यक्रमावेळी भाविकांची/नागरिकांची क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 29 जानेवारी 2021 रोजीच्या आदेशान्वये जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 28 फेब्रुवारी रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणारे मेळावे कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे राज्यातील कोविड रुग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याबाबत निर्देश देवून त्यांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सुचित केले आहे. त्या अनुषंगाने यात्रा, उत्सव, ऊरुस, इ. चे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

श्री. क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे दि. 28 फेब्रुवारी रोजी पासून पुढील चार रविवार संपन्न होणारे श्री जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु, पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी/पुजारी व भाविक यांच्या उपस्थिती पुजा करण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि, श्री जोतिबा खेटे कार्यक्रमास भाविकांना व नागरिकांना प्रवेश देण्यात येवू नये, असे यात म्हटले आहे.

000000

आजअखेर 48 हजार 373 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1604 प्राप्त अहवालापैकी 1554 अहवाल निगेटिव्ह तर 19 अहवाल पॉझिटिव्ह (31 अहवाल नाकारण्यात आले).  अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 78 प्राप्त अहवालापैकी 78 अहवाल निगेटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 274 प्राप्त अहवालापैकी 242 निगेटिव्ह तर 32 पॉझीटिव्ह  असे एकूण 51 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 50 हजार 337 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 373 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 223 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

       आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 51 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, भुदरगड- 1, चंदगड-2, गडहिंग्लज- 4, गगनबावडा- 2, कागल-1, करवीर-2, शिरोळ- 2,नगरपरिषद क्षेत्र- 2, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 24  इतर जिल्हा व राज्यातील – 10 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-888, भुदरगड- 1237, चंदगड- 1230, गडहिंग्लज- 1510, गगनबावडा- 154, हातकणंगले-5325, कागल-1685, करवीर-5736, पन्हाळा- 1871, राधानगरी-1254, शाहूवाडी-1363, शिरोळ- 2514, नगरपरिषद क्षेत्र-7518, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 580 असे एकूण 47 हजार 865 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 472 असे मिळून एकूण 50  हजार 337  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 50 हजार 337 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 373 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 741 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 223 इतकी आहे.

0000000

 

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान प्रतिबंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

 


 

कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान प्रतिबंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.

शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, बँका, परिवहन कार्यालये व इतर सार्वजनिक ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी धुम्रपान करणे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन/वापर करण्याबाबत तंबाखू नियंत्रण कायदा 2003 (कोटपा 2003) अन्वये निर्बंध करण्यात आलेले आहेत. जनतेने या नियमांचे पालन करावे, जेणेकरून थुंकीच्या प्रसारामुळे इतर आजारांना आळा बसेल.

आदेश संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय/ निमशासकीय/ खासगी/ विविध मंडळे/परिमंडळे/महामंडळे/औद्योगिक/व्यावसायीक/वाणिज्य/शैक्षणिक/वैद्यकीय/रहिवासी क्षेत्र व संकुले/ रेल्वे स्थानके /बस स्थानके/ जल वाहतुक स्थानके/ बंदरे क्षेत्र/ न्यायालयीन संस्था/ देवस्थाने/ बगीचे/ पर्यटन स्थळे/ शॉपिंग मॉल/ जलतरण तलाव/ व्यायाम शाळा/ रस्ते/ बाजारपेठा/ हॉटेल्स इ. संस्था व आस्थापना व सार्वजनिक क्षेत्रांच्या ठिकाणी आवारातही लागू राहतील.

000000