इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २० जून, २०१८

जिल्ह्याचा 365 कोटीचा योजना आराखडा उपलब्ध निधीचे परीपूर्ण प्रस्ताव 1 ऑगस्टपूर्वी सादर करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील



पंचगंगा काठावरील गावांसाठी सांडपाणी निर्गतीची विशेष योजना
                      
              कोल्हापूर, दि. 20  :  जिल्हा वार्षिक योजनेअंर्तग्त या वर्षासाठी जिल्ह्यास 364 कोटी 83 लाखांचा आराखडा मंजूर केला असून या आराखड्यातील एकही पैसा परत जाणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्व योजनांचे परीपूर्ण प्रस्ताव लोकप्रतिनिधी आणि सदस्यांच्या मागणी /सूचनांसह येत्या 1 ऑगस्टपूर्वी जिल्हा नियोजन समितीस सादर करावेत, या कामात कसलीही हयगय सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
        जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सदाशिव साळुंखे,  जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी,सदस्य-सदस्या, अधिकारी उपस्थित होते.
यंदा जिल्ह्यासाठी 364 कोटी 83 लाखाचा आराखडा
              यंदा जिल्ह्यासाठी 364 कोटी 83 लाखाचा आराखडा मंजूर केला असून यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 263 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 113 कोटी 41 लाख आणि ओटीएसपीसाठी 1 कोटी 90 लाखाच्या तरतूदीचा समावेश असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आजअखेर शासनाकडून 273 कोटी 12 लाखाचा निधी प्राप्त झाला असून या निधीच्या खर्चाचे सुक्ष्म नियोजन करावे. हे करताना लोकप्रतिनिधी आणि सदस्यांना विश्वासात घेवून त्यांच्या मागणीचा यामध्ये समावेश करावा. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपलब्ध निधी 100 टक्के खर्च करण्याच्या दृष्टिने सर्व खातेप्रमुखांची दरमहा विशेष बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी त्यांनी जाहीर केला. तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध योजनांतर्गत केलेल्या विकास कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून मुल्यांकण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
गेल्यावर्षी अनुसूचित जाती योजनेचा 100 टक्के खर्च : जिल्हा राज्यात प्रथम
              जिल्ह्यात गेल्या वर्षी  जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मार्चअखेर 364 कोटी 83 लाखाचा खर्च करण्यात आला असून हा खर्च उपलब्ध निधीच्या 99.03 टक्के आहे. यामध्ये अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 100 टक्के खर्च करून कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम आल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  यावेळी सांगितले. यामध्ये  जिल्हा सर्वसाधारण योजनेअंतर्गत 249 कोटी 52 लाख, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 113 कोटी 41 लाख  तर ओटीएसपी अंतर्गत 1 कोटी 90 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पंचगंगा काठावरील गावांसाठी सांडपाणी निर्गतीची विशेष योजना
              पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पंचगंगा नदी काठावरील जिल्ह्यातील गावांसाठी सांडपाणी निर्गतीच्या दृष्टिने 4-5 गावांचे एक क्लस्टर तयार करून विशेष योजना हाती घेतली जाईल. याबरोबरच पंचगंगा नदी काठावरील सर्वच गावांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने आरओ सिस्टिम हाती घेतला जाईल. यासाठी इतर योजना तसेच सीएसआरमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच नगरोत्थानमधून नगरपालिकांना दिला जाणाऱ्या निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र देणे संबधित नगरपरिषदांना बंधनकारक केले आहे. याशिवाय निधी उपलब्ध होणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
निमंत्रित सदस्यांनाही या वर्षीपासून निधी
              जिल्हा नियोजन समितीतील जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणाऱ्या निधीच्या धर्तीवर निमंत्रित सदस्यांनाही या वर्षीपासून निधी उपलबध करून दिला जाईल, अशी घोषणा करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्यावर्षी साकव उभारणीसाठी 33 कोटी रूपये उपलबध करून दिले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ही साकवांची कामे पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली. रंकाळा तलाव तसेच पंचगंगा  नदीमध्ये निर्माण झालेली जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेला मशिन उपलब्ध करून दिले जाईल, यासाठी महापालिकेने प्रस्ताव तात्काळ द्यावा.  रंकाळ्यातील जलपर्णी काढल्यानंतर पंचगंगा नदीवरील जलपर्णी प्राधान्याने काढावी याकामी पाटबंधारे विभागाने पुढाकार घ्यावा,अशी सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
रस्त्यांचे  खड्डे भरण्यात पुढील वर्षी 20 कोटीची तरतूद
              अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेला गेल्या वर्षी 12 कोटी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून ग्रामीण भागातील 1200  कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे  खड्डे भरण्यात येणार आहेत.  या कामाची निविदा प्रकीया, वर्क ऑडर्स या बाबी तात्काळ पूर्ण करून पावसाळ्यानंतर ही कामे तात्काळ हाती घेण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. पुढील वर्षी या कामांसाठी 20 कोटीपर्यत तरतूद केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी या बैठकीत केली. रस्त्याची कामे अधिक दर्जेदार करण्याची सूचनाही त्यांनी केल्या. याबरोबरच जिल्हा परिषदेकडील पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करून जनतेला पिण्याचे शुध्द पाणी उपलबध्‍ करून देण्यास प्राधान्य राहील, या कामांचे योग्य नियोजन आणि प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
जलयुक्त शिवार अंतर्गत 80 गावांची निवड : अन्य गावांत लोकसहभागातून कामे
              जलयुक्त शिवार अभियानातून गावागावात शाश्वत जलसाठे निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 80 गावांची निवड केली आहे. या योजनेत न बसलेली मात्र जलयुक्त शिवारची कामे घेणे आवश्यक आहे, अशा गावांमध्ये गावकऱ्यांनी पुढाकार घेवून गावातील तलाव तसेच गाळ काढणे आदी जलसंधारणाच्या प्रणालीचा गावनिहाय आराखडा तयार करावा, यासाठी लोकसहभाग आणि सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.  गावाला लागणारी वीज सौरऊजा प्रकल्पाद्वारे निर्माण करुन गावाची वीजेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर उर्जा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. मात्र यासाठी गावाने 5 एकर जागा उपलब्ध करुन दिल्यास असे प्रकल्प राबविणे सोईचे होणार आहे. 
              आडवाटेवरचं कोल्हापूर या उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर आता जिल्ह्यातील 4 धार्मिक तीर्थक्षेत्रे लोकांना पाहण्यास उपलब्ध व्हावीत, यासाठी येत्या श्रावण महिन्यात आठवड्यातून एक अशा सहलींचे आयोजन केले जाईल. या उपक्रमाचा जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  यावर्षीच्या आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यापुढील काळात जिल्ह्यात जेथे जेथे महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची गरज आहे, तिथे- तिथे संबंधितांनी तयारी दर्शविल्यास शौचालयाची उभारणी मोफत करुन दिली जाईल, मात्र यासाठी स्वच्छतेची आणि देखभालीची जबाबदारी स्विकारणे गरजेचे आहे.
 डॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत विधानसभा मतदार संघासाठी 1 कोटीचा निधी
              भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना जाहीर करुन या योजनेंतर्गत दलितवस्ती विकासासाठी 300 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.  या योजनेंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी 1 कोटीचा निधी दलित वस्ती विकासासाठी उपलब्ध होणार असून त्यानुसार जिल्ह्यातील आमदारांनी आपली कामे सुचवावीत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  
डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा-पालकमंत्री
              जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी विशेषत: डास निर्मुलनासाठी प्रभावी उपाययोजना करावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. डेंग्यू प्रतिबंधक उपाय योजनांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जनजागृतीचा आणि प्रबोधनाचा भरीव कार्यक्रम हाती घ्या, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. जिल्हा परिषदेने हाती घेतलेली  ‘ एकात्मिक डास निर्मुलन’ मोहिम डास निर्मुलनासाठी उपयुक्त ठरणार असून ही मोहिम सर्व यंत्रणांच्या सक्रिय सहभागातून आणि लोक सहभागातून यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डास निर्मुलनासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी पॉवर पाँईंट प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना दिली.
              याबैठकीत खासदार धनंजय महाडिक यांना दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यबद्दल आणि पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांची राज्य शासनाने उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल या मान्यवरांच्या अभिनंदनाचे ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा नियोजन समितीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
              या बैठकीत कृषी, पाणीपुरवठा, ऊर्जा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, अनुसूचित जाती घटकांसाठीच्या योजना आदी विषयांबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. 
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.