गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

राष्ट्रीय एकता,अखंडतेचा संदेश देत धावले कोल्हापूरकर लोहपुरूषांचे एकतेचे कार्य प्रेरणादायी - डॉ. देशमुख










       कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देत राष्ट्रीय एकता दौडीच्या निमित्ताने कोल्हापूरकर आज धावले. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकतेचे कार्य नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी यावेळी केले.
       सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ 31 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा होत आहे. आज कोल्हापुरात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त्‍  रन फॉर युनिटी एकता दौड काढण्यात आली.  या एकता दौडीचा शुभारंभ कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलीत करुन तसेच  हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी  राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथही घेण्यात आली
       दसरा चौकात सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस विशेष पोलीस महानिरीक्षक  डॉ. वारके  यांच्या हस्ते पुषपहार अर्पण करुन या एकता दौडीस सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी प्रसाद संकपाळ, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, क्रीडा प्रबोधिनीचे कुस्ती प्रशिक्षक कृष्णा पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस जवान, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थींनी, खेळाडू तसेच क्रीडा प्रेमी जनता उपस्थित होती. 
          दसरा चौकातून सुरु झालेली ही एकता दौड पुढे लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, वाणिज्य महाविद्यालय, टेंभे रस्ता, केशवराव भोसले नाट्यगृह, प्रायव्हेट हायस्कूलमार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे येऊन या एकता दौडीचा समारोप करण्यात आला. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देण्यात या दौडीत देण्यात आला. या एकता दौडीमध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू जयश्री बोरगी आणि राष्ट्रीय धावपटू स्मिता माने यांचा प्रमुख सहभाग तसेच पोलीस बँड  हे या दौडीचे मुख्य आकर्षण होते.  छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची महती सांगण्यात आली. तसेच राष्ट्रगीतांने या दौडीचा समारोप करण्यात आला.      
लोहपुरूषांचे कार्य प्रेरणादायी - डॉ. देशमुख
          या प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकता, एकात्मता आणि अखंडतेचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे. देशात भौगोलिक ऐक्य आणि एकसंघता साधण्याचे ऐतिहासिक काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरात पोलीस संचलन आयोजित करून एकतेचा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
          या प्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, भारत देश एकसंघ ठेवण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले आहे. अशा या भारताच्या लोहपुरुषाचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर हा संपूर्ण देशभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जात आहे. प्रारंभी तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले.                                        
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.