इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेसाठी गटशेती प्रकल्प उपयुक्त - कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा कृषि तंत्रज्ञान महोत्सव आणि कृषि प्रदर्शनास सुरुवात




कोल्हापूर, दि. 12 : दिवसेंदिवस कमी होत चाललेले शेतीचे क्षेत्र विचारात घेता, यापुढील काळात गटशेती प्रकल्पाद्वारे शेती करुन शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्नता साधावी, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले.
 शासनाचा कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालयात आयोजित केलेल्या कृषि तंत्रज्ञान महोत्सवाचे आणि कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होत. समारंभास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण कोकाटे, संचालक (संशोधन) डॉ. शरद गडाख, कृषि सहसंचालक महावीर जंगटे आदि मान्यवर उपस्थित होते.
गटशेतीसाठी किमान 20 शेतकऱ्यांनी एकत्र येवून 100 एकरावर गटशेतीच्या प्रकल्प हाती घेतल्यास शासनाकडून अनुदानही उपलब्ध होत असल्याने हा प्रयोग शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितपणे आर्थिक स्थैर्य निर्माण करु शकतो असा विश्वास व्यक्त करुन डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, कृषी विद्यापीठाने शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनासाठी कृषि संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित केले असून या तंत्रज्ञानाचा आणि नव नव्या बियाणांच्या वानाचा शेतकऱ्यांनी विनियोग करुन शेती क्षेत्रात प्रगती साधावी.
 राज्यातील शेतकऱ्यापर्यंत कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान पोहचवून शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रातील सर्वानीच प्रयत्न करावेत, असे आवाहन करुन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, महाराष्ट्रात कृषी क्षेत्रावर सर्वाधिक भर दिला असून कृषी तंत्रज्ञानाद्वारे लाभदायी शेती करण्याबरोबरच एकात्मिक पीक पध्दतीचाही शेतकऱ्यांनी अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच शेतीबरोबर पशुपालन, कुक्कुटपालन, फलोत्पादन, फळप्रक्रिया असे शेतीपुरक व्यवसाय करुन आर्थिक संपन्नता साधावी.  तसेच कृषी व्यवस्थापनाचाही अवलंब करावा. यापुढील काळात आवश्यकतेनुसार पीक पध्दतीत सुधारणा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच कृषी पदवीधारकांनी यापुढे गावात राहून गावाच्या विकासाची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. राळेगणसिध्दी व हिवरे बाजार प्रमाणेच राज्यातील अन्य गावे विकसित करण्यास कृषी पदवीधारकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले
राहुरी कृषी विद्यापीठाने कृषी संशोधनात लौकिक निर्माण केल्याचे सांगून कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, कृषी विद्यापीठाने 257 विविध पिकांचे वान विकसित केले असून 3000 हून अधिक कृषी तंत्रज्ञान विकसित केले आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे, यासाठी कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजित  केल्याचे ते म्हणाले. कृषी विद्यापीठांतर्गत ‍विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियान राबविण्याबरोबरच किमान 5 झाडे लावून कृषी परिसर वृक्षाच्छादीत करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी गटशेती उपयुक्त असून कृषि विद्यपीठाने विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकामी कृषी विभागाने आणि  कृषी पदवीधारकांनी सक्रिय योगदान देणे गरजेचे आहे. ऊसावरील हुमनी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 35 लाखाचा निधी देवून कोल्हापूर येथे हुमनी किड नियंत्रण प्रयोग शाळा विकसित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.  कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध वानांचा शेतकऱ्यांनी लाभ घेवून अधिकाधिक शेती उत्पन्न काढावे तसेच बाजार पेठांचा कल विचारात घेवून पीक पध्दतीत सुधारणा करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
 कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख म्हणाले, कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन केले असून या महोत्वाचा आणि कृषी प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच नजिकच्या जिल्हयातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, या महोत्सवानिमित्त्‍ या परिसरात विविध पिकांच्या 45 वानांच्या प्रात्याशिकांचा अनुभव शेतकऱ्यांना घेता येईल. यामध्ये बियाणांचे वान, विविध खते, औजारे आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी विद्यापीठाचे (विस्तार शिक्षण) संचालक डॉ. किरण कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी विद्यापीठाने‍  विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. हवामानातील बदल, तमपान वाढ, अनियमित पाऊस या साऱ्यांवर मात करण्यासाठी शेतकरी प्रथम हा उपक्रम हाती घेतला असून शाश्वत शेतीच्या दृष्टीने हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 या प्रसंगी कृषी सहसंचालक महावीर जंगटे यांनी मनोगत व्यक्त केले. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी.जी.खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रा. तरडे यांनी आभार मानले. या समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदुम, शेतीनिष्ठ शेतकरी संजीव माने यांच्यासह अनेक मान्यवर, कृषी संशोधक, कृषी तंत्रज्ञ, कृषी अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हुमनी किड नियंत्रण प्रयोग शाळेचे शुभारंभ
ऊसावरील हुमनी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 35 लाखाचा निधी देवून विकसित केलेल्या हुमनी किड नियंत्रण प्रयोग शाळेचा शुभारंभ कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांच्याहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होत. समारंभास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण कोकाटे, संचालक (संशोधन) डॉ. शरद गडाख, कृषि सहसंचालक महावीर जंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी आदिजण उपस्थित होते.
कृषी प्रदर्शनास मान्यवरांची भेट
 यावेळी विविध पीकांच्या वानाचे शेती प्रात्यक्षिकांनाही मान्यवरानी भेट देवून या प्लॉटची पाहणी केली. कृषी महाविद्यालय परिसरात आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे उदघाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये 15 हून अधिक ऊस जातीचे वान, विविध प्रकारच्या बियाणाचे वान, ट्रॅक्टर, टिलर, रोट वेटर, यांत्रिक औजारे, पिकांचे मुल्य वर्धन तंत्रज्ञान, औषधे, किटक नाशके, ब्रुशी नाशके, जैविक खते विविध प्रकारच्या ज्युस तसेच कृषी विद्यापीठाने विकसित  केलेल्या तंत्रज्ञानावर आधारीत प्रात्यक्षिके, कृषी औजारे मांडण्यात आली होती. या प्रदर्शनास शेतकरी आणि नागरीकानी भेट देवून माहिती घेतली.

0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.