इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

गरिबी दूर करण्यासाठी विविध घटकांनी एकत्र यावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील



कोल्हापूर, दि. 11 : समाजातील दुर्बल घटक सक्षम होवून गरिबी दूर व्हावी यासाठी विविधस्तरातील  घटकांनी निरपेक्ष भावनेने एकत्र येवून प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य, गरीब कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी कोल्हापूर शहरानजिक मोठी निवासी वसाहत लवकरच उभी करण्यासाठी प्रयत्नशिल असून या प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून सी.ए. शरद सामंत या निष्कलंक, चारित्र्यवान व्यक्तीमत्वाने काम पहावे, अशी इच्छा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
दि महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट या विश्वस्थ संस्थेच्या सामंत परिवार समाज सेवा निधीतर्फे सी.ए. शरद सामंत शैक्षणिक पुरस्कारांचे सुमारे 40 दिव्यांग, मतिमंद, अनाथ, ग्रामीण विद्यार्थी, विद्यार्थींनीना 2 लाखांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू इन्सिटट्यूट (सायबर) चे अध्यक्ष डॉ. रणजितसिंह शिंदे होते. यावेळी संस्थेचे नुतन अध्यक्ष सी.ए. गिरीष सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, अरुण नरके, बाळ पाटणकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सी.ए. शरद सामंत हे निष्कलंक आणि चारित्र्यवान व्यक्तीमत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सामाजातल्या दुर्बल घटकांना मदत करण्याचे  शरद सामंत यांचे काम आदर्शवत आहे. समाजातल्या विविधस्तरातील घटकांनी गरिबी दूर करण्यासाठी निरपेक्ष भावनेने एकत्र येणे व त्यासाठी टार्गेट ओरिएंटेड काम करणे आवश्यक आहे. कोल्हापूर शहराच्या जवळपास सर्व सामान्य माणसाला स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी मोठी निवासी वसाहत उभी करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असून त्यामध्ये शरद सामंत यांनी अध्यक्ष म्हणून काम करावे अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दि महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट या संस्थेच्या इमारतीसाठी जागेचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शरद सामंत यांचा सपत्नीक सत्कार झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रणजितसिंह शिंदे यांनी शरद सामंत यांचे मार्गदर्शन सदैव महत्वाचे असल्याचे सांगून त्यांच्या प्रदिर्घ सामाजिक कार्याचा गौरव केला.
शरद सामंत यांनी सामाजिक संस्थांमध्ये वर्षानुवर्षे कार्यरत ज्येष्ठांनी स्वत: बाजूला होवून तरुण, उत्साही कार्य करणाऱ्यांचा मार्ग मोकळा करुन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्यानी संस्थेच्या इमारतीसाठी 35 लाख  रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे सांगून आपल्या 66 व्या वाढदिवसानिमित्त मातृ संस्थेस 66 हजारांची देणगी दिली.
यावेळी चेतना विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सी.ए. गिरीष सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चेतना संगीत शास्त्र विभागासाठी 40 हजार रुपयाचा निधी देण्यात आला तर हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्ड संस्थेचे 10, अवनी संस्थेचे 5, सायबरचे 6, बाल संकुलातील 10 यांच्यासह अत्यंत दुर्बल घटकातील विद्यार्थी, विद्यार्थींना शैक्षणिक प्राविण्य व गुणवत्ता यासाठी प्रोत्सहानात्मक पुरस्कार देण्यात आले. यावेळी कोल्हापूर शहरातील सामाजिक क्षेत्रातील विविध नामवंत उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.