इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

जादा दराने विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई - जिल्हा पुरवठा अधिकारी


   
      कोल्हापूर, दि. 31 (जिमाका)-  सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू व गृहोपयोगी वस्तू ह्या प्रचलीत असणाऱ्या दरानेच विक्री करावयाच्या आहेत.  जादा दराने विक्री केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिला.
        जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किराणा माल दुकानदार यांनी आपल्या दुकानातून विकल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू व गृहोपयोगी वस्तू या प्रचलीत असणाऱ्या दरानेच विक्री करावयाच्या आहेत. जादा दराने विक्री केल्यास तसेच दुकानामध्ये माल असताना माल संपला आहे. असे सांगून ग्राहकांची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
0000

हातकणंगले येथील मृत तरुणांचा कोरोना अहवाल अप्राप्त


      कोल्हापूर, दि. 31 (जिमाका)-  हातकणंगले येथील 37 वर्षाच्या तरुणाचा  कोरोना बाबतचा अहवाल अद्याप अप्राप्त असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
          येथील सी. पी. आर हॉस्पीटल मध्ये 31 मार्च रोजी पहाटे 2.30 वाजता या तरुणास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यास श्वसनाचा गंभीर त्रास, तसेच निमोनिया व सेपसिस निष्पण झाला. त्यांचा बाधित देशात, शहरात  प्रवास झालेला नव्हता तसेच कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क झाल्याचा इतिहास नव्हता. तरीही सध्याची कोरोना साथ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्याचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
          हा रुग्ण गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी 11-30 वा त्याचा मृत्यू झाला.
00000    

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर जयसिंगपुरात विलगीकरण कक्ष सुरु




      कोल्हापूर, दि. 31 (जिमाका)-   जयसिंगपूर शहरामध्ये विलगीकरण कक्ष सुरु करावा त्यासाठी शासनाकडून हवी ती मदत दिली जाईल, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. जे. जे. मगदूम शिक्षण समूहाचे प्रमुख विजयकुमार मगदूम व सोनाली मगदूम यांनी डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या इमारती मध्ये 50 खाटांची व्यवस्था असलेला विलगीकरण कक्ष विभाग सुरु केला आहे. या विभागाला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज भेट देऊन समाधान व्यक्त केले.
          कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दक्षता व उपचारासाठी 60 हजार लोकसंख्या असलेल्या जयसिंगपूर शहर व परिसरातील गावांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी इंडियन मेडीकल असोशिएशन व मेडीकल असोशिएशन शाखा जयसिंगपूर यांच्या पदाधिकाऱ्यांना केले होते. डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्ट, इंडियन मेडिकल असोसिएशन, मेडिकल असोसिएशन जयसिंगपूर आणि जयसिंगपूर नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेतला. जयसिंगपूर मेडिकल असोशिएशन, तसेच  इंडियन मेडीकल असोशिएशन जयसिंगपूरचे सर्व पदाधिकारी व डॉक्टर्स या आयसोलेशन विभागाकडे सेवा देणार असून डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयाचा नर्सिंग स्टाफ या विलगीकरण कक्षात काम करणार आहे.  
          या विलगीकरण कक्षाची पहाणी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी आज केली. यावेळी मुख्याधिकारी टीना गवळी, नगसेविका सोनाली मगदूम, इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष  डॉ. अतुल घोडके, जयसिंगपूर मेडिकल असोशिएशन चे अध्यक्ष डॉ. अतिक पटेल, जयसिंगपूर मेडिकल असोशिएशनचे उपाध्यक्ष  डॉ. अकलंक चौगुले, डॉ,रजपूत, डॉ. प्रतिभा चौगुले आदी उपस्थित होते.
00000

सोमवार, ३० मार्च, २०२०

सी.पी.आर.मधील टेलीमेडिसीन सुविधेला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांच्या हस्ते ऑनलाईन सुरुवात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणार मदत व मार्गदर्शन



            कोल्हापूर, दि. 30 (जिमाका)-  कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरबसल्या मदत व मार्गदर्शन करण्यासाठी  येथील सी.पी.आर. मध्ये टेलीमेडिसीन सुविधेची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज ऑनलाईन सुरुवात करण्यात आली. 
            या योजने अंतर्गत सी.पी.आर. येथे सर्व सोयीनी सुसज्ज कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून  त्याचा हेल्पलाइन क्रमांक 9821088123 हा आहे. कोव्हीड-19 हेल्पलाईन असे या सुविधेचे नाव असून www.kolhapurcovid19care.com  हे वेबपोर्टल सुरु करण्यात आले आहे. आहे.  या सॉफ्टवेअरमध्ये टोल फ्री कॉल सेंटर मार्फत नागरिकांशी संपर्क साधून त्यामध्ये त्यांने केलेली परदेशवारी, कोरोना लागण झालेल्या रुग्णांशी आलेला संपर्क तसेच कोरोनाच्या अनुषंगाने सर्व माहिती व तक्रार फीड केली जाईल. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला यावर संपर्क साधून आरोग्यविषयक माहितीची देवाण-घेवाण करता येणार आहे. नगरिकांची संपूर्ण हिस्ट्री ऐकून घेतल्यानंतर सी.पी.आर. अधिष्ठातांच्यामार्फत त्यांना संबंधीत डॉक्टराची कन्सल्टींगनंतर त्याला टेलीमेडिसीनची गरज आहे की नाही हे निश्चित केले जाईल. त्या विभागातील डॉक्टरांशी वेळ घेऊन संबंधीतांना कळविले जाईल. डॉक्टर नोंदणी झालेल्या क्रमांकावरती ऑडीओ अथवा व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांशी संपर्क करतील. कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत त्याला SMS सेवेद्वारे कळविले जाईल व मार्गदर्शन केले जाईल. ही संपूर्ण सेवा मोफत असून WHO च्या गाईडलाईन्सला अनुसरुन सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या अपत्तीनंतरही सुविधा निरंतर सुरु राहील. जिल्ह्यातील नागरिकांना घरबसल्या कोरोना आरोग्य सेवेबाबत मोफत सल्ला व मार्गदर्शन मिळणार आहे.
            ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांचे या कामी सहकार्य लाभले आहे. मनोरमा इन्फो सोलुशन्स या कंपनीने ही सेवा सुरु केली असून कंपनीच्या संचालक अश्विनी दानीगोंड यांचा यामध्ये पुढाकार आहे.
0000

कोविड-19 हेल्पलाईनवर घरबसल्या कोरोनाबाबत मोफत मार्गदर्शन - पालकमंत्री सतेज पाटील



कोल्हापूर, दि. 30 (जिमाका)-  जिल्ह्यातील नागरिकांना घरबसल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेबाबत मोफत सल्ला व मार्गदर्शन मिळण्यासाठी 9821088123 या कोविड-19 हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे, आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
      लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत व मार्गदर्शन व्हावे या दृष्टिने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सहकार्याने येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल  येथे www.kolhapurcovid19care.com ही टेलीमेडिसिन सुविधा सुरु केली आहे. 9821088123 हा त्याचा हेल्पलाईन क्रमांक आहे. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरुन मनोरमा इन्फो सोलुशन्सच्या संचालक अश्विनी दानीगोंड यांच्यामार्फत या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नागरिकांना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून परदेशवारी, कोरोना लागण, झालेल्या रुग्णांशी आलेला संपर्क तसेच कोरोनाच्या अनुषंगाने सर्व माहिती  किंवा सल्ला मागता येईल. यासाठी संपर्क व्यवस्था म्हणून सी. पी. आर मधील दोन हॉस्पिटलमधून तिसऱ्या वर्षाचे व चौथ्या वर्षाचे दहा विद्यार्थी व दहा तांत्रिक सहाय्यक हे सर्व आपापल्या घरातून या साठी काम करतील. 
             नागरिकाची संपूर्ण माहिती ऐकल्यानंतर सीपीआरच्या अधिष्ठातांमार्फत  त्यांना संबंधीत डॉक्टरांनी कन्सल्टींगनंतर त्याला टेलीमेडिसीनची गरज आहे की नाही हे निश्चित केले जाईल. त्या विभागातील डॉक्टरांशी वेळ घेऊन संबंधीतांना कळविले जाईल. डॉक्टर नोंदणी झालेल्या क्रमांकावरती ऑडीओ अथवा व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांशी संपर्क करतील. कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत त्याला SMS सेवेद्वारे कळविले जाईल व मार्गदर्शन केले जाईल. ही संपूर्ण सेवा मोफत असून WHO च्या गाईडलाईन्सला अनुसरुन सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या आपत्तीनंतरही सुविधा निरंतर सुरु राहील. जिल्ह्यातील नागरिकांना घरबसल्या कोरोना आरोग्य सेवेबाबत मोफत सल्ला व मार्गदर्शन मिळणार आहे. केडीएमजीच्यावतीने          डॉ. शीतल पाटील यांनी डॉक्टर तसेच हेल्पलाईनसाठी वरुण जैन यांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स पुरवून सहकार्य केले आहे.
000

रविवार, २९ मार्च, २०२०

बाधित रुग्णाच्या कुटुंबातील महिला सदस्याला कोरोनाची लागण कुटुंबातील इतर चार सदस्यांसह एकूण 31 संशयितांचा अहवाल निगेटिव्ह




            कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का) -  पुण्याहून आलेल्या मंगळवार पेठेतील कोरोना संसर्गिताच्या कुटुंबातील एका महिला सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. कुटुंबातील इतर चार सदस्यांसह अन्य 31 संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
            पुण्याहून मंगळवार पेठेत आलेल्या प्रवाश्याला यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही स्वॅब नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामध्ये एका महिला सदस्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज निष्पन्न झाले. कुटुंबातील इतर चार सदस्यांसह अन्य एकूण 31 संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.परंतु, खबरदारीची उपाय योजना म्हणून पॉझीटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील 4 निगेटिव्ह सदस्य व उर्वरीत निगेटिव्ह सदस्यांना स्वतंत्ररित्या संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. पुढील 14 दिवस अलगीकरणात राहून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, आशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
00000

कोल्हापूरकरांचे दातृत्व मोठं महापुराप्रमाणेच यावेळीही मदत करावी पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन



        कोल्हापूर, दि. 29(जिमाका)- महापुरावेळी कोल्हापूरकरांनी मोठं दातृत्व दाखवलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. "कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड" या खात्यावर आपली मदत जमा करावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
  महापुराच्यावेळी हजारो हात मदतीसाठी पुढे आले. कुणी धान्य दिलं. कुणी कपडे दिले. कुणी वैद्यकीय सेवा दिली. कुणी मशिनरी दिली. कुणी स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेची भूमिका स्वीकारली. यावेळी घरातून बाहेर येवू शकत नसल्याने थोड्या मर्यादा आहेत. 
अशा दानशूरांसाठी "कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड" या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी शाखेमध्ये खाते उघडण्यात आले आहे. 090110110018730 हा खाते क्रमांक आहे.IFSC Code - BKID0000901 यावर मदत करावी. 
            या संकटावर मात करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने राज्य शासन आणि कोल्हापूर जिल्ह्याला काही मदत करण्याची भूमिका घेतली आहे, त्याबद्दल त्यांना  पालकमंत्री श्री पाटील यांनी  मनापासून धन्यवाद दिले. महाराष्ट्राला निधीचा ओघ कमी पडणार नाही. सर्व निधी जिल्ह्याला मिळावा किंवा जिल्ह्याला वाटा वाढवून द्यावा.  जिल्ह्याला व्हेंटीलेटर्सची खरी गरज लागणार आहे. दुर्दैवाने वेळ आल्यास व्हेंटीलेटर्सची कमतरता भासू नये, यासाठी आपणाला पुढच्या काळात मदत लागणार आहे, अशी विनंतीही त्यांनी केली.
 0000

पत्र देवून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधीसह संबंधितांवर होणार गुन्हा दाखल पत्रासह वाहनेही होणार जप्त : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश



        कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का)  :  लोकप्रतिनिधी, विविध संस्था आणि प्रतिष्ठित व्यक्ती पत्र देवून बाहेरुन जिल्ह्यामध्ये लोकांना पाठवित आहे. यामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे आणि जिल्हा बंदीचे उल्लंघन होत आहे, अशा लोकप्रतिनिधी, संस्था तसेच संबंधित व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. यामध्ये पत्रासह संबंधिताचे वाहनही जप्त होणार आहे.
            कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेसाठी जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदी मध्ये जिल्हा बंदीही लागू  करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, मागील काही  दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे, जिल्ह्याबाहेरील काही प्रतिष्ठित व्यक्ती, संस्था, काही जबाबदार लोकप्रतिनिधी जिल्हाबाहेरील काही व्यक्तींना पत्र देत आहेत. अशा व्यक्ती निरनिराळ्या तपासणी नाक्यांवर पत्र दाखवून जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत येत आहेत आणि जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत.
            कुठल्याही संस्था, लोकप्रतिनिधी यांनी अशी बेकायदेशीर पत्रे देवून संचारबंदीचे उल्लंघन करु नये असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, अशा व्यक्ती जिल्ह्यामध्ये अचानक आल्याने जिल्ह्यामध्ये संसर्ग वाढून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमोडून पडेल. असे प्रकार घडलेले आहेत. या विरुध कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत. संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांनी अशी पत्र देवून नयेत. अशी पत्रे दिली असल्यास त्वरित मागे घ्यावीत. मागे घेतली नाहीत तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
0000


शनिवार, २८ मार्च, २०२०

मुंबई-पुण्यावरुन येणाऱ्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवणार -पालकमंत्री सतेज पाटील





        कोल्हापूर, दि. 28 (जि.मा.का)  : मुंबई- पुण्यावरुन जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना सक्तीने   संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरी सोडले जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करु नये.  जेथे आहात तेथेच घरी सुरक्षित रहा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.   
            दुधाचे टँकर, रुग्णवाहिका इतर जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनामधून व्यक्तींची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.  
वाचकांनी वस्तुनिष्ठ माहितीसाठी वर्तमान पत्रे घ्यावीत
            उद्यापासून वर्तमानपत्रे सुरु करण्याचा निर्णय सर्व संपादकांनी कालच घेतलेला आहे. वर्तमानपत्रे वितरण करणाऱ्याला  मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझर द्यावे. जेणेकरुन जे वर्तमानपत्र घरामध्ये जाणार आहे ते व्यवस्थित आहे याचा विश्वास वाचकांवर बसला पाहिजे. अशा सर्व सुविधा देण्याचे संपादकांनी मान्य केले आहे. तशी कोणतीही तक्रार येवू नये याची दक्षता त्यांनी घ्यावी. वृत्तपत्रामुळे संसर्ग होत नाही. वस्तुनिष्ठ माहिती समजण्यासाठी वाचकांनी न घाबरता वर्तमानपत्रे घ्यावीत असे आवाहनही त्यांनी केले.

            दूध उत्पादक संस्थांनी दूध न नाकारता त्याचे संकलन करावे. अतिरिक्त दुधाची भुकटी करता येईल का याबाबत केंद्राशी बोलून राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शिवभोजन थाळीच्या  चांगल्या निर्णयाचा 500 सामान्य नागरिकांना आज फायदा  झाला आहे.
            इचलकरंजी येथील निरामय आणि अलायन्स हे हॉस्पिटल अधिग्रहीत केली आहेत. त्याच बरोबर गडहिंग्लजमधील केदारी रेडेकर हॉस्पिटल स्वत:हून आमच्या ताब्यात दिले आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पारगावचे वारणा हॉस्पिटल त्यांनीही परवानगीचे पत्र दिले आहे. जिल्ह्यामध्ये दुर्देवाने वेळ आली तर सगळ्या दृष्टीने तयारी आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. 
            शेतकऱ्यांसाठी दिवसाचा वीज पुरवठा करता येईल का यासाठी राज्यस्तरावरुन माझा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये निश्चित यश मिळेल. लोकांनी संयम पाळावा. प्रशासनामार्फत योग्यती उपाय योजना करण्यात येत आहे. एक रुग्ण सापडल्यावर 100 लोकांना होम क्वॉरंटाईन करण्याची वेळ आली. 500 मीटरचा परिसर सीमाबंद करण्याची वेळ आली आहे. याचा विचार नागरिकांनी करावा. लक्षणे असतील तर ताबडतोब प्रशासनाला संपर्क करावा.  
सव्वा कोटीचे व्हेंटीलेटर
        जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सव्वा कोटी रुपयांचे व्हेटीलेटर्स विकत घेतले आहेत. मास्क, ग्लोव्हज आवश्यक त्या सर्व सुविधा कमी पडणार नाहीत यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. आपण फक्त घरात राहून आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंती पालकमंत्र्यांनी नागरिकांना केली. 

            प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनासाठी 100 खाटांची सुविधा असली पाहिजे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सीपीआरमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, ज्यांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी घरातून बाहेर पडू नये. आजपर्यंत 600 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.   गरज नसेल तर कृपा करुन घरातून बाहेर पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
 0 0 0 0  0


शुक्रवार, २७ मार्च, २०२०

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य राज्यमंत्र्यांची सीपीआरला भेट



        कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का) :- जिल्ह्यात कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळल्याचे समजल्यावर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काल रात्री तातडीने सीपीआर मध्ये भेट देऊन माहिती घेतली.
        जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण मिळाल्याचे समजल्यानंतर काल रात्री शासकीय रुग्णालयात भेट देऊन  एक वाजेपर्यंत संबंधित डॉक्टर्स व अधिकारी यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन माहिती घेतली. बाधित रुग्णाच्या परिवारातील सदस्यांचेही स्त्राव घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या सर्वांची रुग्णालयात वेगळी व्यवस्था करण्याचे आदेश श्री. यड्रावकर यांनी दिले. संबंधित बाधित रुग्णाला ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
            आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी  यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोरोना प्रादुर्भावाच्या संदर्भात आवश्यक त्या सूचना उपस्थित डॉक्टर्स अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.  यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी पाटील, रुग्णालयाचे डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000

प्रशासन दक्ष; नागरिकांनी सहकार्य करा - पालकमंत्री सतेज पाटील





        कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का) :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन दक्ष असून जनतेनेही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.
        पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, परदेशातून तसेच पुणे, मुंबई येथून आलेल्या प्रवाशांना जर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. आपण स्वत: दक्ष रहा आणि ताबडतोब प्रशासनाला कळवा. त्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही. अशा लक्षणांमुळे पहिला धोका हा आपल्या घरातील व्यक्तींना असणार आहे, याची दक्षता घ्यावी.
वृत्तपत्रांना प्रशासनाचे सर्व सहकार्य
            जिल्ह्यातील प्रमुख दैनिकांच्या संपादकांनी आज पालकमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पालकमंत्री म्हणाले, बंद असणाऱ्या वृत्तपत्रांना प्रशासनामार्फत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. पत्रकारांना अत्यावश्यक सेवेचे पास देण्यात आले आहेत. त्याच बरोबर अंक विक्रेत्यांनाही तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही पास देण्यात आले आहेत. वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांनी मास्क वापरावेत. स्वत:ची तसेच वाचकांचीही योग्य ती खबरदारी घ्यावी. यावेळी दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, दैनिक सकाळचे संपादक-संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक निखील पंडितराव, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक विजय जाधव, दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे, दैनिक लोकमतचे वरिष्ठ         सरव्यवस्थापक  मकरंद देशमुख,  दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक राजकुमार चौगुले आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेकडून लाखाचा धनादेश
            ज्यांना मदत करायची आहे त्यांनी 'कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंड' या नावाने मदत करावी असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.  या आवाहनाला  प्रतिसाद देत राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचा धनादेश आज पालकमंत्री यांच्याकडे सुपूर्द केला.
            अनेक स्वयंसेवी संस्था जेवण पुरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे स्वागतार्ह आहे. परंतु, त्याची नोंद प्रशासनाकडे करावी. प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही गोष्ट करु नये. जेणेकरुन कोणताही धोका निर्माण होणार नाही. महापुराच्या कालावधीत ज्या पद्धतीने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सेंट्रल किचन सुरु करुन जेवणाची सुविधा करण्यात आली होती त्याच पद्धतीने यावेळी देखील करण्याचा विचार आहे.
अडकलेल्या लोकांना त्याच ठिकाणी सुविधा पुरवू
            मुंबई, लातूर, रोहा आणि गोवा या ठिकाणी  नातेवाईक अडकल्याचे अनेक जणांचे फोन येत आहेत. त्या सर्वांना तिथे जेवणाची सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तशी कुणाची राहण्याची, जेवणाची अडचण असेल तर आम्हाला कळवा. तिथे आम्ही सुविधा  पुरविण्याचे नियोजन निश्चित करु. परंतु त्यांना इकडे आणण्याचा आग्रह धरु नका, कारण जिल्हाबंदी घातली आहे. काटेकोरपणे आपण संचारबंदी राबविली तर निश्चितपणे या संकटातून बाहेर पडू असा विश्वास पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
000000

एआरटी औषधे घेणाऱ्या संसर्गितांना लॉकडाऊन काळात घराजवळ मिळणार औषधे



        कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का) -  कोविड-19 (कोरोना) साथ रोगाच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन आदेश जारी करण्यात आले आहेत. या कालावधीत एचआयव्ही संसर्गितांच्या औषधांमध्ये खंड पडू नये यासाठी एआरटी केंद्राच्या वतीने एचआयव्ही संसर्गिताना त्यांच्या घराशेजारीच औषधे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपूरकर यांनी दिली.
            सी. पी. आर. हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, कोल्हापूर व आय.जी.एम. रुग्णालय इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, लोटस एआरटी कोल्हापूर या ठिकाणी ए.आर.टी. औषधे घेणाऱ्या संसर्गितांना लॉकडाऊन आदेश कालावधीत एआरटी केंद्राकडे येणे अवघड असल्याने, त्यांना त्यांच्या घराशेजारी सोयीच्या ठिकाणी औषधे पुरविण्याचा निर्णय एआरटी केंद्राच्या वतीने घेण्यात आला आहे. औषधांमध्ये खंड न पडू देण्यासाठी एचआयव्ही संसर्गितानी याचा लाभ घ्यावा.
            एचआयव्ही संसर्गिताना सकाळी १० ते १ या वेळेत औषधे  दिली जाणार  असून  ज्या संसर्गितांना दुसऱ्या टप्प्यातील (सेकंड लाईन) औषधे चालू आहेत, त्यांनी मात्र ज्या त्या एआरटी केंद्रात जाऊन औषधे घ्यावयाची आहेत. ज्या रुग्णालयात औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्यांचे नाव व त्या ठिकाणच्या आयसीटीसी कर्मचाऱ्यांचा संपर्क खालील प्रमाणे आहे.        
            ग्रामीण रुग्णालय खुपीरे (करवीर व गगनबावडा तालुक्यासाठी ) - सतिश पिसाळ - ९६२३४१६३०३
माहेश्वरी करगुप्पी-९५९५२२९२४४, (हसुर दु., शिरोली दु. - करवीर ते धामोड म्हासुर्ली भाग राधानगरी) विनायक देसाई - ९४२११०६२६०, ग्रामीण रुग्णालय मलकापूर (शाहूवाडी), क्रांतिसिंह चव्हाण -९८२२६२५२६९, चंद्रकात गायकवाड -९९२३५४५३५७, उपजिल्हा रुग्णालय कोडोली (पन्हाळा तालुका) -
तुषार माळी - ९८५००४१५७१, सतिश पाटील - ९२२६२२३११५, ग्रामीण रुग्णालय सोळांकूर (राधानगरी तालुका), विजय पाटील -९४०५११९९२७, कविता कांबळे -९५०३१८०८६७, ग्रामीण रुग्णालय गारगोटी (भुदरगड तालुका), जयवंत सावंत -७५८८०६४५०६, जयश्री पाटील,  ग्रामीण रुग्णालय आजरा, उदय किल्लेदार -९४२१७२५४५२, ताहेर शेख-९७६५३४७४६२, ग्रामीण रुग्णालय चंदगड-विनायक देसाई - ९४२११०६२६०, अश्विनी पाटील -९४०४७२८५७१, ग्रामीण रुग्णालय नेसरी-कपील मुळे -९७६७८९७४१४
स्नेहलता सटाले -९४२०८८७८११, ग्रामीण रुग्णालय कागल, ग्रामीण रुग्णालय, मुरगुड (कागल), राजेश गोधडे - ९९२१८१८९९२, धनाजी पाटील -८८०५०५२७२७, राजश्री पाटील -७५८८६२१०१३, ग्रामीण रुग्णालय, दत्तवाड (शिरोळ तालुका), अश्विनी माने -९८६०६६९४०२, रिजवान पटेल -८८५६०४०२८०, ग्रामीण रुग्णालय, शिरोळ, संदिप तकडे - ९४२०००८०५०, ग्रामीण रुग्णालय, हातकणंगले- सुजाता पाटील -७०२०४६१३७९, विजय खोत -७५८८२२१२६४, ग्रामीण रुग्णालय पारगाव- संजय गायकवाड -९२७२३२८९६७, विद्या चिखले -९९२१०८३३३२, अधिक माहितीसाठी संपर्क - सागर पाटील, एआरटी केंद्र सीपीआर हॉस्पिटल-८३७८०४५५७७, साईनाथ माने - एआरटी आय.जी. जी. एच. हॉस्पिटल इचलकरंजी -९०११७४२३०६, संदिप पाटील - एआरटी केंद्र सावित्रीबाई फुले हॉस्पिटल -९७३०६५२२२२, विकास माने - एआरटी केंद्र गडहिंग्लज - ७८७५१६६७६०,  टिप- ज्या त्या तालुक्यातील संसर्गितांनी त्यांच्याच तालुक्यात औषधे घेण्याचे कोणतेही बंधन नसून जिल्ह्य़ातील कोणत्याही सोयीच्या ग्रामीण रुग्णालयातून औषध घेऊ शकतात.
00000
           

आपले सरकार केंद्र : अर्ज मागणीस स्थगिती



        कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का) - तालुक्याच्या ठिकाणी आपले सरकार केंद्र स्थापन करण्यासाठी मागणी करण्यात आलेल्या अर्ज प्रक्रियेस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी कळविले आहे.
            महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत असलेल्या सर्व महा ई सेवा केंद्र, सेतू, सुविधा केंद्र, नागरी सुविधा केंद्र तसेच संग्राम केंद्र याना आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हीस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक तालुक्याचे तहसिल कार्यालयात (करवीर व गगनबावडा वगळून) सेतू सुविधा केंद्र कार्यरत आहे.
            सेतू सुविधा केंद्राची मुदत संपली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी (करवीर वगळून) आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी दि. 31 मार्च 2020 अखेर अर्ज मागणी करण्यात आले होती. सध्या कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रीयेस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी कळविले आहे.
0000

खासगी दवाखाने विलगीकरणासाठी अधिग्रहित करण्यास उपविभागीय अधिकारी प्राधिकृत -जिल्हाधिकारी दौलत देसाई



        कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का) - कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील खासगी दवाखाने पूर्णत : किंवा आवश्यकतेनुसार खाटांची व्यवस्था, दवाखान्यातील वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवेसहित विलगीकरणासाठी अधिग्रहित करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी जारी केले आहेत.
            कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला असून जिल्ह्यातील सर्व उपविभागयी अधिकाऱ्यांनी कोरोना (कोव्हिड-19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार आपआपल्या कार्यक्षेत्रातील खाजगी दवाखाने, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवेसहित अधिग्रहित करण्याची कार्यवाही करावी व अधिग्रहीत आस्थापना त्यांच्या खासगी व्यवस्थापनाकडे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पुढील कार्यवाही व व्यवस्थापनासाठी सुपूर्त करण्याचे आदेश दिले आहेत.
0000

ट्रॅक्टर, फवारणी यंत्र, पॉवर टिलर, मळणी यंत्रासह पत्रकारांच्या वाहनांनाही मिळणार पेट्रोल-डिझेल जिल्हाधिकारी दौलत देसाई


            कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का) - जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरुन आता शेती उपयोगी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, पिकावरील फवारणी यंत्र, पॉवर टिलर, मळणी यंत्र आदिबरोबरच प्रसार माध्यमे, पत्रकारांची वाहने (प्रसार माध्यमाचे ओळखपत्र दाखविल्यानंतर) यांनाही पेट्रोल व डिझेल पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी जारी केले आहेत.
            कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरुन केवळ अत्यावश्यक सेवासाठीच पेट्रोल व डिझेल पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार काही अत्यावश्यक सेवावरील वाहनांना सूट देण्यात आली असून यामध्ये आता शेती उपयोगी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर, पिकावरील फवारणी यंत्र, पॉवर टिलर, मळणी यंत्र आदिबरोबरच प्रसार माध्यमे, पत्रकारांच्या वाहनांनाही (प्रसार माध्यमाचे ओळखपत्र दाखविल्यानंतर) सूट देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमिन केले आहेत.
00000

गुरुवार, २६ मार्च, २०२०

होम क्वारंटाईन बाहेर फिरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल



        कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का) - जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या 358 मोटार सायकल स्वारावर आणि होम क्वारंटाईन असताना बाहेर आढळलेल्या दोन व्यक्तींवर गुन्हे नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
         गोवा व केरळ येथून आलेल्या दोघांचे  होम क्वारंटाईन केले असताना देखील ते बाहेर फिरताना आढळून आल्याने त्यांच्यावर राजारामपुरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
            कुरुंदवाड ता शिरोळ येथील गुरुकृपा परमिट बार हा पुढील बाजूने बंद ठेऊन मागील बाजून कामगाराच्या खोलीतून दारु विक्री होत असल्याचे आढळून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या पथकाने कारवाई केली. कारवाई मध्ये 39 हजार 65 रुपये किंमती दारु मिळाल्याने दारु विक्री करणारे सुस्वम विनायक गायकवाड, विशाल संजय तांबट, श्रीमती कांचन विनायक गायकवाड  (सर्व राहणार कुरुंदवाड) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना 2020 चे कलम, साथीचे रोग प्रतिबंध कायदा 1897 च्या कलमा नुसार कुरुंदवाड पोलीसांत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            इचलकरंजी येथे गावठी हातभट्टी विक्री करणारे शांतीलाल गुलाबसिंग भाट (दत्त नगर, इचलकरंजी),  गावठी हातभटी दारुसह सापडल्याने इचलकरंजी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये आणि सदरबाजार येथे गावठी हातभट्टी विक्री करणारे दिपक दिलीप माने, (बापू कांबळे गल्ली सदरबाजार) आणि परशूराम विनायक कट्टी (विचारेमाळ) यांच्यार गावठी हातभट्टी दारु विक्रीसह मिळून आल्याने शाहूपूरी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            तसेच रस्त्यावर विनाकरण फिरत असणाऱ्या मोटारसायकल धारकावर शहर वाहतूक शाखेने 107 इचलकरंजी शहर वाहतूक शाखा-72, जुना राजवाडा 8, शाहूपुरी 7, करवीर 6, कागल 8, मुरगूड 10, शिरोली एम आयडीसी 28, गांधीनगर 32, गोकूळ शिंरगाव 22, हातकणंगले 6, शिरोळ-14, आजरा 8, गडहिंग्लज 10, नेसरी 20, अशा एकूण 358 केसेस नोंदवल्या आहेत.
            कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आदेशाचे जिल्ह्यातील नागरिकांनी उल्लंघन करु नये, होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीनी घराबाहेर पडू नये  असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
0000

जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी पोलीसांकडून मिळणार पास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले आदेश



            कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का) - आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्ह्यात                 कोविड -19 विषाणू प्रतिबंधासाठी आदेश लागू करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक आदेश कालावधीत जीवनावश्यक व अत्यावश्यक बाबींची वाहतूक सुरळीत रहाण्यासाठी नागरी व ग्रामीण क्षेत्रात पासेस देण्यासाठी पोलीस अधिकारी यांना प्राधिकृत केले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
        प्रतिबंधात्मक आदेश कालावधीत अत्यावश्यक बाबींची वाहतूक त्याच प्रमाणे संबंधीत व्यक्ती व संस्था संचारबंदीत बाहेर जाण्यासाठी त्यांचा निवास किंवा अस्थापना ज्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आहे, त्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज केल्यानंतर विनंती अत्यावश्यक कारणासाठी आहे, याबाबत खातरजमा करुन ठरविक कालावधीसाठी संबंधीत पोलीस अधिकारी वाहन परवाना किंवा पासेस देण्याची कार्यवाही करतील. पासेस देताना मर्यादीत स्वरुपात देण्यात येऊन संचारबंदीचे उल्लघन येणार नाही याची दक्षता संबंधीत अधिकारी यांनी घ्यावयाची आहे.
            जिल्हास्तरावर जे शासकीय अधिकारी - कर्मचारी अत्यावश्यक सेवा व आपत्ती व्यवस्थापन कामकाजात सहभागी आहेत, याची यादी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या नंतर निवासी उपजिल्हाधिकारी या यादीची खातरजमा करुन संबंधीत अधिकारी - कर्मचारी यांना पासेस व वाहन परवाने देण्याची कार्यवाही करतील. तालुकास्तरावर जे शासकीय अधिकारी-कर्मचारी अत्यावश्यक सेवा व आपत्ती व्यवस्थापन कामकाजात सहभागी आहेत, याची यादी तहसिलदार कार्यलयास प्राप्त झाल्या नंतर या यादीची खातरजमा करुन संबंधीत अधिकारी - कर्मचारी यांना पासेस व वाहन परवाने देण्याची कार्यवाही तहसिदार  करतील.
            सर्व ॲम्बुलन्स, आरोग्य सेवेतील शासकीय वाहने, पोलीस वाहने, डीव्ही कार, न्यायाधीश, तहसिलदार, उपविभागीय दंडाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी यांच्या वाहनांना वाहन परवान्यांची गरज असणार नाही, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
0000

जीवनावश्यक व अत्यावश्यक सुविधांसाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



                                          
            कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का) - आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्ह्यात                 कोविड -19 विषाणू प्रतिबंध, प्रचार, प्रसिध्दी आणि प्रतिसाद कार्यक्रम राबविण्याबरोबरच जिल्ह्यातील आराग्य सेवा, जीवनावश्यक व  अत्यावश्यक सुविधा, सेवा सुरळीत सुरु ठेवणे, त्यांचा पुरवठा, वाहतुक वितरणाचे नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हास्तर अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
            आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवास तसेच पर्यटन आणि इतर कामानिमित बाहेर जावून परत कोल्हापूर मध्ये आल्याचे आढळून आले आहे. यामुळे  जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाय योजना  राबविण्यात येत आहेत.  या विषाणूमुळे  जिल्ह्ययात आपत्तीजनक परिस्थिती उदभवू नये यासाठी पुर्व तयारी व प्रतिसाद संत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.  कोरोनाच्या पाशर्वभूमीवर जिल्हास्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडे विशेष जबाबदाऱ्या व त्या अनुषंगाने वेळोवेळी देण्यात येणाऱ्या अतिरीक्त जबाबदाऱ्या पुर्ण कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी  या  अधिकाऱ्यांना आवश्यक ते सर्व अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
            आरोग्य सेवा  विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाय योजनांसाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजबीये (9923680346) यांच्यकडे छ . प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा व कोल्हापूर विलगीकरण कामावरील दैनंदिन नियंत्रण, कोल्हापूर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पाटील (9766532014) यांच्याकडे महानगर पालिका क्षेत्रात अधिकारी महानगर पालिका विलगीकरणासाठी योग्य सोईनीयुक्त खाजगी रुग्णालये शोधणे व त्यांचे अधिग्रहण आदेश देणे व तेथील
व्यवस्थापन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी पाटील (9867043980)  व वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र फाळके (9765788221)  यांच्याकडे
सर्व शासकीय व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवा व विलगीकरण कामावरील दैनंदिन नियंत्रण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक (9423039869), वैद्यकीय अधिकारी डॉ . पटेल (9420133718), आरोग्य सेवा कुष्ठरोगचे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाटील (9403498708)  यांच्याकडे ग्रामीण भागात व नगरपालिका क्षेत्रात विलगीकरणासाठी योग्य सोईनी युक्त खाजगी रुग्णालये शोधणे व अधिग्रहित करणे व तेथील व्यवस्थापन, डॉ. विनायक भोई (9423285956) यांच्याकडे सर्व औषधे उपकरणे व साधन सामग्री व्यवस्थापन  जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
            जीवनावश्यक वस्तू व इंधन उत्पादन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके (9422087077)  यांच्याकडे अन्नधान्य पुरवठा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे (9881053400) यांच्याकडे फळे, भाजपाला, कृषीजन्य वस्तू, खते, बी-बियाणे,  एचपी गॅस सेल्स ऑफिसर आदित्य तौनक (9822163031)  यांच्याकडे पेट्रोल , डिडोल , स्वयंपाकाचा गॅस व सर्व प्रकारचे इंधन, सहा आयुक्त (अन्न) मोहन केंबळकर (9822041128)  व सहा. आयुक्त (औषध) मनिषा पाटील (9405556424)  यांच्याकडे ओषधे , वैद्यकीय उपकरणे इत्यादी उत्पादन व पुरवठा, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. वाय. ए. पठाण (9423324609) यांच्याकडे  अंडी, मांस, पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य, उत्पादन वाहतूक , विक्री व इतर व्यवस्थापन आणि दुग्ध सहकारी दुधसंस्थाचे सहा. निबंधक गजेंद्र देशमुख (9421439485)  यांच्याकडे दुध , दुग्धजन्य पदार्थ उत्पादन, वाहतूक, विक्री व्यवस्थापना विषयी सर्व बाबींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
            अत्यावश्यक वस्तुंचा व सेवांचा पुरवठा करण्यासाठी भारत दुरसंचार निगमचे  महाव्यवस्थापक एस. के. चौधरी (9423086860)  यांच्याकडे इंटरनेट सेवा, दुरध्वनी सेवा, मोबाईल सेवा व ई - कॉमर्स इत्यादी, महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे (7875769111)  यांच्याकडे विद्युत पुरवठा,  प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिफन अल्वारीस (8108639933)  यांच्याकडे वाहन उपलब्धता, वाहतूक व्यवस्था व संबंधित कर्मचारी, जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू व सेवांची वाहतूक व्यवस्था, वाहन परवाने देण्याच्या कामात समन्वय राखणे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहूल माने (9822631082) यांच्याकडे बँकिंग सेवा व एटीएम इत्यादी, जिल्हा माहिती अधिकरी प्रशांत सातपुते (9403464101)  यांच्याकडे प्रसारमाध्ये व सर्व संबंधित कामे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे (9921301155) यांच्याकडे ग्रामीण पाणी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकरी प्रियदर्शनी मोरे (9011046079)  यांच्याकडे ग्रामीण स्वच्छता, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ (9175044909)  यांच्याकडे नगरपालिका व पंचायत समितीकडील स्वच्छता, आरोग्य उपसंचालक हेमंतकुमार गोडसे (9158868861)  यांच्याकडे ग्रामीण आरोग्य सेवा, जिल्हा आरोग्य अधिकारी योगश साळी (7719986661) यांच्याकडे नगरपंचायती व नगरपरिषदेकडील आरोग्य सेवा, जिल्हा उद्योग केंद्राचे महा व्यवस्थापक एस. बी. शेळके (9423839512)  व महाराष्ट्र औद्योगिक विकास चे प्रादेशिक अधिकारी धनंजय इगळे  यांच्याकडे  जिल्ह्यात सुरु ठेवावे लागणारे अत्यावश्यक उद्योग, व्यापारी आस्थापना, गोदामे व्यवस्थापन आणि जिल्हा उपनिबंधक अमरसिंह शिंदे (9860610727)  यांच्यावर गोदामे व्यवस्थापन  व बाजार समिती समन्वय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
00000

तक्रार निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाच WhatsApp क्रमांक कार्यान्वित नागरिकांनी समस्यांबाबत केवळ संदेश पाठवावेत. -पालकमंत्री सतेज पाटील



            कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का)-कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविणेसाठी जिलाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये जिल्हा प्रशासनाकडून पाच WhatsApp क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर केवळ तक्रारी, प्रश्न या संदर्भात संदेश पाठवावेत. त्यांच्या समस्या सोडविल्या जातील, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. जिल्हयात येणा-या अडी अडचणी, तक्रारी प्रश्न संदर्मात जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन बांगर हे या नियंत्रण कक्षाचे प्रमुख आहेत.
            या कक्षामध्ये 9356716563, 9356732728, 9356713330, 9356750039 व 9356716300 हे WhatsApp क्रमांक आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर समस्यांबाबत केवळ संदेश पाठवावेत. यामध्ये नाव,मोबाईल क्रमांक, पत्ता आणि तक्रारीचे स्वरुप असा उल्लेख असावा. खोटी माहिती अफवा पसरविणारे संदेश या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याशिवाय प्रत्यक्ष संपर्कासाठी 1007 आणि 0231-2659232 हे क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
00000

मंगळवार, २४ मार्च, २०२०

संचारबंदी कालावधीत जिल्ह्यात 122 जणांवर कारवाई -डॉ. अभिनव देशमुख


                  
       कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : संचारबंदीच्या कालावधीत भा.दं.वि.स कलम 188 अन्वये काल अखेर जिल्ह्यामध्ये 82 जणांवर तर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 40 जणांवर कारवाई  केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
       शहर विभाग- जुना राजवाडा-9, राजारामपुरी -6, शाहूपुरी-9, लक्ष्मीपुरी-6, करवीर विभाग - करवीर-2, कागल-1, एम.आय. डी. सी.-1,  इस्पुर्ली-2, शाहूवाडी विभाग - 1, इचलकरंजी विभाग- इचलकरंजी-2, शिवाजीनगर -22, शहापूर -3, हुपरी-13, गडहिंग्लज विभाग- आजरा-1, जयसिंगपूर विभाग- शिरोळ-1, वडगाव-3, असे विभाग निहाय काल अखेर 82 जणांवर आणि आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
0000

होम क्वारंटाईन शिक्का मारताना प्रत्येकवेळी तो निर्जंतुकीकरण करा शिक्का मारताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना



                            
      कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : होम क्वारंटाईन शिक्का मारला जाणारी व्यक्ती व शिक्का मारणारी व्यक्ती या दोघांचे हात शिक्के मारण्यापूर्वी स्वच्छ साबणाने धुवून घेण्यात यावेत.  हात कोरडे झाल्यानंतर त्या प्रवाशाच्या हातावर मारण्यात येणारा स्टॅम्प स्टरिलायझरमध्ये किंवा 1% सोडियम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये 20 सेकंद बुडवून ठेवण्यात यावा. त्यानंतरच इनडिलीबल इंकमध्ये बुडवून शिक्का मारण्यात यावा.  पुन्हा दुसऱ्या व्यक्तीस शिक्का मारण्यापूर्वी हा स्टॅम्प पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या.
         जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज याबाबत महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी सर्व ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सर्व ग्रामपंचायती यांना पत्र पाठविले आहे.
          या पत्रात म्हटले आहे, जिल्हयातील प्रत्येक गावात व नागरी भागात परदेश प्रवास करुन आलेल्या तसेच कोल्हापूर बाहेरील ठिकाणावरुन आलेल्या व्यक्तिंची नोंदवही टेवणे त्याचप्रमाणे त्यांना 14 दिवस विलगीकरण करुन निरिक्षणाखाली ठेवण्याबाबत  सूचना देण्यात आलेल्या आहेत.  यासाठी खालील प्रमाणे कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी.           
          * परदेश प्रवास करुन आलेल्या परंतु मुंबई विमानतळ किंवा छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेल्या व्यक्तींना पुन्हा शिक्का मारण्याची आवश्यकता नाही.
       * परदेश प्रवास करुन आलेल्या परंतु तपासणी न झालेल्या प्रत्येक व्यक्तीस प्रथम सीपीआर हॉस्पीटल, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, आय.जी.एम., इचलकरंजी येथे तपासणी करण्यासाठी सक्ती करण्यात यावी. तपासणीअंती अशा नागरिकांमध्ये कोणतीही लक्षणे न आढळल्यास संबंधित हॉस्पीटलमार्फत त्यांच्या उजव्या हातावर होम क्वारंटाईन शिक्का मारण्याची कार्यवाही केली जाईल. *
            *  जिल्हयाबाहेरील ठिकाणावरून म्हणजे पुणे, मुंबई व इतर जिल्हा-राज्ये या ठिकाणाहून कोल्हापूरमध्ये आलेल्या व्यक्तिच्या बाबतीत खालील प्रमाणे कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी.
            * जिल्हयाबाहेरील अशा व्यक्तींची स्थानिकरित्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपालय वैद्यकीय अधिका-यामार्फत प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात यावी.
            * प्राथमिक वैद्यकीय तपासणीत कोरोना सदृष्य विषाणू प्रादुर्भावाची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीस थेट सीपीआर हॉस्पीटल किंवा इतर अधिसूचित रुग्णालयांकडे पाठविण्यात यावे.
            * वैद्यकीय तपासणीत कोणतीही लक्षणे नसतील तर अशा व्यक्तीस गावात प्रवेश केल्यापासून 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यासाठी उजव्या हातावर शिक्का मारण्यात यावा. परंतु यामध्ये खालीलप्रमाणे खबरदारी घेण्यात यावी.
          होम क्वारंटाईन शिक्का मारला जाणारी व्यक्ती व शिक्का मारणारी व्यक्ती या दोघांचे हात शिक्के मारण्यापूर्वी स्वच्छ साबणाने धुवून घेण्यात यावेत.  हात कोरडे झाल्यानंतर त्या प्रवाशाच्या हातावर मारण्यात येणारा स्टॅम्प स्टरिलायझरमध्ये किंवा 1% सोडियम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये 20 सेकंद बुडवून ठेवण्यात यावा. त्यानंतरच इनडिलीबल इंकमध्ये बुडवून शिक्का मारण्यात यावा.  पुन्हा दुसऱ्या व्यक्तीस शिक्का मारण्यापूर्वी हा स्टॅम्प पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात यावा.
00000