इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २४ जून, २०१७

लष्करी व शासकीय इतमामात शहीद सावन माने यांना अखेरचा निरोप हजारोंचा जनसमुदाय गहिवरला


        






कोल्हापूर, दि. 24  : अमर रहे... अमर रहे, शहीद जवान सावन माने अमर रहे..  भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदे्मातरम अशा गगनभेदी घोषणांनी साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान सावन माने यांना शाहूवाडी तालुक्यातील गोगवे येथे लष्करी व शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद सावन माने यांच्या पार्थिवास त्यांचे सैन्य दलात सेवेत असणारेच बंधू सागर माने यांनी मुखाग्नी दिला. यावेळी वडील बाळकू माने, आई शोभाताई माने यांच्यासह उपस्थित असणारा हजारोंचा जनसमुदाय गहिवरला.
                यावेळी शहीद सावन माने यांच्या पार्थिवास राज्य शासनाच्यावतीने सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. याबरोबरच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार चंद्रदिप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार सत्यजीत पाटील, 109 इंन्फट्री बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.एस.लेहल, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनीही शहीद सावन माने यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली., कर्नल कावेरीअप्पा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पन्हाळा प्रांताधिकारी अजय पवार, शाहूवाडीचे पोलीस उप अधीक्षक आर.आर.पाटील,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने, निवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड यांच्यासह शहीद सावन माने यांचे नातेवाईक  यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
                शहीद सावन माने यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव आज सकाळी मूळ गावी गोगवे येथे आणण्यात आले. वडील बाळकू माने, आई शोभाताई माने, तसेच नातेवाईक आणि जनसमुदायांनी साश्रुनयनांनी अंत्यदर्शन घेतले. गोगवे गावातून शहीद सावन माने यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. पंचक्रोशीतील प्रत्येक चौकात सावन माने अमर रहे.. वीर जवान तुझे सलाम अशा घोषणांचे बॅनर्स लावण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा महिला, आबालवृध्द, तरूण मुले, मुली, शाळेची मुले, शहीद सावन माने अमर रहे च्या घोषणा देत होते. यावेळी लष्करी व पोलीस दलातील जवानांनी शहीद सावन माने यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाच्या शोकभावना अनावर झाल्या. याप्रसंगी पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी, शैक्षणिक, सहकारी क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
                सकाळी 9 वाजता शहीद सावन माने यांचे पार्थिव कोल्हापूर विमानतळावर आले यावेळी सैन्य दल आणि प्रशासन यांच्यावतीने त्यांना विमानतळावर मानवंदना देण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यांच्यासह जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अदरांजली वाहिली. कोल्हापूर स्टेशन हेड कॉर्टरचे ॲडम कमांडंट कर्नल कावेरीअप्पा, मेजर नवीन पवार, सुभेदार रघुनाथ रेहमान यांच्यासह उपस्थित असणाऱ्या सैन्य दलाच्या पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवान सावन माने यांना मानवंदना दिली.
                यावेळी शहीद सावन माने यांचे संपूर्ण कुटुंबिय सैन्य दलाच्या सेवेत आहे असे सांगून कर्तव्य बजावत असताना देशासाठी दिलेले सावन माने यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. महाराष्ट्र शासन या कुटुबाच्या पाटीशी ठामपणे उभे राहील. दुखा:च्या या काळात हा परिवार एकटा नसून संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे. शहीद सावन माने यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केली. 
               

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.