इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज व सजग मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया जिल्ह्यात 2450 मतदान केंद्रे तर 21 लाख 38 हजार मतदार






कोल्हापूर, दि.5 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पारपडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणा व पोलीस यंत्रणा सज्ज आणि सतर्क असल्याने मतदारांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे,  असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कामकाजाचा राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. राजेश देशमुख, निवडणूक निरीक्षक अजित पवार, नंदकुमार काटकर, तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते.                             
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची सर्व यंत्रणांनी जागृकपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन करुन सहारिया म्हणाले, मतदारांवर दबाव टाकणे तसेच प्रलोभन दाखविणाऱ्या प्रवृत्तीवर पोलीस दलाने आणि निवडणूक यंत्रणेने अंकुश ठेवावा. तसेच निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे.
निवडणूक यंत्रणेने निवडणूक कळात सर्वांना समान वागणूक देण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करुन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया म्हणाले, आचारसंहितेचे कशाही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. आचारसंहिता कक्ष 24 तास कार्यरत ठेवावा, जिल्ह्यात येणारी खाजगी विमाने आणि हेलिकॅप्टर्स तसेच जिल्ह्यात येणाऱ्या रेल्वेंची तपासणी जिल्ह्याच्या एंट्री पॉइंटलाच करावी अशी सूचनाही त्यांनी केली. भरारी पथकाबरोबरच स्थीर सर्वेक्षण पथकेही आवश्यकतेनुसार वाढविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.       
निवडणूक संबंधाने तसेच उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या अनुषंगाने सोशल मिडियावर असलेल्या जाहिराती व पोस्टबाबत आचारसंहिता कक्षाने तसेच सोशल मिडियासाठी नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय पथकाने दक्ष राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी सूचना करुन ज.स. सहारिया म्हणाले, सोशल मिडियासाठी नेमलेल्या पथकामध्ये सायबर सेल प्रतिनिधीचाही समावेश करावा.
श्री. सहारिया यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे महत्व विषद करुन सविस्तर मार्गदर्शन केले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने  मतदार जागृतीचा प्रभावी कार्यक्रम हाती घेतला आहे.  जिल्ह्यात मतदारांना विविध माध्यमातून  जागृत करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्याने निवडणूक प्रक्रीया सुरळीत होण्यासाठी भरारी पथके, आचारसंहिता कक्ष, व्हिडीयो पथके, चेक पोस्ट इत्यादी प्रकारच्या उपाययोजना प्राधान्य क्रमाने कराव्यात. निवडणूक काळात होणाऱ्या मोठया  आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी बँकांची मदत घ्यावी. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती करुन त्याठिकाणी जास्तीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असे सांगून उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर कटाक्षाने लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे व नियमबाह्य बाबी दिसून आल्यास कठोर कारवाई करावी असेही आयुक्त श्री. सहारिया म्हणाले.
निवडणुकीमधील उमेदवारांनी दाखल केलेले शपथपत्र व त्यातील माहिती देणारे फ्लेक्स संबंधित मतदान  केंद्रावर 4x3 आकारात उभे करावेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यंदा प्रथमच मतपत्रिकेतील मजकूराचा फाँट वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना राज्यभर 40 स्टार प्रचार आणि इतरांना 20 स्टार प्रचारक आणण्याची मुभा देण्यात आल्याचेही श्री. सहारिया यांनी सांगितले. निवडूण आलेल्या उमेदवारांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्यात सादर करणे बंधनकारक असून याबाबत जात पडताळणी प्रमाणपत्र समिती मार्फत यागोष्टी प्राधान्य क्रमाने व्हाव्यात, यासाठी विभागीय आयुक्तांना निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
2450 मतदान केंद्रे तर 21 लाख 38 हजार मतदार
जिल्ह्यात येत्या 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 2 हजार 450 मतदान केंद्रे निश्चित केली आहे. तर या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 21 लाख 38 हजार 80 इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 16 हजार 260 मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 248 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती, आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रण कक्ष, 40 भरारी पथके, 39 स्थीर सर्वेक्षण पथके, 56 व्हीएसटी पथके आणि 14 व्हीव्हीटी पथके याबरोबरच पेड न्युज, जाहिरात प्रसारण, सोशल मिडिया तसेच खर्च तपासणी पथके कार्यरत केली असून वाहतूक आराखडा, साहित्य वितरण आराखडा तसेच मतदान जागृती कार्यक्रमावरही अधिक भर दिला असल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने 20 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ऑनलाईन नामनिर्देशनपत्रे भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरु आहे. 
यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व समित्यांचा तसेच पथकांच्या कामाचा राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, आयकर विभागाचे सहायक आयुक्त महेश शिंगटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी इंद्रजित देशमुख, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नोडल अधिकारी विवेक आगवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी.टी.पवार, विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. नांदिवडेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी गणेश देशपांडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा कोषागारे अधिकारी रमेश लिथडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शशिकांत किणिंगे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री. भानप महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक श्री. आंधळे यांच्यासह सर्वसंबंधित विभागाचे अधिकारी, सर्व समित्या आणि पथकांचे प्रमुख अधिकारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नामनिर्देशन प्रक्रियेची पाहणी
राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी करवीर तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. उमेदवार तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी निवडणूक प्रक्रियेविषयी चर्चा केली. 

000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.