इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन

 

 

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) :  शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा तसेच शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी, शेतकरी व वरिष्ठ कृषि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा, यासाठी कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून दिनांक 1 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीत महाराणा प्रतापसिंह चौक परिसर, सिल्लोड, जि. औरंगाबाद येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कृषि महोत्सवात 600 पेक्षा जास्त स्टॉल्स, 99 विविध प्रात्यक्षिके, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग, शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा, कृषि प्रदर्शन, चारही कृषि विद्यापीठामार्फत विविध विषयांवर तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि महोत्सवात शेती औजारे, बी बियाणे, लागवड साहित्य, शेती औषधे, ग्रीन हाऊस व साहित्य, जैवतंत्रज्ञान, डेअरी तंत्रज्ञान व उत्पादने, कुक्कुट पालन, हॉल्टीकल्चर, सिंचन यंत्रणा, पशूधन विकास, सौर उर्जा, जलव्यवस्थापन, शेतमाल साठवणूक यंत्रणा, अपारंपारिक ऊर्जा संरक्षित शेती, पणन व विपणन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, शेतविमा व अर्थसहाय्य, शैक्षणिक संस्था, सहकार क्षेत्र, फार्म टेक्नॉलॉजी, उती तंत्रज्ञान, जैविक खते, फार्म मशिनरी या संस्था, कंपन्या सहभागी होणार आहेत.

 

जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांनी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये उच्च तंत्र व नवनवीन तंत्रज्ञान, संधी, व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी या राज्यस्तरीय कृषि महोत्सवास अवश्य भेट द्यावी. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.