सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२

वेगळ्या पद्धतीने विचार करायला घाबरु नका माजी राष्ट्रपती कलाम यांचा विद्यार्थ्यांना सल्ला : सिंबायोसिस स्कूल इमारतीचे अनावरण

कोल्हापूर, दि. २ : वेगळ्या पद्धतीने विचार करा आणि असा विचार करण्यास कधीही घाबरू नका , असा सल्ला भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे.अब्दुल कलाम यांनी आज विद्यार्थ्यांना दिला.
सिंबायोसिस संस्थेच्या गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील सिंबायोसिस स्कूलच्या नूतन इमारतीचे उदघाटन आणि शालेय विद्यार्थ्यांशी संवाद असा कार्यक्रम आज झाला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. त्यावेळी ते बोलत होते. हरळी येथीस शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, भूषण पटवर्धन, डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
श्री. कलाम यांनी सुमारे तासभर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, उच्च ध्येय, सातत्य, चिकाटी आदी गुणांच्या आवश्यकतेबाबत सविस्तर सांगितले. त्यांनी सुरवातीलाच ज्ञान  म्हणजे काय याची उकल करुन सांगितली. ते म्हणाले, ज्ञान म्हणजे सृजनशीलता, चांगले काम करण्याची असलेली मनापासूनची तळमळ आणि धैर्य यांची बेरीज म्हणजेच ज्ञान होय. शिक्षणामुळं सृजनशीलता येते. सृजनशीलतेमुळे व्यक्ती विचार करू शकतो आणि विचारांमुळे कृती करण्याची शक्ती मिळते.
जीवनात नेगहमी उच्च ध्येय बाळगली पाहिजेत, असे सांगून श्री. कलाम म्हणाले, तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्यात एकमेवाव्दितीय बनण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी उच्च ध्येय, ज्ञान संपादन करण्याची इच्छा, कष्ट आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या चार गोष्टींची अंगी बाणवा. त्याचबरोबर वेळेचे महत्व ओळखा. कारण वेळ कोणासाठीही  थांबत नाही. त्याचबरोबर वेळेवर आपण नियंत्रणही मिळवू  शकत नाही. पर्यावरणाचे महत्व पटवून सांगताना श्री. कलाम यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान पाच झाडे लावली पाहिजेत, त्यांचे जतन करायला हवे, असे सांगितले.
यावेळी श्री. कलाम यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, गडहिंग्लजच्या उप विभागीय अधिकारी निलिमा धायगुडे, तहसिलदार अनिल कारंडे, गट विकास अधिकारी चंचल पाटील, शाळेचे मुख्याध्यापक दत्ता देशपांडे आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.