इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६




छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन
राज्य शासनाची वाटचाल
                                           --  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्रीभुदरगड किल्ल्याच्या विकासासाठी 11 कोटीची योजना-- पालकमंत्री

कोल्हापूर दि. 27: छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेला मार्ग आणि प्रशासकीय नितीचा अवलंब करुन राज्य शासनाची वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिवप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या श्रीरांगणाकड ते श्रीभूदरगड धारातीर्थ यात्रा मोहिमेचा सांगता समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गारगोटी येथे मौनी विद्यापीठाच्या मैदानात झाला. समारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, संभाजीराव भिडे (गुरुजी) आदि मान्यवर उपस्थित होते.  
छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते, आदर्श राजे होते. त्यांनी जीवनभर सर्वसामान्य जनता डोळयासमोर ठेवून राज्यकारभार केला. सामान्य माणसामध्ये आपल्या कार्याने राष्ट्रतेज निर्माण करण्याचं महान कार्य केले. अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला बरोबर घेवून, उत्तम प्रशासन केले. त्यांनी त्याकाळी जलनियोजन, सागरी सुरक्षा नियोजन, सागरी किनारपट्टींचं संवर्धन आणि संरक्षण, जंगल नियोजन, सामान्यांचं हित अशा सर्व गोष्टींचे सुक्ष्म नियोजन करुन राज्यकारभार केला. राष्ट्रासमोर ज्यावेळी आव्हाने उभे राहतात त्यावेळी छत्रपतींचे कार्य, विचार आणि निती आदर्श मानून त्या आव्हानांचा सामना करण्याचा मार्ग मिळतो. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासनाची वाटचाल असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणूस, शेतकरी संघटीत करुन त्यांना स्वराज्याचा मंत्र देवून त्यांच्यात राष्ट्रतेज जागृत केले. त्यातून स्वराज्य निर्मिती झाली. त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून सर्वांनी वाटचाल करणे राष्ट्रहिताचे  असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सामाज्याला आपल्या नितीने आणि कतृत्वाने शह देवून स्वराज्य मिळविले. त्यांचा पुतळा गारगोटी येथे उभा करण्यासंदर्भात प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.
            छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळयासमोर ठेवून तरुणांमध्ये शिस्त आणि राष्ट्रतेज जागृत करण्याचं काम शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. तरुणांमध्ये देशाभिमान, धर्माभिमान निर्माण व्हावा, तसेच देश, धर्म संस्कृती विषयी अभिमानही निर्माण व्हावा या हेतूने शिवप्रतिष्ठानने हाती घेतलेले काम महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
श्रीभुदरगड किल्ल्याच्या विकासासाठी 11 कोटीची योजना-- पालकमंत्री
            याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाचा अभिमान असणारा तरुण निर्माण करण्याचा प्रयत्न शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असून धारातीर्थ यात्रा मोहिमेचा हाती घेतलेला उपक्रम महत्वाचा आहे. प्रतिष्ठानच्या या कार्याला राज्य शासन सहयोग देईल असेही ते म्हणाले.
            राज्यातील सर्व गड किल्ल्यांवर जीवंतपणा निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्रीभुदरगड किल्ल्याच्या विकासासाठी 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करुन ती पर्यटन मंत्रालयाला सादर केली आहे. ही योजना मार्गी लावण्याच्यादृष्टीने निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. श्रीभुदरगड किल्ल्यावरील तलावाच्या सुशोभिकरणासाठी 44 लाखाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. गडावरील सर्व रस्त्यांची कामे प्राधान्यक्रमाने हाती घेतली जातील, असेही ते म्हणाले.
            संभाजीराव भिडे गुरुजी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, शिस्त आणि निती डोळयासमोर ठेवून काम होणे गरजेचे आहे. गावागावात तालमींची निर्मिती करुन कुस्तीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनामार्फत विशेष योजना हाती घ्यावी अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
            याप्रसंगी पुढील वर्षाच्या मोहिमेसाठी दौडीत ध्वज धरण्याचा मान मिळविणारे पंडीतराव कट्टीकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला. सुरुवातीला देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी आमदार बजरंग देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब बेडगे यांनी आभार मानले. समारंभास माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि शिवप्रेमी तरुण उपस्थित होते.
           

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.