इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

पर्यटन विकासासाठी नियोजन समितीतून भरीव निधी श्री अंबाबाई विकासाचा 68 कोटीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्यात -जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार पर्यटन पर्व : पर्यटन जागृती व मार्गदर्शन शिबिर संपन्न




        कोल्हापूर, दि. 9 : कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधुन भरीव निधी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जात आहे.  श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 68 कोटीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी  दिली.
            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कोल्हापूर हॉटल मालक संघ व कोल्हापूर डिस्ट्रीक्ट कार ऑपरेटर्स असोसिएशनच्यावतीने पर्यटन पर्व कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर पर्यटन जागृती व मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. येथील हॉटेल पॅवेलीयनच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त भुगोल विभाग प्रमुख डॉ. शहाजीराव देशमुख, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचे कोल्हापूर विभाग अधिकारी दिपक हर्णे, पर्यटन सल्लागार वासिम सरकवास, कोल्हापूर हॉटल मालक संघाचे सचिव सिध्दार्थ लाटकर,  कार ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब गयावळ आदिजण उपस्थित होते.
            कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या समितीतून चालना देण्यात आली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासाची अनेक कामे हाती घेतली आहेत. याबरोबरच श्री अंबाबाई मंदिरावर साडेचार कोटी रुपये खर्चुन आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखड्यांतर्गत 25 कोटींना मान्यता मिळाली असून  श्री अंबाबाई विकास आराखड्यातून 68 कोटीचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. याबरोबरच पन्हाळा येथे लाईट व साऊंड शो, शाहू जन्मस्थळाचा विकास, ऐतिहासिक माणगाव परिषद विकास आराखडा अशा अनेक पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांना प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले.
            पर्यटन क्षेत्रात कोल्हापुरचे नाव देशाबरोबरच जगाच्या नकाशावर यावे, देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे कोल्हापूर आकर्षण ठरावे, यासाठी कोल्हापूरचा आगामी 100 वर्षाच्या पर्यटन विकासाचे नियोजन करुन काम करणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी पायाभुत सुविधा निर्माण होणे गरजेचे असून यासाठी कोल्हापुरच्या जनतेने सक्रिय सहकार्य आणि मदत करण्यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. यामध्ये कोल्हापूर-नागपूर चौपदरीकरण रस्ता, सातारा-कागल सहापदरी रस्ता, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे, कोल्हापुरची विमान सेवा असे अनेक प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे असून यासाठी स्थानिकांनी पर्यटन विकासासाठी प्रसंगी त्याग करावा लागला तरी तो करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
            कोल्हापुरला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला असून पर्यटन क्षेत्रात कोल्हापुरची वेगळी ओळख निर्माण होत आहे. कोल्हापुरला पर्यटनाच्या दृष्टीने मोठी संधी असून या क्षेत्रात रोजगाराच्या संधी असल्याने या क्षेत्रात होणारी गुंतवणूक ही पर्यटन विकासाला चालना देणारीच ठरणार असल्याचे मत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले देशातील तसेच परदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कार ऑपरेटर्ससह पर्यटन क्षेत्रातील सर्वांनीच कोल्हापूरात येणाऱ्या पर्यटकाच्या प्रती आस्था पूर्वक वागणूक पर्यटकांचे आपले पाहुणे समजून आदरातीर्थ करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त भुगोल विभाग प्रमुख डॉ. शहाजीराव देशमुख म्हणाले, कोल्हापूर पर्यटन समृध्द जिल्हा असून येथील पर्यटन स्थळांची इतंभुत माहिती बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना योग्य पध्दतीने मिळणे गरजेचे आहे. पर्यटकांसाठी निवास व दळणवळणाची सुविधा महत्वाची असून याकामी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यटन विकासासाठी जोतिबा-पन्हाळा स्काय लिफ्टने जोडण्या बरोबरच विशालगड येथे आकाश पाळणा, गगनगड येथे पुष्प पठार आणि मसाई पठार येथे इको गार्डन अशा अनेकविध बाबी हाती घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
             पर्यटन सल्लागार वासिम सरकवास म्हणाले, कोल्हापुरला भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांना पाहुणे म्हणून वागणूक देण्यात कार ऑपरेटर्सनी पुढाकार घ्यावा. कोल्हापुरच्या पर्यटन स्थळाची माहिती आणि महती येथील ऐतिहासिक, सांस्कृतिक, खाद्य संस्कृती अशा सर्वच बाबींची माहिती आदरपूर्वक द्यावी. कार ऑपरेटर्स हे कोल्हापुरच्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसिटर असून पर्यटकांना आदरातीथ्याची अनुभूती मिळेल यादृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत आवाहनही त्यानी केले.
            प्रारंभी   कार ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब गयावळ यांनी स्वागत केले, कोल्हापूर हॉटल मालक संघाचे सचिव सिध्दार्थ लाटकर यांनी प्रस्ताविक केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचे कोल्हापूर विभाग अधिकारी दिपक हर्णे यांनी पर्यटन पर्व उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.  याप्रसंगी अमरजा निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारंभास हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उमेश राऊत, पथीक प्रतिष्ठानच्या अरुणा देशपांडे, पल्लवी कोरगावकर, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे,  अरुण चोपदार यांच्यासह अनेक मान्यवर आणि हॉटेल मालक संघ व कार ऑपरेटस असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन समीर देशपांडे यांनी केले.

0 0 0 0 0 0 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.