इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

पोलिसांची निवासस्थाने सुधारणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील




कोल्हापूर, दि. 2 :  पोलिसांची निवासस्थाने अत्यंत दयनीय स्थितीत असून ही स्थिती सुधारण्यासाठी राज्यात 29 हजार निवासस्थाने पोलिसांसाठी बांधण्यात येणार असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 1400  निवासस्थानांचा समावेश आहे,  ही बांधकामे पूर्ण होईपर्यंत सध्या असणाऱ्या निवासस्थानांमध्ये शौचालये, सांडपाणी व्यवस्था, पाणी पुरवठा, रंगरंगोटी अशा सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
            पोलीसांच्या निवासस्थानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच आढावा घेतला असून प्रत्येक पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात पोलीस क्वाटर्समध्ये जाऊन भेट द्यावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस मुख्यालयातील निवासस्थानांमध्ये भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी आयोजित समारंभात त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एस.साळुंखे, कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, नगरसेविका स्वाती यवलुजे, पोलीस उप अधीक्षक (गृह) सतिश माने पोलीस उप अधीक्षक भरतकुमार राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.           
पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथील 100 वर्षापूर्वीची शाहूकालीन 518 जुनी निवासस्थाने पाडून त्याठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळातर्फे बहुमजली इमारत बांधकामाबाबतची प्रशासकीय कारवाई सुरु आहे. ही बांधकामे पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असून तोपर्यंत सध्या असलेल्या क्वाटर्समध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शौचालय, सांडपाणी व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था, रंगरंगोटी यांच्या दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तसेच 1986 मध्ये बांधलेल्या निवासस्थानांच्या मेंटन्ससाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव तयार केले असून सदरचे प्रस्ताव आपण स्वत: मंत्रालयस्तरावर घेऊन जाणार असून यासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन देणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. नगरपालिकेची आचारसंहिता संपताच याबाबतची निविदा प्रक्रिया करा व मे अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस निवासस्थानांची पाहणी करत असताना चंद्रकांत पाटील यांनी वाहक आप्पासो घाटगे यांच्या घरी भेट देऊन चहापान केले. 
            कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातंर्गत सध्या पोलीस मुख्यालय, कोल्हापूर 718 यामध्ये जुनी शाहू कालीन 518 व 1986 साली बांधलेली 200, लक्ष्मीपुरी पोलीस लाईन 60, रिसाला पोलीस लाईन, कसबा बावडा 51, जुना बुधवार पोलीस लाईन 84 अशी 913 निवासस्थाने उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण कल्याण महामंडळामार्फत 1139 निवासस्थानांना मंजूरी प्राप्त झालेली आहे. सदर मंजुरी अंतर्गत पहिल्या टप्यात जुना बुधवार पोलीस लाईन येथे 200 निवासस्थाने व लक्ष्मीपुरी पोलीस लाईन येथे 200 निवासस्थाने. जुनी निवासस्थाने पाडून त्या ठिकाणी बांधणेबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरु झालेली आहे. तसेच इचलकरंजी येथे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कलानगर येथील पोलीस खात्याच्या मोकळ्या जागेवर एकूण 242 निवासस्थाने बांधकामाबाबत कार्यवाही सुरु आहे. पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथे 718 निवासस्थाने उपलब्ध असून त्यापैकी जुनी शाहू कालीन 518 तर 1986 साली बांधलेली 200 निवासस्थाने आहेत. यामध्ये 18 निवासस्थाने राहण्यास अयोग्य असून उर्वरित मध्ये कर्मचारी राहत आहेत.
             
                        पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पोलीस विभागाकडून जनतेच्या व प्रशासनाच्या अपेक्षा वाढत असून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी व पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.  आतापर्यंत पोलीसांना 180 चौ. फुटाची निवासस्थाने होती. ती आता 430 चौ.फुटाची होतील. जिल्हा मुख्यालयातील जुनी 518 निवासस्थाने पाडून टप्याटप्याने टॉवर उभे केले जातील.  1986 मधील 200 निवासस्थाने न पाडता त्यांच्यात सुधारणा केली जाईल. यामुळे पोलीसांना व त्यांच्या कुटुंबियांना अधिक चांगले वातावरण लाभेल.
            कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार पोलीस उप अधीक्षक (गृह) सतिश माने यांनी केले


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.