इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६



शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत
शासनाची सकारात्मक भुमिका
             -- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर दि. 31 : शिक्षण क्षेत्राच्या विकासाला राज्य शासनाने गती दिली असून शिक्षण क्षेत्राबरोबरच माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाची सकारात्मक भुमिका असून त्यांचे रास्त प्रश्न निश्चितच मार्गी लावले जातील असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या 44 व्या राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्राचा समारोप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील वडणगे येथील देवी पार्वती हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे तसेच महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे ठराव या अधिवेशनात करण्यात आले असून, या संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने समिती नेमली असून, या समितीच्या अहवालानुसार शासन सकारात्मक विचार करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
याप्रसंगी खासदार राजू शेट्टी यांनीही आपले मनोगत व्यकत केले. माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही दिली.
प्रारंभी महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष वाल्मिक सुरासे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या समारंभास महामंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश चडगुलवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.