इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५



विक्रीकर अधिकाऱ्यांनी प्रशासकीय सुधारणा
आधुनिक तंत्रज्ञान आणि कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे
                                     - अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार
कोल्हापूर दि. 6 : विक्रीकर अधिकाऱ्यांनी प्रशासकीय सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि विक्रीकर कायद्याचे ज्ञान आत्मसात करुन विक्रीकर विभाग अधिक लोकाभिमूख आणि कार्यक्षम करण्याच्या कामात सक्रीय व्हावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी येथे बोलतांना केले.
विक्रीकर विभागाच्या कोल्हापूर झोनमधील पदोन्नत झालेल्या सहाय्यक विक्रीकर आयुक्त आणि विक्रीकर अधिकाऱ्यासाठी विक्रीकर भवनमधील सभागृहात आयोजित केलेल्या सहा दिवसांच्या पायाभूत प्रशिक्षण सत्राच्या समारोप समारंभात अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार बोलत होते. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर विक्रीकर आयुक्त सी. एम. कांबळे, विक्रीकर सह आयुक्त विलास इंदलकर उपस्थित होते.
 प्रशासकीय कामकाज करताना जिद्द, निष्ठा आणि कार्यतत्परतेबरोबरच कायद्याचे ज्ञान, प्रसंगावधान, संघवृत्ती आणि निर्णयक्षमता हे गुण अंगी बानवण्याचा सल्ला देऊन अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार म्हणाले, आपल्याला देण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करतांना कायद्याच्या चौकटीत राहून नीट आणि नेटकी भूमिका घ्यावी,  पारदर्शी आणि लोकाभिमूख प्रशासनाव्दारे विक्रीकर विभागाचा लौकीक वृध्दींगत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या ई-डिस्नीक प्रणालीस राष्ट्रीय पातळीवरील स्कॉच पुरस्काराने गौरविण्यात आले असून, ही प्रणाली शासनाने राज्यभर लागू केली आहे. यापुढील काळात ई-जमाबंदी हे सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
कोल्हापूर झोनचे अप्पर विक्रीकर आयुक्त सी. एम. कांबळे म्हणाले, विक्रीकर विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विक्रीकर अधिकाऱ्यांनी विभागात होणाऱ्या सुधारणा आणि बदलांना सामोरे जाण्याची क्षमता आणि सजगता प्रशिक्षणातून निर्माण करावी, विक्रीकर विभागातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन त्यांच्यात नवी उमेद निर्माण करण्याचा विक्रीकर विभागाचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. विक्रीकर विभागाने कोल्हापूर झोनसाठी निश्चित केलेले महसूलाचे उद्दिष्ट मुदतीत साध्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विक्रीकर सह आयुक्त विलास इंदलकर यावेळी म्हणाले, विक्रीकर विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कामात अचूकता, गतीमानता आणि कार्यतत्परता जोपासून विक्रीकर विभागाचा लौकीक वाढविण्यास कटिबध्द व्हावे. पदोन्नत अधिकाऱ्यांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण सत्रे आयोजित करुन त्यांना त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करुन देऊन विक्रीकर विभागाचे कामकाज अधिक सुकर करण्यास प्राधान्य असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी विक्रीकर अधिकारी बजरंग मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी बेस्ट परफॉरमर ऍ़वॉर्डचे वितरणही अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये विक्रीकर अधिकारी शंकर पाटील, माधुरी पाटील,अभिजीत भोसले या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या प्रशिक्षण सत्रानिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत विक्रीकर भवन येथे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. सहा दिवसांच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये कोल्हापूर झोनमधील सहा जिल्हयातील 46 अधिकारी सहभागी झाले होते.
या समारंभास मुकुंद पन्हाळकर यांच्यासह  विक्रीकर विभागातील अधिकारी तसेच कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.