इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

जिल्ह्याला ओमायक्रॉन विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा


ओमायक्रॉनला थोपवण्यासाठी शासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर काम करावे

आवश्यक ती पथके स्थापन करुन तात्काळ कार्यान्वित करा

परदेशातून व परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची माहिती घ्या

कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे काटेकोर पालन करावे

मास्क विषयी जनजागृती करा

मंगल कार्यालय, हॉटेल मालकांना मर्यादित संख्येबाबत सूचना द्या

नागरिकांनी घाबरु नये, खबरदारी घेण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि.30(जिमाका): कोल्हापूर जिल्ह्याला ओमायक्रॉन विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेने प्रतिबंधात्मक आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी. सर्व तालुक्यांच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करणे, गडहिंग्लज, चंदगड, कागलसह परराज्यातून येणाऱ्या मार्गावर जिल्ह्याच्या सीमाभागात चेकपोस्ट उभारणे, परदेशातून व परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी, संस्थात्मक विलगीकरण यासाठी आवश्यक ती पथके स्थापन करुन तात्काळ कार्यान्वित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलीस विभागासह विविध विभागप्रमुखांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, विधी अधिकारी वैभव इनामदार प्रत्यक्ष उपस्थित होते.

 कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत आहे. ओमायक्रॉन विषाणूला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. 18 वर्षावरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सर्जिकल ट्रिपल लेअर अथवा एन 95 या प्रकारातील मास्क वापण्याबाबत जनजागृती करावी. दुकानदार, खासगी आस्थापना छोटो-मोठे व्यावसायिकांनी दर्शनी भागात नियमावलीचा फलक ठळक अक्षरात लावावा. हॉटेल, मंगल कार्यालय, कार्यक्रम स्थळी उपस्थितांची संख्या नियमानुसार मर्यादीत राहण्यासाठी तसेच आवश्यक त्या उपाययोजनांचे पालन करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती विमानतळावर घेण्यात येत आहे. मात्र देशात इतर ठिकाणी उतरून रस्ते व रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांचीही माहिती ठेवावी, अशाही सूचना यावेळी श्री. रेखावार यांनी दिल्या.

कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे काटेकोर पालन करुन कर्मचाऱ्यांकडूनही याचे पालन होत असल्याची खात्री करावी. ओमायक्रॉन विषाणूला नागरिकांनी घाबरु नये, पण कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करुन खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या विषाणूला थोपवण्यासाठी शासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर कामाला लागावे, असेही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले.

0000000 

सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे जारी


कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजनविषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड-१९ सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळानुसार, शर्तींना अधीन राहून, खुले करण्यात आले आहेत. यानुसार सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे जाहिर करण्यात आल्याचे  आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

१. कोविड अनुरूप वर्तनाचे (Covid Appropriate Behaviour) पालन:

राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB), सेवा प्रदाते, परिवास्तूंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी, इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे. कोविड अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंड, कोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि यात यापुढे नमूद केलेल्या दंडांनुसार असेल.

कोविड अनुरूप वर्तनाचे पालन काटेकोरपणे होईल यासाठी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आयुक्त व त्यांचे अधिकारी / कर्मचारी , नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीत मुख्याधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी याच बरोबर त्या त्या पोलीस स्टेशन मधील पोलीस  अधिकारी / कर्मचारी  यांची  पथके  स्थापन करुन प्रत्येक गाव / शहरातील आवश्यक त्या ठिकाणी तपासणी, आकस्मीक भेटी देवून तपासणी करावी व ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नसल्यास उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / आस्थापनांवर दंडात्मक / प्रशासकीय / फौजदारी कारवाई करण्यात यावी. तहसिलदार यांनी तात्काळ या व्यवस्थेची खात्री करावी.

२. संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता:

अ. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते, इत्यादी), अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे, यात यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केलेले असावे.

ब. जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे), इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे.

क. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. असे नसल्यास 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट सोबत असणे अत्यावश्यक असेल. याबाबत वाहनांची तपासणी करण्याकामी प्रादेशिक परिवहन विभागाकडील अधिकारी / कर्मचारी यांची पथके स्थापन करुन आवश्यक त्या ठिकाणी तपासणी, आकस्मीक भेटी देवून तपासणी करावी व ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नसल्यास उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / आस्थापना / वाहनांवर दंडात्मक / प्रशासकीय / फौजदारी कारवाई करण्यात यावी.

ड. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा, संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. तसेच राज्य शासनाने जारी केलेल्या 9013151515 या व्हॉटस अप नंबर वरुन संपूर्ण लसीकरण सर्टिफिकेट प्राप्त करुन घ्यावे. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.

इ. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

कोविड अनुरूप वर्तनाचे पालन काटेकोरपणे होईल यासाठी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आयुक्त व त्यांचे अधिकारी / कर्मचारी , नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीत मुख्याधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी याच बरोबर त्या त्या पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी / कर्मचारी तसेच वाहनांची तपासणी करण्याकामी प्रादेशिक परिवहन विभागाकडील अधिकारी / कर्मचारी यांची पथके स्थापन करुन आवश्यक त्या ठिकाणी तपासणी, आकस्मीक भेटी देवून तपासणी करावी व ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नसल्यास उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / आस्थापनांवर दंडात्मक / प्रशासकीय / फौजदारी कारवाई करण्यात यावी. तहसिलदार यांनी तात्काळ या व्यवस्थेची खात्री करावी.

३. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवास:

कोणत्याही आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानावरून किंवा इतर राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, या बाबतीतील भारत सरकारच्या निदेशांद्वारे विनियमन करण्यात येईल. जिल्ह्यात येणाऱ्या अशा सर्व प्रवाशांचे, यात यापुढे व्याख्या केल्यानुसार, संपूर्ण लसीकरण केले असलेबाबतची खात्री केली जाईल किंवा मागील ७२ तासांमध्ये नमुना घेवून बनलेले वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र तपासले जाईल. असे न आढळल्यास सदर व्यक्तीस कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करु दिला जाणार नाही आणि जर प्रवेश केल्यास संस्थात्मक अलगिकरणामध्ये ठेवण्यात येईल. अशा व्यक्तींना गाव / शहरामध्ये शोधून विलगीकरण कक्षात आणण्याची जबाबदारी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी आरोग्य विभागाच्या मदतीने पार पाडावी.

कोविड अनुरूप वर्तनाचे पालन काटेकोरपणे होईल यासाठी विमानतळ प्राधिकरण, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे तपासणी पथक नेमून विमानतळावर तीनही पाळीमध्ये तैनात ठेवावित. या पथकाची नेमणूक तहसिलदार करवीर यांनी करावी. विमानतळावरील अशा प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरण  ठिकाणांची  यादी बनविणे  व  व्यवस्था  करणे  ही  जबाबदारी आयुक्त, कोल्हापूर महानगपालिका  यांची राहील. इतर सर्व तालुक्यांमध्ये अशा प्रवाशांसाठी तालुका स्तरावर विलगीकरण केंद्र बनविण्याची व आवश्यक कर्मचारी नेमणेची जबाबदारी  संबंधीत नगरपालिकांची राहील. तहसिलदार यांनी तात्काळ या व्यवस्थेची खात्री करावी.                                                                                                               

४. कोणताही कार्यक्रम, समारंभ, इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंध:

प्रत्येक कार्यक्रमाचा/समारंभाचा आयोजक आणि कार्यक्रम समारंभ ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला असेल त्या जागेचा व इमारतीचा मालक व व्यवस्थापक हे या आदेशातील सर्व अटींचे पालन करवून घेण्यास जबाबदार असतील.

अ. चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय, सभागृह, इत्यादी बंदिस्त /बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या/समारंभाच्या/ उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेपर्यंत परवानगी देण्यात येत आहे.

ब. संपूर्ण खुल्या असलेल्या (open to sky) जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (उदा. स्टेडियम इ.) संबंधीत मनपा आयुक्त, मुख्याधिकारी किंवा तहसिलदार (ग्रामीण भागात) ही क्षमता निश्चित करतील.

क. खुल्या प्रांगण/लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळयास उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल.

ड. बंदीस्त मंगल कार्यालये/ हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादीत असेल.

इ. जर वरील नियमानुसार कोणत्याही सामुहीक सोहळ्यासाठी / कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या वरील निर्बंधापेक्षा अधिक असणे आवश्यक असेल तर, अशा बाबतीत. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आयुक्त व त्यांचे अधिकारी / कर्मचारी , नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीत मुख्याधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी यांना त्याची माहिती द्यावी लागेल व परवानगी घ्यावी लागेल आणि संबंधीत यंत्रणा अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे) निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवतील आणि तेथे वर नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील, कोविड-१९ च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, तेथे कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उक्त प्रतिनिधीला, कार्यक्रम पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा प्राधिकार असेल.

५. संपूर्ण लसीकरणाची व्याख्याः

संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ, -

लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे किंवा

ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती. असा आहे. किंवा

१८ वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असा आहे.

६. कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम व दंड :

व्याख्या: कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल, ज्यांचे काविड अनुरूप वर्तन (CAB) म्हणून म्हणून वर्णन केले जाते आशा वर्तनाच्या पैलूंमध्ये, खाली नमूद केलेल्या वर्तनांचा समावेश होतो आणि कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास जे अडथळा निर्माण करू शकतील अशा सर्व तर्कसंगत पैलूंचा देखील समावेश होतो, त्यात नमूद केलेली त्याच्या प्रसाराची कार्यपद्धती (methodology) दिलेली आहे.

मूलभूत कोविड अनुरूप वर्तनाचे काही पैलू पुढीलप्रमाणे असून त्यांचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे. सर्व संस्थांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, सहभागी होणारी कोणीतीही व्यक्ती, त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये आणि/किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा संबंधित संस्थेशी संबंधित असलेली अन्य कार्य करताना, त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था उत्तरदायी असतील. संस्था, त्यांच्या  नियंत्रणाखाली  किंवा जेथे ती संस्था आपला व्यवहार  किंवा इतर कार्य करत असेल अशा सर्व ठिकाणी, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक (thermal scanner), इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.

१. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. मास्क हा एन९५/ सर्जिकल थ्री लेअर / कापडी थ्री लेअर असावा. याव्यतिरिक्त कापडी एकेरी मास्क दंडास पात्र राहील. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.)                                              

२. जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखा.

३. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.

४. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.

५. योग्य श्वसन स्वच्छता(आरोग्य) राखा.

६. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जतुक करा.

७. खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा; जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोडांवर ठेवून खोकाचे व शिकावे,

८. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

९. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा.

१०. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार/अभिवादन करा.

११. कोविड-१९ विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.

शास्ती :

या नियमानुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.

 ज्यांनी, आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये१०,०००/- इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त सुनिश्चित करण्यात वारंवार कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९-ची अधिसूचना अंमलातअसेपर्यत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

 जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने, स्वत:चे कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केली तर, ती, प्रत्येक प्रसंगी, रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तीना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल, वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास, वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे, उल्लंघन करणान्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणार इतर कोणतेही विषय/मुद्दे. राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमानुसार/आदेशानुसार असतील.

कोविड अनुरूप वर्तनाचे पालन काटेकोरपणे होईल यासाठी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आयुक्त व त्यांचे अधिकारी / कर्मचारी , नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीत मुख्याधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी व त्यांचे अधिकारी / कर्मचारी याच बरोबर त्या त्या पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी / कर्मचारी तसेच वाहनांची तपासणी करणेकामी प्रादेशिक परिवहन विभागाकडील अधिकारी / कर्मचारी  यांची  पथके  स्थापन  करुन  आवश्यक  त्या  ठिकाणी  तपासणी, आकस्मीक भेटी देवून तपासणी करावी व ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नसल्यास उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / आस्थापनांवर दंडात्मक / प्रशासकीय / फौजदारी कारवाई करणेत यावी. तहसिलदार यांनी तात्काळ याची खात्री करावी.

तसेच सर्व विभागांनी त्यांच्या मार्फत नियंत्रित (अंशत: किंवा पूर्णत:) आस्थापनांमध्ये या सर्व नियमांची अंमलबजावणी होत आहे याची खात्री करावी. यासाठी तहसिलदारांच्या मदतीने पथके नेमावीत. तसेच अशा सर्व आस्थापनांच्या कोविड विषयक शंकांचे निरसन करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची तात्काळ नेमणूक करावी. सर्व विभागांनी असे नोडल अधिकारी नेमल्याची खात्री निवासी उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ करावी.

आदेशा व्यतिरिक्त लागू करण्यात आलेले निर्बंध हे या आदेशाच्या दिनांकापासून 48 तासांनंतर म्हणजेच दिनांक 02 डिसेंबर 2021 रोजीचे सकाळी 05.00 वा. पासून अंमलात येतील. याबाबीसाठी आदेश हीच नोटीस समजण्यात यावी.

 

 

 

0000

उचंगी प्रकल्पग्रस्तांचे अर्ज 3 डिसेंबर रोजी आजरा तहसिल कार्यालय येथे स्विकारण्यात येणार

 


           

            कोल्हापूर, दि. 30 (जिमाका):  उचंगी प्रकल्पग्रस्तानी अद्यापही जमिन अथवा विशेष आर्थिक सहाय्य मिळणेबाबतचे अर्ज तसेच रहिवाशी भुखंड मागणीचे अर्ज दिलेले नाहीत अशा प्रकल्पग्रस्ताचे अर्ज ज्या इतर विषयाबाबतचे अर्ज तसेच प्रकल्पातील 13 प्रकल्पग्रस्ताचे पॅकेज मिळण्याबाबतचे अर्ज त्यांचे कौटुंबिक व इतर कारणास्तव करारनामा करण्यासाठी प्रलंबित आहेत अशा प्रकल्पग्रस्तांनी सुध्दा दि. 3 डिसेंबर 2021 इ रोजी तहसिलदार कार्यालय आजरा येथे सकाळी 11.00 वा. स्विकारण्यात येणार असल्याचे आजरा-भुदरगडच्या उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी कळविले आहे.

          दि. 30 डिसेंबर रेाजी अर्ज जमा करण्याची दक्षता घ्यावी. अर्ज नमुद दिनांकापूर्वी प्राप्त न झाल्यास आपणास पुनर्वसनाची आवश्यकता नाही असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे (ज्या प्रकल्पग्रस्ताना अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे व इतर दाखले आवश्यक आहेत अशी कागदपत्रे ही त्याच दिवशी तहसिलदार कार्या आजरा येथून उपलब्ध होतील.) ,

            आजरा तालुक्यातील उचंगी या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे सकारात्मक प्रतिसादामुळे प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काम प्रगती पथावर असून प्रकल्पातील पाण्यामुळे मोठे फायदे मिळणार आहेत.

 जमीन व पॅकेज वाटप- पुनर्वसनाअंतर्गत आजअखेर 89 प्रकल्पग्रस्ताना 49.53 हे आर क्षेत्र, 51 प्रकल्पग्रस्तांना देय क्षेत्र 26.85 है और ऐवजी 10 कोटी 73 लक्ष इतके विशेष आर्थिक सहाय्य व 43 प्रकल्पग्रस्तांना -20.75 है आरक्षेत्र तसेच त्यामधील 11 प्रस्तांना 3.57 हे आर देय क्षेत्राऐवजी 1 कोटी 42 लक्ष इतके विशेष आर्थिक सहाय्य वाटप करून देय क्षेत्राचे वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे.

 

शिस्तक प्रकल्पग्रस्त- सद्यस्थितीमध्ये 74 प्रकल्पग्रस्ताना 33.87 है आर इतके क्षेत्र वाटप करणे शिल्लक आहे यातील अद्यापही 41 प्रकल्पवस्तानी 1963 है आर क्षेत्राबाबत जमीन अथवा विशेष आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत अर्ज सादर केलेले नाही.

 

उपलब्ध पर्यायी जमीन व पॅकेज- उचंगी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी शासनाने मौजे चितळे, ता. आजरा येथील गट क्र 46/31 मधील क्षेत्र 10.01. गट क्र. 233 मधील 372 है आर व गट क्र. 266 मधील क्षेत्र 3 13 है आर. असे एकूण 16 86 है आर तसेच मौजे जेऊर येथील गट क्र. 106 मधील 4:27 है आर. असे एकूण 21.13 हे आर गायरान क्षेत्र उपलब्ध करुन देणेत आलेले आहे तसेच उचगी प्रकल्पाचे लाभक्षेत्रामधील 7.65 है आर. इतके क्षेत्र वाटपासाठी उपलब्ध आहे. तसेच पर्यायी जमीनीऐवजी तिप्पट देयतेने म्हणजेच रु. 40 लक्ष प्रती हेक्टरी या दराने विशेष आर्थिक सहाय्य देणेस मान्यता देणेत आलेली आहे.

 

रहिवासी भुखंड- उचंगी प्रकल्पातील ज्या प्रकल्पग्रस्तांना रहिवासी भुखंड देय आहे. अशा प्रकल्पग्रस्तांची यादी[संपादन] मंडळाचे गावामधील कार्यालयामध्ये उपलब्ध करून देणेत आलेली आहे.

0000000

1 ली ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू

 


  कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयामार्फत 1 ली ते 10 पर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृतीची योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येणार असल्याचे, समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे यांनी कळविले आहे. .

योजनेचे नाव, जात, वर्ग/इयत्ता व आवश्यक कागदपत्रे याप्रमाणे- मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजन-  विजाभज- 1 ली ते 10 वी. इ.मा.व-1 ली ते 10 वी, अनु. जाती 9 वी व 10 वी  आवश्यक कागदपत्रे  बॅक पासबुक छायांकित प्रत, 2020-21 चा पालकांचा उत्पनाचा दाखला (अनु जाती व विजाभज साठी रु 2 लाख/ इमाव साठी   2 लाख ), विद्यार्थ्यांचा स्वत:चा सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला.

सावित्रीबाई फले शिष्यवृत्ती  योजना (फक्त मुली) इमाव, विजाभज, विमाप्र, अनु जाती- इ.5 वी  ते 7 वी व इ.8 वी ते 10 वी आवश्यक कागदपत्र बॅक पासबुक छायांकित प्रत.

10 परीक्षा फी-अनु जाती विजाभज, विमाप्र, इ. 10 वी आवश्यक कागदपत्र बॅक पासबुक छायांकित प्रत. गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना- अनु जाती विजाभज, विमाप्र  इ.5वी ते 7 वी व इ.8 वी ते 10 वी आवश्यक कागदपत्रे बॅक पासबुक छायांकित प्रत, मागील परीक्षेचे गुणपत्रक.

अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना- सर्व जाती / धर्म, आवश्यक कागदपत्रे बॅक पासबुक छायांकित प्रत, कातडी कमावणे,सोलणे, सफाईकाम, कागद, काच, पत्रा गोळा करणे या पैकी एक काम करत असल्याबाबत आयुक्त / मुख्याधिकारी/ ग्रामसेवक यांचा दाखला वसतीगृहात राहत असल्याबाबत वसतीगृह प्रमुखचा दाखला.

 योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी सर्व शाळांनी विदयार्थींनींचे प्रस्ताव आवश्यक  त्या माहितीसह जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,कोल्हापूर कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणा-या तालुकाच्या  कॅंम्पच्या ठिकाणी जमा करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद दूरध्वनी क्रमांक 0231-2950162 येथे संपर्क साधावा.  

000000

असे मिळवा लसीचे ऑनलाईन प्रमाणपत्र..! सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 


 

कोल्हापूर, दि. 30(जिमाका): कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी संपूर्ण लसीकरण व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन अत्यंत आवश्यक आहे. जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत असून जिल्ह्यात दुकाने, मॉल, पेट्रोल पंप आदी सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी कोरोना प्रतिबंधक दोन्ही लस घेतलेल्या असणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 

  सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करताना 18 वर्षावरील नागरिकांना संपूर्ण लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. आपण लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनाने खूप सोपा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

आपल्या मोबाईल वर +919013151515 क्रमांक (MyGov Corona Helpdesk) सेव्ह करावा.

 


नंतर whats app वरुन या क्रमांकावर Certificate हा मेसेज पाठवावा.

 


यानंतर एक ओटीपी क्रमांक येईल. हा ओटीपी क्रमांक टाईप करुन या नंबरवर पाठवावा.

 


यानंतर Certificate या संदेशाला क्लिक केल्यावर अवघ्या काही सेकंदांमध्ये आपण लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळेल.

 हे प्रमाणपत्र मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन किंवा स्क्रीन शॉट घेऊन आपण ठेऊ शकतो, किंवा त्याची  प्रिंट काढता येते, जेणेकरुन सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करताना सहजरित्या संपूर्ण लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवणे शक्य होते..

000000

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी संपूर्ण लसीकरण बंधनकारक जिल्हाधिकारी राहूल रेखावार

 





 

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत असल्याने संसर्गाचा धोका वाढणार आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी  संपूर्ण लसीकरण बंधनकारक असून प्रत्येक नागरिकांने संपूर्ण लसीकरण करुन घेणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे याबरोबरच शासन व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटोकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज केले.

कोव्हिड 19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत  जिल्हाधिकारी  कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस अतिरीक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

संपूर्ण लसीकरण नाही .....प्रवेश नाही

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले,  कोविड प्रतिबंधासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य असून ज्यांनी अद्यापही पहिला डोस घेतला नाही अशा 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी त्वरीत पहिला डोस घ्यावा. तसेच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोस विहीत कालावधीत घ्यावा.  मास्क नाही प्रवेश नाही हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आला.  आता याच पद्धतीने संपूर्ण  लसीकरण नाही प्रवेश नाही हा उपक्रम देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच खासगी आस्थापना, दुकानदार, घाऊक व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, एमआयडीसी, पेट्रोल पंप, रेशन दुकानदार यांनी त्यांच्या आस्थापनाच्या ठिकाणी  ठळक अक्षरात संपूर्ण लसीकरण नाही प्रवेश नाही अशा आशयाचे फलक लावावेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी ज्या व्यक्ती खरेदीसाठी व अन्य कारणांसाठी येतील त्यांच्याकडे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्या प्रमाणपत्राची पडताळणीकरुनच त्यांना सेवा द्यावी.

कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले,  कोरोना ओमायक्रॉन व्हेररियंटची घातकता लक्षात घेता मास्कचा वापर अनिवार्य आहे. ज्या व्यक्ती मास्कचा वापर करणार नाहीत त्यांच्याकडून शासनाने निर्धारित केलेला दंड वसूल केला जाईल.  कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था,आस्थापना या  दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.  ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात  जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थाना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

          जर कोणतीही संस्था किंचा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

        जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोबिड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.   तसेच सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

            यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी  संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही मार्गदर्शन केले.

            जिल्ह्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबण्यिात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांना सहकार्य केले जाईल, असे बैठकीस उपस्थित असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

0000000

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

विधानपरिषद निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांना प्रमाणपत्र प्रदान

 






            कोल्हापूर, दि.26 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 मध्ये बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सतेज उर्फ बंटी. डी. पाटील (पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस) यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक तथा मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल(भाप्रसे), निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 साठी 5 उमेदवारांची 7 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. यापैकी छाननीत 4 उमेदवारांची 6 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. अमल महादेवराव महाडिक (पक्ष- भारतीय जनता पार्टी), शौमिका अमल महाडिक (अपक्ष) व शशिकांत शामराव खोत (अपक्ष) या 3 उमेदवारांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी  द्विवार्षिक निवडणुकीत सतेज उर्फ बंटी डी. पाटील विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घोषित केले.


0000

संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेची हस्तलिखित प्रतिमा जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट

 



 


कोल्हापूर, दि.26 (जिमाका): संविधान दिनाचे औचित्य साधून शाहीरविशारद डॉ.आझाद नायकवडी लोककला सामाजिक सांस्कृतिक फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला संविधानाच्या हस्तलिखित उद्देशिकेची फोटो प्रतिमा भेट देण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

        अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या कक्षामध्ये झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अश्विनी जिरंगे, फाउंडेशनचे मार्गदर्शक मदन पवार, फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष डॉ.आझाद नायकवडी, निवृत्त अधिकारी मदन पवार, डॉ.प्रविण कोडोलीकर, बंकट थोडगे, बाळासाहेब कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

00000

 

संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 







कोल्हापूर, दि.26 (जिमाका): संविधान दिनानिमित्त समाजकल्याण विभागामार्फत बिंदू चौक येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, तहसीलदार शितल मुळ्ये-भामरे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

          "आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य...." या  संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. संविधान उद्देशिका गीत कबीर नाईकनवरे यांनी तर वाचन सचिन परब केले. यावेळी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन उपस्थित सर्वांनी उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

0000000

 

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

निवडणूक निरीक्षक रणजितसिंह देओल यांनी केली पन्हाळा मतदान केंद्राची पाहणी

 




 

कोल्हापूर, दि.25 (जिमाका): महाराष्ट्र विधानपरिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 साठीचे निवडणूक निरीक्षक वरिष्ठ सनदी अधिकारी रणजितसिंह देओल यांनी पन्हाळा येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी भैरप्पा माळी, संपर्क अधिकारी तथा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, तहसीलदार रमेश शेंडगे आदी उपस्थित होते.

0000

दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यशाळा रद्द

 


कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : 3 डिसेंबर रोजी दिव्यांग दिनानिमित्त महासैनिक दरबार हॉल, कोल्हापूर येथे दिव्यांगासाठी कार्यशाळा व दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तथापि जिल्ह्यामध्ये विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून आचारसंहिता संपल्यानंतर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

000000