इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ३० जून, २०२२

1 ते 15 जुलै विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यातील 2 लाख 43 हजार बालकांना ओआरएस पाकिटांचे वाटप होणार

 


 

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्हयामध्ये अतिसार नियंत्रण पंधरवडा 1 ते 15 जुलै 2022 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. अतिसारामुळे होणारे बाल मृत्यू शुन्यावर पोहोचविणे हे या मोहिमेचे अंतिम ध्येय आहे. अतिसार ही बालकांच्या आजारामधील एक गंभीर समस्या असून अहवालानुसार देशामध्ये दरवर्षी साधारणत: 5 वर्षाखालील 1 लाख बालकांचा मृत्यू अतिसारामुळे होतो.

अतिसार प्रतिबंधासाठी तसेच जलद व प्रभावी उपचारासाठी या पंधरवड्याअंतर्गत विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे. पंधरवड्यामध्ये 5 वर्षाखालील बालकांना आशावर्करद्वारे घरभेटी देवून ओआरएस पाकिटांचे वाटप करणे व पालकांना प्रात्यक्षिक दाखवून व आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. ओआरएस व झिंक कोपरा 517 ठिकाणी आरोग्य संस्थास्तरावर तयार करण्यात येणार आहे. हात स्वच्छ धुण्याबाबतचे प्रात्यक्षिक शाळा व अंगणवाडीमध्ये देण्यात येणार आहे. ग्राम आरोग्य पोषण दिनी पोषण आहारासंबंधित प्रात्याक्षिक व समुपदेशन करण्यात येईल. तसेच अतिसाराची बालके शोधून उपचार देवून तीव्र अतिसार असलेल्या बालकांना संदर्भित करण्यात येईल. जिल्हा स्तरावर वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, तालुकास्तरावर आरोग्य सहाय्यक पुरुष, आरोग्य सहाय्यिका स्त्री, गटप्रवर्तक व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावर्षी 5 वर्षाखालील 2 लाख 43 हजार 402 बालकांना ओआरएसचे वाटप करण्यात येणार आहे.

कार्यक्षेत्रातील आरोग्य सेविकेचे रिक्त असलेले उपकेंद्र पोहोचण्यास कठीण भाग, डोंगराळ भाग, पुरग्रस्त भाग, स्थलांतर होणारा भाग, भटकंती करणा-या लोकांची वस्ती, वीटभटटी, बांधकाम सुरु असलेला भाग, तात्पुरत्या स्वरुपाच्या झोपड्या, रस्त्यावर राहणारी बालके, मागील दोन वर्षी अतिसाराचे साथ असलेली क्षेत्रे, पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेले क्षेत्र या क्षेत्रांसाठी सुक्ष्म कृती आराखडा तयार करुन या भागातील बालके पूर्णपणे सुरक्षित होतील असे नियोजन केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देशमुख यांनी या कालावधीमध्ये कोविडची साथ सुरु झाल्यास कोविडच्या मार्गदर्शक सुचनांचा वापर करून मोहिमेची अंमलबजावणी करण्याबाबत सुचित केले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी देखील मोहीमेचे काटेकोर नियोजन करुन मोहीम यशस्वी करण्याबाबत सुचना दिल्या.

5 वर्षाच्या आतील बालकांमध्ये अतिसारामुळे होणारे धोके टाळता यावेत व बालकांच्या अतिसाराच्या गंभीरतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागास सहाकार्य करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले.

000000

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.