इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १९ जून, २०१८





डेंग्यू प्रतिबंधासाठी गुरूवार डास संहारक दिन
जिल्ह्यात डास निर्मूलन मोहिम युध्दपातळीवर राबवा
                                            - अध्यक्षा शौमिका महाडिक
कोल्हापूर, दि. 19 :  जिल्ह्यात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी दर गुरूवार हा डास संहारक दिन पाळून गाव, गल्ली स्वच्छ करणे तसेच डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबरोबरच  गुरूवार कोरडा दिवस पाळून आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डास निर्मूलन मोहिम युध्दपातळीवर राबवा, अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आज येथे बोलताना केली.
            जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने आजपासून राबविण्यात येणाऱ्या ‘ एकात्मिक डास निर्मुलन’ मोहिमेचा शुभारंभ अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात आयोजित केलेल्या जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार,आरोग्य सभापती सर्जेराव पाटील,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. मनिषा कुंभार,जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
            जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादूर्भाव डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद डेंग्यू प्रतिबंधासाठी गाव घटक धरून नियोजन केले असल्याचे सांगून, अध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, गाव पातळीवर डेंग्यू प्रतिबंधासाठी समिती स्थापन केली असून गावातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि  गावकऱ्यांच्या सक्रिय योगदानातून डास प्रतिबंधक मोहिम अधिक तीव्र केली जात आहे. यामध्ये गाव, गल्ली, गटारी, डासोत्पत्तीची स्थाने  स्वच्छ करण्याबरोबरच तुंबलेल्या गटारी वाहत्या करणे, शौचालयाच्या व्हॅट पाईपला जाळी बसवून गावातील दलदलीची ठिकाणे स्वच्छ करणे, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतून तीव्रतेने पाणी सोडून गटारी स्वच्छ करणे तसेच ग्रमापंचायतीच्या सहकार्याने गप्पी मासे सोडणे, जळके ऑईल ओतणे, फॉगींग करणे या गोष्टीस प्राधान्य दिले आहे.
            जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात 830 डेंग्यूची लोकांना  लागण झाली असून यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बाब गंभीर असल्याचे स्पष्ट करून अध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, डास प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या एकात्मिक डास निर्मुलन मोहिमेस सर्व यंत्रणांनी सक्रिय योगदान द्यावे, परस्पर समन्वय राखून ही मोहिम यशस्वी करावी. जिल्हा स्तरावर डास संव्हारक टिम कार्यान्वित केली असून या मोहिमेचा दर आठवड्याला आढावा घेवून तिला गती दिली  जाईल असेही त्या म्हणाल्या.
डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडण्यावर भर -- डॉ. खेमणार
            डास निर्मुलनासाठी जिल्ह्यात डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा प्रभावी कार्यक्रम हाती घेतला असून जिल्ह्यात आज मीतिस 420 गप्पी माशांची पैदास केंद्रे कार्यान्वित केली आहेत. यामध्ये शिरोळ तालुक्यात 65, हातकणंगले 47, करवीर 42, गगनबावडा 9, पन्हाळा 35, शाहूवाडी 38, कागल 43, राधानगरी 25, भुदरगड 24, आजरा 17, गडहिंग्लज 50 आणि चंदगड तालुक्यात 25 गप्पी मासे पैदास केंद्रे  कार्यरत आहेत. जिल्ह्यात गणना केलेली कायमस्वरूपी 1021 तर तात्पुरती 2174 डासोत्पती केंद्रे आहेत. मागील पाच वर्षात डेंग्यू, मलेरीया आणि चिकनगुनीया यांची 1452 जणांना लागण झाली असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी डास प्रतिबंधक मोहिम अधिक गतीने राबविण्यात सर्वांनी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले.
            डास निर्मुलनासाठी जिल्ह्यात जिल्हा, तालुका आणि गावनिहाय उपाययोजनांचा आणि आरोग्य शिक्षणाचा आराखडा तयार केला असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, डास निर्मुलनासाठी गुरूवार हा डास संहारक दिन घोषित केला आहे. गुरूवारी गाव ते जिल्हा सर्वत्र समान मोहिम हाती घेतील जाईल. यामध्ये तात्पुरती डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, न वापरात येणाऱ्या पाणीसाठ्यावर जळके ऑईल व डिझेल सोडणे, पिण्यासाठी वापरात न येणारे पाणीसाठी, बांधकामासाठीचे  पाणीसाठे टॉमीफॉसचा वापर करणे आणि गावा-गावात फॉगींग धूर फवारणीचा कार्यक्रम युध्द पातळीवर हाती घेतला आहे.         
            " डंख छोटा धोका मोठा " या  घोषवाक्यानुसार डास निर्मुलनाचे काम एक मोहिम म्हणून हाती घेतले  असून यंत्रणेबरोबरच जनतेनेही या मोहिमेत सहभागी होवून ही मोहिम सामूहिक प्रयत्नाव्दारे यशस्वी करावी, असे आवाहन करून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, जून ते ऑक्टोबर हा कालावधी डासांचा प्रजनन काळ असल्याने डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यावर भर दिला आहे. यासाठी  गप्पी मास्यांची पुरेश्या उपलब्धता करण्यात आली आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात योग्य समन्वय  ठेवून ही मोहिम गतीमान केली जाईल. दर आठवड्याला या मोहिमेचा अहवाल घेवून त्यावर कार्यवाही केली जाईल. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून डास निर्मुलन मोहिम यशस्वी करावी. या कामास सर्वानीच सर्वोच्चा प्राधान्य द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
            आरोग्या सभापती सर्जेराव पाटील यावेळी बोलताना म्हणाले, डास निर्मुलनासाठी आजपासून सुरू होत असलेल्या एकात्मिक डास निर्मुलन मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे. स्वच्‍छता, दक्षता याबरोबरच आरोग्य शिक्षण या बाबींना प्राधान्य  देणे गरजेचे आहे. गावातील पाण्याच्या टाक्या महिन्यातून एकदा स्वच्छ करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगश साळे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात एकात्मिक डास निर्मुलन मोहिमेची सविस्तर माहिती दिली. डासांचे प्रकार, त्यांचा जीवनचक्र कालावधी, आयुष्य मर्यादा आणि त्यांची जीवनशैली, याबरोबरच डेंग्यू आणि हिवतापाची लक्षणे आणि उपाययोजना याची माहिती दिली. आणि गावपातळीवर करावयाच्या योजना विषद केल्या. शेवटी डॉ. दातार यांनी आभार मानले. या कार्यशाळेस आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.