इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७


जोतिबा मंदीर परीसर विकास आराखडा : 25 कोटी मंजूर
माणगाव, शाहू जन्मस्थळ, पंचगंगा घाट, पन्हाळा विकासासही निधी
                 -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
लाईट व साऊंड शो - दर्जेदार, आकर्षक  व्हावा : पालकमंत्री
कोल्हापूर दि.26 :  श्री क्षेत्र जोतिबा मंदीर, वाडी रत्नागिरी परीसर विकास आराखड्‌या अंतर्गत पहिल्या टप्यातील 25 कोटीच्या तर माणगाव परिसर विकास आराखड्‌यापैकी पहिल्या टप्यातील 2 कोटी, पंचगंगा घाट विकास आराखड्यास 4 कोटी 78 लाख, शाहू जन्मस्थळ विकास 2 कोटी 10 लाख, पन्हाळा लाईट व साऊंड शोसाठी 4 कोटी 50 लाख निधीस शासनाने मान्यता दिली असून ही पर्यटन विकासाची कामे वेळेत, दर्जेदार आणि देखणी करावीत, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
 पर्यटन विषयक जिल्हास्तरीय समितीची बैठक सर्कीट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, सदसय्‍ आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 श्री  क्षेत्र जोतिबा मंदीर, वाडी रत्नागिरी परीसर विकासाचा 155 कोटीचा आराखडा शासनास सादर केला असून पहिल्या टप्यात 25 कोटीच्या आराखड्यास शासनाने मान्यता दिली आहे.  यामध्ये दर्शन मंडप, सेंट्रल प्लाझा, पार्किंग, टॉयलेट काँम्प्लेक्स, सांडपाणी आदी कामांचा समावेश असून ही कामे देवस्थान समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.  यामधील अंडर ग्राऊंड वायरिंग, भक्त निवास आदींचा 4.50 कोटींचा सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.  माणगांव परिसर विकासाच्या 5 कोटीच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्यात  2 कोटीच्या निधीस शासनाने मान्यता दिली यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्यावर भाषणावर आधारित होलोग्राफिक शो तसेच तक्याची सुधारणा आदी कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर वस्तुसंग्रहालय विकास आराखडा यावर सविस्तपणे चर्चा करण्यात आली. संग्रहालयाचा 13 कोटी 42 लाखाचा आराखडा तयार केला असून पहिल्या टप्यात 2 कोटी 10 लाखास मान्यता मिळाली आहे. ही कामे दर्जेदार आणि गुणात्मक, वेळेत करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. या बैठकीत पंचगंगा घाट विकासाचा 26 कोटी 85 लाखाचा बृहत आराखडा तयार केला असून पहिल्या टप्यात 4 कोटी 78 लाख रुपयास शासनाने मान्यता दिली आहे, यामध्ये प्रवेशद्वार, रस्ता, बगिच्या, जुन्या घाटाचे संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन केंद्र आदी विकास कामांचा समावेश आहे.
 किल्ले पन्हाळागड येथे लाईट व साऊंड शोसाठी 4 कोटी 50 लाखाचा आराखडा मंजूर झाला असून यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.  पन्हाळ्यावर लाईट आणि साऊंड शो दर्जेदार आणि गुणात्मक काम करण्याबरोबरच संपूर्ण किल्ले पन्हाळागडाचा इंटीग्रेटेड प्लॅन तयार करुन एक मिशन पन्हाळ्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्याची सूचना याबैठकीत करण्यात आली. यावेळी मसाई पठार, काळम्मावाडी धरणावरील बगिचा विकास, राधानगरी, येवळणजुगाई मंदिर आदींच्या विकासाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. याबैठकीत बड्याचीवाडी येथील काळभैरव मंदिर परिसराचा विकास 7 लाख, पट्टणकोडोली येथील भक्तीनिवासासाठी 8 लाख, कलानंदीगड परिसर विकासासाठी 20 लाख, तळेमाऊली मंदिर विकासासाठी  40 लाख, किल्ले सामानगड विकासासाठी 10 लाखाच्या आराखड्यांना मंजूरी मिळाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पर्यटन विकासांतर्गत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर बनविण्यासाठी शासनामार्फत टप्या टप्याने पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून या निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन विकासाची नव नवी कामे हाती घेतली जात आहेत. ही कामे वेळेत, दर्जेदार, देखणी करण्यावर सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक भर द्यावा, यासाठी निष्णात आणि नामांकित कंत्राटदाराकडून कामे करुन घ्यावीत, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर तसेच पन्हाळ्यावर लाईट व साऊंड शो - दर्जेदार, आकर्षक  व्हावा : पालकमंत्री
पर्यटन विकासांतर्गत भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर तसेच पन्हाळागडावर तयार करण्यात येणारा लाईट व साऊंड शो हा दर्जेदार, आकर्षक आणि देखणा करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, अशी सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
या बैठकीत मान्यवर लोकप्रतिनिधींनीही आपापल्या सूचना केल्या. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी स्वागत केले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाची अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, श्री. वेदपाठक, सामाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, सहायक नियोजन अधिकारी भुषण देशपांडे यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पर्यटन समितीचे सदस्य आणि सर्व संबंधित विभांगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                                                                  0 00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.