इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १९ डिसेंबर, २०१५



नाबार्डचा वित्त आराखडा महत्वाचा दस्तऐवज
   -- जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे

      कोल्हापूर, दि. 19 : नाबार्डद्वारे प्रत्येकवर्षी देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केला जाणारा संभाव्य वित्त आराखडा (PLP) एक महत्वाचा दस्तऐवज असून याचा वापर भारत सरकार, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, देशातील सर्व बँकाकडून केला जात असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी केले.
जिल्ह्याच्या सन 2016-17 करीता संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे झाली यावेळी श्री. आगवणे मार्गदर्शन करीत होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबईचे सहा.महा.प्रबंधक सांगवीकर, बँक ऑफ इंडिया, कोल्हापूरचे जिल्हा आग्रणी व्यवस्थापक एम.जी. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. आगवणे यावेळी म्हणाले, जिल्हा अग्रणी बँक दस्तऐवजामध्ये प्रस्तावित वित्तीय आराखड्याचा सुयोग्य वापर करुन रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे जिल्ह्याची पतयोजना (DCP) बनवून देतात त्याची जिल्ह्यातील सर्व बँकाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या विकासामध्ये मोलाचे योगदान देत आहे. जिल्ह्याचा सन 2016-17 संभाव्य वित्तीय आराखडा 7 हजार 185 कोटी 27 लाख रुपयांचा आहे. यामध्ये शेती, शेतीपुरक क्षेत्रासाठी 4 हजार 465 कोटी 62 लाख रुपये तर सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगासाठी 1 हजार 980 कोटी 41 लाख तर प्राथमिक क्षेत्रासाठी 739 कोटी 24 लाख रुपये प्रस्तावित केले आहेत. शेती  आणि शेतीपुरक क्षेत्रामध्ये पीक कर्जासाठी 2 हजार 676 कोटी 33 लाख रुपये, सिंचनासाठी 543 कोटी 2 लाख, शेती यांत्रिकीकरणासाठी 320 कोटी 64 लाख, फळबाग रेशीम उद्योगासाठी 74 कोटी 75 लाख, वनीकरण पडित जमीन सुधारणासाठी 14 कोटी 55 लाख, दुग्धव्यवसायासाठी 410 कोटी 61 लाख, कुकुटपालनासाठी 42 कोटी 45 लाख, शेळी-मेंढीपालनासाठी 40 कोटी 19 लाख, मत्स्यव्यवसायासाठी 3 कोटी 95 लाख, गोडावून, शेतीगृहयासाठी 206 कोटी 1 लाख, भुविकास, जमीनसुधारणा यासाठी 53 कोटी 40 लाख, शेतीमाल प्रसंस्करणासाठी 58 कोटी 39 लाख रुपये यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      प्राथमिक क्षेत्रातील गृहकर्जासाठी 433 कोटी 92 लाख, अपरंपरागत उर्जासाठी 29 कोटी 11 लाख, शैक्षणिक कर्जासाठी 134 कोटी 25 लाख, निर्यातीसाठी 75 कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात आला आहे. महिला बचत गटासाठी 50 कोटी रक्कमेचा विशेष वित्तपुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे. यावेळी 2016-17 करीता संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे (PLP) प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.