इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १३ जून, २०१७

संपूर्ण निधी वेळेत खर्च करण्याची खबरदारी घ्या - जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार कृषि विभागाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश





कोल्हापूर, दि. 13 :  कृषी विभागाकडील उपलब्ध निधी समर्पित होणार नाही, याची दक्षता घेऊन यापुढे निविदा प्रक्रिया वेळेत राबवून ऑक्टोबरपर्यंत कामे सुरु झाली पाहिजेत, मिळणाऱ्या निधीचा विनियोग संपूर्णत: त्याच वर्षी होईल, याची खबरदारी घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.
 कृषी विभागाकडील विविध योजनांची जिल्हास्तरीय कार्यकारणी समित्यांची बैठक 40 ठाणा येथील आत्मा सभागृहात सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत झाली.   यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .कुणाल खेमणार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.जी. किणिंगे, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, कृषि उपसंचालक सुरेश मगदुम, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, एन.ए.आर.सीचे संचालक एन.वाय.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गतीमान पाणलोट विकास अंतर्गत गतवर्षी 3 कोटीचा निधी समर्पीत करण्यात आला असून वेळेत नियोजन न झाल्याने निधी समर्पीत करावा लागला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कृषी विभागाकडून निधी समर्पीत होत आहे हे योग्य नसून मिळणाऱ्या निधीचा विनियोग विहित मुदतीत करण्याची खबरदारी संपूर्ण यंत्रणेने घ्यावी असे सांगून मागेल त्याला शेततळे ही मुख्यमंत्री देवेंन्द फडणवीस यांची प्राधान्यक्रमाची योजना असून या योजनेमधील कामे अधिक गतीमान होण्याची गरज अधोरेखित केली. तसेच मृदा आरोग्य प्रत्रिका अभियानामध्ये 15 जून पर्यंत 70 टक्के काम पूर्ण होणे आवश्यक होते त्या दृष्टीनेही कामाची गती वाढवावी असे त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संदर्भात इंन्श्यूरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहत नसल्याबद्दल तसेच प्रकरणाच्या निर्गतीकरणाचे प्रमाणही कमी असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कृषी खात्याकडील विविध योजनांचा लाभ देत असताना प्रत्येक वेळी लाभार्थी बदलले जावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या उपस्थितीत कृषी विभागाकडील विविध येाजनांच्या जिल्हास्तरीय कार्यकारणीच्या बैठका झाल्या. यामध्ये उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान बैठकीत 25 मे ते 8 जून 2017 या कालावधीमध्ये उन्नत शेती समृध्द शेतकरी पंधरवडा साजरा करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले. या पंधरवड्यात 1112 गावांमध्ये 77 शास्त्रज्ञ, 1020 मार्गदर्शक अधिकारी आणि 1444 प्रगतशील शेतकरी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात आले.  आत्मा अंतर्गत कॅफेटेरिया मधील पिक प्रात्यक्षिके, अभ्यास दौरा, प्रशिक्षण, शेती शाळा, किसन  गोष्टी आदी कार्यक्रमांच्या आराखड्यावर  चर्चा करण्यात आली. या आराखड्यामध्ये कृषिसाठी 57.53 लाख तर कृषि संलग्न विभागासाठी 8.15 लाखाची तरतुद करण्यात आली आहे. रेशिम विकाससाठी 3.55 लाखाची मागणी करण्यात आली आहे. तर उप वनसंरक्षक कोल्हापूर वन विभाग यांनी 2 लाखाची मागणी केली आहे. तथापी या दोन्ही यंत्रणांनी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावे असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
 राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेमधील कामाचा आढावा घेताना सन 2016-17 मध्ये 50 शेतकऱ्यांचा 50 एकर क्षेत्राचा एक गट या प्रमाणे हे अभियान राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 30 गट मंजूर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सन 2014-15 मध्ये 123 प्रस्ताव विमा कपंनीला पाठविण्यात आले होते त्यापैकी 38 प्रस्ताव नामंजूर झाले. सन 2015-16 मध्ये 5 प्रस्ताव नामंजूर झाले अनेक प्रस्ताव कंपन्यांकडे प्रलंबित आहेत. आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी जिल्हास्तरीय बैठकांना उपस्थित राहत नाहीत याबद्दल याबैठकीत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येवून संबंधितांना याबद्दल कळवावे अशा सूचना देण्यात आल्या.
 प्रधानमंत्री पिक विमा योजना ही कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एैच्छिक आहे. या योजनेमध्ये 8905 कर्जदार शेतकरी तर 1438 बिगर कर्जदार शेतकरी सहभागी आहेत. सन 2016-17 मध्ये जिल्ह्यात एकूण 20 लाख 52 हजार रुपयाची रक्कम विविध शेतकऱ्यांना विम्या पोटी देण्यात आली आहे.
महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राच्या उभारणीसाठी स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.लि.  या कंपनीची निवड करण्यात आली असून जिल्ह्यात 76 महसूल मंडळांपैकी 24 ठिकाणी केंद्रांच्या उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. उर्वरित ठिकाणीही गतीने कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी यावेळी दिले.
 राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-कडधान्य या योजनेचा उद्देश जिल्ह्यात कडधान्य पिकाचे क्षेत्र व उत्पादन, उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांना या पिकातील सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती देणे हे आहे. यामध्ये 10 हेक्टरच्या क्लस्टरवर पिक प्रात्यक्षिक घेण्यात येणार असून प्रती शेतकरी कमीत कमी 0.40 हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे. एकात्मिक किड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव व्यवस्थापन, कृषी अवजारे आदींबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
कृषी उन्नती योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी सन 2017-18 मध्ये 544 औजारे प्राप्त झाली असून यासाठी सुमारे साडे तीन हजार अर्ज प्राप्त झाले आहेत यातून लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थी निवडण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकासमध्ये सन 2017-18 साठी जिल्ह्यातील मुमेवाडी (ता. आजरा), कासार कुतळे, आपताळ  (ता. राधानगरी), मजले (ता. हातकणंगले), पैझारवाडी (ता. पन्हाळा) या सहा गावांची निवड करण्यात आली आहे.
            मृद व जलसंधारण कामाचा आढावा घेत असताना जिल्ह्यात सन 2016-17 मध्ये 58179 मृदा आरोग्य पत्रिका वितरणाचे उद्दिष्ट होते याच्या तुलनेत 62659 आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आल्या. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 768 आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. सन 2017-18 साठी जिल्ह्यातील 43 हजारचे उद्दिष्ट होते 15 जून पर्यंत 70 टक्के काम होणे आवश्यक असल्याने या कामांचीही गती वाढवा असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची प्राधान्य क्रमाची योजना आहे. या अंतर्गत निवडलेल्या गावातील पाणलोट विकासच्या कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करुन द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सन 2017-18 साठी गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून 8 कोटी 16 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार मधील कामांसाठी 6 कोटी 52 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सन 2016-17 मध्ये एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात विशेष घटक योजनामधून 6 कोटी 55 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. यापैकी 77 कामांसाठी  3 कोटी 74 लाख निधी खर्च झाला व उर्वरित निधी समर्पीत करण्यात आला. यावर्षी कृषी विभागाने अत्यंत काटेकोर नियेाजन करुन निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी व ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी. कोणत्याही परिस्थितीत निधी अखर्चीत राहू नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
            मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत 61 कामे पूर्ण झाली असून  66 कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्याला उद्दिष्ट 407 शेततळ्यांचे असून या योजनेमधील कामांची गती वाढविण्याची गरज जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केली. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत उपजीविका कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
            या विविध बैठकांना कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.