गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाकडून डिसीपीएसधारकांना पावत्या वाटप

 

 

कोल्हापूर दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक अनुदानित शाळांकडील ३१८ डीसीपीएसधारक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन २०२०-२१ मधील जमा रक्कमेच्या पावत्या वाटप करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षक वसुंधरा कदम यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा १० टक्के तर राज्य शासनाकडून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगार रक्कमेच्या 14 टक्के असे एकूण २४ टक्के अशी सुमारे २२ कोटी इतकी रक्कम व्याजासह डिसीपीएस धारक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्या असून या रक्कमेच्या पावत्या कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आल्या आहेत.

डिसीपीएस धारक २९५ कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेले Permanent Pension Account Number (PRAN) 'प्राण किट' यांचे वाटपही कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. प्राण किटच्या माध्यमातून डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांना आपल्या खात्यावर जमा रक्कम व व्याज याचा तपशिल पाहता येणार आहे.

जिल्ह्यातील १०८ कर्मचाऱ्यांची ६७ लाख रक्कमेची वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. याकामी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सहा शिक्षण संचालक सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे सहकार्य लाभले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.