इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्वपूर्ण

 


        केंद्र सरकारच्या वतीने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. देशातील नागरिक, गावे, शहरे आणि राज्यांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून त्याचा लाभ नागरिकांना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील गरजू नागरिकांपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचवून त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शासनाच्या योजनांची माहिती पोहचवण्यासाठी करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे घेण्यात आलेल्या महाशिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारच्या वतीने 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरु असणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून देशातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

संकल्प यात्रेची उद्दिष्टे - विविध योजनांतर्गत पात्र परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचवणे, या माहितीचा प्रसार करुन त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे, नागरिकांशी व लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करुन घेणे अशी या योजनेची उद्दिष्टे आहेत.

 

ठळक वैशिष्ट्ये - सुरुवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या 110 जिल्ह्यांना आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून 26 जानेवारी 2024 पर्यंत उर्वरित जिल्ह्यांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा समन्वय साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग कार्यरत आहेत. या यात्रेच्या प्रभावी समन्वयासाठी राज्य स्तरावर समिती नेमून राज्य व जिल्ह्यांमध्ये नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

 

 संकल्प यात्रेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद - ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ जिल्ह्यात सुरु असून या अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांपासून वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवून त्याचा लाभ वंचित घटकांना मिळण्यासाठी हे अभियान जिल्ह्यासह राज्यभरात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे.

 

विविध योजनांची माहिती - विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात राधानगरी, शिरोळ, चंदगड, कागल, हातकणंगले, शाहूवाडी, करवीर, भुदरगड, पन्हाळा, आजरा, चंदगड व गगनबावडा अशा 12 तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या मोहिमेत केंद्र सरकारच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात 430 ठिकाणी झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला 1 लाख 85 हजारहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. जिल्ह्यात 1025 ग्रामपंचायतींमधे कार्यक्रम होत असून 26 जानेवारीपर्यंत कार्यक्रम सुरु राहणार आहेत. या संकल्प यात्रेअंतर्गत 18 डिसेंबरपर्यंत सुरक्षा बीमा योजनेच्या एकूण 1192 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. जीवन ज्योती योजनेचा लाभ 961 लाभार्थ्यांना, आरोग्य शिबीराचा लाभ 13 हजार 525 लाभार्थ्यांनी घेतला आहे. पीएम उज्वला योजनेच्या लाभासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांची संख्या 1 हजार 487 आहे. क्षयरोगासाठी तपासणी केलेल्या लोकांची संख्या 19 हजार 225 आहे. सिकलसेल तपासणी केलेल्या लोकांची संख्या 7 हजार 801 आहे. या व्यतिरीक्त नैसर्गिक शेती करणाऱ्या 210 शेतकऱ्यांशी संवाद साधला गेला.  विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ मनोगत एकूण 548 लाभार्थ्यांनी नोंदविले.

            कंदलगावमधील महाशिबीरातून लाभ- विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे 18 डिसेंबर रोजी महाशिबीर घेण्यात आले. या यात्रेला लाभार्थी शेतकरी, महिला, पुरुष व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दिला. येथे उभारण्यात आलेल्या विविध योजनांच्या स्टॉल्स मधून 1 हजार 200 हून अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला. यावेळी हर घर जल योजने अंतर्गत शंभर टक्के नळ जोडणी केल्याबद्दल तसेच आयुष्यमान भारत योजनेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कंदलगावचा तसेच विविध योजनांमध्ये चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायती व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आयुषमान भारत, प्रधानमंत्री आवास, हर घर जल, प्रधानमंत्री उज्वला  योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, संजय गांधी निराधार योजना, महा-ई-सेवा, किसान क्रेडीट कार्ड, जन धन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा, स्वामित्व योजना, प्रधानमंत्री पोषण अभियान, प्रधानमंत्री किसान सन्मान, प्रधानमंत्री प्रणाम, नॅनो फर्टीलायझर योजनेसह कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभाग, समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन आदी विविध योजनांची माहिती या ठिकाणी देण्यात आली.

देशातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू, गरजू आदी घटकांसाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात सुरु आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ वंचित घटकांना मिळण्यासाठी ही संकल्प यात्रा महत्वपूर्ण ठरेल..

                                                                        लेखन- वृषाली पाटील,

                                                                        माहिती अधिकारी,

                                        जिल्हा माहिती कार्यालय,

                                                                        कोल्हापूर

 

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.