इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ३० जून, २०२२

1 ते 15 जुलै विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यातील 2 लाख 43 हजार बालकांना ओआरएस पाकिटांचे वाटप होणार

 


 

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्हयामध्ये अतिसार नियंत्रण पंधरवडा 1 ते 15 जुलै 2022 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. अतिसारामुळे होणारे बाल मृत्यू शुन्यावर पोहोचविणे हे या मोहिमेचे अंतिम ध्येय आहे. अतिसार ही बालकांच्या आजारामधील एक गंभीर समस्या असून अहवालानुसार देशामध्ये दरवर्षी साधारणत: 5 वर्षाखालील 1 लाख बालकांचा मृत्यू अतिसारामुळे होतो.

अतिसार प्रतिबंधासाठी तसेच जलद व प्रभावी उपचारासाठी या पंधरवड्याअंतर्गत विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे. पंधरवड्यामध्ये 5 वर्षाखालील बालकांना आशावर्करद्वारे घरभेटी देवून ओआरएस पाकिटांचे वाटप करणे व पालकांना प्रात्यक्षिक दाखवून व आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. ओआरएस व झिंक कोपरा 517 ठिकाणी आरोग्य संस्थास्तरावर तयार करण्यात येणार आहे. हात स्वच्छ धुण्याबाबतचे प्रात्यक्षिक शाळा व अंगणवाडीमध्ये देण्यात येणार आहे. ग्राम आरोग्य पोषण दिनी पोषण आहारासंबंधित प्रात्याक्षिक व समुपदेशन करण्यात येईल. तसेच अतिसाराची बालके शोधून उपचार देवून तीव्र अतिसार असलेल्या बालकांना संदर्भित करण्यात येईल. जिल्हा स्तरावर वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, तालुकास्तरावर आरोग्य सहाय्यक पुरुष, आरोग्य सहाय्यिका स्त्री, गटप्रवर्तक व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावर्षी 5 वर्षाखालील 2 लाख 43 हजार 402 बालकांना ओआरएसचे वाटप करण्यात येणार आहे.

कार्यक्षेत्रातील आरोग्य सेविकेचे रिक्त असलेले उपकेंद्र पोहोचण्यास कठीण भाग, डोंगराळ भाग, पुरग्रस्त भाग, स्थलांतर होणारा भाग, भटकंती करणा-या लोकांची वस्ती, वीटभटटी, बांधकाम सुरु असलेला भाग, तात्पुरत्या स्वरुपाच्या झोपड्या, रस्त्यावर राहणारी बालके, मागील दोन वर्षी अतिसाराचे साथ असलेली क्षेत्रे, पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेले क्षेत्र या क्षेत्रांसाठी सुक्ष्म कृती आराखडा तयार करुन या भागातील बालके पूर्णपणे सुरक्षित होतील असे नियोजन केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देशमुख यांनी या कालावधीमध्ये कोविडची साथ सुरु झाल्यास कोविडच्या मार्गदर्शक सुचनांचा वापर करून मोहिमेची अंमलबजावणी करण्याबाबत सुचित केले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी देखील मोहीमेचे काटेकोर नियोजन करुन मोहीम यशस्वी करण्याबाबत सुचना दिल्या.

5 वर्षाच्या आतील बालकांमध्ये अतिसारामुळे होणारे धोके टाळता यावेत व बालकांच्या अतिसाराच्या गंभीरतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागास सहाकार्य करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले.

000000

 

 

 

 

 

‘आधार’ मतदार यादीला जोडण्याची अधिसूचना जारी नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी वर्षातून चार वेळा संधी नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): कोणत्‍याही वर्षी 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्‍टोबर रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार म्‍हणून नोंदणी करण्‍यासाठी अर्ज करू शकतील. या चार तारखांमुळे मतदार यादीतील मतदार संख्‍या वाढेल. यासाठी सध्‍या फक्‍त 1 जानेवारी हीच एक तारीख आहे. त्‍यानंतर 18 वर्षे पूर्ण करणा-या व्‍यक्‍तीला मतदार म्‍हणून नोंदणीसाठी एक वर्ष वाट पाहावी लागते. त्याप्रमाणे 'आधार' मतदार यादीला जोडण्‍याची अधिसूचना जारी झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

            तसेच निवडणूक संबंधी कायदा लैंगिकदृष्ट्या तटस्‍थ करण्‍यासंबंधी पत्‍नी हा शब्‍द हटवून जीवनसाथी हा शब्‍द समाविष्‍ट केल्याने सर्व्‍हीस सेंटर मतदाराची पत्‍नी किंवा पतीला मतदानासाठी उपलब्‍ध सुविधा प्राप्‍त करण्‍याची परवानगी दिली जाणार आहे. केंद्र सरकारने चार अधिसूचना जारी करून मतदार यादीला आधार जोडण्‍यासह, सशस्‍त्र दल किंवा विदेशात भारत सरकार नियुक्‍त व्‍यक्‍तींसाठी निवडणूक संबंधी कायद्याला लैंगिकदृष्ट्या तटस्‍थ करणे आणि युवकांना वर्षातून एकाऐवजी चारवेळा मतदार यादीत नाव नोंदविण्‍याची परवानगी दिली आहे, अशी माहिती श्री. रेखावार यांनी दिली.

            या अधिसूचना मागच्‍या वर्षअखेर संसदेने संमत केलेल्‍या निवडणूक कायदा (दुरुस्ती) अधिनियम (2021) चा भाग आहेत. निवडणूक आयोगासोबत विचार विनिमय करून या चार अधिसूचना जारी करण्‍यात आल्‍या आहेत. दूरवर्ती भागात तैनात सैनिकांना किंवा विदेशातील भारतीय दूतावासात नियुक्‍त कर्मचाऱ्यांना सर्व्‍हीस वोटर मानले जाते. मतदार यादी संकलित माहिती आधारशी जोडता येईल. जेणेकरून एकाच व्‍यक्‍तीचे अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव असण्‍याची समस्‍या दूर होणार आहे, असेही श्री. रेखावार यांनी सांगितले.

000000

जिल्हा नियोजन समितीमध्ये सांख्यिकी दिन उत्साहात साजरा

 



कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): प्रशांतचंद्र महालनोबीस यांचा जन्मदिवस दि. 29 जून हा दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हा नियोजन समिती, जिल्हा सांख्यिकी कार्यालय व इतर आस्थापनेवर कार्यरत सांख्यिकी कर्मचा-यांच्यावतीने जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी चालू वर्षी शाश्वत विकासाकरिता सांख्यिकी ही संकल्पना राबविण्यात आली असून भविष्यातील सांख्यिकीचे महत्व त्यांनी यावेळी विषद केले.

 जिल्हा सांख्यिकी अधिकारी सायली देवस्थळी यांनी महालनोबीस यांच्या कार्याची ओळख करुन दिली. किरण देशपांडे यांनी प्रास्ताविक तर सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्राजक्ता सांळुखे यांनी आभार मानले. 

000000

 

भुदरगड येथे काल 15.4 मिमी पाऊस

 


 

            कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात भुदरगड तालुक्यात सर्वाधिक 15.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 10.45 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 0.8 मिमी, शिरोळ- 2.7 मिमी, पन्हाळा- 2.6 मिमी, शाहूवाडी- 12.6  मिमी, राधानगरी- 2.5 मिमी, गगनबावडा-13.9 मिमी, करवीर- 0.5 मिमी, कागल- 1.5 मिमी, गडहिंग्लज- 2.4 मिमी, भुदरगड- 15.4 मिमी, आजरा- 4.9  मिमी, चंदगड- 6  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

 

बुधवार, २९ जून, २०२२

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याची बेकायदेशीर खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 


कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): कसबा बावडा येथील पाटील गल्लीतील एका इमारतीमध्ये संदिप सिताराम रणदिवे व राजू सिताराम रणदिवे या दोघांनी काही लाभार्थ्यांकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शासनाकडून प्राप्त झालेले धान्य बेकायदेशीरपणे खरेदी करून एकूण १ हजार २८२ किलो तांदूळ व १ हजार ९९८ किलो गहू एवढे धान्य जमा केल्याचे दिसून आले. या बेकायदेशीर कृत्याबद्दल दोन्ही इसमांविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७अन्वये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारे कोणत्याही लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेले शासकीय धान्य कोणालाही बेकायदेशीरपणे विक्री करु नये अथवा कोणीही ते खरेदी करू नये. लाभार्थ्यांना धान्याची आवश्यकता नसल्यास त्यांनी हा लाभ सोडून देण्याबाबत अर्ज सादर करावा. शासकीय अनुदानित अन्नधान्याची बेकायदेशीर खरेदी- विक्री केल्याचे आढळल्यास संबंधितांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिला आहे.

00000

तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 






 

  उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद

  महिला नवउद्योजकांची लक्षणीय उपस्थिती

 

       कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): तरुण- तरुणींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

 

           जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय विभागांच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित 'उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमा' चे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.  यावेळी अल्पसंख्याक विकास महामंडळाअंतर्गत शैक्षणिक कर्ज मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक (जिल्हा विकास) आशुतोष जाधव तसेच विविध विभाग व महामंडळांचे व्यवस्थापक उपस्थित होते.

 

          जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात चांगल्याप्रकारे करण्यात येत असून याला आणखी गती देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिक, उद्योजक, नवउद्योजकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. कर्ज पुरवठा योजनांचा लाभ घेवून औद्योगिक क्षेत्रात प्रगती करा. शासकीय विभाग व महामंडळांच्या सहकार्यातून उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

          प्रास्ताविक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले. आभार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी मानले.

 

  मार्गदर्शन कार्यक्रमाला हजारो नागरिकांची भेट: महिलांची लक्षणीय उपस्थिती 

 

           उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात देण्याच्या उद्देशाने महासैनिक दरबार हॉल येथे ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम’ घेण्यात आला. कार्यक्रमास तरुण-तरुणी, महिला उद्योजकांसह नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            या कार्यक्रमामध्ये विविध विभागांचे माहिती पत्रक, सर्व योजनेचे कर्ज मागणी अर्ज, ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशील व संपूर्ण माहितीसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,कृषी विभाग राज्य स्तर, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान विभाग, जिल्हा रेशीम कार्यालय, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सारथी संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ आदी विभागांनी नागरिकांना विविध कर्ज पुरवठ्याच्या विविध योजनांची माहिती देऊन प्रस्ताव सादर करुन घेतले.

           

0000000

गगनबावडा येथे काल 18.4 मिमी पाऊस

 


 

            कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 18.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 10.45 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 0.3 मिमी, शिरोळ- 0.1 मिमी, पन्हाळा- 1.7 मिमी, शाहूवाडी- 4.2  मिमी, राधानगरी- 10.1 मिमी, गगनबावडा-18.4 मिमी, करवीर- 1.2 मिमी, कागल- 1.5 मिमी, गडहिंग्लज- 0.6 मिमी, भुदरगड- 4.3 मिमी, आजरा- 1.4  मिमी, चंदगड- 2.7  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

मंगळवार, २८ जून, २०२२

मोडीलिपी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रासाठी पुरालेखागार कार्यालयाशी संपर्क साधावा

 


 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : पुराभिलेख संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाची परीक्षा 29 मे 2022 रोजी झाली आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. मोडीलिपी प्रशिक्षण परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर पुरालेखागार, हुजूर रेकॉर्ड इमारत, टाऊन हॉल बागेसमोर येथून कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्रे घ्यावीत, असे आवाहन पुरालेखागारचे सहाय्यक संचालक दिपाली पाटील यांनी केले आहे.

00000

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी लागणाऱ्या वस्तुंच्या पुरवठ्यासाठी दरपत्रक सादर करा

 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : राष्ट्रीय छात्रसेना मुलींचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर क्र. 307 दि. 1 ते 10 जुलै 2022 या कालावधीत एनसीसी भवन कोल्हापूर येथे होणार आहे. पुरवठादारांनी या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी दरपत्रक मुलींचे राष्ट्रीय छात्र सेना पथक, एनसीसी भवन, कोल्हापूर येथील कार्यालयात सादर करावे, असे आवाहन 6 महाराष्ट्र मुलींचे राष्ट्रीय छात्र सेना पथकाचे समादेशक अधिकारी कर्नल एस गणपती यांनी केले आहे.

सर्व प्रकारची धान्ये, तेल, डाळी, मसाल्याचे पदार्थ इ., बेकरी उत्पादने, मटण, चिकन व अंडी, दुध व दुग्धजन्य पदार्थ, पालेभाजी, फळभाजी आणि फळे, स्वयंपाकी, दोन मदतनीस यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहे.

00000

 

सेवा हमी कायद्यानुसार जलसंपदा विभागाच्या दहा सेवा ऑनलाईन

 

 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या सेवा हमी कायद्यानुसार जलसंपदा विभागाने आपल्या खात्यांतर्गत असणाऱ्या दहा सेवा ऑनलाईन केल्या आहेत. या सेवा जलसंपदा विभागाच्या  wrd.mahaonline.gov.inaaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून यापुढे सेवाबाबतचे अर्ज आवश्यक कागदपत्रासहीत ऑनलाईन स्विकारण्यात येणार आहेत. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभाग (उत्तर)चे  कार्यकारी अभियंता सुरेश नाईक यांनी केले आहे.

या दहा सेवांमध्ये पाणीवापर संस्थेस देय पाणी हक्क मंजुरी देणे, पाणीवापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे, बिगरसिंचन पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे, पाणीपट्टी देयक तक्रार निवारण करणे, लाभक्षेत्राचा दाखला देणे, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, कटक मंडळे यांना घरगुती पाणीवापर परवाना देणे, महानगरपालिका, खासगी विकासक, विशेष नगरविकास प्रकल्प यांना घरगुती/ औद्योगिक पाणीवापर परवाना देणे, औद्योगिक प्रयोजनासाठी पाणीवापर परवाना देणे, नदी व जलाशयापासून अंतराचा दाखला देणे व उपसा सिंचन परवानगी देणे या सेवांचा समावेश आहे.

000000

उमेद अभियानामार्फत राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट स्पर्धा 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करावेत विजेत्याला 3 लाख रुपयाचे बक्षीस

 


कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याने या स्पर्धेसाठी व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते व युट्यूब ब्लॉगर यांना सहभागी होता येणार आहे. यासाठी 30 जून 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आणि  प्रकल्प संचालक तथा उमेद अभियानाचे सहसंचालक डॉ. रवी शिवदास यांनी केले आहे.

        राज्यस्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकासाठी प्रथम पारितोषिक ३ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय २ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय १ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह  सोबतच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रात सन २०११ पासून व जिल्ह्यात सन २०१८ पासून इंटेन्सिव्ह पद्धतीने दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या नावाने अंमलबजावणी केली जात असून महिला स्वयं सहायता समूहांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबांच्या जीवनमानात फरक पडला आहे. या यशोगाथाना दृकश्राव्यमाध्यमातून चित्रित करण्यासाठी राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफित निर्मिती स्पर्धा   आयोजीत केली आहे.

          स्पर्धकांनी जिल्हास्तरावर चित्रफित सादर करावी. जिल्हास्तरावर सहभागी एकूण स्पर्धकापैकी उत्कृष्ट ५ स्पर्धकांना जिल्हा कक्षाकडून सन्मानपत्र देण्यात येईल. तसेच त्यांच्या चित्रफिती राज्यकक्षाकडे पाठविण्यात येतील व अंतिम निवड प्रक्रिया पार पडेल. चित्रफितीचा कालावधी जास्तीत जास्त ७ मिनिट असावा.  दर्जा उत्तम (HD) असावा, चित्रफित अप्रकाशित असावी.     

      लघुपट निर्मितीत व्यावसायिक, हौशी, स्वयं सहायता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, यांच्या सह सर्वसामान्य नागरीकांनाही या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. स्पर्धेचे विषय, नियम, प्रवेश अर्ज व इतर माहितीसाठी इच्छुकांनी संबंधित जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद जिल्हा परिषद व संबंधित तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत, समिती यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

           या स्पर्धेमुळे राज्यातील स्वयंसहायता गटांच्या यशकथा दृकश्राव्य स्वरूपात समोर येण्यास मदत होणार आहे.  या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.

000000

 

सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी 1 ते 15 जुलै पर्यंत अर्ज करावेत

 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र असलेला करवीर तालुका वगळून 11 तालुक्यांमध्ये टप्याटप्याने सार्वजनिक/खासगी भागिदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. सघन गटाची स्थापना करण्यासाठी चंदगड तालुक्यातून अर्ज मागविण्यात आले होते. चंदगड तालुक्यातील एकही अर्जह प्राप्त न झाल्याने पात्र लाभार्थ्यांनी दि. 1 ते 15 जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.वाय.ए.पठाण यांनी केले आहे.

सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत तसेच ज्या लाभार्थीकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. कुक्कुट व्यवयासात स्वयंरोजगार निर्मितीची आवड असणारे नवउद्योजकही अर्ज करु शकतात. प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असणारी साधने, सुविधा व व्यवहार्यता पडताळून लाभार्थी निवडण्यात येतील. 

मार्गदर्शक सूचना - योजनेंतर्गत एकूण प्रकल्पाची किंमत रु. 10 लाख 27 हजार 500 पैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाचे 50 टक्के अनुदान असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थी स्वतःचा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभा करु शकतात.  लाभार्थी / अर्जदाराची वयोमर्यादा 18/60 वर्ष राहील. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. सन 2018-19 पासून टप्याटप्याने उपलब्ध होणाऱ्या तरतुदीस अधीन राहून योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांसाठी प्रति तालुका एक प्रमाणे निवड करण्यात येणार आहे. लाभार्थीकडे 2500 चौ. फू. जागा स्वतःच्या मालकीची असावी, तसेच त्या ठिकाणी दळणवळणाची, पाण्याची व विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असावी. प्रकल्प कार्यान्वित करताना शासनाचे अनुदान एकदाच देय असून, त्यानंतर प्रकल्प सुरळितरित्या चालू ठेवून पुढील खर्च संपूर्णपणे लाभार्थीने करावयाचा आहे.

या योजनेंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी लाभार्थींनी बँकेकडून कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड स्वतः लाभार्थीने करावयाची असून कर्ज परतफेडीची जबाबदारी शासनाची राहणार नाही. निवडलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत सघन कुक्कुट गटाच्या कामाचे व कुक्कुटपालनाचे पाच दिवशीय प्रशिक्षण नजिकच्या सघन कुक्कुट विकास प्रकल्पामार्फत घेणे बंधनकारक राहील. पक्षीगृहाचा उपयोग कुक्कुटपालनासाठीच करणे बंधनकारक राहील. कुक्कुट पक्षीगृहाच्या बांधकामासाठी प्रकल्प खर्चापेक्षा जास्त खर्च आल्यास तो लाभार्थ्यांनी स्वतः करावयाचा आहे. लाभार्थीस व्यवसाय किमान तीन वर्ष करणे तसेच शासनास हमीपत्र देणे बंधनकारक राहील. लाभार्थीस पक्षीगृह बांधकाम, लघु अंडी उबवणूक यंत्र, एकदिवशीय पिलांची 20 आठवडे वयाचे अंडयावरील पक्षी, उबवणुकीची अंडी यांची खरेदी तसेच इतर पायाभूत सुविधा शासनाच्या निकषाप्रमाणे करणे बंधनकारक राहील. सर्व बाबींची व कागदपत्रांची पूर्तता करून तसेच पडताळणी झाल्यानंतरच शासन निर्णयात नमूद संबंधित बाबींच्या देय अनुदान जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्यामार्फत लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. लाभार्थीनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती चंदगड यांच्याकडून प्राप्त करुन घ्याव्यात. पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांनी प्राप्त झालेले अर्ज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत लाभार्थी निवडीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याकडे सादर करावेत.

अर्जासोबत फोटो आयडी/आधार कार्ड/ओळखपत्राची सत्यप्रत/बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, लाभधारकाकडील मालमत्ता 7/12 व 8अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8, कुक्कुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्रांची छायांकित सत्यप्रत इ. कागदपत्रे सादर करावीत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, (दूरध्वनी क्रमांक 0231-2662782) कोल्हापूर तसेच पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती चंदगड यांच्याशी संपर्क साधावा.

000000

 

 

 

सोमवार, २७ जून, २०२२

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

 


कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 4 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली आहे.

तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.

अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे

अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड), तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, चारही स्तरावरील लोकशाही दिनांकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहिल. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल.

चारही स्तरावरील लोकशाही दिनात खालील बाबींशी संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाहीत-

न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर अशा प्रकारचे अर्ज लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत.

लोकशाही दिनापूर्वी करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आपले तक्रार अर्ज करावेत, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

 

 

 

गगनबावडा येथे काल 43.1 मिमी पाऊस

 

 

 

            कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 43.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 11.06 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 0.9 मिमी, शिरोळ- 0.5 मिमी, पन्हाळा- 9.9 मिमी, शाहूवाडी- 16.6  मिमी, राधानगरी- 17.9 मिमी, गगनबावडा-43.1 मिमी, करवीर- 4 मिमी, कागल- 8.1 मिमी, गडहिंग्लज- 6 मिमी, भुदरगड- 40.5 मिमी, आजरा- 12.4  मिमी, चंदगड- 17  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

 

शुक्रवार, २४ जून, २०२२

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या शैक्षणिक संस्थांनी अनुदानासाठी 31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावेत -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 


कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊन शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या अनुदान योजनेसाठी संबंधित शैक्षणिक संस्थांनी आपले प्रस्ताव 31 जुलै 2022 पर्यंत जिल्हाधिकारी  कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

 या योजनेच्या अनुदानासाठी (सन 2022-2023) धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल  शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक  प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी परिपूर्ण प्रस्ताव मुदतीत प्रस्ताव सादर करावेत.

00000

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

 

 

 कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी दि. 30 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अल्पसंख्यांक उच्चस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे.

मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयाचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इ. 9 वी, 10 वी व 12 वी तील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होवून  त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल या दृष्टिने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याची डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मदरशांनी दि. 30 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावेत.

000000

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह वसाहतीमध्ये मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

 

 

            कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 26 जून रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह वसाहतीमध्ये लिम्रास ट्रस्ट व सी.पी.आर रुग्णालय यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर, ओम हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत डोळे तपासणी व श्री हॉस्पिटल यांच्यामार्फत मोफत हेल्थ चेकअप, वजन व रक्तदाब तपासणी, सी.बी.सी., बी.एस.एस. व व्हेरिकोज व्हेन्स शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी दिली आहे.

        कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सी.पी.आर.चे डिन डॉ. दीक्षित, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, अति. पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

000000

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेसाठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत -कृषी अधिकारी जालिंदर पांगरे

 

           

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 साठी जिल्ह्याकरिता एकूण रक्कम रु. 350.83 लाखाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमामध्ये विदेशी फळपिक लागवड (ड्रॅगन फ्रुट), पुष्पोत्पादन कार्यक्रम (कंदवर्गीय व सुट्टी फुले लागवड), मसाला पिके (मिरची, हळद व आले लागवड), सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती (हरितगृह, शेडनेट, प्लॅस्टिक मल्चिंग) मधुमक्षिका पालन, फलोत्पादन यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर, पॉवर टिलर) पॅक हाऊस, शीतखोली, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, प्रक्रिया युनिट व फिरते विक्री केंद्र इत्यादी घटकांचा समावेश आहे.

            अधिक माहितीसाठी संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडल कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांना संपर्क साधावा व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर (www.mahadbt.gov.in) जास्तीत-जास्त अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

0000000

गवताच्या विक्रीकरिता दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): महासैनिक दरबार हॉल परिसरातील पडसर जमिनीतील गवताची सन 2022 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीरांनी प्रत्यक्ष पहाणी करुन दरपत्रके सिलबंद लिफाफ्यासह दि. 10 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

प्राप्त सिलबंद लिफाफ्यातील जास्तीत जास्त रक्कम असणा-या दरपत्रकास मान्यता देण्यात येईल. अधिकúü माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक  0231-2666185 वर संपर्क साधावा.

00000