इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

निर्णय बंधनकारक असल्याने समित्यांना कायद्याची समग्र माहिती आवश्यक - डॉ. विजया रहाटकर






बाल विकास प्रकल्प अधिकारी  तालुक्याचे  नोडल ऑफीसर- विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी

कोल्हापूर, दि. 19 : कामाच्या ठिकाणी महिलांचे होणाऱ्या लैगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई, निवारण) अधिनियम 2013 अन्वये अंतर्गत तक्रार निवारण समितीला कायद्याने सिव्हिल कोर्टाचे अधिकार दिले आहेत. या अंतर्गत तक्रार निवारण समितीचा निर्णय बंधनकारक असल्यामुळे निर्णय संतुलित आणि योग्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी या कायद्याची समग्र माहिती अंतर्गत तक्रार निवारण समित्यांना होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजया रहाटकर यांनी केले.
राज्य महिला आयोगाची औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती या विभागांनंतर कोल्हापूर येथे पाचवी विभागीय कार्यशाळा आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी होते. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, आयोगाच्या सदस्या ॲड आशा लांडगे, सचिव डॉ. मंजुषा गोळवणे, सांगली जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय चव्हाण, महिला व बाल विकास उपायुक्त पी. व्ही. शिर्के, औरंगाबाद येथील प्रा. स्मिता अवचाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय राज्य घटनेने स्त्री पुरुष समानतेचे तत्व स्वीकारले असले तरी प्रत्यक्षात समाजात विरोधाभास दिसतो असे सांगून डॉ. विजया रहाटकर म्हणाल्या, कामाच्या ठिकाणी महिलांचे होणाऱ्या लैगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई, निवारण) अधिनियम 2013 हा कायदा करण्यात आला आहे. हा कायदा अत्यंत परिपूर्ण असून समाजात महिलांवर अत्याचार होतात तेंव्हा या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी अत्यंत महत्वाची ठरते. हा कायदा महिलांना संरक्षणही देतो आणि अन्याय झाल्यास न्यायही देतो. तथापि हा कायदा पुरुषांच्या विरोधात नसून तो गैर वर्तणुकीच्या विरोधात आहे हे समजून घेतले पाहिजे.
डॉ. रहाटकर म्हणाल्या, स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही मनात समानतेचे तत्व रुजले पाहिजे. एकमेकांना सन्मान दिला पाहिजे. त्या दृष्टीने हा कायदा अत्यंत महत्वपूर्ण आहे. पण या कायद्याबाबत अनेक ठिकाणी अनास्था दिसते. या कायद्यांतर्गंत असलेल्या तक्रार निवारण समितीला कायद्याने सिव्हिल कोर्टाचे अधिकार दिले आहेत. समितीचा निर्णय बंधनकारक केला आहे. पण या समित्यांनी योग्य व संतुलित निर्णय घ्यावा यासाठी या कायद्याबाबत फार मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य महिला आयोगाच्यावतीने पुश(PUSH) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 40 हजार लोकांना या कायद्याचे प्रशिक्षण दिले आहे. यापुढेही 2 लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये 16 हजार लोकांना, साडे तीन हजार महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये या कायद्याबाबत जाणीव जागृती करण्यात आली आहे. पुशचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून दुसऱ्या टप्प्यात सर्व शासकीय कार्यालयातील समित्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. या कायद्याबद्दल अधिकाधिक जनजागृती करुन महिलांसाठी भयमुक्त व उत्तम वातावरण कामाच्या ठिकाणी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
विभागीय आयुक्त चंद्राकांत दळवी यांनी महिला संरक्षणाचे केवळ कायदे करुन चालणार नाही तर त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सांगून लैगिक छळाच्या घटनाच होऊ नयेत असे वातावरण निर्माण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तक्रार आल्यास न्यायही मिळाला पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी तक्रार निवारण समित्या स्थापन करुन त्यांचे कामकाज प्रभावीपणे करा. महिला लोकशाही दिनाच्या कार्यक्रमांनंतर त्याच दिवशी तक्रार निवारण समित्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. या कायद्याच्या जनजागृतीसाठी आयोगाने तयार केलेले पोस्टर्स दर्शनी भागात लावावेत असे निर्देश दिले. यावेळी त्यांनी या कायद्यातर्गत तालुकानिहाय नोडल ऑफीसरची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे सांगून प्रत्येक तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी  हे नोडल ऑफीसर असतील असे जाहिर केले.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, मोठ्या प्रमाणावर महिला नोकरी करीत आहेत. कायद्याने महिलांना 30 टक्के आरक्षण दिले आहे. कित्येक ठिकाणी महिलांची संख्या 50 टक्केपेक्षाही जास्त आहे त्यामुळे या कायद्याबद्दल व्यापक जाणीव जागृतीची आवश्यकता आहे. केवळ कामाच्या ठिकाणीच नव्हे तर समाजात अन्यत्र कोठेही होणारे महिलांवरील अत्याचार उद्विग्न करणारे आहे. राईट टू एज्युकेशनचा अधिकार मिळाला आता राईट एज्युकेशनची आवश्यकता असल्याचे सांगितले.
डॉ. कुणाल खेमणार यांनी सदरचा कायदा हा अत्यंत सवेदनशील तितकाच सक्षम आहे. लिंग भेदावर आधारित कोणताही भेदभाव केला जाऊ नये. या राज्य घटनेच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करणारा हा कायदा आहे. या कायद्याबाबत सर्वांनी सकारात्मक काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी महिला आयोगाच्या सदस्या आशा लांडगे, प्रा. स्मिता अवचाल यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्तावि उपायुक्त पी. व्ही. शिर्के यांनी केले. आभार महिला व बाल विकास अधिकारी नितीन म्हस्के यांनी मानले. यावेळी कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा या चार जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचे प्रमुख, समिती सदस्य यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

00000000

रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत हा निशब्द करणारा अनुभव - पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत चित्रफीतचे पालकमंत्री यांच्याहस्ते प्रकाशन






 कोल्हापूर, दि. 13 : विकलांग मुलांसमवेत मा. अमिताभ बच्चन यांचे सांकेतिक परिभाषेत (साईन लँग्वेजमध्ये) सादर केलेले राष्ट्रगीत पाहताना आपण एका वेगळ्याच वातावरणात पोहचतो साईन लँग्वेजमधील हे राष्ट्रगीत पाहिल्यानंतर आपण निशब्द झाल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
 वुई केअर फिल्म फेस्ट व ब्रदरहूड दिल्ली, चेतना अपंगमती विकास संस्था कोल्हापूर, कर्न्सन्ड ॲक्शन दिल्ली, स्वयंम ग्लोबल सेंटर दिल्ली, आरुशी भोपाल, सामाजिक न्याय मंत्रालय मध्यप्रदेश, एपीजी सत्या युनिव्हर्सिटी गुडगाव यांची निर्मिती असलेल्या विकलांग मुलांसमवेत मा. अमिताभ बच्चन यांचे सांकेतिक परिभाषेत (साईन लँग्वेजमध्ये) राष्ट्रगीत, चित्रफीत प्रकाशन समारंभ दिल्ली आणि मध्यप्रदेश याठिकाणी झाला असून महाराष्ट्रात हा समारंभ कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते केशवराव भोसले नाट्यगृहात झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, चेतना संस्थेचे प्राचार्य पवन खेबुडकर, अध्यक्ष नरेश बगरे, उपाध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
 सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत सादर होत असताना संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. राष्ट्रगीतानंतर बोलण्यासाठी उभारलेले पालकमंत्री निशब्द झाले होते. सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत आणि विकलांग मुला मुलींनी सादर केलेले गीत-नृत्य पाहून  आपल्या भावना व्यक्त करताना गहिवरलेल्या पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांना पाहताना संपूर्ण नाट्यगृह ही स्तब्‍ध झाले होते. यावेळी पालकमंत्री यांनी दोन्ही खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींनी या जिल्ह्यात कोणतेही दुख: राहू नये यासाठी एकत्र येवून काम करुया असे आवाहन केले. चेतना अपंगमती विकास संस्था कोल्हापूर या संस्थेला लवकरच भेट देवून सर्व अडचणी समजून घेवून सोडविल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
 खासदार धनंजय महाडिक यांनी विकलांग मुलांची विविध क्षेत्रातील भरारी अभिमानास्पद आहे. त्यांच्या सक्षमीकरणाबाबत समाजाने संवेदनशिल असणे आवश्यक असल्याचे सांगून चेतना संस्थेला त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठील सर्वतोपरी मदत करु. विकलांगांना सहजपणे वावरता येईल अशा सुविधा असल्या पाहिजेत त्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगून, अवयवदानाबद्दलही समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात येईल, असे सांगितले.
 महापौर हसिना फरास यांनी विकलांग मुलेही सामान्य क्षमतेच्या मुलांपेक्षा अधिक जिद्दी व कष्टाळू असतात. त्यांच्यासाठी गेली 32 वर्षे करत असलेले चेतना संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून या कार्याला मदत करण्यासाठी सर्व कोल्हापूरकरांनी पुढे यावे. अवयवदान, नेत्रदान याबाबतही समाजात सजगता निर्माण व्हावी, असे सांगितले.
संस्थेचे प्राचार्य पवन खेबुडकर यांनी सांकेतिक परिभाषेत राष्ट्रगीत या चित्रफीतीत अमिताभ बच्चन यांच्यासह चेतना संस्थेतील आठ मुलांचा सहभाग आहे ही बाब संपूर्ण कोल्हापूर वासियांनसाठी अभिमानास्पद असून या मुलांच्या जीवनात अधिकाधिक आनंद फुलवावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरत व्यक्त केली.
यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमा पुजानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य पवन खेबुडकर यांनी लिहिलेल्या गीतावर चेतनाच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. मुकबधीर विद्यार्थ्यांनी या चला शरदेला वंदुया ही प्रार्थना गायली. ज्ञान प्रबोधन भवन संचालित अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायीले. हेल्पर्स ऑफ द हँडीकॅप संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व्हील चअर्स वरील नृत्य सादर केले. याप्रसंगी सांकेतिक परिभाषेत राष्ट्रगीत या चित्रफीतीत सहभागी असणारे सुशांत कुंदे, पद्मश्री करकरे, निखिल ढाकणे, अमिता सुतार, विशाल मोरे, आंम्रपाली कांबळे, विनम्र खटावकर, प्रतिक्षा कराळे यांच्यासह आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पवन खेबुडकर यांनी तर आभार डॉ. सुनिल पाटील यांनी मानले तर सुत्रसंचालन सोनाली नवांगुळ यांनी केले.

000000

सोमवार, ७ ऑगस्ट, २०१७

तलाठी सजे व सर्कल कार्यालये अद्ययावत करणार - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील




कोल्हापूर, दि. 7 : ग्रामीण भागातील जनतेचा त्रास कमी व्हावा, वेळ व खर्चात बचत व्हावी, सातबारासाठी चावडीत हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी ऑनलाईन सातबारा संगणकीकरण करण्यात आला आहे. सध्या राज्यात 12 हजार तलाठी असून आणखी 4 हजार तलाठी सजे व 500 सर्कल नव्याने वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे तलाठी कार्यालयांमधून अधिक चांगली सेवा ग्रामीण भागातील जनतेला मिळेल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समितीकडील सन 2015-16 च्या निधीमधून बांधण्यात आलेल्या भुदरगड तालुक्यातील गंगापूर येथील चावडी इमारतीचे उद्घाटन व ऑनलाईन सातबारा अज्ञावलीचा उद्घाटन समारंभ  महसूलमंत्री  आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, पंचायत समितीच्या सभापती सरिता वरंडेकर, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई, पंचायत समिती सदस्य संग्रामसिंह देसाई, कार्यकारी अभियंता एन.एम. वेदपाठक, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, गोकुळचे संचालक बाबा देसाई, सरपंच संगीता केणे, प्रविण सावंत, नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असून नव्याने तलाठी सजे व  सर्कल वाढविण्याच्या निर्णयाने शेतकरी व ग्रामीण जनता यांना चांगली सुविधा निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी तलाठी कार्यालये नाहीत, त्यामुळे 16 हजार अद्यायावत तलाठी कार्यालये बांधण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. गंगापूर येथे नव्याने उभारण्यात आलेली चावडीची इमारत अत्यंत प्रशस्त असून यातून लोकांना गुणवत्तापूर्ण सुविधा ‍मिळाली.
सरकार जनतेच्या प्रती असणारे आपले कर्तव्य बजावत असतेच पण गावातील लोकांनीही शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत. ठिबक सिंचन पध्दती, कोल्ड स्टोरेजमधील मालावर तारण कर्ज योजना यासारख्या अनेक योजनांचा लाभ घेऊन आपले उत्पादन दुप्पट करावे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन आपली श्रीमंती आपणच वाढविली पाहिजे. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.
आमदार आबिटकर यांनी राधानगरी, भुदरगड, आजरा या आपल्या मतदार संघातील अनेक तलाठी कार्यालयांना इमारती नाहीत. ती मिळावीत. सातबारा संगणकीकरणात देवस्थान जमिनीबाबतच्या नोंदी व्हाव्यात, तसेच चाळण उडालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संपत खिलारे यांनी केले. आभार तहसिलदार अमर वाकडे यांनी मानले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते संगणकीय सातबाराचे वितरण करण्यात आले. तसेच पीओएस मशीनव्दारे धान्य वितरण, शिधापत्रिका वितरण, स्मार्ट मतदान ओळखपत्र याचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000000