इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

एचआयव्ही विषयी कामगारांच्या जनजागृतीसाठी बैठकीचे आयोजन करा -जिल्हाधिकारी दौलत देसाई



            कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : विविध कारखान्यांमध्ये असणाऱ्या कामगारांच्यात एचआयव्हीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी कामगार आयुक्त, कारखानदार यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
         जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात झाली. जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी सुरुवातीला मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन केले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर यांनी संगणकीय सादरीकरण करून गेल्या तीन महिन्यातील जिल्ह्याचा आढावा दिला. यामध्ये जिल्ह्यातील संसर्गीतांचे प्रमाण कमी होत चालले असून त्यांना नियमित औषधोपचार सुरु आहे. एचआयव्ही संसर्गाबाबत पूर्णपणे गोपनीयता ठेवली जाते. त्याबाबत संबंधितांच्या नातेवाईकांनाही माहिती दिली जात नाही, असेही त्यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, संसर्गीतांना केएमटीच्या बसचा लाभ मिळवून देण्यासाठी महापालिका आयुक्तांना पत्र द्यावे. त्याचबरोबर संग्रामचे काम पोलीस संरक्षणात करण्याबाबत  पोलीस अधीक्षक यांनाही पत्र द्यावे. संजय गांधी योजनेच्या फायद्यासाठी 15 वर्षे रहिवासाची अट शिथिल करण्याबाबत शासनाकडे एक प्रस्ताव पाठवा. औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या कारखान्यातील कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी कारखानदार, कामगार आयुक्त यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करा. कामगारांमध्ये विश्वास निर्माण करुन त्यांना सुविधा पुरवा.
            गोकुळ शिरगाव मॅनिफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांनीही यावेळी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी विविध 9 संघटनांच्या बैठकीमध्ये हा विषय मांडण्याचे अश्वासन दिले. यावेळी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्र
        तृतीयपंथीयांचे जुन्या नावावर आणि जुन्या छायाचित्रावर सद्या मतदान ओळखपत्र आहे. परंतु तृतीयपंथीयांच्या सद्या नाव आणि ओळखही नवी आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत, अशी माहिती श्रीमती शिपुरकर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील अशा सर्व तृतीयपंथीयांची यादी सादर करुन त्याबाबतची माहिती एकत्रित ऑनलाईन भरावी. तृतीयपंथीयांना नव्या नावावर आणि नव्या छायाचित्रासह नवीन मतदान ओळखपत्र दिले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी दिले.

            याबैठकीला डॉ. सुनील कुरुंदवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अभिजीत वायचळ, डॉ. इमरान जमादार, मैत्री संघटनेच्या अंकिता आळवेकर, बी.जी.काटकर, मोटर वाहन निरीक्षक सुभाष देसाई, डॉ. एस.आर.जगताप, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे डॉ. पी.पी.पाटील, अमित गायकवाड, अक्षरा आळवेकर, जयदिप उबाळे, महेश रावळ, इस्माईल शेख, मोहन सातपुते आदी उपस्थित होते.   
           
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.