इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा बंद जागा खेरीज इतर ठिकाणी वापरास 15 दिवस सुट

 


 

    कोल्हापूर, दि. 13 (जिमाका)  : ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी  जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत  वापर करण्यास ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी मान्यता दिली आहे.

     कोणत्याही ध्वनी प्रतिबंधीत क्षेत्राच्या परिसरामध्ये कोणतीही सुट राहणार नाही. तसेच ध्वनीवर्धक / ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचेही  जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी कळविले आहे.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती -1 दिवस, शिवजयंती (पारंपारिक)-  1 दिवस, मोहरम- 1 दिवस-नववा दिवस (खत्तलरात्र), दहीहंडी-1 दिवस (गोपाळकाला), गणपती उत्सव, ईद-ए-मिलाद- गणेशोत्सव- 4 दिवस (पहिला, आठवा, नववा व दहावा दिवस ) ईद-ए-मिलाद, नवरात्री उत्सव- 3 दिवस (पहिला, आठवा व नववा दिवस), दिपावली- 1 दिवस (लक्ष्मीपूजन), ख्रिसमस- 1 दिवस, 31 डिसेंबर 1 दिवस व 1 दिवस आवश्यतेनुसार महत्वाच्या कार्यक्रमासाठी सुट घोषीत करण्यात येत आहे.

0 0 0 0 0 0 0 0

 

सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या वतीने विविध योजनांची माहिती देण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न


 

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक योजनांची माहिती समाजामध्ये पोहोचवून त्याचा प्रचार व प्रसार व्हावा व या योजनेपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी  सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी व पदाधिकारी यांना व्हावी याकरिता सामाजिक न्याय  विभागाच्या वतीने  एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेमध्ये  समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन केले.

          सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत  नारनवरे यांच्या संकल्पनेतून 1 एप्रिल ते 1 मे 2023 दरम्यान सामाजिक न्याय पर्व अभियान राबविण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती असून 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आहे. महापुरुषांनी समाजकार्याचा घालून दिलेला वारसा डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या समाज कल्याण विभागाने राष्ट्रपुरुष थोर व्यक्तींच्या विचारांचे अनुकरण या अभिनव पद्धतीने करण्याचे आयोजन केले आहे. विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय पर्व हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यशाळेस करवीर तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तालुका समन्वय सचिन कांबळे   सुरेखा डवर यांनी योजनांची माहिती दिली.

000000

मुरगूड येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे “पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार” मेळावा

 

 

 

            कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमाने,  मंगळवार  दिनांक  18‍ एप्रिल 2023  रोजी  शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज, मुरगूड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्राचे सहायक आयुक्त सं.कृ.माळी यांनी केले आहे.

            रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 15 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 1800 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्याकरिता कळविण्यात आली  आहेत. या पदांकरीता किमान 8 वी, 9 वी उत्तीर्णांसह, 10 वी, 12 वी,  कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

            इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे.  प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे,  आवश्यकतेनुसार अर्जाच्या आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.‍ तसेच स्वयंरोजगार करीता विविध महामंडळाकडील शासकीय कर्ज योजनांचीमाहिती देण्यात येणार असल्याचेही श्री. माळी यांनी कळविले  आहे.

00000

परिवहन संवर्ग वाहनांची नवी नोंदणी मालिका 17 एप्रिलपासून सुरु

 

 

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): परिवहन संवर्ग वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FL की दिनांक 21 एप्रिल 2023 पर्यंत संपणे अपेक्षित आहे. तदनंतर या कार्यालयामार्फत नवीन परिवहन संवर्ग नोंदणी मालिका MH09-GJ दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 9.45 ते 4 या वेळत खिड़की क्रमांक 9 (परिवहन विभाग) येथे स्विकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली.

 

वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावयाचे आहे-

 पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देवू नये. Demand Draft (धनाकर्ष) काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच Demand Draft (धनाकर्ष) दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9.45 ते 3 या वेळेत कार्यालयात सादर करावा. 17 एप्रिल 2023 रोजी 4 वाजल्यानंतर पसंतीच्या क्रमांकाच्या व (लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. Demand Draft (धनाकर्ष) शक्यतो STATE BANK OF INDIA (SBI) या बँकेचाच असावा. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

 

एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांकडून दिनांक 18 एप्रिल  रोजी जादा रकमेचा स्वतंत्र Demand Draft (धनाकर्ष) बंद लिफाफ्यात सकाळी 9 ते दुपारी 3 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहिल. एक पेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव दिनांक 18 एप्रिल  रोजी दुपारी 4 वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. फक्त अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल. लिलावास येताना अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी राहणार असल्यास त्यांच्याकडे प्राधिकारपत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. आकर्षक क्रमांकाची मागणी करताना आधारला संलग्न असलेलाच मोबाईल नंबर व पत्ता लिहावा. मोबाईल नंबर पुन्हा बदलता येत नाही याची नोंद घ्यावी.

 

 एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नोंदणी करुन नाही घेतली तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक अपोआप रद्द होईल व शुल्क सरकार जमा होईल. विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. वाहन धारकाने आरक्षित क्रमांकाला अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आरक्षित क्रमांकाचा संदेश प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी कार्यालयीन वेळेत समक्ष किंवा संदेश प्राप्त झाल्यानंतर समक्ष येवून पावतीची खात्री करुन घ्यावी व पावतीत कोणत्याही प्रकारची चूक असल्यास दुरुस्त करुन घ्यावी. तद्नंतर कोणतीही चूक दुरुस्त करता येत नसल्याने त्यास कार्यालय जबाबदार असणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.

00000

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

जिल्हा लोकशाही दिनी तीन अर्ज प्राप्त

 



कोल्हापूर, दि.3 (जिमाका) : जिल्हा लोकशाही दिनी तीन अर्ज प्राप्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिन बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, पोलीस उपअधीक्षक(गृह) प्रिया पाटील, तहसीलदार रंजना बिचकर तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.  

     आजच्या लोकशाही दिन कार्यक्रमात जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख विभाग 1, पोलीस विभाग 1, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 1  असे एकूण  3 अर्ज प्राप्त झाले.

          000000